*वाडी सुतोंडा किल्ला, जलव्यवस्थापनचा उत्कृष्ट नमुना*
पोस्तसांभार :: https://www.facebook.com/Khandesh-388457908591849/
मराठवाडा व खान्देशच्या हद्दीवरील सोयगाव तालुक्यात अजिंठाडोंगर परिसरात वसलेला वाडी सुतोंडा किल्ला जलव्यवस्थापन व वॉटर फिल्टरचा उत्कृष्ट नमुना समजला जातो. किल्ल्याचा अजून सखोल अभ्यास होऊन परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होण्याच्या हालचाली पर्यटनप्रेमी करीत आहेत.हा किल्ला सुतोंडा, सायितोंडा, वाडी किल्ला, नायगाव किल्ला या नावाने ओळखला जातो. हा किल्ला चाळीसगाव-सोयगाव रस्त्यावरील बनोटी गावापासून चार किलोमीटर अंतरावर नायगावशेजारी आहे. किल्ला इतका दुर्लक्षित आहे की बनोटी गावातही अनेक ग्रामस्थ या किल्ल्याबद्दल अनभिज्ञ आहेत. नायगावशेजारी पूर्वी ओसाड, उजाड गाव होते. त्या गावाचे नाव सुतोंडा व बाजूला वाडी गाव. त्यावरून या किल्ल्याचे नाव वाडी सुतोंडा असे पडले. औरंगाबादच्या गॅझेटमध्ये या किल्ल्याला सायितोंडा म्हटले आहे. कन्नडपासून उत्तर पूर्वेला 26 किलोमीटर अंतरावर हा किल्ला असल्याची नोंद आहे.
*पाण्याच्या 52 टाक्यातून उत्कृष्ट जलव्यवस्थापन*
किल्ल्यात कोठार घरे, तोफा, भुयारे असे काहीही आढळत नाही; मात्र महाराष्ट्रातील कोणत्याही किल्ल्यात वा लेणीत आढळत नसतील एवढ्या 52 पाण्याच्या टाक्या या किल्ल्यात कोरलेल्या आहेत. एकाखाली एक अशा तीन टप्प्यात या टाक्यांची रचना असून वरील पाणी खालच्या टाकीत व त्यातील पाणी पुन्हा खालच्या टाकीत असे तीन ते चार वेळा फिल्टर होऊन खाली साचून राहते. जलनियोजन व जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या किल्ल्यात दुष्काळातही भरपूर पाणी आढळते.
*बनोटीला हत्ती घोडे यांचे बाजार*
आजूबाजूच्या परिसरात पाण्याची इतकी आवश्यकता नसताना किल्ल्यात एवढे पाणी का साठवून ठेवले गेले असेल असा प्रश्न साहजिक पडतो. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या किल्ल्यातील पाणी बनोटी गावाच्या नदीकाठावरील महादेव मंदिराजवळील गोमुखातून पडत असे. 1992 ते 93 पर्यंत हे पाणीपडत असल्याचे प्रत्यक्ष बघितल्याचे अनेक ग्रामस्थांनी सांगितले. पुढे या मार्गात शेती करताना ही पाईपलाईन तुटून पाणी बंद झाले. शिवाय या किल्ल्याला लागून बाजारपट्ट्याच्या ओट्यांच्या व पय्यांच्या खुणा आहेत. येथे हत्ती व घोड्यांचा मोठा बाजार भरत असे. या जनावरांना पाण्याची व्यवस्था किल्ल्यात केली असावी.
*अजिंठा डोंगररांगात ऐतिहासिक ठेवा*
औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा डोंगर परिसरात कन्नड, सोयगाव, चाळीसगाव, नांदगाव व सिल्लोड तालुक्यातील भागात पाटणादेवी, पितळखोरा लेणी, मद्रासीबाबा, केदाऱ्या धबधबा, कन्हेरगड, मल्हारगड, गौताळा अभयारण्य, गौतम ऋषी, सीतान्हाणी, धारकुंड लेणी, घटोत्कच लेणी,अजिंठा लेणी, जोगेश्वरी, मुर्डेश्वर, कालीमठ, पिशोरचे मंदिर, वाकीचे मंदिर, पेडक्या किल्ला, चिंध्या देव, किल्लेअंतुर, नायगावचा वाडी सुतोंडा किल्ला, वेताळवाडीचा किल्ला, हळद्या किल्ला, खालच्या व वरच्या पट्टयातील शेकडो हेमाडपंथी मंदिरेआहेत.
*काय म्हणणे आहे इतिहासतज्ज्ञचे*
इतिहास तज्ज्ञ डॉ. रमेश सूर्यवंशी यांच्या मते, 52 टाक्या असलेला हा लेणीवजा किल्ला अभ्यासकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. मात्र सर्व पातळीवर हा किल्ला दुर्लक्षित आहे. तालुका, जिल्हा वा प्रशासकीय हद्दीचा संकोचित विचार गाळून या निसर्गसंपन्न परिसराचा सर्वांनी एकत्र येऊन विकास करणे आवश्यक आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रस्ते, राहण्याची व्यवस्था व सुरक्षा बळकट करणे अपेक्षित आहे.तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी विजय सूर्यवंशी यांच्या म्हणण्यानुसार, हा परिसरच मुळात निसर्गसंपन्न व वैभवशाली आहे. सध्या महाराष्ट्रात जलव्यवस्थापनासाठी राबवण्यात येणारी “माथा ते पायथा’ योजना या किल्ल्याच्या अभ्यासातून शिकणे गरजेचे आहे. शिवाय येथील पाणी अगदी आपण हल्ली पैसे देऊन खरेदी करत असलेल्या आरओ पाण्यासारखे आहे, तेही नैसर्गिकरीत्या! याचा विकास करण्यासाठी जास्त निधीची आवश्यकता नाही. केवळ टाक्यातील गाळ काढून थोडी डागडुजी केलीतरी याला पूर्वीचे वैभव प्राप्त होईल. वेताळवाडी किल्ला, जंजाळा किल्ला व वाडी सुतोंडा किल्ला यांच्या पर्यटन विकासाठी सुमारे दोन कोटींचा प्रकल्प आराखडा शासनास सादर केलेला आहे. अद्याप त्याचे पुढे काहीही झाले नाही.
No comments:
Post a Comment