सह्याद्रीची अवघड पर्वत रांग सोडून आपण जेंव्हा मैदानी मुलुखात सरकू लागलो की भुईकोट किल्ल्यांची शृंखला सुरू होते. अर्थात किल्ल्याला सह्याद्रीची सुरक्षा नसल्याने किल्ल्याची मजबुती ठेवणे आणि किल्ल्याच्या भोवताली संरक्षक पाण्याचे खंदकांमध्ये किल्ला आपला कर्तुत्व आणि ताकद दाखवत असे. या किल्ल्यापैकी महत्वाचा किल्ला म्हणजे परांड्या चा भुईकोट किल्ला.
परंड्याला तर काही दिवसांकरिता निजामशहाची राजधानी होती. परंड्याला प्राचिन इतिहास असून पोथी-पुराणातील उल्लेखानुसार प्रचंडसुरामुळे या किल्ल्याला परंडा नाव पडले. काही ठिकाणी परंड्याचा उल्लेख हा प्रत्यंडक, परमधामपूर, प्रकांडपूर व पलिखंड असा आढळतो. त्यानुसार पलांडा, परिंडा ते परंडा असे नामांतर झाले असावे आणि अपभ्रंश होऊन परंडा नाव झाले.
बहामनी सत्तेच्या विभाजनानंतर परंडा किल्ला आणि आजूबाजूचा परिसर निजामाकडे आला. तेव्हा इ.स. १६२८ ते १६३० च्या दरम्यान शहाजीराजांनी मुर्तुजा निजामाला गादीवर बसवून काही काळ परंड्या वरून सुध्दा कारभार चालविला. या किल्ल्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामुळे निजामशाहीच्या काळातच येथील बुरुजांवर निरनिराळ्या तोफा ठेवण्यात आल्या.
यापैकी मलिका-ए-मैदान, कसाब, खडक अझदहपैकर या महत्त्वाच्या आणि शक्तिशाली तोफा असून आज भारतातील नावाजलेली विजापूरच्या सर्जा बुरुजावरील मलिक-इ-मैदान ज्या तोफेला मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखले जाते ती तोफ १६३२ पर्यंत परंड्याच्या बुरुजावर होती. २२ मे १६३२ ला विजापूरच्या दिवाणाने मुरार जगदेवने १० हत्ती आणि ४०० बैलांच्या साह्याने ५५ टन वजनाची महाकाय तोफ विजापूरला नेली.
संरक्षणाच्या दृष्टीने परिपूर्ण असलेल्या या किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्यावर प्रत्यक्षपणे कोणीही आक्रमण केलेले नाही. तरीपण देखील या किल्ल्यावर असंख्य तोफा आहेत आणि त्या तोफांसाठी लागणारे वेग वेगळ्या आकाराचे तोफगोळे आढळतात. या किल्ल्याचे स्थान मध्यवर्ती असल्या कारणाने या किल्ल्यावर दारूगोळ्याचे भांडार बनवले. एवढा मोठी युद्धसामुग्री अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर सापडत नाही.
औरंगजेबाच्या दरबारातील बातमीपत्रानुसार परंडा किल्ल्यातील हालचाली समजण्यास मदत होते. त्यानुसार इ.स. १६६५ मध्ये मिर्झाराजाने पुरंदर वर आक्रमण केले होते. तेव्हा मोगलांना धडा शिकवावा म्हणून छत्रपती शिवरायांच्या सांगण्यावरून नेताजी पालकर यांनी परंडा किल्ल्याभोवतीच्या परिसरात धुमाकूळ माजविला होता. मोगलांची फौज परंड्यात येण्यापूर्वीच नेताजी पालकर केव्हाच पसार झाले होते.
१६८१ नंतर १७०७ म्हणजे मृत्यूपर्यंत औरंगजेब दक्षिणेतच राहिल्यामुळे उत्तरेकडील जमा होणा-या महसुलाचा पैसा विजापूर, सोलापूर, हैदराबाद, कोल्हापूर परिसरात जाताना तो परंड्याहून बऱ्याच वेळा पुढे जायचा.
असेच एकदा परंड्याहून निघालेला खजिना सेनापती धनाजी जाधवाने २५ जानेवारी १७०० मध्ये परंड्याजवळील उंदरगाव या ठिकाणी लुटूला होता. मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या किल्ल्यावर धनाजी जाधव यांनी बऱ्याच वेळा असा धुमाकूळ घालून औरंगजेब च्या नाकी नऊ आणले होते.
No comments:
Post a Comment