Followers

Tuesday 24 August 2021

चौलचा रामेश्वर

 









चौलचा रामेश्वर
कोकणात अनेक सुंदर शिव मंदिरे आहेत. त्यापैकी अतिशय अप्रतिम रचना असलेले आणि ऐतिहासिक वारसा असलेले एक मंदिर म्हणजे चौल गावचा रामेश्वर. दगडी पुष्करणीसमोर हे कोकणी पद्धतीचे मंदिर एखादे चित्र असावे तसे भासते. इसवीसन १६२५ मध्ये इटालियन प्रवासी डेला वेल ने लिहिलेल्या वृत्तांताप्रमाणे पोर्तुगीज चौल आणि मुस्लिम चौलच्या मध्ये (आजच्या दृष्टीने चौल-रेवदंडा सीमेवर) एक भव्य शिवमंदिर आहे.
या मंदिराचे वर्णन करताना हा इटालियन प्रवासी सांगतो … इथं तलावाकडे पाठ करून आणि गर्भगृहाकडे नजर वळवलेल्या स्थितीत दक्षिणी पद्धतीचा नंदी आहे. भाविक इथं आल्यावर प्रथम हातपाय धुतात आणि नंतर नंदीला डोके आणि हात टेकून नमस्कार करतात. त्यानंतर काही मंदिरात जातात तर काही प्रथम प्रदक्षिणा घालून मग मंदिरात जातात. इथल्या देवांना, नंदीला आणि तुळशीला ते फळे आणि भात अर्पण करतात. रामायणातील महत्त्वाचे पात्र हनुमान इथं देवता स्वरूपात आहे.
मंदिरासमोरील दगडी पुष्करिणीबद्दलही बरीच माहिती उपलब्ध आहे. इसवीसन १८३८ मध्ये या पुष्करिणीच्या दुरुस्तीसाठी ७५० रुपये खर्च ग्रामस्थांनी मिळून केला. नंदीजवळ असलेली दीपमाळ लाडो भावजी प्रभू पाताणे यांनी १७८४ मध्ये बांधली तर पुष्करिणीजवळ असलेली दीपमाळ बाबाजी लोहार यांनी बांधली. मंदिरात अतिशय सुबक आणि रेखीव गणेशमूर्तीही पाहता येते.
या मंदिराचा जीर्णोद्धार ८ ऑक्टोबर १७४१ रोजी श्रीनिवास बाबा दीक्षित यांनीविजयादशमीच्या मुहूर्तावर करवून घेतला. यासतीच मानाजी आंगरे आणि नानासाहेब पेशव्याचे आर्थिक अनुदान मिळाले. पुढे उरलेली रंगरंगोटी आणि दीपमाळा, तुळशी वृंदावन वगैरे काम विसाजीपंत सरसुभेदार यांनी १७६९-७० मध्ये पूर्ण करून घेतले. या मंदिराला अर्धा खंडी भात नेमला गेला होता. धार्मिक प्रवृत्तीच्या राघोजी आंगरेंनी यात अजून अर्ध्या खंडी भाताची भर घातली.
या मंदिराची एक खास गोष्ट म्हणजे इथं तीन कुंडं आहेत. अग्नि-कुंड, वायू-कुंड आणि पर्जन्य कुंड. जेव्हा पाऊस पडत नाही तेव्हा पर्जन्य कुंड उघडले जाते आणि देवाला पाऊस पडावा म्हणून धावा केला जातो. १८७६ साली जेव्हा पर्जन्य कुंड उघडले तेव्हा आत काही नाणी सापडली ती पूजेसाठी ठेवण्यात आली. हे कुंड १६५३ साली उघडले गेले. त्यानंतर १७३१ साली सेखोजी आंगरेनी उघडले. नंतर १७९०, १८५७, १८७६ च्या दुष्काळात, १८९९ साली आणि सर्वात शेवटी १९४१ साली उघडले गेल्याची नोंद सापडते. अशी समजूत होती की कुंड उघडणाऱ्या यजमानांचा सहा महिन्यात मृत्यू होतो. सुरुवातीच्या काळात काही योगायोगाने हे घडले असावे असे दिसते कारण नंतर अनेकदा कुंड उघडून काही वर्षे उलटली तरीही यजमानांना कोणताही त्रास झाला नाही असं शां वि आवळस्कर यांनी नमूद केलं आहे. मंदिराबाहेर एका मंचावर नवग्रहांची मांडणी केलेली दिसते त्यांचीही नित्य पूजा केली जाते.
अनेक पेशवेकालीन मंदिरांचे खास वैशिष्ट्य म्हणजे देवतांच्या संगमरवरी मूर्ती. रामेश्वर मंदिरात श्री विष्णूची अतिशय सुबक संगमरवरी मूर्ती पाहायला मिळते.
कोकणातील किल्ले, समुद्रकिनारे, मंदिरे, लेणी यांची गोष्ट आम्ही दर्या फिरस्ती ब्लॉगच्या माध्यमातून सांगत आहोत. या चित्र भ्रमंतीत सहभागी होण्यासाठी ब्लॉगला भेट देत रहा.
संदर्भ –
1) कुलाबा जिल्हा गॅझेट
2) आंगरेकालीन अष्टागर – शां वि आवळस्कर

No comments:

Post a Comment