छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेक सोहळ्या नंतर स्वराज्य वृद्धी साठी दक्षिण दिग्विजय मोहीम काढली. आणि या मोहिममध्ये महाराजांना सापडलेले एक दुर्ग रुपी रत्न म्हणजेच जिंजी चा किल्ला.
शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह जिंजी जवळ पोहोचले तेंव्हा नासिर मुहम्मद हा जिंजीचा किल्लेदार होता. मराठ्यांनी गडाच्या बदल्यात त्याला पन्नास हजाराची जाहगीर देऊ केली. त्याने मान्य केले व १३ मे १६७७ च्या आसपास कुठलाही रक्तपात न होता हा किल्ला मराठ्यांना मिळाला. आता शिवरायांच्या सैन्याला पाहून म्हणा किंवा शिवरायांनी दिलेल्या जहागिरी मुळे म्हणा किल्ला स्वराज्यात आला हे महत्त्वाचं.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजीकडे कूच केले व त्याची पाहाणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांना हा किल्ला पाहता क्षणी आवडला. त्याची डागडुजी करून किल्ला अधिक भक्कम आणि अजिंक्य कसा राहील यांकडे लक्ष दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायाजी नालगे या मराठी सरदाराची निवड जिंजीच्या किल्लेदार पदी केली. विठ्ठल पिळदेव अत्रे ह्याला जिंजी सुभ्याचा सुभेदार म्हणून नेमले गेले.
जिंजी मराठ्यांची राजगादी ठरली ती औरंगजेबाच्या महाराष्ट्रावरील आक्रमणानंतर. छत्रपती राजारामांनी जिंजी वर आश्रय घेतला आणि जिंजी ने मोगलांचा वेढा ७ वर्षे झुंजत आपले ‘ट्रॉय ऑफ इस्ट’ नाव सार्थ केले. राजगिरी (राजाचा किल्ला), कृष्णगिरी (राणीचा किल्ला),
चंद्रगिरी अशा तीन दुर्गांचा समुह असलेल्या या किल्ल्यात इतिहासातील अनेक वास्तु आपले पाय अडकवून टाकतात. ऍबे बार्थीलिमो कॅरे या फ़्रेंच प्रवाशाने छत्रपती शिवाजी महाराजांचे मनातील स्वराज्याबद्दल च मत काय आहे ते लिहिलं आहे.
महाराजांना सिंधु नदीपासुन बंगालच्या उपसागरापर्यंतचा मुलुख स्वराज्याचा भाग करावयाचा होता जिथे प्रजाहीत साधत रयतेचं हित जपलं जावं. या दृष्टीने त्यांची वाटचाल होत होती आणि याची प्रचिती जिंजी येथील भव्य दुर्ग पाहिल्यावर नक्की येते. ‘सेन्जीअम्मा’ या देवीच्या नावावरून किल्ल्याला स्थानिक लोक या किल्ल्याला सेंजी असं देखील म्हणतात.
जिंजी किल्ल्याची निर्मिती साधारणपणे इसवी सन १६०० मध्ये झाली. विजयनगरच्या राजांनी हा किल्ला बांधला असावा. दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या काळात छत्रपती शिवरायांची नजर या किल्ल्यावर गेली पाहणी केल्यावर या किल्ल्याला शिवाजी महाराजांनी ‘हिंदुस्थानातील अभेद्य किल्ला’ म्हणून गौरवले होते.
विजयनगरचे मांडलिक असलेल्या जिंजीच्या नायकांनी सोळाशे ते अठराशे सालात या किल्ल्यावर राज्य केले. त्यांचा राज्यकारभार वरकरणी जरी शांततेत चालू आहे असं वाटत असला तरी अधूनमधून यांवर मदुराई, वेलूर आणि चंद्रगिरीच्या राज्यकर्त्यांशी त्यांच्या लढाया होत असत.
१६७४ मध्ये काही काळ तो विजापूरच्या नवाबांच्या ताब्यात होता. त्यानी या किल्ल्याचे नाव होते ‘बादशहाबाद’. विजापूरच्या नवाबांना देखील हा किल्ला जास्त काळ टिकवता आला नाही. पुढे हा किल्ला मराठ्यांनी जिंकला.
संपूर्ण स्वराज्याच्या इतिहासात जिंजीचे महत्व अनन्य साधारण आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्ये नंतर २७ वर्ष सतत मोघल सेनेला स्वराज्याने निकराची झुंज दिली जे जगाच्या इतिहासातील एक आश्चर्य आहे कारण सतत २७ वर्ष युद्ध कोणत्याही राष्ट्राने आज वर लढलेले नाही, या कठीण परिस्थितीत राजाराम महाराजांना अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची बाजी लाऊन या प्रवासा मध्ये अलौकिक साहाय्य केले.
छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्याची राजधानी रायगडहून दक्षिणेत जिंजीला हलविली. हिंदवी स्वराज्याच्या अद्वितीय पराक्रमामुळे जिंजी जगाच्या इतिहासात विख्यात झाले औरंगजेबाने प्रयत्नांची शर्थ केली तरी तो जिंजी वर मात करून स्वराज्य बुडवू शकला नाही.
No comments:
Post a Comment