उत्तर भारतातील बुंदेलखंडचा परिसर म्हणजे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि माळव्याचा ३००० चौ. मैलचा भाग या साम्राज्यात मोडत होता. चंबळ, यमुना, नर्मदा, टोंस केन, धसाळ, पार्वती, सिंधू, बेतवा, जामनेर या १० नद्यांचा प्रदेश म्हणजे बुंदेलखंड देवीपुढे आपले शिर कलम करून तिच्या आशीर्वादाने जे राज्य निर्माण केले त्याला बुंदेलखंड म्हटले जाते. या वेळी देवीच्या चरणावर जे बूंद म्हणजे थेंब पडले त्याला बुंदेल म्हटले गेले. छत्रसालचा पिता चंपतराय हा स्वाभिमानी असून मोगलांच्या विरोधात त्याने उघड संघर्ष केला. औरंगजेबाने त्याच्या भाऊबंदांना हाताशी धरून त्याचे राज्य घेतल्याने हताश होऊन चंपतरायने आपल्या पत्नीसह आत्महत्या केली.
या वेळी छत्रसाल बुंदेला यांचे वय केवळ १२-१४ वर्षांचे होते. तेव्हा मामा साहेबसिंह धंधरे आणि भाऊ अंगदराय यांच्या नेतृत्वाखाली छत्रसाल बुंदेला यांनी सैनिक शिक्षण पूर्ण केले. पुढे देवासच्या पवार घराण्यातील देवकुंवारीशी विवाह होऊन त्यांना जगतराय आणि हरेदशाह ही दोन मुले झाली. मोगलांशी बदला घेण्याची इच्छा असूनही स्वत:ची ताकत कमी असल्याने छत्रसालने मिर्झाराजे जयसिंहाच्या सैन्यात चाकरी धरली. आपल्या पराक्रमाने छत्रसालने औरंगजेबाला अनेक प्रांत मिळवून दिले. मिर्झाराजा हा औरंगजेबाचा मांडलिक असल्याने १६६५ ला बादशहाने त्याला छत्रपती शिवरायांच्या विरोधात पाठविले. त्यात छत्रसालही होता. या वेळी राजांना मोगलांपुढे शरणागती पत्करावी लागली होती. उत्तरेतील अनेक राजांनी मोगलांना स्वत:च्या मुली देऊन त्यांची चाकरी पत्करली होती. तेव्हा शिवाजी महाराज मात्र स्वत:च्या हिमतीवर औरंगजेबाशी दोन हात करत होते.
औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूपुढे उत्तर भारतातील बहुतांश राजांनी लोटांगण घातले असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या लढ्यामुळे औरंगजेबाचा सेवक असलेल्या राजा छत्रसालला त्याचे आश्चर्य वाटले. महाराजांचा आदर्श घेऊन राजा छत्रसालने मोगलांविरोधात बंडाचा झेंडा उभा करून बुंदेलखंडात स्वत:चे राज्य निर्माण केले. छत्रसालच्या स्वराज्य उभारणीमागे राजांची प्रेरणा व संघर्ष या दोन्ही गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत
No comments:
Post a Comment