Followers

Sunday, 15 August 2021

मल्लिकार्जुन मंदिर, घोटण, ता. शेवगाव



























 मल्लिकार्जुन मंदिर, घोटण, ता. शेवगाव

अहमदनगर जिल्ह्याचा शेवगाव तालुका हा सातवाहनांची राजधानी असलेल्या पैठणला खेटून असल्याने सातवाहन राजवटीतील अवशेष आपल्याला येथे सापडतात.. पुढे १० ते १४ व्या शतकात भरभराटीला आलेल्या यादव साम्राज्याच्या खाणा-खुणा पैठण व परिसरात विखुरलेले बघायला मिळतात. शेवगाव पासून १० कि.मी. अंतरावर, नगर - पैठण मार्गावरील घोटण येथील मल्लिकार्जुन मंदिर अशाच यादवकालीन स्थापत्याचे आपल्याला दर्शन घडवते.
घोटण नावाची उत्पत्ती सांगताना याच्याशी जोडलेली कथा थेट महाभारतात जाते. कौरव आणि जरासंधानी विराट राजाच्या गायी पळवल्या. त्या गायी भयभीत होऊन दंडकारण्यात पळत असताना मल्लिक नावाच्या ऋषींनी त्यांना या ठिकाणी आश्रय दिला. त्यामुळे या ठिकाणाला ‘गो-ठाण’ असे नाव मिळाले. पुढे त्याचे अपभ्रंश होऊन घोटण असे झाले. मल्लिक ऋषींच्या आज्ञेवरून अर्जुनाने इथे तपश्चर्या केली त्यामुळे इथला देव झाला ‘मल्लिकार्जुन’ अशी आख्यायिका सांगितली जाते.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना असून चारही बाजूंनी तटबंदी असलेले हे पश्चिमाभिमुख मंदिर आहे. मंदिर प्रकारात विटांनी बांधलेल्या तीन दीपमाळा नजरेस पडतात. मंदिरावरील शिखर मात्र नंतरच्या काळात बांधलेले कळते. मंदिराच्या सभामंडपात १६ खांब असून ते सगळे विविध शिल्पांनी मढवलेले आहेत. सभागृहात दुर्मिळ अशी एक गद्धेगळ, अनेक वीरगळी, भग्न मूर्ती व मंदिराचे अवशेष आपल्या नजरेस पडतात. शिव मंदिराचा गाभारा पंधरा फूट खोल असून गाभाऱ्यातील शिवलिंग पाताळलिंग प्रकारातील आहे.
या मंदिरासमोर बळेश्वर नावाचे आणखी एक मंदिर आहे तसेच पायऱ्या चढून गेल्यानंतर काही पावलांवरच जटाशंकर महादेवाचे पुरातन मंदिर नजरेस पडते. रम्य परिसर, शिल्पांनी नटलेले आणि काहीसे वेगळे असलेले स्थापत्य असणारे हे मल्लिकार्जुन मंदिर मुद्दाम वाट वाकडी करून पहावे असे आहे.

No comments:

Post a Comment