Followers

Sunday, 21 June 2020

किल्ले चाकण अथवा संग्रामदुर्ग

#दुर्लक्षित दुर्गांचा अपरिचित इतिहास :





किल्ले चाकण अथवा संग्रामदुर्ग
लेख क्र. -2

“दर्द कहाँ तक पाला जाए,
युद्ध कहाँ तक टाला जाए
तू भी है राणा का वंशज,
फेंक जहाँ तक भाला जाए”

वरील कवितेतील ओळी वाचल्या की डोळ्यापुढे उभा राहतो चाकणच्या संग्रामदुर्गाचा मराठ्यांनी मुघलांविरुद्ध दिलेला रणसंग्राम.
मित्रांनो, इतिहासाच्या पानापानांत आणि सह्याद्रीच्या कणाकणात इतिहास दडलाय. फक्त गरज आहे शोध घेण्याची. 'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा' हे उगीच नाही म्हटलं जात.
जसे की शांत झालेल्या निखा-यांना गरज असते फक्त एकदाच फुंकर मारायची मग त्याच निखाऱ्यात पुन्हा अग्नी प्रज्वलित होतो. अगदी तसंच काहीसे मराठ्यांचे रणांगणातील शौर्य आहे. चाकणचा किल्ला उर्फ संग्रामदुर्गाचा इतिहास काहीसा असाच आहे आणि आजच्या ह्या लेखमालेच्या दुसऱ्या लेखात याच दडलेल्या इतिहासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

नमस्कार मित्रांनो,
मी तुषार भोर तुम्हां सर्वांचे स्वागत करतो आपल्या आवडत्या लेखमालेच्या दुसऱ्या भागात "दुर्लक्षित दुर्गांचा अपरिचित इतिहास " किल्ले चाकण किंवा संग्रामदुर्ग.
संग्रामदुर्ग हा स्थलदुर्ग किंवा भुईकोट या प्रकारात मोडतो. बरोबर आजपासून सुमारे ३६० वर्षांपूर्वी हा संग्राम घडला होता.२१जुन १६६० रोजी सुरु झालेले युद्ध हे नुसतेच मराठा विरुद्ध मुघल असे नव्हते तर धर्मांध विकृत सत्ताधीशांविरुद्ध स्वधर्माच्या आणि स्वदेशाच्या रक्षणासाठी एका कल्याणकारी राजाच्या नेतृत्वाखाली लढलेले स्वराज्यातील अनेक लढायांपैकी महत्वपूर्ण युद्ध होते. युद्धातील विजयाचे पारडे हे जर संख्या बळावर निश्चित होत असेल तर मला गर्व आहे मी महाराष्ट्रात एक मराठा म्हणून जन्माला आल्याचा की या मातीने हा नियम मराठ्यांच्या इतिहासात आपल्या मर्दुमकीने बदलला. आजच्या आपल्या देशावर चीनरूपी संकटावर मात करण्यासाठी यापेक्षा वेगळे उदाहरण मला नाही वाटत शोधून सापडेल.
तसं पहिलं तर हा दुर्ग बहमनी काळात बांधल्याचा उल्लेख मिळतो परंतु ह्या किल्ल्यास खरी प्रसिद्धी मिळाली ती शिवकाळात.
छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचे पारिपत्य करून अवघ्या १८ दिवसात स्वराज्याचा विस्तार पन्हाळ्यापर्यंत केला. त्यामुळे चिडलेल्या आदिलशहाने महाराजांवर सिद्दी जोहर या हबशी सरदाराला नामजाद केले. महाराज पन्हाळ्यावर वेढ्यात अडकल्याने मुघल सरदार शास्ताखान उर्फ शाहिस्तेखान २१००० सैन्यानिशी चाकण वर चालून आला ती तारीख होती आजची म्हणजे २१जुन १६६०, चाकण च्या दुर्गाला आपण एका दिवसात घेऊ हे स्वप्न पाहणाऱ्या खानाचा अहंकार मराठयांनी संग्रामदुर्गाच्या तटबंदी पलीकडेच चिरडला. जवळ जवळ २१०००हजारांची फौज आणि अनेक तोफा घेऊन आलेल्या खानाने आपली छावणी किल्ल्याच्या उत्तर दिशेला टाकली जिथे आज बांधकामे करून अतिक्रमण करण्यात आले आहे. या दिशेला किल्ल्याची सलग तटबंदी दिसते.
खानाने सुरुवातीचा हल्ला फोल गेल्यावर नेटाने तोफांचा मारा चालू ठेवला, पण मराठे काही हटायला तयार नव्हते कारण संग्रामदुर्गाच्या तटबंदी पेक्षा मराठ्यांच्या मनाची तटबंदी अभेद्य होती. आणि तसाच कणखर, धीट मनाचा किल्लेदार फिरोंगोजीबाबा नरसाळा मराठ्यांना लाभला होता,
युद्ध दोन्हीही बाजूने सुरु होते. दिवसभर लढलेले मुघल सैनिक जेव्हा रात्री सुस्तावत तेव्हा मराठे गपचूप दिंडी दरवाज्यातून येऊन कापाकापी करून परत पळून जात. जवळ जवळ ५४ दिवस झाले तरी किल्ला पडेना. तिकडे महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटले हे ऐकून तर खान अधिकच बैचैन झाला.
शेवटी खानाने किल्ल्याच्या ईशान्य भागातील बुरुजाखाली भुयार खणून त्यांत दारू ठासली आणि स्फोट घडवून आणला, बुरुजावरील सैनिक अक्षरशः दगडांप्रमाणे हवेत भिरकावले गेले. किल्ल्याची ही बाजू ढासळली. मुघल आत शिरले तरी मराठे आतील बालेकिल्ल्याच्या सहाय्याने दिवसभर लढले आणि किल्ला झुंजता ठेवायचा प्रयत्न केला. किती अचाट हे धाडस एकवीस हजार विरुद्ध तिनशे पन्नास मावळे. इतिहासाच्या काळपुरुषाला एकदा हिम्मत करून विचारा कुठून आणतात मराठे हे जीवावर उदार होण्याचे सामर्थ्य? काय दिले होते महाराजांनी या लोकांना? जहागीरी की वतने की सोन्या चांदीचे दागिने? काहीच नाही. महाराजांनी या सर्वांना दिला होता एक विश्वास, स्वतःच्या राज्याचा, हिंदूंच्या राज्याचा, भगव्याची आण घेऊन लाख मोलाचा मंत्र दिला होता महाराजांनी. म्हणूनच तर हे सर्व लढत होते अगदी सह्याद्रीच्या कातळावाणी कणखरपणे. या युद्धात दोन्हीकडचे असंख्य सैन्य मारले गेले, मुघलांची २६८ माणसे ठार झाली तर ६०० जखमी झाली
अखेर दुसऱ्या दिवशी चाकणचा संग्रामदुर्ग मराठ्यांनी शास्ताखानाच्या हवाली केला. तर असा हा इतिहासात अपरिचित असलेला छोटासा स्थलदुर्ग प्रकारातील किल्ला या मराठ्यांच्या संग्रामानंतर प्रसिद्ध पावला आणि मराठ्यांच्या चिवट, मोडेन पण वाकणार नाही या वृत्तीची चुणूक खानास दाखवून गेला.
१६६० मध्ये गमावलेला संग्रामदुर्ग महाराजांनी १६७० मध्ये पुन्हा घेतला. परत मुघलांकडे १७०३ मध्ये असण्याची नोंद मिळते. त्यानंतर मराठ्यांचा साम्राज्य विस्तार होऊन सुद्धा १७५५पर्यंत हा किल्ला स्वराज्यात नव्हता. २९नोव्हेंबर रोजी चाकणचा दुर्ग मराठ्यांच्या ताब्यात आला, पुढे १८१८ मध्ये इंग्रज अधिकारी कर्नल डिकनने हा किल्ला मराठ्यांकडून घेतला.
चाकणच्या संग्रामदुर्गाचे वर्णन श्री. बाबासाहेब पुरंदरेंनी फार सुरेख शब्दात केले आहे. ते म्हणतात, " चाकणचा दुर्ग म्हणजे जणू काही मांडी घालून बसलेला बलदंड भीमच आहे !"
चाकणचा दुर्ग ३ एकरमध्ये पसरलाय, पन्नासफूटी तटबंदी आणि १०ते १२ फुटी रुंदी असलेल्या भक्कम तटबंदी आणि बाहेरून असलेल्या खंदकामुळे हा किल्ला सामरिक दृष्ट्या अवघड होता, त्यामुळे स्थलदुर्ग प्रकारातील असून सुद्धा कणखर नेतृत्वाच्या भरोशावर सहजासहजी पडणारा नव्हता.
परंतु काळाच्या ओघात आणि वाढत्या अतिक्रमणामुळे सदर खंदक नसल्यात जमा झालाय. श्री. सतीश अक्कलकोट सरांच्या दुर्ग नामक पुस्तकातील उल्लेखानुसार "दुर्गामध्ये पूर्वाभिमुख प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर वाट उजव्या हाताकडे वळते थोडे पुढे गेल्यावर या वाटेने येणारा शत्रू तटावरील सैनिकांकडून घेरला जाईल अशी अनोखी पद्धत या दुर्गाचे वैशिष्ट्य आहे यास रणमंडळ असे म्हटले जाते. आत एक तोफागाडा पाहण्यास मिळतो आणि बालेकिल्ल्याच्या खाणाखुणा सुद्धा पाहण्यास मिळतात. शासनाची उदासीनता आणि स्थानिक गावकऱ्यांच्या निष्काळजीपणाची मोठी किंमत आज चाकणचा संग्रामदुर्ग चुकवत आहे. वेगाने विकसित होणाऱ्या चाकण शहराच्या विकासाची झळ किल्ल्याला बसलेली आहे. किल्ल्याच्या मधून शहरातील रस्ता नेऊन कुठेतरी अधिकृतरीत्या या ऐतिहासिक स्थळाच्या नामशेषाची मुहूर्तमेढ रोवली आहे. आज तटबंदी वगळता किल्ल्यात एक विष्णू मंदिर आणि एक मस्जिद आहे. तसे पहिले तर किल्ल्याचे ''अवशेष" आता "शेष" राहिलेच नाहीत असे म्हणावे लागेल शिल्लक राहिलाय तो फक्त मराठ्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर संग्रामदुर्गाचा संग्राम जो ओरडून ओरडून हेच सांगत आहे माझे नाव सार्थ केले ते मराठ्यांनीच. म्हणून तर संग्रामदुर्गाच्या इतिहासात मराठ्यांची ही अभूतपूर्व लढाई अमर झाली. सदर लढाईने मराठ्यांच्या धीरोदत्त आणि वीरोचित सामर्थ्याचे दर्शन मुघलांना दिले, आणि पुन्हा एकदा हे निर्देशित झाले की, मराठ्यांचे किल्ले जिंकणे जितके कठीण त्यापेक्षा जास्त मराठ्यांना युद्धात पराभव करणे दुर्धर.
मित्रांनो दुर्लक्षित दुर्गांच्या अपरिचित इतिहास या लेखमालेत या किल्ल्याची निवड करण्याचा हाच हेतू आहे की अशाप्रकारे आपणच आपला इतिहास हळू हळू पुसत चाललोय आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला यापासून वंचित करत चाललो आहोत. हे जर होऊ द्यायचे नसेल तर प्रत्येक दुर्गाचे संवर्धन झालेच पाहिजे, हे नुसते दुर्ग नाहीत तर महाराजांपर्यंत पोहचण्याची एक कडी आहे हे विसरून चालणार नाही.
या दुर्लक्षित दुर्गांच्या उत्थानासाठी सखा सह्याद्री तर्फे हा छोटासा प्रयत्न.

तर मित्रांनो सदर लेख कसा वाटला जरूर कळवा आणि आपल्या सखा सह्याद्री page ला like, share आणि comment करा. लवकरच भेटू पुढील भागात एका नव्या किल्ल्यासोबत तोपर्यंत
लेखनसिमा.

श्री शिव सेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.

Tuesday, 2 June 2020

वाफगावचा स्थलदुर्ग (भुईकोट)

वैभव महाराष्ट्राचे!

होळकरांचा वैभवशली इतिहासाचा अनुभव घेण्यासाठी


वाफगावचा स्थलदुर्ग (भुईकोट) प्रत्यक्ष पहावे. सध्या हा किल्ला रयत शिक्षण संस्थेला बक्षीस रूपात दिलेला आहे. राजगुरूनगर पासून बारा कि. मी. अंतरावर वाफगाव आहे. गावातच प्रशस्त किल्ला असून त्याच्या एका बाजूस नदी आहे. वाफगावात उतरल्यावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वोभव स्मृती असे नाव असलेली वेस नजरेस पडते. किल्ल्याच्या प्रमुख प्रवेश द्वरावर शिक्षण संस्थेचे नाव लिहिलेले आहे. महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय वाफगाव. किल्ल्याची तटबंदी व बुरूज मजबुत दगडात असून प्रवेशद्वारावर लोखंडी सुळे असलेला दरवाजा आहे. प्रवेशद्वारा बाहेर तटबंदीच्या कडेला चुन्याचा घाणा दिसतो. गडाला दोन प्रशस्त प्रवेशद्वारे आहेत, त्यास लाकडी दरवाजे आणी दिंडी दरवाजा ही आहे. गडाची तटबंदी दोन टप्प्यात आहे. किल्ल्याच्या आत राजदरबार, राजमहाल, अंधारी विहीर, होळकर कालीन तोफा, काही मंदिरे (विष्णू - लक्ष्मी, विष्णू पंच्याती, मांगीर बुवा), बावडी, राजमहालाची तटबंदी, होळकर कालीन भव्य गुफा पाहाण्यास मिळतात. राजदरबाराचा आतून काही भाग पडला असून राजमहाल हा दुमजली असून मजबूत स्थितीत आहे. राजमहालाच्या आत होळकर कालीन सुबक लाकडी काम पाहावयास मिळते. या महालास राणीचा महाल म्हणून ओळखला जातो. तटबंदीमधील एका विशाल बुरूजात बांधलेली खोल विहिर हे या किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहे. हा किल्ला महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांचे जन्मस्थान आहे. या किल्ल्याचे बांधकाम हे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या राज्यकाळामध्ये सुरू होऊन राणी अहिल्यादेवी यांच्या राज्यकाळात पूर्ण झाले असे सांगतात.

होळकरकालीन किल्ल्याच्या बाहेर राजराजेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी स्वरूपाचे असून या मंदिराची बांधनी राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केलेली आहे. या मंदिरासमोर दगडी मेघडबरीमध्ये नंदीची भव्य वास्तू स्थित असून नंदीच्या गळ्यातील घंटा व रेखीव काम सुरेख आहे. हे मंदिर बंदिस्त स्वरूपात आहे. या मंदिरच्या नक्षीदार बांधकामात महेश्वर किल्ल्याची समरूपता पाहवयास मिळते. मंदिराच्या बाजूच्या चौथऱ्यावर पूर्वी धर्मशाळा होती. मंदिराच्या गाभाऱ्यात आजही होळकर कालीन पूजेच्या पुरातन वास्तू पाहावयास मिळतात. एका कलशावर "तुकोजी होळ"अशी अक्षरे दिसतात. एक नक्षीदार घंटी आणि शिसवी पेटी आहे. या मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजाचे वेगळेच वैशिष्ट्य म्हणजे सध्याच्या लॅच पद्धतीची कुलूप कशी असतात तशी कुलुपाची पद्धत आहे. दरवाजा लोटून घेताच आतून कडी लागते आणि एका लांब चपट्या किल्लीनेच ते उघडता येते.
किल्ले वाफगाव, ता. खेड, जि. पुणे

# आम्हास वेड सह्याद्रीचे!

Saturday, 30 May 2020

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 🚩






पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  🚩

चोंडी ता. जामखेड , जि. अहमदनगर
हे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान आहे. याच गावात 31 मे 1725 रोजी अहिल्यादेवींचा जन्म झाला . पुढे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडोजीराव होळकरांशी त्यांचा विवाह झाला. अहिल्यादेवी बालपणापासूनच शुर, चाणाक्ष, तल्लख व कुशाग्र बुद्धीच्या होत्या. पुढे 1754 मध्ये खंडोजीराव होळकर कुंभेर या ठिकाणी झालेल्या लढाईत मारले गेले.सासरे मल्हारराव अहिल्याला म्हणाले, "माझा खंडू गेला म्हणून काय झालं? तुझ्या रूपानं माझा खंडू अजून जिवंत आहे. तू सती जाऊ नकोस." अहिल्यादेवींनी ते ऐकलं.अहिल्यादेवींच्या हाती सत्तेची सुत्रे दिली गेली. त्यांनी अनेक ठिकाणी शत्रुला धुळ चारून लढाया जिंकल्या. अहिल्यादेवी या उत्तम तिरंदाज होत्या. त्या उत्तम न्यायाधिश, उत्तम प्रशासक होत्या. त्यांनी महिलांची फौज निर्माण केली होती .उत्तर भारतात माहेश्वरी येथे 27 वर्षे त्यांनी राज्य केलं.
चोंडी या ठिकाणी आजही त्यांचा राहता वाडा आहे. वाड्यामध्ये अहिल्यादेवींच्या गौरवशाली इतिहासातील अनेक प्रसंगांची शिल्पे बनवण्यात आलेली आहेत. वाड्याबाहेर त्यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा व स्मृती स्तंभ उभारण्यात आलेला आहे.
एका छोट्याशा गावात सामान्य कुटूंबात जन्माला आलेली मुलगी आपल्या शौर्य आणि कर्तृत्वाच्या जोरावर उत्तर भारतात राज्यकर्ती बनू शकते. आजच्या युवकांनी अशा महापुरुषांच्या संघर्षमय जीवनकार्याचा आदर्श घेतल्यास आजचा तरुण परिस्थितीवर रडत बसणार नाही, तर तो परिस्थितीशी धैर्याने लढेन आणि निश्चितच प्रगती करू शकेन. अहिल्याबाई होळकर यांच्या राज्य बरखास्तीचा डाव राघोबा पेशवे यांनी आखला होता.तो चानाक्षपणे अहिल्याबाई होळकर यांनी ऊधळून लावला.
महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा वारसा घेऊन
आदर्श राज्यकारभार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी असेच होते. त्यांच्या प्रत्येक कामात दूरदृष्टी दिसून येत .व्यक्तिगत जीवनात अहिल्याबाईंनी अनेक संकटांना तोंड देत सुमारे 28 वर्ष राज्यकारभार केला. पण या सगळ्या कारभारात अहिल्यादेवींनी स्वतःची अशी अर्थनीती व जलनीती ठरवली .महिला असूनही राजसत्तेचे नेतृत्व कसे असावे याचे उत्तम उदाहरण अहिल्याबाईंनी घालून दिले. राज्यातील शेतकरी कष्टकरी उपेक्षित वर्ग हा त्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू होता .शिवाय कसण्यास दिलेल्या जमिनीत शेतकऱ्यांनी वीस फळझाडे लावावीत त्यातील 11 झाडे सरकारची आणि नऊ झाडे शेतकऱ्यांची असे सूत्र ठरवले होते. अहिल्यादेवींच्या जलनीती मध्येही अर्थनीती प्रमाणेच सर्वसमावेशकता होती. त्याकाळी फड पद्धतीने पाणी वाटपावर अहिल्यादेवींनी भरपूर पैसे खर्च केले. ज्यादा पैसे खर्च करून पाणी दिल्याने उत्पन्न वाढीचा वायदा त्यांनी शेतकऱ्यांशी केला पण शेतकऱ्यांकडून उत्पन्ना एवढाच सारा वसूल केला .शेतीच्या पाण्याचे महत्त्व त्यांनी जाणले होते, पण पिण्याच्या पाण्यासाठीही पुढे अनेक भागात विहिरी बारव ,आड ,घाट यासारख्या योजना त्यांनी त्यांच्या कल्पनेतून उभारल्या त्यापैकी बहुतांश विहिरी आजही सुस्थितीत आहेत.ग्राम व्यवस्थेची घडी त्यानी चांगली बसवली होती.गावोगावी न्याय देणारे पंचाधिकारी नेमले होते.राज्यकारभार करताना जुन्या रूढी-परंपरांना त्यांनी कायमच विरोध केला.पुरूषप्रधान व्यवस्थेत स्वच्छ आणि शिस्तबध्द कारभार करणार्या त्या रणरागिनी होत्या ,प्रचंड आत्मविश्वास, धाडस ,दूरदृष्टी, त्यागी वृत्ती असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. "अशा या थोर,कर्तबगार ,पराक्रमी ,अहिल्यादेवीस आमचे विनम्र अभिवादन "
लेखन ✒️
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
( अहिल्याबाई होळकर यांचा चांदवड येथील वाडा )

दारूगोळ्याचे भांडार अशी ख्याती असलेला किल्ला

सह्याद्रीची अवघड पर्वत रांग सोडून आपण जेंव्हा मैदानी मुलुखात सरकू लागलो की भुईकोट किल्ल्यांची शृंखला सुरू होते. अर्थात किल्ल्याला सह्याद्रीची सुरक्षा नसल्याने किल्ल्याची मजबुती ठेवणे आणि किल्ल्याच्या भोवताली संरक्षक पाण्याचे खंदकांमध्ये किल्ला आपला कर्तुत्व आणि ताकद दाखवत असे. या किल्ल्यापैकी महत्वाचा किल्ला म्हणजे परांड्या चा भुईकोट किल्ला.

परंड्याला तर काही दिवसांकरिता निजामशहाची राजधानी होती. परंड्याला प्राचिन इतिहास असून पोथी-पुराणातील उल्लेखानुसार प्रचंडसुरामुळे या किल्ल्याला परंडा नाव पडले. काही ठिकाणी परंड्याचा उल्लेख हा प्रत्यंडक, परमधामपूर, प्रकांडपूर व पलिखंड असा आढळतो. त्यानुसार पलांडा, परिंडा ते परंडा असे नामांतर झाले असावे आणि अपभ्रंश होऊन परंडा नाव झाले.

बहामनी सत्तेच्या विभाजनानंतर परंडा किल्ला आणि आजूबाजूचा परिसर निजामाकडे आला. तेव्हा इ.स. १६२८ ते १६३० च्या दरम्यान शहाजीराजांनी मुर्तुजा निजामाला गादीवर बसवून काही काळ परंड्या वरून सुध्दा कारभार चालविला. या किल्ल्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामुळे निजामशाहीच्या काळातच येथील बुरुजांवर निरनिराळ्या तोफा ठेवण्यात आल्या.

यापैकी मलिका-ए-मैदान, कसाब, खडक अझदहपैकर या महत्त्वाच्या आणि शक्तिशाली तोफा असून आज भारतातील नावाजलेली विजापूरच्या सर्जा बुरुजावरील मलिक-इ-मैदान ज्या तोफेला मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखले जाते ती तोफ १६३२ पर्यंत परंड्याच्या बुरुजावर होती. २२ मे १६३२ ला विजापूरच्या दिवाणाने मुरार जगदेवने १० हत्ती आणि ४०० बैलांच्या साह्याने ५५ टन वजनाची महाकाय तोफ विजापूरला नेली.

संरक्षणाच्या दृष्टीने परिपूर्ण असलेल्या या किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्यावर प्रत्यक्षपणे कोणीही आक्रमण केलेले नाही. तरीपण देखील या किल्ल्यावर असंख्य तोफा आहेत आणि त्या तोफांसाठी लागणारे वेग वेगळ्या आकाराचे तोफगोळे आढळतात. या किल्ल्याचे स्थान मध्यवर्ती असल्या कारणाने या किल्ल्यावर दारूगोळ्याचे भांडार बनवले. एवढा मोठी युद्धसामुग्री अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर सापडत नाही.

औरंगजेबाच्या दरबारातील बातमीपत्रानुसार परंडा किल्ल्यातील हालचाली समजण्यास मदत होते. त्यानुसार इ.स. १६६५ मध्ये मिर्झाराजाने पुरंदर वर आक्रमण केले होते. तेव्हा मोगलांना धडा शिकवावा म्हणून छत्रपती शिवरायांच्या सांगण्यावरून नेताजी पालकर यांनी  परंडा किल्ल्याभोवतीच्या परिसरात धुमाकूळ माजविला होता. मोगलांची फौज परंड्यात येण्यापूर्वीच नेताजी पालकर केव्हाच पसार झाले होते.

१६८१ नंतर १७०७ म्हणजे मृत्यूपर्यंत औरंगजेब दक्षिणेतच राहिल्यामुळे उत्तरेकडील जमा होणा-या महसुलाचा पैसा विजापूर, सोलापूर, हैदराबाद, कोल्हापूर परिसरात जाताना तो परंड्याहून बऱ्याच वेळा पुढे जायचा.

असेच एकदा परंड्याहून निघालेला खजिना सेनापती धनाजी जाधवाने २५ जानेवारी १७०० मध्ये परंड्याजवळील उंदरगाव या ठिकाणी लुटूला होता. मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या किल्ल्यावर धनाजी जाधव यांनी बऱ्याच वेळा असा धुमाकूळ घालून औरंगजेब च्या नाकी नऊ आणले होते.

Friday, 29 May 2020

शिवरायांचा असा एक अजिंक्य किल्ला ज्याला इंग्रजांनी आदराने ‘ट्रॉय ऑफ इस्ट’ ही उपाधी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेक सोहळ्या नंतर स्वराज्य वृद्धी साठी दक्षिण दिग्विजय मोहीम काढली. आणि या मोहिममध्ये महाराजांना सापडलेले एक दुर्ग रुपी रत्न म्हणजेच जिंजी चा किल्ला.

शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह जिंजी जवळ पोहोचले तेंव्हा नासिर मुहम्मद हा जिंजीचा किल्लेदार होता. मराठ्यांनी गडाच्या बदल्यात त्याला पन्नास हजाराची जाहगीर देऊ केली. त्याने मान्य केले व १३ मे १६७७ च्या आसपास कुठलाही रक्तपात न होता हा किल्ला मराठ्यांना मिळाला. आता शिवरायांच्या सैन्याला पाहून म्हणा किंवा शिवरायांनी दिलेल्या जहागिरी मुळे म्हणा किल्ला स्वराज्यात आला हे महत्त्वाचं.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजीकडे कूच केले व त्याची पाहाणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांना हा किल्ला पाहता क्षणी आवडला. त्याची डागडुजी करून किल्ला अधिक भक्कम आणि अजिंक्य कसा राहील यांकडे लक्ष दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायाजी नालगे या मराठी सरदाराची निवड जिंजीच्या किल्लेदार पदी केली. विठ्ठल पिळदेव अत्रे ह्याला जिंजी सुभ्याचा सुभेदार म्हणून नेमले गेले.

जिंजी मराठ्यांची राजगादी ठरली ती औरंगजेबाच्या महाराष्ट्रावरील आक्रमणानंतर. छत्रपती राजारामांनी जिंजी वर आश्रय घेतला आणि जिंजी ने मोगलांचा वेढा ७ वर्षे झुंजत आपले ‘ट्रॉय ऑफ इस्ट’ नाव सार्थ केले. राजगिरी (राजाचा किल्ला), कृष्णगिरी (राणीचा किल्ला),

चंद्रगिरी अशा तीन दुर्गांचा समुह असलेल्या या किल्ल्यात इतिहासातील अनेक वास्तु आपले पाय अडकवून टाकतात. ऍबे बार्थीलिमो कॅरे या फ़्रेंच प्रवाशाने छत्रपती शिवाजी महाराजांचे मनातील स्वराज्याबद्दल च मत काय आहे ते लिहिलं आहे.

महाराजांना सिंधु नदीपासुन बंगालच्या उपसागरापर्यंतचा मुलुख स्वराज्याचा भाग करावयाचा होता जिथे प्रजाहीत साधत रयतेचं हित जपलं जावं. या दृष्टीने त्यांची वाटचाल होत होती आणि याची प्रचिती जिंजी येथील भव्य दुर्ग पाहिल्यावर नक्की येते. ‘सेन्जीअम्मा’ या देवीच्या नावावरून किल्ल्याला स्थानिक लोक या किल्ल्याला सेंजी असं देखील म्हणतात.

जिंजी किल्ल्याची निर्मिती साधारणपणे इसवी सन १६०० मध्ये झाली. विजयनगरच्या राजांनी हा किल्ला बांधला असावा. दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या काळात छत्रपती शिवरायांची नजर या किल्ल्यावर गेली पाहणी केल्यावर या किल्ल्याला शिवाजी महाराजांनी ‘हिंदुस्थानातील अभेद्य किल्ला’ म्हणून गौरवले होते.

विजयनगरचे मांडलिक असलेल्या जिंजीच्या नायकांनी सोळाशे ते अठराशे सालात या किल्ल्यावर राज्य केले. त्यांचा राज्यकारभार वरकरणी जरी शांततेत चालू आहे असं वाटत असला तरी अधूनमधून यांवर मदुराई, वेलूर आणि चंद्रगिरीच्या राज्यकर्त्यांशी त्यांच्या लढाया होत असत.

१६७४ मध्ये काही काळ तो विजापूरच्या नवाबांच्या ताब्यात होता. त्यानी या किल्ल्याचे नाव होते ‘बादशहाबाद’. विजापूरच्या नवाबांना देखील हा किल्ला जास्त काळ टिकवता आला नाही. पुढे हा किल्ला मराठ्यांनी जिंकला.

संपूर्ण स्वराज्याच्या इतिहासात जिंजीचे महत्व अनन्य साधारण आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्ये नंतर २७ वर्ष सतत मोघल सेनेला स्वराज्याने निकराची झुंज दिली जे जगाच्या इतिहासातील एक आश्चर्य आहे कारण सतत २७ वर्ष युद्ध कोणत्याही राष्ट्राने आज वर लढलेले नाही, या कठीण परिस्थितीत राजाराम महाराजांना अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची बाजी लाऊन या प्रवासा मध्ये अलौकिक साहाय्य केले.

छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्याची राजधानी रायगडहून दक्षिणेत जिंजीला हलविली. हिंदवी स्वराज्याच्या अद्वितीय पराक्रमामुळे जिंजी जगाच्या इतिहासात विख्यात झाले औरंगजेबाने प्रयत्नांची शर्थ केली तरी तो जिंजी वर मात करून स्वराज्य बुडवू शकला नाही.

थरारक सांदन दरी

सह्याद्रीत भटक्यांसाठी अनेक थरारक ठिकाणे आहेत. सुरुवातीला ही ठिकाणे फक्त भटक्या लोकांनाच माहिती होती. परंतु नंतरच्या काळात भटक्यांचा ओघ वाढला, गावकऱ्यांनी सुध्दा त्या जागेचे महत्त्व ओळखले आणि खऱ्या अर्थाने इतके दिवस अज्ञात असलेली ठिकाणे सर्वसामान्य लोकांना माहिती पडली. असेच एक ठिकाण म्हणजे सांदन दरी.

भंडारदरा धरणाच्या पश्चिमेला बाजूला सभोवतीच्या निसर्गशिल्पांच्या गराड्यात मधोमध साम्रद नावाचा आदिवासी पाडा वसला आहे. तिथून चालत चालत आपण रतनगडाच्या दिशेने येतो. अवघ्या १०/१५ मिनिटात आपण एका भल्या मोठ्या घळीच्या मुखाशी पोहोचतो. तेच या प्रसिद्ध अशा सांदण दरीचे मुख आहे.

विशेष म्हणजे ही दरी जमिनीच्या पातळीखाली आहे. या दरीत जाण्यासाठी थोडेसे खाली उतरावे लागते. वसुंधरेच्या गर्भातील एक नितळ आनंद देणारी वाट तुडवताना जणू सृष्टीच आपल्याशी काही गूज सांगू पाहतेय, असेच पावलागणिक वाटत राहते! अतिशय अरूंद अशी ही लांबच लांब, जमिनीला पडलेली भेग आहे.

एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच म्हणावा लागेल. ही आपल्या देशातील अशा प्रकारची सर्वात मोठी घळ आहे. अशी ही अद्भुत रूपे पाहिली की निसर्ग नावाच्या किमयागारापुढे आपण किती खुजे आहोत याची जाणीव त्याच्या केवळ दर्शनाने आपल्याला क्षणोक्षणी होत राहते.

घळीच्या सुरुवातीलाचा गार पाण्याचा एक जिवंत झरा आहे. जो उन्हाळ्यातही कधी आटत नाही. एक सोपा कातळटप्पा उतरुन आपण दरीच्या नळीत प्रवेश करतो.

दरीचे वाकडे तिकडे वळण एखाद्या सापासारखे लांबच लांब दिसते. दरीत प्रवेश केल्यावर तिचे ते रूप पाहून आपण चक्रावून जातो. काही ठिकाणी १५/२० फूट तर काही ठिकाणी जेमतेम २/३ फूट अशी ती अतिशय अरुंद नाळ आहे. ही नळी दोन्ही बाजूला उभ्या तुटलेल्या काळ्याकभिन्न कातळकड्यांनी बंदिस्त झालेली. पहिला कातळ्टप्पा उतरताच एक लहानसा डोह आपला मार्ग अडवतो.

साधारण १.५ फूट खोल आणि १२/१३ फूट लांब त्या पाण्यातून शेवाळलेल्या दगडांवरून कौशल्याने पार व्हावे लागते. मग तीव्र उतार सुरु होतो. नाळ अधिकाधिक अरूंद होते. कुठेही सपाट मार्ग उरत नाही. दरडी, लहानमोठे दगडगोटे यांचा अक्षरशः तिथे खच पडलेला दिसतो. मग आणखीन एक मोठा पाणसाठा मार्ग अडवतो.

एका बाजूला ४.५ फूट खोल पाणी, तर दुसर्या बाजूला ३ फूट खोल पाणी. हेही पाणी कधी आटत नाही, कारण पाण्याच्या बाष्पीभवनाला सूर्यकिरण इकडे पोहोचूच देत नाहीत. अतिशय थंडगार त्या पाण्यातून १७/१८ फूट लांब चालण्याचा थरार केवळ प्रत्यक्ष अनुभवावा घ्यावा असाच आहे. मग कधी येताय आमच्या सांदन दरी च्या भेटीला ?

सूचना: 1. सुरक्षित भटकंती करा व सोबतीला कुणाला तरी घ्या, 2. एकट्याने ट्रेकला जाण्याचे धाडस करू नये, 3. ट्रेकिंगला जाताना कमीतकमी ३-४ जणांच्या ग्रुपने जा. व सोबत अत्यावश्यक साधन सामुग्री ठेवा, 4. ट्रेकिंगला कुठे जात आहात ते घरातील सदस्यांना सांगूनच जा, 5. पायवाटा माहिती नसल्यास स्थानिक वाटाड्या बरोबर ठेवा, 6. मळलेल्या पाऊलवाटांचा वापर करा, अनोळखी वाटेने जाण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका.


दुर्गबांधणीतील सर्वात शेवटचा “तरुणगड”

दुर्गबांधणीतील सर्वात शेवटचा “तरुण

स्वराज्यातील अभिमानाने छाती काढून उभे राहिलेले दुर्ग यांच्या पाऊलखुणा शेकडो वर्षांपूर्वी उमटलेल्या दिसून येतात. महाराष्ट्रात गड किल्ल्यांचा इतिहास हा सातवाहन कालखंडापासून आढळून येतो. एवढ्या मोठ्या काळात कित्येक दुर्ग निर्माण झाले, कित्येकांनी इतिहास गाजवला असेल तर पराभवाची दुःख देखील पचवली असतील. तर कित्येक आपल्या हलगर्जीपणा मुळे नामशेष झाले असतील.

पहिला दकिल्ला कधी, कोणी, केव्हा आणि कसा निर्माण केला हे बोट ठेवून आपण सांगू शकत नाही. अगदी अलीकडच्या काळात किंवा स्वराज्यातील शेवटचा बांधलेला किल्ला कोणता तर आपण नेमका किल्ला सांगू शकतो, नव्हे नव्हे आपण स्वतः भटकंती साठी त्या ठिकाणी जाऊ शकतो.

स्वराज्यात अलीकडच्या काळात बांधलेला किल्ला, किल्ल्यांचा इतिहास जर पाहिला तर मराठयांनी बांधलेला शेवटचा किल्ला म्हणजे मल्हारगड. या किल्ल्यांची बांधणी व निर्मिती १७५७ ते १७६० च्या दरम्यान झाली.

अगदी अलीकडच्या काळातील किल्ला असल्याने त्याला तरूणगड असं ही म्हणतात. किल्ल्याचा आकार त्रिकोणी असून बालेकिल्ला ची तटबंदी मात्र चौकोनी आहे. किल्ल्याची उंची ३१६६फूट उंच असून इतर किल्ल्यांचा मनाने याचे भौगोलिक क्षेत्र फार कमी म्हणजे चार ते पाच एकरामध्येच आहे.

जेजुरी पासून बत्तीस किलोमीटर च्या अंतरावर हा किल्ला सोनोरी गावात बांधला म्हणून त्याची स्थानिक ओळख सोनोरी किल्ला म्हणून देखील आहे. खंडोबाच्या नगरीतील हा किल्ला असल्याने त्याचं नाव मल्हारगड पडले असावे. किल्ल्यावर फारशी वर्दळ नसल्याने गडाचा संपूर्ण परिसर साफ व स्वच्छ आहे. गडावर खाण्या पिण्याची सोय नसल्याने आपल्या तशी सोय करावी लागते.

गडावरील विहिरी चा उपसा नसल्याने गडावरील विहिरी च पाणी पिण्याजोगं नाही. गडावर महादेवाचे आणि खंडोबाचे मंदिर आहे. जीर्ण झालेले वाड्यांचे अवशेष शिल्लक राहिले आहे. मुख्य दरवाजा जवळ नैसर्गिक बोगदा निर्माण झाला त्याला सुईचे भोक म्हणतात.

पेशव्यांचे त्यावेळेचे तोफखाना प्रमुख सरदार पानसे यांनी या किल्ल्याची बांधणी केली. १७७१-७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्याची पाहणी केली असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळून येत. सरदार पानसेंचा सोनोरी गावात एक चिरेबंदी वाडा आहे जो किल्ल्याच्या पायथ्याशी आहे.

किल्ल्याबद्दल एक दंतकथा प्रसिध्द आहे. किल्ल्याच काम चालू असताना एके ठिकाणी खोदकाम करताना रक्तासारखं पाणी वाहू लागले. पाण्याचे झरे लागतात ते माहीत होतं पण हे रक्तवर्ण पाणी पाहून सर्वजण काम करायला धजावेच ना काम थांबलं ही बातमी सरदार भीमराव पानसेनी यांना कळली.

ते गडावर गेले असता त्यांनी तो पाझर पाहिला आणि मग त्यांनी खंडोबाला साकडे घातले आणि मंदिर बांधण्याचा संकल्प केला. किल्ल्याच बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यांनी खंडोबाच मंदिर बांधलं म्हणून ह्या किल्ल्याला मल्हारगड म्हटलं जातं असावं. पूर्वी किल्ल्यावर तोफखाना होता आणि दुर्दैवाने आता तिथे एकही तोफ पहायला मिळत नाही.

ब्रिटीश काळात उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिशांपासून लपण्यासाठी या किल्ल्यावर आसरा घेतला होता. फंदफितुरीचा शाप या गडाने देखील अनुभवला वासुदेव बळवंत फडके जेंव्हा या किल्ल्यावर आसऱ्यासाठी होते तेंव्हा आपल्यातील काही फितुरांनी ब्रिटिशांना याबाबतची माहिती पुरवली होती. इंग्रजांच्या विरोधात झालेली एकमेव लढाई या किल्ल्याने अनुभवली. परंतु या किल्ल्याचा मुख्य उपयोग हा टेहळणीसाठी आणि दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी होता.

दिवे घाट संपल्यावर काळेवाडी गावातून कच्चा रस्त्याने आपल्याला गडाच्या पायथ्याशी जाता येतं. रस्ता कच्चा असला तरी चारचाकी वाहन सहज जाऊ शकतं.

दुसरा रस्ता झेंडे वाडी मधून येऊन एका खिंडीतून वर येताच मल्हारगडाचे दर्शन होते. सासवड वरून रोज सोनोरी गावात ST जाते. पायथ्याला अलीकडे दीडेक किलोमीटर उतरून आपण किल्ल्यावर पोहोचू शकतो. सह्यप्रेमी तसेच नवख्या ट्रेकर्सना सुरुवात करायला हा गड उत्तम आहे.

गड”