Followers

Wednesday 11 August 2021

चाफळचे श्रीराम मंदिर

 








चाफळचे श्रीराम मंदिर :

समर्थांनी चाफळचे राममंदिर शके १५६९ (सन १६४८) मध्ये आपले शिष्य व गावकरी यांच्या मदतीने बांधले. त्या कामात छत्रपती शिवाजी महाराजांनी सहाय्य केले होते. समर्थांनी चाफळच्या मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केली त्याबद्दलची आख्यायिका प्रचलित आहे. समर्थ रामदास यांना श्रीरामचंद्रांनी दृष्टांत दिला. त्यांनी त्यानुसार अंगापुरच्या डोहातू दोन मूर्ती बाहेर काढल्या. एक श्रीरामाची आणि दुसरी अंगलाई देवीची. समर्थ रामदासांनी श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना चाफळ येथे केली. पंचवटीचा राम अशा रीतीने कृष्णेच्या खोर्यात आला, आणि समर्थ संप्रदायाचे मुख्य मठाचे स्थान चाफळ हे ठरले. अंगलाई देवीची मूर्ती सज्जनगडावर स्थापना करण्यात आली. अंगापूरच्या ग्रामस्थांनी रामाची मूर्ती चाफळला नेण्यास विरोध केला होता. त्यावर समर्थांनी त्यांना ती मूर्ती घेऊन जाण्यास सुचवले. मात्र त्या गावक-यांनी ती मूर्ती जागची हलवता येईना. गावक-यांनी समर्थांकडे स्वत:ची चूक मान्य केली. चाफळ येथे त्या मूर्तीची स्थापना झाल्यापासून तेथे श्रीरामनवमीचा उत्सव अखंडीतपणे साजरा केला जात आहे.त्या उत्सवात अंगापुरच्या गावक-यांना सासन काठ्यांचा मान देण्यात आला आहे.
समर्थांनी बांधलेले मंदिर त्यांच्या पश्चात मोडकळीस आले. त्या मंदिरास डिसेंबर १९६७ मध्ये झालेल्या कोयना भूकंपामुळे भेगा पडल्या. १९७२ साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या बांधकामात त्याची जुन्या पद्धतीची बांधणी कायम ठेवण्यात आली. चाफळ येथील मंदिर काळ्या दगडी चौथ-यावर उभे आहे. त्याचा आकार तारकाकृती आहे. मंदिराशेजारी मजबूत दगडी तटबंदी असून तिला चार बुरुज आहेत. मंदिराच्या जुन्या बांधकामांपैकी महाद्वार आणि पाय-या हे भाग शाबूत आहेत. मंदिरावर पाच शिखरे असून सर्वात उंच शिखरावर सुवर्णकलश व तांब्याचा ध्वज आहे. त्या मंदिराच्या बांधकामात कोठेही लोखंड वापरलेले नाही. मंदिराच्या पाय-या चढून आत जाताना विष्णूच्या दशवतारांची शिल्पे नजरेस पडतात. मंदिरात प्रवेश करताना दोन बाजूंस दोन खांब दिसतात. त्यापैकी उजव्या खांबावर मत्स्य, कूर्म, वराह व नरसिंह या अवतारांची शिल्पे कोरलेली आहेत. तर डाव्या खांबावर वामन, परशुराम, बौद्ध, व कलंकी यांच्या मूर्ती आहेत. उर्वरीत दोन दोन अवतार मागील बाजूस भिंतीवर कोरलेले आढळतात.
मंदिराच्या गाभा-यात संगमरवरी सिंहासनावर राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. त्यापैकी श्रीरामाची मूर्ती मध्यभागी चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे. ती मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतरत्र रामाची मूर्ती धनुर्धारी अवस्थेत असते. चाफळच्या मंदिरातील रामाच्या हातात कमळाची फुले आहे. मूळ मूर्तीच्या शेजारी खालील बाजूस समर्थ रामदास व हनुमान यांच्या छोट्या संगमरवरी मूर्ती आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर कोनाड्यात अनेक देवदेवतांच्या मूर्ती आढळतात.

No comments:

Post a Comment