Followers

Friday, 28 April 2023

जुन्नरच्या भटकतीतून उलगडलेला "सटवाई" देवी च्या अभ्यासाचा शोध......


जुन्नरच्या भटकतीतून उलगडलेला "सटवाई"
देवी च्या अभ्यासाचा शोध......
---------------------------------------------------
बालकाच्या जन्मानंतर पाचवीला "सटवाई देवी" च्या पूजनाचा विधी जुन्नर परिसरातील काही खेडेगांवातील कुटुंबामधुन केला जातो. त्यासाठी बाळंतणीच्या खाटे जवळ घरातील जेवणासाठी मसाला वाटण्याचा दंगडी पाटा मांडला जातो. त्यावर नागिनीच्या पानावर सुपारी , हळकुंड, अंबट चिंच, जायफळ, नाडापुडी, दहा दंगडी गोल खंडे, वही - पेन, लोखंडी वस्तू एकांड ठेवून पूजनाचा कार्यक्रम केला जातो. सुवर्णा मध्ये सटवाई च्या उमटवलेल्या लहान छबीचा देखील पूजनात समावेश केलेला असतो. पूजेच्या ठिकाणी कणकेच्या दिव्यात गोडेतेल घालून ते दिवे प्रज्वलित करीतात.
कुंटुंबात मुलगी जन्माला आली असल्यास पाच कुमारिकांना भोजनाचा कार्यक्रम आयोजित करतात.त्यासाठी चपाती,भात, वरण, कढी असे जेवण बनविले जाते. मुलगा जन्माला आला असल्यास पाच मुलांसाठी भोजनाचा कार्यक्रम केला जातो. पूजन झाल्यावर नाडापुडीतील दोऱ्यांमध्ये सुवर्णातील लहान छबी बांधून ती बाळाच्या मनगटावर बांधली जाते. पूजनातील लोखंडी एकांडाचा उपयोग त्या लहान बाळाला सर्दी झाल्यावर उगाळून लावण्यासाठी केला जातो.
पूजनाच्या दुसऱ्या दिवशी आई - बालकाचे उसे बदलते. पुर्ण सव्वा महिना झाल्यावर गावाच्या बाहेर जाऊन वाटेवरही अशाच पध्दतीने "सटवाई" ची पूजा केली जाते. चार ते पाच आठवड्या नंतर आई बाळाला घेऊन गावाच्या जवळ असलेल्या
"सटवाई" देवीच्या दर्शनाला जातात. श्रावणातील सोमवारी सटवाई चे पूजन करण्याची प्रथा जुन्नर परिसरात आजही चालू आहे. प्रत्येक गावाच्या जवळ पास "सटवाई" देवीचे मंदिर असते. बाळांच्या जन्माशी जोडल्या गेलेल्या प्रथा परंपरांचा अभ्यास करून त्यावर शोध प्रबंध सादर करण्यासाठी प्रख्यात विद्यापीठातील विद्यार्थी अभ्यासक मित्र अभ्यासासाठी जुन्नर परिसरात येत असतात. "सटवाई" देवी ही जुन्नर परिसरातील लोकांचे श्रध्दास्थान आहे. जुन्नर परिसरातील काही "सटवाई" देवीची आख्यायिका या भागातील वयोवृद्ध आजही सांगत असतात.
--- बापुजी ताम्हाणे, जुन्नर ( लेण्याद्री - गोळेगांव )
जुन्नर परिसरातील प्राचीन इतिहासाचे अभ्यासक
मों. नं. 9730862068

No comments:

Post a Comment