Followers

Saturday, 27 July 2019

शिवडीचा किल्ला

 मेंटॉस जिंदगी        🤓
🏰🏰




शिवडीचा किल्ला🏰🏰


या हिंदुस्तानला शौर्याचा अन तेजस्वी पराक्रमाचा अखंड वारसा लाभला आहे. आसेतु हिमालय पसरलेला हा राष्ट्रपुरुष आपल्या देहावर अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जिवंतपणे जपत आहे. या खुणांच्या रेघोट्यावरच तर हा देश घडत गेला, बनत गेला अन वाढत गेला. आजतर याची कीर्ती "वाढता-वाढता वाढे, भेदीले शून्यमंडळा" अशीच झाली आहे. काही खुणा येथील स्थानिक राज्यकर्त्यांच्या, राष्ट्रपुरुषांच्या, महापुरुषांच्या आहेत तर काही या राष्ट्रावर राज्य केलेल्या विविध परदेशी राजवटींच्या. या मुंबईतही तत्कालीन फिरंगी राज्यकर्त्यांच्या म्हणजेच पोर्तुगिजांच्या अनेक कलाकृती नजरेस पडतात. आपल्या लेकीला लग्नाचे आंदण म्हणा किंवा इंग्रजांनी मगितलेला हुंडा म्हणा ही मुंबई इंग्रजांच्या हाती गेली. मग या बेटाच्या संरक्षणासाठी इंग्रज राज्यकर्त्यांनी येथील किल्ले आणखी बळकट करण्यास सुरुवात केली. त्यापैकीच मुंबापुरीतील "शिवडी" किल्ल्यास भेट दिली.

पनवेल किंवा त्या आसपासच्या इतर बंदरातून सिंधूसागरामार्फत होणाऱ्या व्यापारी मार्गावर देखरेख ठेवणे अन पूर्वेकडील सागरी सीमेचे संरक्षण अशा दुहेरी भूमिकेसाठी हा किल्ला बांधला.

 आपल्या भूतकाळातील काही रम्य तर काही युद्धाचे, लढाईचे प्रसंग डोळ्यांत साठवून हा किल्ला जड अंगाने आजही या स्वप्ननगरीत आपले अस्तित्व टिकवून आहे. जगाला जंटलमन वाटणाऱ्या गोऱ्या इंग्रजांचे अनेक काळे डाव, धूर्त चाली, कपटी कावे इथल्या रिकाम्या खोल्यांमध्ये घुमतात.  इथल्या तटा-बुरूजावर त्यांच्या इंग्रजीचे टणात्कार होतात.  "हा सुसंस्कृत मुंबईकर किल्ला आहे बरं का!" असे कसोशीने इथला परिसर सांगतो.

आजच्या सुधारित मुंबईत नवीन इमारतींचे कितीही मजले उभे राहिले तरीही या किल्ल्याच्या कर्तुत्वापर्यंत यांची मजल जाणे अशक्य होय.  या इमारतींची उंची गगनाला भिडली तरीही या दुर्गाच्या कामगिरीची उंची त्यांना कदापि गाठणे शक्य नाही. किल्ल्याच्या पश्चिमेकडील त्रिकोणी बुरुजावरून दिसणाऱ्या मध्य मुंबईतील उंचच उंच इमारती या काळ्याकुट्ट किल्ल्याला हिणवत असतीलही पण या "म्हाताऱ्या" झालेल्या किल्ल्यामुळेच हे "तरुण" मनोरे आपण पाहत आहोत ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही.
प्रतापगडावरील अफझलखान कबरीप्रमाने येथील अवस्था भविष्यात न होवो हीच अपेक्षा.
आपल्या तरुणांचे पाय या किल्ल्याकडे वळत असतीलही पण फक्त प्रेमाचा हुंकार भरण्यासाठी. सागराच्या साक्षीने प्रेमामध्ये भरती येण्यासाठी. काही गड- दुर्गप्रेमी याला अपवाद आहेत बरं का!

या मुंबईत रोजीरोटीसाठी थेट पश्चिम बंगालहुन म्हणजेच भारतमातेच्या डाव्या हाताच्या बोटापासून येऊन उजव्या अंगठ्यावरील हा किल्ला पाहण्यास रुची दाखवणाऱ्या माझ्या मित्राचे आभार.
आमच्या पोरांच्या मनात येवो अथवा राहो पण "मनोज मन्ना"च्या मना(न्ना)त आले अन हा बेत सुफल संपन्न झाला.  पण निघताना मात्र एक प्रसंग घडलाच.
 किल्ल्याच्या मुख्य प्रवेशाकडे पाठ करून आम्ही पाठमोरे, किल्ल्याचा काही भाग पाहत बाहेर येत असतानाच येथील दर्ग्यात आलेल्या एका मुस्लिम बांधवाने जरा दरडावूनच विचारले,
"किधर जा रहे हो?"
मी म्हणालो,"ये किला देखने का है भाय! देख सकते है ना?"
तो जरा गुश्यातच म्हणाला,
"नही, एक सालभर के लिये किला सबको बंद है। बाहर आ जाव।"
मी जरा जोरातच म्हणालो,
"भाय जरा देखने देते तो अच्छा होता। हमे देखना था।"
तो बोलला,"अब नही। बाद में कभी आव।"

मी मनातल्या मनात म्हणालो,
"मेंटॉस आम्ही पण खातो कधी- कधी. आहा!!!!!"


मेंटॉस जिंदगी
शिवडीचा किल्ला.



✍🏼
।। यशवंतपुत्र ।।

Wednesday, 24 July 2019

अहमदनगर इतिहासात एक चंगीझखान भटकंती अहमदनगर परिसराची

भटकंती अहमदनगर परिसराची
इतिहासात चंगीझखान नावाची व्यक्ती बद्दल थोडा घोटाळा आहे
कारण चंगीझखान नावाचे सरदार वेगवेगळ्या काळात होवुन गेले. हा चंगीझखान कोण हे सांगता येत नाही परंतु अहमदनगर इतिहासात एक चंगीझखान होवुन गेला हे मात्र निशित
चवथा बादशाह मुर्तीजा निजामशाहच्या पदरी चंगीझखान सरदार होता. मुर्तीजा पोर्तुगीजाच्या ताब्यात असलेला रेवदांडा यास वेडा दिला परंतु पोर्तुगीज लोकांनी निजामशाहच्या सरदारास दारूच्या बाटल्या नजर केल्यामुळे किल्ला ताब्यात येईना ही गोष्ट मुर्तीजा निजामशाहाला कळली तेव्हा त्या ठिकाणी चंगीझखानाची सरदारची म्हनून नेमणूक केली चंगीझखानाने फारच प्रामाणिकपणे आपली कामगिरी बजावली व आपल्या हुशारिने वऱ्हाडाचे राज्य जिंकून ते निजामशाहित सामील केले.
पुढे चंगीझखानाला बेदरची बरीदशाही नाहीशी करून ते राज्य निजामशाहित सामील करायचे होते परंतु बादशाहच्या मुर्खपणा मुळे ते शक्य झाले नाही. ज्यावेळी चंगीझखानाचा बेदरवर स्वारी करण्याचा बेत होता त्याच वेळेस गोवळकोंड्याचा कुतुबशाहा बेदर पक्षातील असल्यामुळे त्यानी चंगीझखानास लाच देवून स्वारी तहकूब करण्याकरिता आपला वकील चंगीझखानाकडे पाठवला पण तो प्रस्ताव चंगीझखानाने धुडकावून लावला.
चंगीझखान लाचेने वश होत नाही असे पाहून त्या वकीलाने साहेबखान नावच्या नोकरामार्फत मुर्तीजा निजामशाहच्या मनामधे चंगीझखानविषयी द्वेष निर्माण केला की चंगीझखान
वऱ्हाडाचे राज्य आपल्या हताखाली घेत आहे. इतर लोकामार्फत सुध्दा असाच अपप्रचार केल्यामुळे निजामशाहाने चंगीझखानाचे सरदार पद व सैन्य काढुन घेतले व त्यास नजरकैदेत ठेवले. त्या वेळेस वैद्यांकरवी चंगीझखानावर विषप्रयोग करण्याचे बेत होता ही बातमी चंगीझखानास समझली त्या वेळी त्याला खुप दुःख झाले परंतु त्याने काही गडबड न करता बादशहास पत्र लिहले व वैद्यांकरवी आलेला विषाचा पेला प्राशन केला.
बादशाहाला खरी हकीकत कळल्यावर फारच पछतावा झाला

निजामशाहीचा प्रमुख सत्ताकेंद्र असलेला अहमदनगरचा अभेद्य भुईकोट किल्ला








निजामशाहीचा प्रमुख सत्ताकेंद्र असलेला अहमदनगरचा अभेद्य भुईकोट किल्ला
कोट बाग निजाम (अहमदनगरचा किल्ला )
अहमद निजामशहा याने ता.३ रज्जब हिजरी (२८ मे १४९० – अहमदनगर शहर स्थापना दिवस ) रोजी अजमखान वगैरे सरदार बरोबर घेऊन बहामनी सैन्यावर एकाएकी छापा घातला व सेनापती जहांगीर खान व सरदारांची हत्या करून विजय मिळवला.ज्या जागी जय मिळाला तेथे एक इमारत बाग तयार करून त्यास ‘बाग निजाम’ असे नाव दिले.हा अहमदनगर किल्ल्याचा प्रारंभ आहे.पुढे अहमदशहाने अहमदनगर शहराची स्थापना करून तेथे आपली राजधानी केली.त्यावेळी ही इमारत आपली मुख्य राहण्याची जागा करून त्याभोवती एक दगडाचा व विटांचा तट तयार केला.त्यावेळेपासून त्यास ‘कोट बाग निजाम’ हे नाव पडले.हेच अहमदनगरच्या किल्ल्याचे पूर्वीचे नाव होते.
पुढे नवीन नवीन इमारती बनू लागल्या व निजामशाही बादशहांचे रहाण्याचे ठिकाण येथे झाले.पक्का किल्ला बांधताना बऱ्याच ठिकाणावरून आयते घडलेले दगड आणले.त्यासंबंधी दंतकथा नगरच्या आसपासच्या गावात प्रचलित आहेत. इ.स.१४९०मध्ये ज्या जागेवर पुढे किल्ला बांधला ती जागा कायम करण्यात आली.पुढे हुसेनशहाने सध्याचा अस्तिवात असलेला दगडी तट बांधला.
किल्ल्यातील इमारती व बुरुज
अहमदनगर किल्ल्याचा एक जुना नकाशा ‘मुजदे अहमदनगर’ नावाच्या एका उर्दू पुस्तकात प्रसिद्ध आहे.त्यामध्ये किल्ल्यासंबंधी चोवीस बुरुजांची नावे,आतील पहारा,मध्य भागाचा राजवाडा,जुन्या इमारती,मद्रेसा,गगन महाल,मुल्क आबाद,दिलकशाद महाल,हबशीखाना,चाऊसखाना वगैरे सैनिकांच्या इमारती,विहिरी या सर्वांचा स्थलनिर्देश सापडतो.
बुरुजांची नावे
I. अरबी बुरुज
II. नारंगी बुरुज
III. राज बुरुज
IV. छजा बुरुज
V. दौलतखानी बुरुज
VI. आतषखानी बुरुज
VII. शहा बुरुज
VIII. रहमानी बुरुज
IX. हुसेनी बुरुज
X. कासमखानी बुरुज
XI. बदडी बुरुज
XII. सुभानी बुरुज
XIII. युसुफखानी बुरुज
XIV. जहांगीरखानी बुरुज
XV. फरासखानी बुरुज
XVI. दौलत बुरुज
XVII.फतयावर बुरुज
XVIII.गावसजी बुरुज
XIX. डवरखान बुरुज
XX. अशरफखानी बुरुज
XXI. पोलाद्खानी बुरुज
XXII.अकबरखानी बुरुज
XXIII.कमालखानी बुरुज
ही नावे हुसेन निजामशहाने अहमदशहाच्या,बुऱ्हाणशहाच्या व स्वतःच्या वेळच्या प्रसिद्ध मुत्सद्दी प्रधान व सेनापती यांच्या नावावरून दिली असावीत.निशाणाचा बुरुज ज्याला ‘सोंडबुरुज’ किंवा ‘फत्ते बुरुज’ म्हणतात त्याचे नाव ‘हुसेनी बुरुज’ ते नाव हुसेन निजामशहा यांचे नावावरून दिलेले दिसते.
या किल्ल्याचा दरवाजा एका बुरुजात असून इतर किल्ल्यांप्रमाणे येथे दरवाज्याला दोन्ही बाजूंस २ बुरुज नाहीत.किल्ल्यात जाण्यास पूर्वी एकच दरवाजा होता.खंदक ओलांडण्यास एक पूल असून पुढे गेल्यावर त्याच पुलावरून एका पूर्वेकडील विस्तीर्ण बुरुजास वळसा दिल्यास उत्तराभिमुखी दरवाजा आहे.याच बुरुजाचे नाव ‘अरबी बुरुज’ आहे.एका बुरुजावर बाहेरच्या बाजूने एका दगडावर वाघाचे चित्र दिसून येते;परंतू सुक्ष्म अवलोकन केल्यास ते वास्तविक चित्र नसून मुसलमानी शिलालेख आहे.त्या लेखातील अक्षरांची जुळणी इतकी सुबक व खुबीने केली आहे की,त्यामुळे अक्षरांचा वाघाच्या चित्रांचा आकार आला आहे.अजूनही या शिलालेखाचा अर्थ मिळालेला नाही.
महालांची नावे
I. सोन महाल
II. गगन महाल
III. मुल्क आबाद
IV. मीना महाल
V. रूप महाल
VI. बगदाद महाल
विहिरींची नावे
I. गंगा
II. जमना (यमुना)
III. मछलीबाई
IV. शक्करबाई
किल्ल्यात झालेल्या लढाया
चांदबिबीच्यावेळी किल्ल्यास जे दोन वेढे पडले ते सर्वांत महत्त्वाचे आहेत.पहिला वेढा इ.स.१५९५ च्या नोव्हेंबर महिन्यापासून इ.स.१५९६च्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत शहजादा मुराद यांनी दिला होता.त्यावेळी सुलताना चांदबिबी हिने अतुलनीय पराक्रम गाजवून वेढा उठवून मोगलांना तह करण्यास भाग पाडले.अहमदनगरच्या इतिहासात-किंबहुना सर्व हिंदुस्थानच्या इतिहासात हा प्रसंग अत्यंत बहारीचा आहे.दुसरा वेढा इ.स.१६३०च्या जुलै महिन्यात शहजादा दानियल यानी दिला.त्यावेळी आपसातील भाऊबंदकीमुळे चांदबिबीचा खून झाला व अहमदनगरचा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.तो तसाच इ.स.१७५९ पर्यंत होता.मध्यंतरी मलिक-अंबर यांनी तो काही दिवस तो आपल्या ताब्यात घेऊन निजामशाही राज्य चालविले.इ.स.१७५९ मध्ये कविजंग किल्लेदार असताना बंदुकीचा आवाज न निघता किल्ला पेशव्यांच्या ताब्यात गेला.पुढे इ.स.१९९७ मध्ये किल्ला शिंदे यांचे ताब्यात गेला व त्यांच्या ताब्यात असताना अहमदनगरच्या किल्ल्यासंबधी तिसरी महत्वाची गोष्ट घडली.१२ ऑगस्ट १८०३ रोजी जनरल वेलस्ली,जे पुढे ‘ड्यूक ऑफ वेलिंग्टन’ या नावाने प्रसिद्धीस येऊन ज्याने नेपोलियनास जिंकले,त्याने हा किल्ला सर केला.त्याचवेळी भिंगारचे रघुराव बाबा देशमुख यांनी चार हजार रुपये घेऊन किल्ल्याची मारा करन्याची जागा दाखविली.ड्यूक ऑफ वेलिंग्टननी किल्ला सर केल्यानंतर ज्या चिंचेच्या झाडाखाली उपहार केला ती जागा सरकारने कायम ठेवली आहे व या गोष्टींचे कायम स्मारक म्हणून तेथे तोफा रोवून ठेवल्या आहेत.यानंतर तहनाम्याप्रमाणे किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला.परंतू १८१८मध्ये पेशवाईचा अस्त झाल्यावर तो इंग्रज सरकारच्या ताब्यात गेला.
किल्यातील राजकीय बंदिवान
निजामशाही नष्ट झाल्यानंतर किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.तेव्हापासून राजकीय बंदिवानांचे ते एक स्थान झाले. ऐतिहासिक कागदपत्रावरून येथे खालील बंदिवान असल्याचा उल्लेख येतो.
१.छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाई
२.तुळाजी आंग्रे
३.सदशिवरावभाऊ पेशव्यांचा तोतया
४.छत्रपती प्रतापसिंह महाराज (सातारकर) यांचे चिरंजीव शाहू महाराज(काशीराजे) दुर्वासिंग,परशरामबाबा,भाईसाहेब
५.छत्रपती शिवाजी महाराज (चौथे – कोल्हापूर)
६.दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांनी आणलेले जर्मन कैदी
७.भारतातील स्वातंत्र्य लढ्यातील १९४२च्या ‘चले जाव’ या चळवळीनंतर पंडित जवाहरलाल नेहरू,सरदार वल्लभभाई पटेल,मौलाना अबुल कलाम आझाद,ब.असफअली,डॉ.सय्यद महंमद,पं.गोविंद वल्लभ पंत,शंकरराव देव,पी.सी.घोष,डॉ.पट्टाभी सीतारामअय्या,आचार्य कृपलानी,आचार्य नरेंद्र देव,डॉ.हरेकृष्ण मेहताब.पंडित नेहरूंनी जगद्विख्यात ग्रंथ ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा या बंदिवासात किल्ल्यात लिहिला.
किल्ल्यातील अवशेष
किल्ल्यात हल्ली एक मोठा दरवाजा व एक दिवाणखाना इतकेच एका राजवाड्याचे भाग राहिले आहेत.याशिवाय जमिनीत काही तळघरे सापडली आहेत.या ठिकाणी अहमदनगरचा राजवाडा,चांदबिबीचे महाल,गगन महाल पूर्वी मोठमोठ्या इमारती होत्या,असे एका पर्शियन हस्तलिखित पुस्तकावरून दिसून येते.अहमदनगरचा राजवाडा तांबड्या रंगाचा होता,असे इतिहासात वर्णन आहे.चांदबिबीचा गगन महाल हि सर्वांत उंच इमारत असून,तिच्यावरून शहराचा व आसपासच्या मुलुखाचा सर्व देखावा दिसत असे,अशी दंतकथा आहे. बागरोजा (बाग-इ-रौझा),शहा ताहीरची कबर,नेता कक्ष हे किल्ल्यात पाहण्यास मिळते.
किल्ला संरक्षण खात्याच्या अख्यारीतीत असल्यामुळे किल्ला पाहण्यास ओळखपत्र (आधारकार्ड) आवश्यक आहे.मध्यंतरी महाराष्ट्रातील गडकिल्ले जागतिक वारसा स्थळांमध्ये समविष्ट व्हावीत यासाठी युनेस्कोने किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली.किल्ल्याचे खंदक स्वच्छ करून त्यात जलपर्यटन करण्याचे कामही अद्यापही प्रतीक्षेत आहे.
संदर्भ : अहमदनगर शहराचा इतिहास | सरदार ना.य.मिरीकर
सुल्ताना चांदबिबी | डॉ.शशी धर्माधिकारी
फोटो साभार : Dinesh Ishwar Nangare & Amit Rane
संकलन : पीयूष रजनी अविनाश गांगर्डे
#दुर्गजागर
#दुर्गजागर_२
#जागर_इतिहासाचा

किल्ले गोवळकोंडा(गोलकोंडा),भागानगर(हैद्राबाद)






किल्ले गोवळकोंडा(गोलकोंडा),भागानगर(हैद्राबाद)
______महाराष्ट्राच्या दक्षिणेला ५५०-६००कि मी अंतरावर वसलेल व पर्यटनाच्या दृष्टीने गजबजलेले पुर्वीचे भागानगर व आताचे हैदराबाद.मेट्रो ट्रेन व हाय टेक सिटी सारख्या अद्यावत तंत्रद्नानाने दिवसेंदिवस प्रगतीच्या उत्तुंग शिखरावर बसू पाहणारं एक अत्यंत सुंदर शहर.संपुर्ण शहराला गोल राऊंडमध्ये असणारा सहा पदरी रींग रोड यामुळे ट्राफिंक कंट्रोलींग बर्यापैकी सुलभ आहे.या अशा शहराला पुर्वीचा इतिहासही रोमहर्षक आहे.भारत स्वतंत्र्य होण्याच्या व भाषावार प्रांतनिर्मितीच्या आधिचा कालखंड पाहता अगोदर संपूर्ण दक्षिण भारत कर्नाटक म्हणून संबोधला जात होता.सांप्रत भारतातील कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू ह्या राज्यांचा समावेश होत असे.यातील आंध्रप्रदेश राज्याचे एक आंध्र व दुसरा तेलंगणा असे दोन विभाग केले आहेत.साधारणपणे १३ व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये आल्लाउदिन खिलजीचा वजिर ताज अल-दिन इज्ज अल-द्वा उर्फ मलिक काफूर याने दक्षिण भारतावर सॉरी केली.यात त्याने अनेक हिंदु राजांचा पराभव केला.मलिक काफूर राज्य संपादन करत पुढे पुढे जात होता.सन १३३६ मध्ये हरिहर आणि बुक्क राय ह्यांनी एकत्रितपणे मलिक काफूर विरुद्ध लढा देऊन विजयनगरची स्थापना केली. त्यानंतर कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील सर्व भूभाग हा विजयनगर म्हणून ओळखला जाऊ लागला आणि त्याच वेळी उत्तरेच्या भागात बहामनी राज्याची स्थापना झाली. पुढे १५ व्या शतकात बहमनी राज्याचे तुकडे होऊन त्याचे पाच भाग झाले.
१)अहमदनगराची निजामशाही
२)वर्‍हाडातील इमादशाही
३)बिदर येथील बरीदशाही
४)विजापुरातील आदिलशाही
५)गोवळकोंड्याची कुतुबशाही
ह्या सर्व शाह्यांनी एकत्र येऊन विजयनगरचा पाडाव केला आणि ते साम्राज्य आपापसात वाटून घेतले. पुढे काळाच्या ओघात पाचपैकी दोन बलाढ्य शाह्या टिकून राहिल्या आदिलशाही आणि कुतुबशाही.यातील सांप्रत हैदराबाद शहराजवळील गोवळकोंडा किल्ला हा या कुतुबशाहीचा राजधानिचा किल्ला होय.कुतुबशाहीचा इतिहास पाहिला तर बहमनी साम्राज्यातून विलग होऊन महंमद कुली कुत्ब शाह याने या शाहीची स्थापना केली.कुतुबशाहीतील राज्य शासक-
१५१२-१५४३
कुली कुतुबशहा
१५४३-१५५०
जमशेद कुतूबशहा
१५५०-१५८०
इब्राहीम कुतुबशहा
१५८०-१६११
महंमद कुली कुतुबशहा
१६११-१६२६
सुलतान कुली कुतुबशहा
१६२६-१६७२
अब्दुला हुसेन कुतुबशहा
१६७२-१६८७
अबुल हसन कुतुबशहा( कुतुबशाहीचा शेवट)
______काकतीय वंशांच्या राजाने हा किल्ला बांधला.सुरुवातीच्या काळीत चालुक्यांचे प्रतिनिधित्व करणार्या राजघराण्याने नंतरच्या काळात आपले स्वतंत्र्य राज्य घोषित केले.बहमनी सत्तेने याचा पराभव केला.किल्ला बहमनी सत्तेत गेला.त्यानंतर सत्ता विघटनाने तो कुतुबशाहीकडे आला व राज्याचे केंद्र बनला.आजमितीला किल्ला पुर्णपणे उध्वस्त झाला आहे.बाला हिसार हा बालेकिल्ला व किल्ल्याची तटबंधी तेवढी शिल्लक आहे.४ कि मी लांबींच्या तटबंधीस एकूण ८७ बुरुंज आहेत.तात्कालीन काळात या तटबंधीच्या आतच लोक रहात होते.आजही तटबंधीच्या आत पुर्णपणे लोकांचे वास्तव्य आहे.बाला हिसार या बालेकिल्ल्याचे द्वार सुंदर आहे.यावर दोन शरभ कोरलेले आहेत.दरवाजाच्या समोरच संरक्षक बुरुज उभारलेला आहे.खुपच मजबूत व लढाऊ बांधणीचा हा बुरुज आहे.एकूण किल्ला हा ग्रॅनाईट या दगडा पासून बनवलेला आहे.या परिसरात याच प्रकारातील दगड अढळतात.सह्याद्रीच्या काळ्या रॉकच्या तुलनेत हे दगड तेवढे मजबूत नाहित.
_______कामाच्या निमित्ताने दोन तीनदा हैदराबादला जाणे झाल.पण,किल्ला बघायचा काही योग येत नव्हता.या वेळी वेळात वेळ काढून किल्ला बघायला गेलो.बालेकिल्ल्याची निगा येथील प्रशासनाने उत्तम राखली आहे.बालेकिल्ला पाहण्यासाठी प्रत्येकी १५ रुपये तिकीट आहे.किल्ल्यावर कुठल्याही प्रकारचे प्लास्टिक नेण्यास बंधी आहे.खालीच संपुर्ण सामान चेक केल जात व मगच वरती सोडतात.बालेकिल्ल्याचे बांधकाम खुपच सुंदर पद्धतीचे आहेत.या किल्ल्यांनी कधी लढाईचे घाव सोसलेच नाहित.त्यामुळे हे किल्ले आजून चांगल्या स्थितीत आहेत.येथील बांधकामाची पद्धतही सुंदर आहे.वर चढत असताना तुटक अशा पायर्या आहेत.योग्य ठिकाणी टेहाळणी व लढाऊ बुरुज बांधलेले आहेत.१५-२० मिनिटांच्या चढाईनंतर किल्ल्याच्या टॉपला जाता येत.वरही सर्व बाजूंनी तटबंधी व बुरुजाचे काम केलेले आहे.एकंदरीत बालेकिल्ला सुस्थितीत आहे.वरती गेल्यावर पुरातत्व खात्याचेच एक कॅन्टिन आहे. पाण्याची बॉटल घेतली त्याने ४२ रुपये घेतले.म्हटलं यांच काय खर नाही.हे लुटतायेत बहुतेक.पण तो स्टॉलवाला बोलला कि तिकिट मिळते तिथे बॉटल जमा करा व बाकीचे २० रुपये घेऊन जा.मला पहिल्यांदा वाटल कायतरीच टाईमपास आहे.अस आमच्या सह्याद्रीत चुकुनही होत नाही.मी ती मोकळी बॉटल जपून ठेवली व खाली आल्यानंतर तिथे बॉटल जमा केली तर खरोखरच मला २० रुपये दिले.माझ्यासाठी हे नविनच होत.मला हि पद्धत खुपच आवडली.यामुळे कुणीही वरती बॉटल फेकून देत नाही.२० रुपये अडकल्याने सर्वजण बॉटल खाली घेऊन येतात.परिणामी किल्ल्यावर कचराही होत नाही.गडावर सर्व ठिकाणी परमनंट कचरा पेट्या बनवलेल्या आहेत.आपलाकडे अस होत नाही.कीतीही प्रयत्न केला तरी येथील लोक डिसिप्लिन पाळत नाहित.आपल्याइकडे किल्ल्यांवर पहावे तर बाटल्याच बाटल्या व प्लास्टिकचा कचरा पडलेला आहे.खर तर या महाराष्ट्रास या गोष्टीची चाड नाही.बाहेरील देश तसेच महाराष्ट्राबाहेरील राज्य या सर्वांच्या तुलनेने आपला सह्याद्री अनमोल आहे.त्याचा इतिहास थोर आहे.त्याने अनेक वर्षे कित्येक शत्रूशी झुंज घेतली आहे.म्हणून आपल्याला हे आजचे सुखाचे दिवस आहेत.
"पारतंत्र्याची झळ सोसल्याशिवाय स्वातंत्र्याची किंम्मत कळत नाही हे खरेच आहे."
मात्र बदल घडेल.ते तुम्हा आम्हा सर्वांच्याच हातात आहे.
असो....बदल तुम्ही आम्ही केला तर मात्र नक्की घडेल.
______बालेकिल्ल्यात ज्या इमारतीत अंधार असतो तिथे लाईट बसवलेल्या आहेत.जागोजागी व्यवस्थित गार्डन आहे.महत्वाच्या ठिकाणी सेक्यूरीटी गार्ड आहेत.खाली उतरताना तेथील पायर्यांची रचना पाहिली.दगडाचेच कॉलम बनवून त्यावर पायर्या बांधलेल्या आहेत.ते बांधकाम व त्या दगडांची रचना सुंदर आहे.वरती बालेकिल्ल्यावर मोठ मोठ्या दगडांवर दगड तोडल्याच्या खुणा स्पष्ट दिसतायेत.हा खडक ग्रनाईट प्रकारच्या असल्याने या खडकाचे काप तयार होतात.साधारणपणे एका दगडाला एका पाठोपाठ एक असे सात ते आठ होल किंवा चौकोनी खड्डे घेऊन त्यात सौम्य दारुचा दोन तिनदा स्पोट करुन हा दगड तोडला जातो.दगड तोडण्याचे अनेक प्रकार आहेत.आपल्याइकडे त्याच दगडांच्या होलमध्ये लाकडाची पाचर ठोकतात.त़्यात पाणि ओततात.नंतर लाकूड फूगुन दगडास भेग पडते व दगड फुटतो.सह्याद्रीचा दगड कठिण आहे म्हणून येथे मोठे स्पोट करावे लागतात.
थोडा मराठ्यांचा इतिहासही लिहायचा आहे.म्हणून शॉर्टकट मारतो.
_______तर,१६७४ महाराजांचा राजाभिषेक रायरीच्या त्रिशुंगी पर्वतावर पार पडला.राजाभिषेक तर झाला.आता स्वराज्याच्या बॉर्डर कव्हर व सुरक्षित करणे होते.तसेच एका राजाचा राजधर्म आहे की
'नित्य देशाची वाढ करावी.ते सुरक्षित करुन चालवावे'
तसेच राजाभिषेकासही खर्चही झालाच होता.तंजावर प्रांती असणारे आपले सावत्र भाऊ व्यंकोजीराजे यांची स्वराज्य कामासाठी वळविने होते.हि व अशी अनेक कारणे मनात धरुन महाराजांनी दक्षिणेवर स्वारी करण्याचे ठरविले.स्वराज्याची व्यावस्था लावून महाराज "दक्षिण दिग्विजयास" रवाना झाले.मोगलशाहीस तोषिश न देण्याचे पत्राद्वारे कळविले होते.तरीही नळदुर्गला मोगलांसोबत एक लढाई चालू होती.तात्कालीन कुतुबशहा अबुल हसन महाराजांस अनुकुल होता.आदिलशाही मात्र महाराजांच्या विरोधात होती.२५ हजार घोडदळ व ४० हजार पायदळ घेऊन महाराज निघाले.अंबोली घाटावरुन महाराजांनी सैन्याचे दोन तुकडे केले हंबिररावांना एका दिशेने आदिलशाही मुलुखातून व स्वत: भागानगरला निघाले.या मोहिमेचा महाराजांचा तात्कालीन मार्ग कुठल्याच समकालीन साधनांत नाही.मोहिमेत महाराजांनी गुप्तता पाळली होती.त्याची कारणेही तशीच होती.आपण फक्त अंदाज लावू शकतो.माहाराज बिदर किंवा सोलापूर मार्गे भागानगरला पोहोचले.महाराजांचे भागानगरात प्रवेशाआधीच भव्यदिव्य स्वागत झाले. कुतुबशाहीच्या पातशाहांनी महाराजांचे स्वागत करायला मादण्णा आणि आकण्णा यांना पाचारण केले होते. त्यांनी दोन चार गावे पुढे येऊन महाराजांची भेट घेतली आणि त्यांचे यथोचित आदर सत्कार केले. तब्बल एक महिना भागानगरात कुतुबशाहाने महाराजांची आणि त्यांच्या सैन्याची अगदी योग्य बडदास्त ठेवली होती. महाराजांनी आपल्या सैन्याला सक्त ताकीद दिल्याप्रमाणे, कुतुबशाहीच्या रयतेस कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. ह्यावर पातशाह अधिकच खुश झाला आणि त्यांनी महाराजांसोबत तह केला. त्या तहा अंतर्गत कुतुबशाहीच्या हद्दीत महाराजांच्या मोहिमेसाठी होणारा संपूर्ण खर्च कुतुबशाही उचलणार असे ठरले. त्यासोबतच गोवळकोंड्याच्या सेनापती मिर्झा महमद अमीनच्या नेतृत्वाखाली पुढील मोहिमेस उपयुक्त असा सर्वात आधुनिक तोफखाना, चार हजार पायदळ आणि एक हजार घोडदळ महाराजांना दिला गेला.हा एक प्रकारचा मराठ्यांचा विजयच होता.मनात आणले असते तर कुतुबशाही जिंकायला वेळ लागला नसता.पण महाराजांना सर्वच पिढ्यांवर युद्ध व शत्रूत्व नको होते.म्हणूनच महाराजांनी मैत्रीचे सलोख्याचे सबंध राखले.
______गोवळकोंड्याच्या तट बुरुजांनी व बाला हिसार या बालेकिल्ल्याने या मराठ्यांच्या पराक्रमाच्या कथा ऐकल्या आहेत.ते या पराक्रमाचे साक्षिदार आहेत.पायदळाचे सेनापती येसाजी कंक यांची एक रंजक कथा या ठिकाणी घडली.या घटनेस काही समकालीन संदर्भ माझ्या तरी वाचनात नाहीत.पण,सर्वच गोष्टींना संदर्भ पुरावे शोधायचे नसतात.काही गोष्टी जनमानसात ज्या पद्धतीने पसरलेल्या असतात.त्या तशाच ठेवायच्या असतात.तुम्हा आम्हाला अगदी लहानपणापासून हि कथा माहिती तीच येसाजी कंक व एका बलाढ्य हत्तीची लढाई हि याच किल्ल्यात घडली.त्या तटबंधींच्या झरोक्या खिडक्यांनी या मराठी हत्तीचे शौर्य व इमान पाहिले आहे.या मराठी इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत.त्या प्रत्येक मराठी तरुणाला माहित असायला हव्यात.या स्वभिमानाच्या तारेवार निष्ठेच्या खाणाखुणा आमच्यासाठी मागे ठेवून महाराज पुढिल मोहिमेस निघाले.इथून पुढे कर्नाटक मध्ये महाराज वेल्लोर किल्ल्यास लढा देऊन पुढे जिंजी(चंजी) घेतली.मग महाराज तंजावरला व्यंकोजीराजेंना भेटले.व्यंकोजीराजांनीही महाराजांचा हिस्सा नाकारला.महाराजांनी तो प्रदेश लढाई करुन जिंकला.इथून महाराजांनी परतीचा प्रवास सुरु केला. कावेरीपट्टम, चिदंबरम,बाळापुर, बंगरूळ, शिरें, होसकोट,आरणी,चिकबाळापूर, दोडडबाळापूर, देवरायानदुर्ग, तुमकुर, चित्रदुर्ग, कल्याणदुर्ग, रायदुर्ग, हंपी, कनकगिरी, कोप्पळ, लक्ष्मेश्वर, गदग हा भागही जिंकून घेतला.अशा प्रकारे महाराज पन्हाळ्यावर परतले मार्च १६७८ आले.खरे तर महाराजांचा हा दक्षिण दिग्विजय येथे साकारण्यासारखा नाही.यावर पुस्तकेच्या पुस्तके इतिहासकारांनी लिहिली.माझा तेवढा अभ्यास नाही व प्रतिभाही नाही.
______सह्याद्रीतील गडकोटांच्या मानाने राज्याबाहेरील किल्ल्यांस सुगिचे दिवस आहेत.खर तर या किल्ल्यांनी कधीच परकीय आक्रमणांना तोंड दिले नाही.सह्याद्रीतील गडकोट हे नेहमीच तोफगोळ्यांच्या मार्याखाली मारले गेले.कणखर छाती करुन कोट लढले.त्यामुळे ते मातीमोल झाले.तुलना कराविसी वाटते.कारण कसेही झाले तरी ते मराठ्यांच्या तेजोमय इतिहासाचे साक्षिदार आहेत.पुढे मागे जनजागृती होऊन सह्याद्रीतील गडकोटांनाही असे सुगिचे दिवस येतील हि आशा आहे.
बघूयात...!
धन्यवाद....!
संकलन-
नवनाथ आहेर
(९९२२९७३१०१)

Friday, 19 July 2019

किल्ल्याचे प्रकार किती व कोणते?-------4

 

 

किल्ल्याचे प्रकार किती व कोणते?-------4

बागकारखाना:

बागेसाठी लागणारे साहित्य या कारखान्यात असे. देवांच्या पूजेसाठी लागणारी फुले इथल्याच फुलझाडांची असत. फक्त प्रतापगडावरचा हा कारखाना अजून शिल्लक आहे.

बालेकिल्ला:

बालेकिल्ला (मूळ अरबी शब्द बाला-इ-किला) म्हणजे गडावरील सर्वात सुरक्षित जागा. किल्ला ज्या शिखरावर असेल त्या शिखरावरच्या सर्वात उंच जागी बालेकिल्ला असतो. गरज असेल तर बालेकिल्ला तटबंदीने अधिक मजबूत केलेला असतो. क्वचित एका गडावर दोन बालेकिल्ले असतात. राजमाची किल्ल्याला दोन उभे सुळके आहेत, म्हणून तिथे दोन बालेकिल्ले आहेत. सुळक्यांमधल्या जागेत तटबंदी आहे. राजगडावरील बालेकिल्ला चढायला अतिशय कठीण आहे.
बालेकिल्ल्यावरील इमारतीत किल्लेदार आणि हवालदार रहात. क्वचित राजमंदिरही असे.

बुरूज:

बुरूज ही पहाऱ्याची जागा. बुरुजाच्या आत पहारेकऱ्याची राहण्याची सोय असे. बुरुजांवर तोफा ठेवल्या जात. तोफांची तोंडे वेगवेगळ्या दिशांना फिरवण्यासाठी त्या लाकडी गाड्यांवर बसवलेल्या असत.
Image: Vijaydurg Fort
Image: Vijaydurg Fort

भुयार:

काही किल्लयांवर किल्ल्यातून पळून जाण्यासाठी भुयारे आहेत.

माची:

माची हा किल्ल्याच्या बांधणीतला अत्यंत महत्त्वाचा घटक. ज्या गडाचा सपाट विस्तार अधिक त्या गडावर माच्याही अधिक असतात. असे गड जास्त सुरक्षित असतात. माची म्हणजे गडावरील तटांनी सुरक्षित केलेली जागा. माचीवर शिबंदी असते. माची त्या त्या भागाचे संरक्षण करते. राजगडावर संजीवनी माची, पद्मावती माची आणि सुवेळा माची अशी तीन माच्या आहेत. प्रचंडगडावर बुधला माची आणि झुंझार माची आहेत. कोरलई किल्ल्यावरच्या माचीचे नाव आहे ‘क्रूसाची बातेरी’. ही माची इ.स. १५५१मध्ये पोर्तुगीज गव्हर्नराने बांधली.

राजमंदिर:

हे बहुधा बाले किल्ल्यावर असायचे. राजमंदिरात किल्लेदार हवालदार असे खासे लोक रहत. राजे मुक्कामावर येणार असतील त्यापूर्वी मामलेदार ते सारवून धूप वगैरे घालून स्वच्छ करीत. रामचंद्रपंत अमात्यांनी राजमंदिर कधीही रिकामे ठेवू नये अशी गडकऱ्यांना ताकीद दिली होती. राजे येण्याच्या काळात राजमंदिराजवळ सदर (कार्यालय) ठेवली जाई.

शिलेखाना:

शिलेखाना म्हणजे चिलखते आणि शस्त्रास्त्रे ठेवण्याची जागा. या कारखान्यावर धार लावणारे शिकलगार आणि लोहार नेमलेले असत.

सदर:

सदर म्हणजे किल्ल्याचे कागदपत्री कामकाज सांभाळणारे कार्यालय. रायगडावर अंधारकोठड्यांच्या पुढे उजव्या हाताच्या दरवाज्यातून प्रवेश केल्यावर फडाच्या कचेरीचा ओटा आहे. इथेच सदर असे. राजगडावरची सदर पद्‌मावती माचीवर आहे.

सरपणखाना:

गडावर लागणारा जळाऊ लाकूडफाटा सरपणखान्यात असे. ही लाकडे अगदी किल्ल्याजवळच्या जंगलांतून आणता कामा नयेत असे आदेश असत. किल्ल्याभोवतालची झाडे किल्ल्याच्या रक्षणासाठी आवश्यक असत.

स्तंभ आणि दीपमाळा:

रायगडावर एक लोहस्तंभ आहे आणि दोन अनेकमजली जयस्तंभ आहेत. शिवाय अनेक किल्ल्यांवर दीपमाळांचे स्तंभ आहेत.

रथखाना:

रायगड आणि राजगडसारख्या एखाद्या किल्ल्यावर रथ ठेवण्यासाठी रथखाना होता.

किल्ल्याचे प्रकार किती व कोणते?-------4

 

 

किल्ल्याचे प्रकार किती व कोणते?-------4

 

दिंडी दरवाजा:

मोठ्या दरवाज्याच्याच भाग असलेला हा छोटा आणि बुटका दरवाजा. या दरवाज्यातून जाताना थोडे वाकूनच जावे लागते.

चोर दरवाजा:

रायगडाला असा एक दरवाजा आहे. अमात्यांच्या आज्ञेने तो दगडांनी चिणून ठेवला आहे. मुख्य दरवाजा शत्रूने फोडलाच तर या चोर दरवाज्यातून दोरावरून सैनिक उतरवून चोरवाटेने पळून जायची सोय केलेली आहे. वैराटगडावर आणि कोरलईच्या किल्ल्याला अशा चोरवाटा आहेत.
prathamesh ghone chor darvaja
Image: prathamesh ghone chor darvaja
चाकणच्या किल्ल्यात एक फसवा दरवाजा आहे. त्या किल्ल्यात पूर्वेकडून दरवाज्याने आत प्रवेश केला की ती वाट किल्ल्याच्या आतल्या भागात न जाता वेडीवाकडी वळणे घेत एका आडव्या भितीपाशी संपते, आणि त्या दरवाज्याने आत शिरलेले सैनिक जंग्यांच्या माऱ्यात सापडतात.

दारूची कोठारे:

दारूची कोठारे किल्ल्याच्या तटाच्या एका बाजूस असत. कोठाराच्या इमारतीच्या बांधकामात आणि प्रत्यक्ष इमारतीत लाकडाचा अंशही नसे. दारूच्या कोठारांत बंदुकीच्या दारूने भरलेली मडकी, बंदुकीच्या गोळ्या, तोफांचे गोळे आणि बाण साठवलेले असत. ही कोठारे गडावरील वस्तीपासून शक्य तितकी दूर असत.

देवड्या:

देवड्या म्हणजे बुरुजांवरील किंवा दरवाज्यांच्या दोन्ही बाजूंस असलेली पहारेकऱ्याची जागा, चौकी. सुवर्णदुर्गाच्या दरवाज्यापाशी अशा देवड्या आहेत.

देवळे, समाध्या, स्मारकशिला आणि कबरी:

प्रत्येक किल्ल्यावर दोन-तीन तरी देवळे आहेत. काही किल्ल्यांवर स्मारकशिला आणि काहींवर समाध्या आहेत. रायगड किल्ल्यावर शिवाजीची समाधी आणि वाघ्या कुत्र्याचे स्मारक आहे. कबरी अनेक किल्ल्यांवर आहेत. रायगडावरील कबरीला मदरशाची कबर म्हणतात. लोहगडावर दोन थडगी आहेत आणि मुसलमान पिराची एक कबर आहे.

धान्यकोठ्या:

या दगडामध्ये खोदलेल्या असत किंवा आयत्याच बनलेल्या गुहांमध्ये किल्ल्याचा धान्यसाठी ठेवला जाई.

नगारखाना:

नावाप्रमाणेच या कारखान्यात नगारा, शिंग, ताशे आणि इतर वाद्ये ठेवली जात. राजगडावरील अंबरखाना पद्‌मावती माचीवर आहे.

पागा (थट्टी):

थट्टी म्हणजे गडावरील घोडे बांधायची पागा. थट्टीमध्ये घोड्यांशिवाय दुभती जनावरेसुद्धा असत.

पीलखाना:

पीलखाना म्हणजे हत्ती ठेवायची जागा. महाराष्ट्रातील किल्ल्यांपैकी फक्त रायगड, पन्हाळगड आणि प्रतापगड या तीनच किल्ल्यांवर पीलखाने असावेत.

पेठा (पेठ-कारखाना):

किल्यासाठी असलेल्या बाजारपेठा बहुधा किल्ल्याखाली असायच्या. त्याला अपवाद म्हणजे रायगड किल्ला. या किल्ल्यावर नामांकित बाजार आहे. मध्ये रुंद रस्ता आणि दोन्ही बाजूंनी दगडी बांधणीची मापीव बावीस बावीस दुकाने. इथे प्रत्येक दुकानाला माल साठवण्यासाठी मागे दोन दोन खोल्या आहेत आणि खाली तळघर आहे. या दुकानांतून घोड्यावर बसून, जाता जाता खाली न उतरता माल खरेदी करता येत असे. अशाच प्रकारच्या पेठा आणि बाजार पुरंदर किल्ल्यावर, पन्हाळ्यावर आणि मु्रूड जंजिऱ्यावर होते.

प्रवेशद्वार:

हे एकच असेल तर चांगले नाही. याकरिता किल्ल्याला दोन तीन दरवाजे आणि चोरदिंड्या असतात. नेहमीच्या वापरासाठी पाहिजे तितके दरवाजे आणि दिंड्या ठेवून बाकीच्या दगडमातीने चिणून बंद केलेल्या असतात. संकटप्रसंगी ते मार्ग उघडून पळून जाण्याची ही सोय असते.

प्रवेशमार्ग:

किल्ल्यांना बहुधा अनेक वाटांनी जाता येते. असे असले तरी किल्ल्यावर पोचण्यासाठी बऱ्याच वाटा असू नयेत, आणि केवळ एकच वाटही असू नये. एका वाटेवर शत्रू आला असताना दुसऱ्या वाटेने पळून जाता आले पाहिजे. असा किल्ला जास्त सुरक्षित असतो. देवगिरीच्या किल्ल्याला एकच प्रवेशमार्ग असल्याने अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केल्यावर रामदेवरायाला शरण जावे लागले.

फरासखाना:

हा कारखाना वस्त्रे ठेवण्यासाठी असे. सतरंज्या, गादी, तक्के, लोड, सिंहासन, पडदे, गालिचे वगैरे ठेवण्याची जागा.

किल्ल्याचे प्रकार किती व कोणते?-------3

 

 

किल्ल्याचे प्रकार किती व कोणते?-------3

टोक:

गडावरील टोक म्हणजे सपाट भिंतीसारख्या खोल कड्याचा गडावरील सपाट माथा. रायगडावर भवानी टोक आणि टकमक टोक अशी दोन टोके आहेत. टकमक टोकाखाली २८०० फूट खोलीचा सपाट भिंतीसारखा कडा आहे. या टोकापाशी वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे टोकावर उभे रहाता येत नाही. कधीकधी वारा खोऱ्यातून वर वर चढत टकमक टोकापर्यंत पोचतो. त्यामुळे खोऱ्यात उडणाऱ्या घारीसुद्धा वर फेकल्या जातात. त्यामुळे टोकावर पालथे झोपून कडा आणि खालचे खोरे न्याहाळावे लागते.
Image: Ajinkyatara Darvaja
Image: Ajinkyatara Darvaja

ढालकाठी:

ढालकाठी म्हणजे निशाण रोवण्यासाठी बांधलेला दगडी ओटा. ढालकाठी बहुधा एखाद्या बुरुजावर असे. विचित्रगडावरील फत्तेबुरुजावर अशी ढालकाठी आहे, तर राजगडावरील ढालकाठी पद्‌मावती माचीवर आहे.

तट:

तट म्हणजे मजबूत दगडी बांधकाम करून गडाभोवती बांधलेली भिंत. किल्ल्याच्या सर्व बाजूने तट असण्याची आवश्यकता नसते. जो भाग सरळ उभ्या कड्यामुळे वर चढण्यास अशक्य, तेथे तट बांधला जात नाही. कधीकधी दोन कड्यांच्या मधला भागच तटबंदी बांधून सुरक्षित केलेला असतो. तुंगी गडाला सर्व बाजूने कडा असल्याने त्याला तटबंदीच नाही. फक्त दरवाजा आणि भोवती बुरूज आहेत. तट हे नितळ घडीव दगडावर दगड रचून करीत किंवा तिरकस आणि एकमेकांत गुंतलेल्या दगडांचे बनत. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या काही तटांची बांधणी चिलखती पद्धतीची आहे. म्हणजे एकात एक असे दोन तट. रायगडाचे तट असे आहेत.
तटांची रुंदी तीन मीटरांपासून १० मीटरपर्यंत असते. कोणत्याही किल्ल्याच्या तटावरून एक माणूस पाच हत्यारे घेऊन सहज फिरू शके. वसईच्या किल्ल्याचा तट तर दोन मोटारी जातील इतका रुंद आहे. जलदुर्गांचे तट साधारणपणे रुंद असत.

तवा:

देवगिरीच्या किल्ल्याला असा एक तवा आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी एक खंदक लागतो, त्यावर हा तवा ठेवलेला आहे. बिजागऱ्या लावून तो उभा करता येतो. तव्यामागे आग पेटवून तो तवा लालभडक करीत. हा तवा ओलांडून शत्रू किल्ल्यात प्रवेश करू शकत नसे. अल्लाउद्दीन खिलजीने पखालींनी पाणी ओतून ओतून हा तवा थंड केला आणि देवगिरीच्या किल्ल्यात प्रवेश केला.

दगडी जिने:

किल्ल्यावरील उंचसखल जागी जाण्यासाठी उताराचे पायरस्ते किंवा दगडी जिने असत. ब्रम्हगिरी किल्ल्याच्या उंचसर भागाकडून चाळीस-पन्नास पायऱ्याचा एक जिना किल्ल्याच्या पोटात जातो. तिथे एक नैसर्गिक दगडी भिंत लागते. भिंतीवरून शंभर-दोनशे पावले चालल्यावर परत एक दगडी जिना लागतो. या जिन्यावरून वर चढून गेल्यावर दुर्गभंडार नावाचे कडेलोटाचे ठिकाण येते.

दरवाजे:

मुख्य प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर आगंतुकाला किल्ल्यावर हवे तेथे मोकळे फिरता येऊ नये म्हणून किल्ल्याच्या आतील वाटांवर आणखी एकदोन दरवाजे असू शकतात. प्रचंडगडाच्या बिनीदरवाजातून आत गेल्यावर कोठी दरवाजा, कोकण दरवाजा आणि चित्ता दरवाजा असे आणखी तीन दरवाजे लागतात. शिवनेरी किल्ल्यात एकूण सात दरवाजे आहेत. महिपतगडालाही ५ दरवाजे आहेत. कोतवाल दरवाजा, लालदेवडी दरवाजा, पुसाटी दरवाजा, खेड दरवाजा आणि शिवगंगा दरवाजा ही त्यांची नावे.

उपदरवाजे:

किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी ठेवलेले मुख्य प्रवेशद्वाराशी असलेला दरवाजा सोडला तर बाकीच्या दरवाज्यांना उपदरवाजे म्हणतात. लोहगडाच्या शेवटच्या दरवाज्यातून पलीकडे गेल्यावर एक नागमोडी वाट लागते. तिच्या टोकाला खालच्या बाजूला आणखी एक दरवाजा आणि त्यापुढे पुढचा आणखी खालचा बुरुजांनी वेढलेला दरवाजा. हा तिसरा दरवाजा लागेपर्यंत शत्रूला वरच्या भागांत असणाऱ्या जंग्यांच्या माऱ्यातून सुटणे कठीणच.
सिंहगडाचा पुणे दरवाजा आणि त्याचे उपदरवाजे असेच एकावर एक आहेत. एकाच्या मार्यायत दुसरा आणि त्याच्या माऱ्यात तिसरा.
Jidhnesh Khandkhar Pune Sinhagd Darvaja

किल्ल्याचे प्रकार किती व कोणते?-------2

किल्ल्याचे प्रकार किती व कोणते?-------2

 

अशा मोठ्या किल्ल्यांच्या भागांना काही तांत्रिक नावे आहेत. मोठ्या किल्ल्यांवर सुमारे अठरा किंवा कमी कारखाने असत. अशा किल्ल्यांच्या कारखान्यांची आणि किल्ल्यांच्या अवयवांची ही माहिती.

अंधारकोठड्या:

अंधारकोठडी म्हणजे कैदी ठेवायची जागा. ही खोली पंचवीस फूट खोल असून वरती केवळ एक झरोका असे. शत्रूच्या तापदायक माणसाला पकडून आणल्यावर वरून दोराने खाली सोडून दिले जाई. अन्नपाणीही असेच दोराने पुरवले जाई. रायगडावर तीन अंधारकोठड्या आहेत.

अंबरखाने:

अंबरखाना म्हणजे धान्याचे कोठार. अहिवंत किल्ल्यावर दगडचुन्याने बांधलेला अंबरखाना आहे.

उष्ट्रखाना:

उष्ट्रखाना म्हणजे उंटशाळा. सुतरनाला नावाच्या हलक्या तोफा वाहून नेण्यासाठी आणि सांडणीस्वारांबरोबर पत्रांच्या किंवा अन्य वस्तूंच्या थैल्या पाठवण्यासाठी उंटांची आवश्यकता असे. रायगडावर आणि बहुधा पन्हाळगडावरही उष्ट्रखाना होता.

औषधिखाना:

आयुर्वेदप्रवीण वैद्यांसाठी गडांवर औषधिखाना असे. या कारखान्यात भस्मे, चूर्णे, अवलेह आणि अन्य रसायने बनत. पाने, फुले, मुळ्या आणि कंद यांचा संग्रह कारखान्यात करून ठेवलेला असे.

कडा:

कडा म्हणजे किल्ल्यावरून खाली दरीपर्यंत पोचणाऱ्या पर्वताची उभी भिंत. ही भिंत तासून तासून गुळगुळीत केलेली असते. या कड्याच्या बाजूने शत्रूचा हल्ला होण्याची अजिबात शक्यता नसते.

कडेलोटाची जागा:

रायगडावरील टकमक टोकावरून गुन्हेगाराला कडेलोटाची शिक्षा दिली जाई. अशीच एक कडेलोटाची वैशिष्ट्यपूर्ण जागा ब्रम्हगिरी किल्ल्यावर आहे. तिला दुर्गभंडार म्हणतात.

कलारगा:

कलारगा म्हणजे गडाभोवतालच्या खोबणी. या बेचक्यांत प्रयत्न्पूर्वक झाडी वाढवली जाई. कलरग्यातील झाडाची एकही फांदी न तोडण्याची रामचंद्रपंत अमात्यांची आज्ञा होती.

कुरणे:

ही गडाखाली असत. गडावरील गुरांसाठी रोज चारा गडाखालून येत असे. तसा पुरेसा साठा आधीच गडावर करून ठेवलेला असे.

कुसू:

किल्ल्याच्या आतली छोटी तटबंदी किंवा कुंपणाची भिंत. या शब्दाचे अनेकवचन कुसवे असे होते.

कोठी आणि जिन्नसखाना:

गडावरील वस्तीस लागणाऱ्या गोष्टी ठेवण्याची जागा. रायगडावरील कोठीत कलाबतूचे कापड, खारका, बदाम, कस्तुरी, छीट, आणि नाना प्रकारची तेले ठेवली असल्याचे उल्लेख आहेत. नेहमी नेहमी लागणाऱ्या किरकोळ वस्तू जिन्नसखान्यात असत.

खंदक:

किल्ल्याभोवती खोदलेला चर. याच्यावर एखादा पूल असे. खंदक ओलांडून किल्ल्यावर आक्रमण करणे सोपे नसे. खंदकामध्ये काटेकुटे असत आणि विषारी साप सोडलेले असत. चाकणच्या किल्ल्याभोवती तीस फूट खोल आणि पंधरा फूट रुंद असा पाण्याने भरलेला खंदक होता. यशवंतगडाभोवती आग्नेय दिशा वगळून अन्य बाजूंना २४ फूट रुंदीचा आणि १३ फूट खोलीचा खंदक आहे. गोपाळगडाच्या दक्षिण बाजूला १५ फूट खोल खंदक आणि बाकीच्या बाजूंना समुद्र आणि खाडीचे पाणी आहे.

खासगी वस्तुसंग्रह:

पानदाने, पिकदाण्या, गंजीफा, सोंगट्यांचे पट, रुद्राक्षांच्या माळा, दुर्बिणी. लोलक घड्याळे आदी खासगी वस्तू या कारखान्यात ठेवल्या जात.

गुहा:

अनेक किल्ल्यांवर किंवा त्याच्या आजूबाजूच्या डोंगरांवर गुहा आहेत. लोहगडावर लोमेश ऋषींची एक पुराणकालीन गुहा आहे. हरिश्चंद्रगडावरील गुहा ५० फूट लांब आणि ५० फूट रुंद आहे. ही गुहा छातीइतक्या पाण्याने भरलेली आहे. तिच्या मध्यभागी एक चौरस ओटा आणि त्यावर एक फार मोठे शिवलिंग आहे.

झरोके, छिद्रे किंवा जंग्या:

किल्ल्याच्या तटाला बंदुकीचा मारा करण्यासाठी छिद्रे किंवा झरोके ठेवलेले असतात. त्यांची दिशा तिरपी खालच्या बाजूला असते. जवळजवळच्या तीन झरोक्यांतून तटाखालच्या तीन बिंदूवर रोखलेल्या तीन तीन बंदुका असतात. म्हणजे तटावरील एकच माणूस तीन ठिकाणी एकाच वेळी मारा करू शकतो. जिथे शत्रू तटाच्या अगदी जवळ पोचण्याची संभावना असते तेथे छिद्र अधिक तिरके असते.

जामदारखाना:

सिंहगड, रायगड, प्रतापगड, राजगड, आणि पन्हाळा या सर्व किल्ल्यांवर मोठमोठे जामदारखाने होते. जामदारखान्यात रत्ने, हिरे, पाचू, माणके आणि सोन्याचे होन ठेवलेले असत. शिवाय रायगडावरील जामदारखान्यात शिवारायांचे दोन सिंह असलेले सिंहासन ठेवलेले होते.

टांके, तलाव, विहीर:

पिण्याच्या पाण्यासाठी गडावर अनेक टांकी, विहिरी आणि एखादा तलाव असे. टांकी खडकांत खोदलेली असत. पाच मीटर लांब, दोन-चार मीटर रुंद आणि आठ दहा मीटर खोल अशी टांकी गडाच्या चहूबाजूंना असत. पावसाच्या झिरपणाऱ्या पाण्यामुळे ही टांकी भरत. क्वचित दोन टांकी जोडलेली असत. सिंहगडावरचे देवटांके त्याच्या चविष्ट, थंडगार व औषधी पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. रायगडावरच्या आणि लोहगडावरच्या टांक्यांमधले पाणीही रुचकर आहे. मार्किंडा गडावर कोटितीर्थ (रामकुंड), कमंडलू आणि मोतीटांके अशी तीन टांकी आहेत. रवळ्या आणि जवळ्या या दोन किल्ल्यांच्या मधल्या भागात गंगा-जमुना या नावाची उत्तम टांकी आहेत. शिवाय दोन्ही किल्ल्यांवर आणखीही काही टांकी आहेत.
पुरंदर किल्ल्यावर राजाळे आणि पद्‌मावती नावाचे तलाव आहेत. महिपतगडावर पारेश्वराच्या देवळाच्या आवारात दोन तळी आहेत.
रायगडावर गंगासागर नावाचा कधीही पाणी न आटणारा तलाव आहे आणि शिवाय, कुशावर्त आणि हत्ती तलाव नावाचे आणखी दोन तलाव आहेत. हत्ती तलाव हत्तींना डुंबण्यासाठी वापरला जात असे.

किल्ल्याचे प्रकार किती व कोणते?-------1

किल्ल्याचे प्रकार किती व कोणते?----------------1

 

महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. त्यांचे मुख्य प्रकार – भुईकोट किल्ला, जलदुर्ग आणि गिरिदुर्ग.

भुईकोट किल्ला (स्थलदुर्ग):

यांमध्ये चाकणचा किल्ला किंवा शनिवारवाडा यांसारखे किल्ले येतात. भुईकोट किल्ल्याचा छोटा प्रकार म्हणजे गढी. सरदारांच्या, सावकारांच्या, इनामदारांच्या आणि देशमुख-पाटलांच्या अशा गढ्या महाराष्ट्राच्या अनेक गावांत आहेत. गढ्यांना किल्ल्यांप्रमाणेच, पण कमी प्रमाणात संरक्षण असे. गढीपेक्षा लहान म्हणजे वाडा. हे वाडे तर असंख्य आहेत.

जलदुर्ग:

समुद्राचे पाणी चहूबाजूंनी असणारे हे किल्ले. या किल्ल्यांवर बहुधा होडीने जावे लागते. काही किल्ल्यांना समुद्राच्या ओहोटीच्या वेळी उथळ पाण्यातून किंवा किंवा पाण्यातून वर आलेल्या पायरस्त्यावरून पायी पायी जाता येते. तर काही किल्ल्यांना तीन बाजूंनी पाणी आणि चौथ्या बाजूने किल्ल्यावर जाण्यासाठी सरळ वाट असे. अलिबाग, सिंधुदुर्ग, मुरुड जंजिरा ही जलदुर्गांची उदाहरणे. समुद्रावरून येणाऱ्या आक्रमणाची पूर्वसूचना मिळून प्रतिकार करण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग होत असे.
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नाेगिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत पसररलेल्या जलदुर्गांची माहिती ’वेध जलदुर्गांचा’ या भगवान चिले यांनी लिहिलेल्या पुस्तकात आहे. अंजनवेलचा किल्ला,अर्नाळा, तारापूरचा किल्ला, भरतगड, यशवंतगड हे किल्ले खासगी मालकीचे झाले असून या किल्ल्यांवर घरे उभारून तेथे बागा लावल्या आहेत.

डोंगरी किल्ले (गिरिदुर्ग):

हे डोंगरावरच बांधलेले किल्ले. अतिशय कठीण अशा पाऊलवाटांनी या किल्ल्यांवर जाता येते. किल्ल्याच्या पायथ्याकडून येणाऱ्या शत्रूच्या आक्रमणाची पूर्वसूचना मिळण्यासाठी आणि प्रतिकार करण्यासाठी हे किल्ले अतिशय उपयोगी पडत. लढाईत पराभव होऊ लागला की माघार घेऊन एकदा किल्ल्यात शिरले की शत्रूचा पाठलाग आणि ससेमिरा थांबायचा. महाराष्ट्रातील काही किल्ले फारच लहान आहेत. असे किल्ले म्हणजे निव्वळ पहाऱ्यासाठी बांधलेल्या चौक्या. काही किल्ले मात्र फारच मोठे आहेत.