स्वराज्यातील अभिमानाने छाती काढून उभे राहिलेले दुर्ग यांच्या पाऊलखुणा शेकडो वर्षांपूर्वी उमटलेल्या दिसून येतात. महाराष्ट्रात गड किल्ल्यांचा इतिहास हा सातवाहन कालखंडापासून आढळून येतो. एवढ्या मोठ्या काळात कित्येक दुर्ग निर्माण झाले, कित्येकांनी इतिहास गाजवला असेल तर पराभवाची दुःख देखील पचवली असतील. तर कित्येक आपल्या हलगर्जीपणा मुळे नामशेष झाले असतील.
पहिला दकिल्ला कधी, कोणी, केव्हा आणि कसा निर्माण केला हे बोट ठेवून आपण सांगू शकत नाही. अगदी अलीकडच्या काळात किंवा स्वराज्यातील शेवटचा बांधलेला किल्ला कोणता तर आपण नेमका किल्ला सांगू शकतो, नव्हे नव्हे आपण स्वतः भटकंती साठी त्या ठिकाणी जाऊ शकतो.
स्वराज्यात अलीकडच्या काळात बांधलेला किल्ला, किल्ल्यांचा इतिहास जर पाहिला तर मराठयांनी बांधलेला शेवटचा किल्ला म्हणजे मल्हारगड. या किल्ल्यांची बांधणी व निर्मिती १७५७ ते १७६० च्या दरम्यान झाली.
अगदी अलीकडच्या काळातील किल्ला असल्याने त्याला तरूणगड असं ही म्हणतात. किल्ल्याचा आकार त्रिकोणी असून बालेकिल्ला ची तटबंदी मात्र चौकोनी आहे. किल्ल्याची उंची ३१६६फूट उंच असून इतर किल्ल्यांचा मनाने याचे भौगोलिक क्षेत्र फार कमी म्हणजे चार ते पाच एकरामध्येच आहे.
जेजुरी पासून बत्तीस किलोमीटर च्या अंतरावर हा किल्ला सोनोरी गावात बांधला म्हणून त्याची स्थानिक ओळख सोनोरी किल्ला म्हणून देखील आहे. खंडोबाच्या नगरीतील हा किल्ला असल्याने त्याचं नाव मल्हारगड पडले असावे. किल्ल्यावर फारशी वर्दळ नसल्याने गडाचा संपूर्ण परिसर साफ व स्वच्छ आहे. गडावर खाण्या पिण्याची सोय नसल्याने आपल्या तशी सोय करावी लागते.
गडावरील विहिरी चा उपसा नसल्याने गडावरील विहिरी च पाणी पिण्याजोगं नाही. गडावर महादेवाचे आणि खंडोबाचे मंदिर आहे. जीर्ण झालेले वाड्यांचे अवशेष शिल्लक राहिले आहे. मुख्य दरवाजा जवळ नैसर्गिक बोगदा निर्माण झाला त्याला सुईचे भोक म्हणतात.
पेशव्यांचे त्यावेळेचे तोफखाना प्रमुख सरदार पानसे यांनी या किल्ल्याची बांधणी केली. १७७१-७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्याची पाहणी केली असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळून येत. सरदार पानसेंचा सोनोरी गावात एक चिरेबंदी वाडा आहे जो किल्ल्याच्या पायथ्याशी आहे.
किल्ल्याबद्दल एक दंतकथा प्रसिध्द आहे. किल्ल्याच काम चालू असताना एके ठिकाणी खोदकाम करताना रक्तासारखं पाणी वाहू लागले. पाण्याचे झरे लागतात ते माहीत होतं पण हे रक्तवर्ण पाणी पाहून सर्वजण काम करायला धजावेच ना काम थांबलं ही बातमी सरदार भीमराव पानसेनी यांना कळली.
ते गडावर गेले असता त्यांनी तो पाझर पाहिला आणि मग त्यांनी खंडोबाला साकडे घातले आणि मंदिर बांधण्याचा संकल्प केला. किल्ल्याच बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यांनी खंडोबाच मंदिर बांधलं म्हणून ह्या किल्ल्याला मल्हारगड म्हटलं जातं असावं. पूर्वी किल्ल्यावर तोफखाना होता आणि दुर्दैवाने आता तिथे एकही तोफ पहायला मिळत नाही.
ब्रिटीश काळात उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिशांपासून लपण्यासाठी या किल्ल्यावर आसरा घेतला होता. फंदफितुरीचा शाप या गडाने देखील अनुभवला वासुदेव बळवंत फडके जेंव्हा या किल्ल्यावर आसऱ्यासाठी होते तेंव्हा आपल्यातील काही फितुरांनी ब्रिटिशांना याबाबतची माहिती पुरवली होती. इंग्रजांच्या विरोधात झालेली एकमेव लढाई या किल्ल्याने अनुभवली. परंतु या किल्ल्याचा मुख्य उपयोग हा टेहळणीसाठी आणि दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी होता.
दिवे घाट संपल्यावर काळेवाडी गावातून कच्चा रस्त्याने आपल्याला गडाच्या पायथ्याशी जाता येतं. रस्ता कच्चा असला तरी चारचाकी वाहन सहज जाऊ शकतं.
दुसरा रस्ता झेंडे वाडी मधून येऊन एका खिंडीतून वर येताच मल्हारगडाचे दर्शन होते. सासवड वरून रोज सोनोरी गावात ST जाते. पायथ्याला अलीकडे दीडेक किलोमीटर उतरून आपण किल्ल्यावर पोहोचू शकतो. सह्यप्रेमी तसेच नवख्या ट्रेकर्सना सुरुवात करायला हा गड उत्तम आहे.
No comments:
Post a Comment