Followers

Tuesday, 25 July 2023

चालुक्य कालीन वेळापूर चे अर्धनारीनटेश्वर मंदिर.

 चालुक्य कालीन वेळापूर चे अर्धनारीनटेश्वर मंदिर.











चालुक्य कालीन वेळापूर चे अर्धनारीनटेश्वर मंदिर.. स्थापत्य,रचना,महादेवाचं एक वेगळं रूप...प्रसन्न आणि भारावणारं वातावरण!!!!!
चालुक्य साम्राज्य हे भारतातील एक महान साम्राज्य . अतीशय शूर, पराक्रमी आणि हुशार राजे हे या चालुक्यांच्या वंशात होऊन गेले.जसे की पहिला पुलकेशी,दुसरा पुलकेशी, विनायदीत्य,विजयादित्य,विक्रमादित्य दुसरा,सोमेश्वर, अशी भली मोठी यादी आहे चालुक्यांची.
ई.स. 6 व्या ते जवळपास 12 व्या शतकापर्यंत साधारण 600 वर्षे चालुक्य राजांची भारतातील विविध भागावर सत्ता होती.चालुक्य राजा पहिला पुलकेशी याने चालुक्य साम्राज्याची स्थापना केली.एके काळी कदंब राजाचे मंडलिक असलेलं चालुक्य कुटुंब नंतर च्या काळात पूर्ण भारताचे सत्ताधीश झाले व संपूर्ण भारतावर राज्य केलं.
चालुक्यांच्या मान्यतेनुसार त्यांच्या वंशाचा उत्पत्ती ही ब्रम्हा पासून झाली आहे आणि त्यांचे पोषण सप्तमात्रुकांच्या स्थनपानावर झाले आहे.
चालुक्य हे सुरवातीला फक्त यज्ञ आणि कर्मकांड करायचे.ते अगोदर विष्णू पूजक होते.त्यांचे राजचिन्ह हे ही विष्णूचा अवतार असलेले "वराह" हे आहे.दक्षिणेमध्ये सगळ्यात अगोदर मंदिर बांधायला सुरुवात चालुक्यांनी केली.वातापी म्हणजेच आजच्या काळातील कर्नाटकातील बदामी हे शहर होय. ही चालुक्यांची राजधानी होती.अगोदर विष्णू भक्त असणारे चालुक्य काही काळानंतर हे कट्टर शिव भक्त झाले.त्यानंतर 600 वर्षाच्या एकूण कारभारात चालुक्यांनी हजारो शिव मंदिर बांधली.त्यापैकी काही काळाच्या ओघात नष्ट झाली आणि काही अप्रतिम मंदिर आजही 1500 वर्षानंतर मजबुतीने उभी आहेत.विशेष म्हणजे चालुक्यांनी त्याकाळात जैन मंदिर ही बांधली.ती ही बदामी मध्ये आपल्याला पाहायला मिळतात.त्यातील काही मंदिर ही कर्नाटकातील बदामी, पटडक्कल ,एहोळ,याठिकाणी आजही आहेत.
त्यातील एक चालुक्यांनी बांधलेलं आणि नंतर देवगिरीच्या यादवांनी व नंतर अहिल्याबाई होळकरांनी त्याचा जीर्णोद्धार केला. हे असं शिव मंदिर सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर या ठिकाणी आहे.इथेच आज सहकुटुंब भेट दिली.
साधारणतः एका आयतामधून निघणार दुसरा आयत आणि असे अनेक स्तर अशी एकंदरीत या मंदिरांची बांधायची पद्धत असते.या वेळापूरच्या मंदिराचे स्थापत्य असेच आहे.चालुक्यांच्या शिव मंदिरात सप्तमातृका यांचे शिल्प नक्कीच बघायला मिळते.ते इथेही आहे.
मंदिराच्या प्रवेश द्वारातून आत गेल की एक प्रसन्नता मनात भरते आणि आपण चालुक्य काळात प्रवेश केला आहे , असं वातावरणात जाणवायला लागतं.प्रत्येक ऐतिहासिक मंदिरात एक वेगळीच ऊर्जा असते व ती या मंदिरात आल्यावर चटकन आपल्याला जाणवते.आत गेल्या गेल्या त्या काळातील बारव दरवाजातच आहे.या मंदिराच विशेष म्हणजे या मंदिरात एक बाहेर आणि एक अर्धनारी नटेश्वराच्या मूर्ती समोर असे दोन मोठे नंदी आहेत.
यादवकालीन 2 शिलालेख या मंदिरात आहेत.एक शिलालेख बारवेच्या प्रवेशालाच एका दगडावर आहे आणि दुसरा मंदिरच्या बाहेरच्या व्हरांड्यात ठेवलेल्या दगडावर आहे.
या मंदिराच आणखी एक विशेष म्हणजे इथे शंकराच्या पिंडीवर महादेव आणि पार्वतीची मूर्ती आहे ती म्हणजेच अर्धनारी नटेश्वराची मूर्ती.
हीच मूर्ती जी चालुक्य कालीन आहे .त्याच काळातील आहे.एवढी जुनी कलाकृती आपल्या जवळपास कदाचितच कुठे तरी तुम्हाला पाहायला मिळेल.गाभार्याच्या प्रवेश द्वारावर गणपती नसून गजलक्ष्मीची सुंदर छोटी मूर्ती कोरलेली आहे .
यामध्ये शंकराची चतुर्भुज मूर्ती आहे.पार्वती चा एक हात शंकराच्या उजव्या खांद्यावर आहे ,तिच्या दुसऱ्या हातात शस्त्र आहे.महादेवाच्या जटांमध्ये सूर्य चंद्र आहेत.महादेवाच्या पायात भृगु ऋषी आहेत. दोन्ही मूर्त्यांच्या अंगावर संपूर्ण दागिने कोरलेले आहेत. पार्वतीच्या उजव्या पायात एक चक्र आहे, त्यामुळेही या वेळापुर गावाला अगोदर एकचक्र नगर असेही नाव होते.महादेवाची अनेक मंदिरांमध्ये फक्त पिंड च आहे.पण मी पाहिलेलं ज्यामध्ये पिंडीवर महादेव आणि पार्वतीची मूर्ती असलेलं एकमेवद्वितीय मंदिर आहे.परिसर एकदम स्वच्छ आणि प्रसन्न आहे.
मंदिराच्या वातावरणातील प्रसन्नता आपल्याला चालुक्यांच्या काळात घेऊन जाते...बाकी सगळं स्थापत्य हे थोडस यादवकालीन आणि बाकी चालुक्य कालीन असं मिक्स आहे. परिसरात अनेक पिंडी आणि छोटी मंदिर आहेत. काही मंदिरांची आणि पिंडीची अवस्था वाईट आहे.हा परिसर Archeological Survey Of India च्या ताब्यात आहे.
मंदिराच्या सभा मंडपात असणार सप्तमातृकांचं शिल्प आपल्याला हे मंदिर चालुक्यांच आहे असं ओरडून सांगत राहतं. बाहेर दगडाची असणारी जी आजकाल विरळ झालेली आहे अशी दगडांची दीपमाळ इथे पाहायला मिळते.
वातावरणातील प्रसन्नता,झिमझीम ,हलका पाऊस,हवेतील गारवा आणि अप्रतिम वास्तुकला असलेलं चालुक्य कालीन मंदिर ...वा जगायला अजून काय पाहिजे... अन्न, वस्त्र आणि इतिहास!!!!
वेळात वेळ काढून नक्की भेट द्या...
कुणी येणारं नसेल बरोबर तुमच्या,सोबत पाहिजे असेल,चालुक्यांचा इतिहास पण तुम्हाला ऐकायचा असेल तर मला घेऊन जा बरोबर...मलाही आवडेल परत एकदा यायला...फक्त चहा आणि वडापाव ची सोय करावी लागेल...
हर हर महादेव🙏🙏🙏🙏
@राहुल झाडे
@इंजिनियर्स डायरी

Sunday, 2 July 2023

भोकरदन (भोगवर्धन)

 












भोकरदन (भोगवर्धन)
पोस्तसांभार :रामेश्वर जाधव पाटील 
महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले एक स्थळ. हे औरंगाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे एक ठिकाण आहे. स्थानिक दंतकथा या नगराला कृष्णशत्रू भौमासुराची राजधानी मानते. दंतकथेनुसार याचे नाव भोगवर्धन किंवा भगदनाथ या राजाच्या नावाचा अपभ्रंश होऊन झाले असावे. लोकसंख्या ९,६८० (१९८१). ते खेळणा नदीकाठी सिल्लोड-जाफराबाद रस्त्यावर सिल्लोडच्या पूर्वेस सु. २० किमी.वर वसले आहे. हे ठिकाण उज्जयिनी (उज्जैन) ते पैठण या व्यापारी मार्गावर दण्डक अरण्यात वसले होते, असा प्राचीन वाङ्‌मयात तसेच मार्कण्डेयादी पुराणांत व अनेक उत्कीर्ण लेखांत याचा उल्लेख आढळतो. प्राचीन काळी हे जनपद होते आणि नंतर त्याला विषयाचा (प्रांताचा) दर्जा प्राप्त झाला. येथील रहिवाशांनी सांची व भारहूत येथील स्तूपांच्या बांधणीस दान दिल्याचे उल्लेख तेथील अभिलेखांत आढळतात. माहिष्मतीचा कलचुरी राजा शंकरगण याने भोगवर्धन विषयातील एका गावातील जमीन ब्राह्मणाला दान दिल्याचा उल्लेख ५९७ च्या लेखात आहे. इसवी सनाच्या आठव्या–नवव्या शतकांच्या सुमारास खेळणा नदीच्या काठांवर कोरलेल्या सात खोल्या आणि सभागृहयुक्त एक शैव लेणे इथे आहे; तथापि त्यानंतरचा या गावाचा इतिहास ज्ञात नाही. उत्तर पेशावाईत हे गाव हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारीत आले. भोकरदनच्या सभोवती प्राचीन तटबंदीचे अवशेष असून जुन्या किल्ल्यात तहसील कार्यालय आहे. गावात जुनी आठ लहान मंदिरे असून त्यांपैकी खंडोबाचे मंदिर मोठे आहे. तेथे प्रतिवर्षी यात्रा भरते. याशिवाय नदीकाठी एक महानुभव पंथाचे प्राचीन मंदिर आहे. दर शनिवारी येथे बाजार भरतो. भोकरदन कांबळी व खंडसरी साखरेसाठी मराठवाड्यात प्रसिद्ध आहे.
शां. भा. देव आणि र. शं. गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली येथे १९७३-७४ साली उत्खनन करण्यात आले. त्यांत पूर्वंसातवाहन, उत्तरसातवाहन आणि सातवाहनोत्तरकालीन भिन्न वस्त्यांचे बहुविध अवशेष आढळले. उत्तरसातवाहन काळातील भारताचा रोमन संस्कृतीशी असलेल्या व्यापारामुळे भोकरदनची भरभराट झाली. या समृद्धीमुळे कलाकौशल्याचे हे केंद्र बनले. उत्खननात कारागिरांची अनेक घरे आढळली असून ती गुळगुळीत जमिनीची व कबेलूंनी शाकारलेल्या छतांची आहेत. पाटा-वरवंटा, जाते, पळ्या, थाळ्या, डाव, झाकण्या, मडकी इ. हरतऱ्हेच्या नित्योपयोगी वस्तू येथील घरांत मिळाल्या, या घरांतील सांडपाणी वाहून जाण्याचीही सोय चांगली होती. उत्खननांत घरांच्या अवशेषांशिवाय काही नाणी, मृण्मूर्ती आणि दागिने सापडले. नाण्यांचे प्रकार आणि आकार भिन्न असून नाण्यांमध्ये काही आहत नाणी तसेच सातवाहन-क्षत्रप-कार्दमक आणि गुप्त राजे यांची तांब्याची, मिश्रधातूंची आणि सोन्याचा मुलामा दिलेली नाणी आढळली. येथे मिळालेल्या अनेक प्रकारच्या व आकारांच्या मण्यांत अफीक, प्रवाळ, रक्ताश्म, इंद्रनील, स्फटिक इ. मूल्यवान खडे आहेत. उत्खननात उपलब्ध झालेल्या बांगड्या हस्तिदंती, शंखाच्या आणि विशेषत्वे तांब्याच्या आहेत.
येथील अवशेषांत सु. सातशे पक्वमृदा वस्तू मिळाल्या. त्यांपैकी मानवप्राणी व पशू यांची शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. इतर वस्तूंत कर्णभूषणे, पूजेची अर्चनाकुंडे व घरगुती वापरातील हस्तिदंती कंगवे, कज्जलशलाका (काजळाच्या डब्या), सोंगट्या, थाळ्या इत्यादींचा समावेश होतो. कर्णभूषणे डाळिंबीच्या फुलांसारखी कलाकुसर केलेली असून भारतात अन्यत्र उपलब्ध न झालेले किन्नरी-पात्र, शिवाय एका झाकणावरील तीन स्त्रियांच्या उर्ध्वांगाची मूठ इ. अवशेष लक्षणीय आहेत.
येथील मानवी शिल्पांतील दोन स्त्री-प्रतिमांपैकी एक इटलीमधील पाँपेई या ठिकाणी १९३०-३१ साली झालेल्या उत्खननात मिळालेल्या स्त्री-प्रतिमेसदृश आहे. दोन दासींच्या मधोमध उभी असलेली ही स्त्री सडपातळ व बांधेसूद आहे. हिचा काळ इ. स. पू. पहिले ते इसवी सनाचे पहिले शतक असावा. सातवाहन काळात भोकरदन हे हस्तिदंती कलावस्तूंचे केंद्र असावे आणि येथील वस्तूंची व्यापारानिमित्त देवाण-घेवाण होत असावी, असे अनुमान केले जाते. त्यामुळे पाँपेई येथे उपलब्ध झालेली स्त्री-प्रतिमा मूळची याच भागातली असावी, असेही म्हणता येईल. यांशिवाय येथील उत्खननात मातृकादेवींच्या दोन शिलामूर्ती मिळाल्या. त्या दोन्ही मूर्ती विशीर्ष असून योनिस्तनयुक्त उत्तानपाद मूर्ती आहेत. त्यांपैकी एका मूर्तीच्या दोन्ही बाजूंस कमळे कोरलेली आहेत. तज्ञांच्या मते त्या इ. स. पाचव्या-सहाव्या शतकांत खोदल्या असाव्यात.
सातवाहन सत्तेच्या अवनतीनंतर पैठणप्रमाणेच या गावाचा रोमशी व्यापार मंदावला असावा आणि हळूहळू त्याचे ऐश्वर्य आणि महत्त्व कमी झाले असावे. पुढे मध्ययुगात या नगरीला थोडे महत्त्व लाभले होते.
मराठी विश्वकोश

Friday, 28 April 2023

जुन्नर : सातवाहन काळातील बाधकामातील " विट" ...

 






जुन्नर : सातवाहन काळातील बाधकामातील " विट" ...
------------------------------------------------------------
जुन्नर मधील सातवाहन काळात बांधकामासाठी वापरत असलेल्या ' विटा' पक्क्या भाजलेल्या असून त्या बांधकामासाठी वापरत असताना .त्या बांधकामातील भीतींच्या 'विटा ' एका वर एक जोड येणार नाही अशा साधा - मोड पद्धतीने ठेवत असत या शिवाय खालच्या 'विटा ' आडव्या तर वरच्या 'विटा उभ्या या पद्धतीने उभारल्यामुळे बांधकामातील भिंत भक्कम तयार होत असायची.
जुन्नर येथील सातवाहन काळातील लोकवस्ती च्या स्थळातील उत्खननात आढळून येणाऱ्या विटा २१इंच लांब, ११ इंच रुंद व ३ इंच जाड असून काही ठिकाणी त्या आकाराने खूप मोठ्या म्हणजे ४२ इंच लांब, २० इंच रुंद आणि ७ इंच जाडीच्या तर काही विटा त्याहूनही मोठ्या आकाराच्या आढळून येतात.
काही शंकाकृती लहान - मोठ्या विटा जुन्नर परिसरातील सातवाहनकालीन लोक वस्तीस्थानाच्या भागातून अभ्यासक - संशोधक यांना अभ्यासक करण्यासाठी आढळलेल्या आहे. त्या गोलाकार अवशेषांच्या बांधकामासाठी अशा प्रकारच्या विटा चा वापर केल्याने गोलाकार भाग तयार होत असल्याने त्याकामासाठी अशा विटा बनविल्या जात असत . त्याचे पुरावी आजही जुन्नर परिसरातू दिसून येतात.
कुकडी नदीच्या काठावरील आगरगाव , दिल्ली पेठ, सुसरबाग, लेण्याद्री जवळील गोळेगाव , खालचा माळीवाडा येथील उत्खनात सातवाहन कालीन थरात अशा पक्क्या भाजलेल्या स्वरूपातील ' विटा' ह्या मानवी वस्तीस्थानाचा मोठ पुरावा म्हणून ओळखला जातो.
अशा प्रकारच्या विटा पैठण , कराड , नाशिक ,नेवासा, भोकरदन ,तेर इत्यादि ठिकाणच्या सातवाहन कालीन थरात मिळालेल्या आहे
जुन्नर येथील आगर गावात सन २००८ -२००९ मध्ये डेक्कन कॉलेज , पुणे पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खनामध्ये घराच्या भीतीची रचना बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या सातवाहनकालीन विटांचे अवशेष पांढरी टेकडीच्या जमिनीत आढळून आले. त्यात ओबड- धोबड दगड बसून तयार केलेल्या एका घराचा ३ थराचा पाया आढळला. त्या विटांची भिंत २२ फूट लांब असलेली आढळली ही भिंत उभारताना विटांचे जोड एकावर एक येऊ नये याची काळजी घेतली जात असल्याचे पुरावे येथील उत्खननात जुन्नर चे इतिहास अभ्यासक बापूजी ताम्हाणे यांना पाहाण्यासाठी संधी मिळाली होती.तो उत्खनन चालू असलेला क्षण आजही मला आठवतो.
जुन्नर येथील दिल्ली पेठ येथे सन २०११ मध्ये केलेल्या उत्खनात भाजल्या विटांचा वापर करून एका शेजारी एक असलेली बांधकामे येथे आढळून आली असून चौरस आकाराचे उंच हौद असे वर्णन करता येईल अशी ही विटांची तीन बांधकामे असून उभ्या भिंती मध्ये त्यांना कोठेही दार नाही .मातीने सपाट केलेला तळ असलेल्या या एका हौद सदृश्य ' विट' बांधकामाची लांबी २.५ मीटर तर रुंदी १.५ मीटर , उंची ३.१५ मीटर असल्याचे आढळून आले . हि सर्व पुरातत्व उत्खनने कशी केली जातात ति मि स्वःता पाहिलेली असल्याने माझ्या सातवाहन काळातील लोकसंस्कृती अभ्यासासाठी ति उत्खनने मला महत्वपूर्ण ठरली आहे.
आगरगांव , गोळेगाव मध्ये राहणाऱ्या गृहस्थाने आपल्या घराच्या बांधकामात आधुनिक विटा व दगड यांच्या वापरा बरोबर सातवाहन काळातील विटांचाही वापर केल्याची दिसून येते. नदीकाठाची माती भात साळीच्या भुश्शात तसेच गवतात मिसळून त्यापासून विटा बनवून त्या विटा भट्टीत भाजून पक्की वीट निर्माण करून त्या विटांचा वापर स्थापत्य निर्मिती साठी केला जात असत.
----- बापूजी ताम्हाणे, जुन्नर
जिल्हा : पुणे ( महाराष्ट्र )
मों. नं. 9730862068

जुन्नरच्या भटकतीतून उलगडलेला "सटवाई" देवी च्या अभ्यासाचा शोध......


जुन्नरच्या भटकतीतून उलगडलेला "सटवाई"
देवी च्या अभ्यासाचा शोध......
---------------------------------------------------
बालकाच्या जन्मानंतर पाचवीला "सटवाई देवी" च्या पूजनाचा विधी जुन्नर परिसरातील काही खेडेगांवातील कुटुंबामधुन केला जातो. त्यासाठी बाळंतणीच्या खाटे जवळ घरातील जेवणासाठी मसाला वाटण्याचा दंगडी पाटा मांडला जातो. त्यावर नागिनीच्या पानावर सुपारी , हळकुंड, अंबट चिंच, जायफळ, नाडापुडी, दहा दंगडी गोल खंडे, वही - पेन, लोखंडी वस्तू एकांड ठेवून पूजनाचा कार्यक्रम केला जातो. सुवर्णा मध्ये सटवाई च्या उमटवलेल्या लहान छबीचा देखील पूजनात समावेश केलेला असतो. पूजेच्या ठिकाणी कणकेच्या दिव्यात गोडेतेल घालून ते दिवे प्रज्वलित करीतात.
कुंटुंबात मुलगी जन्माला आली असल्यास पाच कुमारिकांना भोजनाचा कार्यक्रम आयोजित करतात.त्यासाठी चपाती,भात, वरण, कढी असे जेवण बनविले जाते. मुलगा जन्माला आला असल्यास पाच मुलांसाठी भोजनाचा कार्यक्रम केला जातो. पूजन झाल्यावर नाडापुडीतील दोऱ्यांमध्ये सुवर्णातील लहान छबी बांधून ती बाळाच्या मनगटावर बांधली जाते. पूजनातील लोखंडी एकांडाचा उपयोग त्या लहान बाळाला सर्दी झाल्यावर उगाळून लावण्यासाठी केला जातो.
पूजनाच्या दुसऱ्या दिवशी आई - बालकाचे उसे बदलते. पुर्ण सव्वा महिना झाल्यावर गावाच्या बाहेर जाऊन वाटेवरही अशाच पध्दतीने "सटवाई" ची पूजा केली जाते. चार ते पाच आठवड्या नंतर आई बाळाला घेऊन गावाच्या जवळ असलेल्या
"सटवाई" देवीच्या दर्शनाला जातात. श्रावणातील सोमवारी सटवाई चे पूजन करण्याची प्रथा जुन्नर परिसरात आजही चालू आहे. प्रत्येक गावाच्या जवळ पास "सटवाई" देवीचे मंदिर असते. बाळांच्या जन्माशी जोडल्या गेलेल्या प्रथा परंपरांचा अभ्यास करून त्यावर शोध प्रबंध सादर करण्यासाठी प्रख्यात विद्यापीठातील विद्यार्थी अभ्यासक मित्र अभ्यासासाठी जुन्नर परिसरात येत असतात. "सटवाई" देवी ही जुन्नर परिसरातील लोकांचे श्रध्दास्थान आहे. जुन्नर परिसरातील काही "सटवाई" देवीची आख्यायिका या भागातील वयोवृद्ध आजही सांगत असतात.
--- बापुजी ताम्हाणे, जुन्नर ( लेण्याद्री - गोळेगांव )
जुन्नर परिसरातील प्राचीन इतिहासाचे अभ्यासक
मों. नं. 9730862068

Thursday, 27 April 2023

जुन्नरचे सातवाहन काळातील " सिंह छाप " नाणे....

 





जुन्नरचे सातवाहन काळातील " सिंह छाप " नाणे....
-------------------------------------------------------------
जुन्नरचे सातवाहन काळातील " सिंह छाप " नाणे हे प्राचीन जुन्नरच्या सातवाहन काळातील इतिहासाचे एक ठोक साधन आहे. जुन्नरच्या सातवाहन काळातील नाण्याच्या आधाराने प्राचीन जुन्नरच्या इतिहासात दडलेल्या अनेक गोष्टी समोर येण्यास मदत होतात. जुन्नरची सातवाहन काळातील ' सिंह छाप" नाणी संशोधनासाठी अतिशय उपयुक्त आहे. जुन्नर परिसरातील निसर्ग संवर्धनाचे दोन हजार दोनशे वर्षापूर्वी देखील जाणीवपूर्वक प्रयत्न जुन्नर परिसरात होत असल्याचे येथील लेण्यातील शिलालेखातून दिसते.प्राचीन नाणी आपल्याला निसर्गाकडे जाण्याची ऐक दिशा दाखवते. प्राचीन जुन्नरच्या सातवाहन काळातील " सिंह छाप " नाण्यातून जुन्नरच्या इतिहासाचे धागे गवसतात. प्राचीन नाण्यातून सातवाहन काळातील जणू मानव निसर्ग पूजक होता याची साक्ष समजते. " सिंह छाप" नाणे हे जुन्नर च्या सातवाहन टांकसाळीचे वैशिष्ट्य आहेत.
जुन्नरच्या सातवाहन कालीन नाण्यावरील सिह जास्त करून डावी कडे पाहात उभा दाखविला असून मुख्य म्हणजे सिंहाची आयाळ हि टिंबाटिंबाची व भरघोस असते. जुन्नरच्या सिंह छाप नाण्यावरील सिंह हा जणूकाही योध्द करण्यासाठी उभा असल्यासारखे वाटते तर सिंहाची शेपटी वर वळलेली असते. सिहाच्या तोडा पुढे ध्वज दाखविला आहे. सिंहाच्या डोक्यावरील नाण्याच्या अर्धगोलाकार भागात लेख असतो. सिंहाच्या पोटात दोन कमानीआहेत.
नाण्याच्या दुसऱ्या बाजूस उज्जैन चिंन्ह न नंदीपाद चिन्ह असते. दोन डंबेल्स एकमेकांवर एक उभा आणि एक आडवा ठेवलेले असून त्यांच्या चारी टोकांना चार पोकळ वर्तुळे आहेत. सातवाहन काळातील नाणी शिसे, पोटीन धातूची आहेत. जुन्नर परिसरातून उपलब्ध झालेल्या नाण्यामध्ये श्री सातवाहन, श्री सातकर्णी, सिव सातकर्णी, पुलमावली, नहपान अशी नाणी मिळालेली आहेत. काही सिंह छाप नाणी मोठी - लहान आकाराची जुने भगार विकणाऱ्या लोकाच्या माध्यमातून उजाडात आली.
जुन्नरच्या सातवाहन कालीन राजघराण्यातील व्यक्तीच्या पराक्रमाचा खरा इतिहास जगाच्या समोर आलेला आहे. मला तर ही नाणी मिळवण्यासाठी खुप म्हणजे कित्येक वर्षे दिवस लागले जुने भगार वस्तू विकणारी मंडळी म्हणजे जुनी नाणी - वस्तू ही इतिहास अभ्यासासाठी ऐक महत्त्वाचा घटक आहे. माझा स्वतःचा दुर्मिळ नाणी संग्रह उभा करण्यासाठी दुसऱ्याच्या शेतावर माझी पत्नी तसेच मि मोलमजुरी, हमाली, भाजीपाला विक्री मधून मला मिळालेल्या पैशातून रोजच्या घरगुती कुटुंबातील खर्चात
बचत करुन पोटाला चिमटा घेऊन हा नाणी संग्रह उभा केला.
--- बापुजी ताम्हाणे, लेण्याद्री - गोळेगांव ( जुन्नर )
मों. नं. 9730862068

जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील अवशेष...

 





जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील अवशेष...
----------------------------------------------------------------
जुन्नर परिसरात सातवाहन काळातील घराचे अवशेष मागील काही वर्षापूर्वी मिळालेले आहेत. जुन्नर परिसरातील आगरगांव, गोळेगाव, खालचा माळीवाडा, उदापूर, कुसूर,निरगुडे अशा प्रकारच्या गावामधून सातवाहन काळातील अवशेष उजाडात आलेले आहेत . त्यात सातवाहन कालीन घरे ( निवास ) अढळून आलेली आहेत. त्या घराच्या भाजलेल्या विटा २१ इंच लांब, ११ इंच रुंद तर ३ इंच जाड अशा तर काही ठिकाणी मोठ्या आकाराच्या विटा आढळुन आल्या आहेत. सातवाहन काळातील घराचे खांब लाकडी असत ते खांब घराच्या भिंतीत रोवले असत. घराचे छप्पर लाकडी असत त्यावर चौकोनी किंवा आयताकृती कौले असत .कौलाच्या वरील बाजूस असलेल्या दोन छिद्रातून लोखंडी खिळे वांशावर ठोकले जात. किंव्हा झाडाच्या वेलानी छिंद्रातून वांशाना घट्ट बाधत असत. लोखंडी खिळ्यासहित अशी कौले जुन्नर परिसरातून पाहायला मिळालेली आहेत.
सातवाहन काळातील जुन्नर परिसरातील कौलांना दोन उभट पन्हाळी पाणी वाहून जायला ठेवलेल्या पाहायला मिळतात. याशिवाय कौलाच्या खालच्या भागास एक खाच असून ती शेजारच्या कौलाच्या कडेला अडकविली जात असत.कुकडी नदीच्या काठावरील माती वापरून ही कौले बनवित असत. त्यानंतर ति उन्हात वाळवून ति भट्टीत पक्की भाजून काढत असत.घराचा आकार काही ठिकाणी चौकोनी असत काही गावात सन १९५५ च्या दरम्यान १२×१५ फूट व १२×१३ फूटच्या आकाराच्या खोल्या स्थानिक अभ्यासकाना पाहायला मिळाल्या होत्या. घराचा पाया भक्कम पणे करण्यासाठी दंगड गोट्याचा वापर केलेला पाहायला मिळाला.सर्वसाधारण पणे कुकडी नदी काठची चिकण माती घराच्या गिलाव्यासाठी वापरित.घराच्या जवळ जळक्या लाकडाचा कोळसा,फुटलेल्या मातीच्या भांड्याचे काठ, जनावरांची हाडे अशी बरीच अवशेष अढळून आली आहेत.
जुन्नर परिसरात चार पाय असलेले एकसंघ दंगडात कोरून काढलेले पाटे - वरवंटे मिळालेले आहेत . त्यावर धार्मिक शुभ चिंन्ह आढळतात. अशा पाट्याचा एक शिरोभाग पुढे आल्याने वाटलेले धान्य पाट्याच्या पुढील बाजूच्या खाली ठेवलेल्या मृदचक्रातील थाळीत पडे.
धान्य दळण्यासाठी जात्याचा उपयोग प्रथमच सातवाहन काळात केला असावा. मत्र हे जाते आजच्यापेक्षा वेगळे होते. त्यांची वरची तळी उभट असून लाकडी दांडा आडवा घातला जाई व दोन स्त्रिया समोरासमोर बसून हा दांडा फिरविला जाई. हे आडव्या दांड्याचे जाते मुळचे 'रोमन ' असून त्यांच्याकडून ते जुन्नर परिसरात आले असावे. असे.जुन्नर परिसराचे प्राचीन इतिहास अभ्यासक बापूजी ताम्हाणे म्हणतात. हल्ली मात्र उभ्या दांड्याचे जाते असून रोमन जात्याची ती सुधारित आवृत्ती होय . जुन्नर परिसरातील सातवाहन काळात धान्य रात्रभर भिजत ठेवून सकाळी सातवाहन काळातील स्त्री सकाळच्या पाहारी लवकर उठून दंगडी पाट्यावर धान्य वाटून जाडी - भरडी भाकरी ,रोट करुन विस्त्यावर भाजीत असत . पण आडव्या दांड्याच्या जात्यामूळे ताज्या भाकऱ्या,पोळ्या जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील लोकवस्तीच्या घरातून होऊ लागल्या.
---- बापूजी ताम्हाणे, गोळेगाव - लेण्याद्री ( जुन्नर )
ता. जुन्नर, जि. पुणे.( महाराष्ट्र )
मों. नं. 9730862068

जुन्नरच्या लेणीत आढळले...... "रोमन" साम्राज्यामध्ये खेळला जाणाऱ्या पट खेळाचे पुरावे

 


जुन्नरच्या लेणीत आढळले......
"रोमन" साम्राज्यामध्ये खेळला जाणाऱ्या पट खेळाचे पुरावे
***********************
तुळजा लेणी गटसमुहातील लेण्याचा अभ्यास करताना लेणी नं. १३ मधील खोलीच्या सपाट पृष्ठभागावर दुर्मिळ बैठ्या खेळाचे पुरावे आढळल्याचे प्राचीन इतिहास अभ्यासक बापूजी ताम्हाणे यांनी सांगितले.
ताम्हाणे म्हणाले, जुन्नर परिसरातील लेण्यापैकी तुळजा लेणी गट समुहातील लेण्या प्रथम इसवी. सनाच्या पहिल्या शतकाच्या मध्यास कोरलेल्या असाव्यात. त्यापैकी लेणी नं. १३ चे दर्शनी भाग तुटलेला असून आतील चौरस मंडपातील दोन्ही बाजूस तसेच मागील भितीच्या अंगास दगडी बाक कोरलेले आहेत. त्या लेणीचा बैठक किंवा सभागृहासाठी उपयोग केला जात असत. लेणी खोलीच्या सपाट पृष्ठभागावर " रोमन" साम्राज्या मध्ये "नवकांकरी" बैठ्या खेळाचा पट खेळला जात असत अशाच प्रकारचा हा दुर्मिळ खेळाचा पट येथील लेणीत पहावयास मिळतो.
" नवकांकरी" हा संस्कृत शब्द असून त्यांचा अर्थ ९ खडे असा होतो. कन्नड मध्ये ' सालू माने अटा' तर गुजराती मध्ये ' नवकाक्री' तसेच तेलुगू मध्ये ' दादी' म्हणून ओळखला जातो. हा एक समरेखन खेळ आहे. हा बैठा खेळ पटावर दोन खेळाडूंनी खेळला जातो. खेळ खेळत असताना प्रत्येक खेळाडूला ९ प्यादे मिळतात.
" नवकांकरी " बैठा खेळ पटावरील प्रत्येक आतील चौकोनाच्या बाजूच्या मध्यभागी संबंधित बाह्य चौकोनाच्या बाजूच्या मध्यापर्यंत रेषानी जोडलेल्या तीन एकाग्र चौकोनाचा समावेश असलेल्या पटावर खेळला जातो. " नवकांकरी" खेळाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, प्रत्यक्ष खेळाडू जसा त्यात रंगतो तसेच तो खेळ पाहणारे प्रेक्षकही त्यांत तसेच रंगून जातात.
सातवाहन काळात जुन्नर - रोमचा कल्याण, भडोच,नाला - सोपारा अशा पश्चिम सम्रुद्र बंदरातील मार्गाने व्यापारी संबंध नाणेघाट ने जवळ आल्याने त्या वेळी " नवकांकरी" बैठा खेळ रोमन खलाशी खेळायचे त्यांच्या कडून हा खेळ सातवाहन कालीन जुन्नर परिसरात नाणेघाट मार्गाने आलेला असावा.
प्राचीन रोम आणि मध्ययुगीन भारत काळात " नवकांकरी" म्हणून बैठा खेळ लोकप्रिय होता. नाणेघाट मार्गाने जुन्नरच्या बाजारपेठ मध्ये व्यापारी व्यापारासाठी येत असत. व्यापारी येथील लेणीच्या परिसरात मुक्कामासाठी थांबत त्यावेळी फावला वेळ घालविण्यासाठी हा खेळ खेळावे असा विचार त्या वेळच्या व्यापारी लोकांच्या मनात आला असावा. तुळजा लेणीत खेळती हवा,भरपूर सूर्य प्रकाश येईल अशा ठिकाणी " नवकांकरी" पट खेळाच्या पटाची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती बापुजी ताम्हाणे यांनी दिली.
--- बापुजी ताम्हाणे, गोळेगाव ( लेण्याद्री ) मों. नं. 9730862068