Followers

Friday, 19 January 2024

#श्री_कर्णेश्वर_मंदिर कसबा, संगमेश्वर,रत्नागिरी

 

कसबा, संगमेश्वर,रत्नागिरी
 ✍️ शैलेश ज्ञानदेव तुपे









कोकणाला लाभलेल्या निसर्गाबद्दल,इथल्या प्राचीन मंदिराच्या अद्भुत स्थापत्यशास्त्राबद्दल बोलावं, लिहावं तेव्हढ कमीच. मागच्या पोस्ट मध्ये सोमेश्वर मंदिर राजवाडी आणि सप्तेश्वर मंदिराची भ्रमंती केली प्रत्येक मंदिराच एक वेगळेपण पाहायला मिळले.आज रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील संगमेश्वर रेल्वे स्टेशन आणि बसस्थानक, मुंबई -गोवा महामार्गापासून जवळ असलेल्या कसबा मधील प्राचीन श्री कर्णेश्वर मंदिराची भ्रमंती करणार आहोत.
अलकनंदा,वरूणा व शास्त्री नदीच्या संगमावर बसलेले हे संगमेश्वर.महामार्गावरील येथून ३ कि.मी. आतमध्ये कसबा संगमेश्वर हा भाग आहे.सुरूवातीला गावात प्रवेश केल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आहे.त्या मागून सरळ गेलेल्या रस्ता थेट मंदिरापर्यंत घेऊन जातो .श्री कर्णेश्वर शिवमंदिर २६ मीटर लांब व २३ मीटर रूंद असून दिड मीटर उंचीच्या जोत्यावर उभारले आहे. मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला आहे. तर दक्षिण आणि उत्तर या दोन्ही बाजूकडून मंदिरात प्रवेश करण्यासाठी एकेक प्रवेशद्वार आहेत.पूर्वेच्या दारातून आत गेले की प्रवेशद्वाराच्या बाजूला व्दारपाल आहेत.मुखमंडपात मध्यभागी वर्तुळाकार घुमट कोरलेला आहे.त्यामधील दगडी झुंबर पाहण्यासारखे आहे.त्याच्या खाली अष्ट दिक्पाल त्यांच्या वाहनावर बसलेले दाखवले आहेत समुद्रमंथन, यशोदा दधीमंथन हे प्रसंग कोरलेले आहेत..दरवाजाच्या वरच्या बाजूला शेषशायी विष्णू असून त्यावर दशावतारी शिल्प कोरलेली आहेत.दरवाजा वर व्दारशाखा नक्षीकाम करण्यात आले आहे.सभामंडपात आल्यावर रंगशिळेवर नंदी विराजमान आहे. सभामंडपाच्या खांबावर विविध नक्षीकाम करण्यात आले आहे.इतर मंदिरा पेक्षा इथे जरा वेगळेपण पाहायला मिळते ते म्हणजे साधारण काही मंदिरातच्या खांब आणि तुळ्या च्या मध्ये यक्ष किन्नर मंदिराचा भार त्यांच्या खांद्यावर घेतलेले आहे असे दाखवण्यात येते परंतु या मंदिरात यक्षांच्या जागी गणपती, नृसिंह ,सरस्वती या देवताच्या मुर्ती कोरलेल्या आहेत.मंदिरात ब्रह्मदेव,शेषदारी विष्णू,वरदलक्ष्मी या देवतांच्या मूर्ती आहेत.तसेच छतावर वेगवेगळे नक्षीकाम पहायला मिळते.एक गद्यगळ आहे.गाभार्याच्या व्दारावर पण नक्षीकाम करण्यात आले आहे.गाभार्यात श्री कर्णेश्वराचे शिवलिंग आहे.मंदीरात गेल्यावर मंदीरातील पुजारी भाविकांना मंदिरा बद्दलची माहिती सांगत असतात.मंदिराच्या उत्तर, दक्षिण दरवाजावर पण नक्षीकाम करण्यात आले आहे.इतर मंदिरात शिवलिंगावर अभिषेक केल्यावर जे पवित्र जल बाहेर पडले त्याठिकाणी गायमुख पहायला मिळते परंतु इथे मकर मुख आहे.मंदिराच्या सभोवताली रामायण, महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिराच्या मागील बाजूस उमा महेश्वराची मुर्ती आहे.मंदिराचे मूळ शिखर आता अस्तित्वात नाही. सध्याचे शिखर हे नंतर जीर्णोद्धार केला तेव्हा बांधलेले आहे. मंदिराच्या प्रांगणात दिपमाळ तसेच सुर्यदेवाचे आणि गणपतीचे मंदिर आहे.
'संगमेश्वरमाहात्म्य' नावाचा एक जुना ग्रंथ आहे. त्यात या मंदिरनिर्मितीबद्दल एक कथा येते. त्यानुसार चालुक्य घराण्यातील धनुर्धारी राजाला नाग, कर्ण, सिंघण असे तीन शूर पुत्र होते. यांचा मांडलिक राजा मारसिंह हा शिलाहारवंशीय होता. करवीर क्षेत्री त्यांनी श्री केदारेश्वर पाहिला. तेव्हा राजा कर्णाच्या मनात आपणही असेच एक भव्य मंदिर बांधावे असा विचार आला. कोल्हापूरच्या अंबाबाईचं मंदिर बांधणाऱ्या स्थापतीकडून मग त्याने कोट्यावधी सुवर्णनाणी खर्चून हे मंदिर बांधून घेतलं, असे उल्लेख संगमेश्वरमाहात्म्य या ग्रंथात आलेले आहेत..पराक्रमी चालुक्य राजा कर्ण याने हजार वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले. म्हणून कर्णेश्वर नाव पडले. मंदिराच्या निर्मात्याला कर्ण राजाने दहा हजार सुवर्ण मुद्रा दिल्या‌. या कर्णेश्वर मंदिराच्या निमित्ताने कर्ण राजाने या भागात तब्बल तीनशे साठ मंदिरे बांधून घेतली. आज त्यातील सत्तर एक मंदिरे आजूबाजूला आहेत. संगमेश्वर दक्षिण काशी म्हणून नावारूपाला आले असते.
सन २०१२ मध्ये पुरातत्व विभागाने श्री कर्णेश्वर मंदिराचा राज्य संरक्षित स्मारक म्हणून सामाविष्ट केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले तसेच फितुरीने मोगलांच्या हाती लागलेले दुर्दैवी सरदेसाई वाडा याच ठिकाणी आहे.कर्णेश्वराचे मंदिर सोडून इतरही छोटीमोठी मंदिरे या ठिकाणी आहेत. आवर्जून वेळात वेळ काढून नक्की बघा.
✍️ शैलेश ज्ञानदेव तुपे

Tuesday, 2 January 2024

#श्री_सप्तेश्वर_मंदिर कसबा, संगमेश्वर,रत्नागिरी

 













#श्री_सप्तेश्वर_मंदिर
कसबा, संगमेश्वर,रत्नागिरी
कोकणला ऐतिहासिक आणि निसर्गाचा खुप मोठा वारसा लाभलेला आहे.कित्येक वेळा जाणे झाले तरी काहींनी काही राहून जाते मग ओढ लागते पुढच्या भेटीची. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात हे 12 व्या शतकातील श्री सप्तेश्वर मंदिर.
कसबा मधील कर्णेश्वर मंदिर बघून झाल्यावर जवळच हे सप्तेश्वर मंदिर आहे. मुंबई -गोवा महामार्गावर शास्रीपुलाच्या पुढे एक पेट्रोल पंप आहे त्याच्या थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला वरच्या बाजूला ITI चे शासकीय कॉलेज कडे जाणारा कच्चा रस्ता आहे श्री धन्वंतरी हॉस्पिटलच्या समोरच्या रस्त्याने गेल्यास 15-20 मिनिटांत मंदिरा जवळ पोहोचतो. रस्ता लहान आहे तसेच मध्ये मध्ये कच्च्या रस्ता असल्याने लहान गाड्यांचं इथपर्यंत घेऊन येऊ शकतात.मंदिरा भोवती घनदाट जंगल आहे. देवराई मध्ये मंदिर असल्यामुळे शांतता असते. मंदिर चारही बाजूंनी तटबंदीने बंदिस्त आहे प्रवेश करण्यासाठी दोन मार्ग आहे. हे शिवमंदिर पश्चिमाभिमुख आहे. वाकाटक राजांनी, शिलाहार राजवटीत इ. स. 12 व्या शतकात बांधले. या मंदिराला सिमेंटचे स्पास्टर केल्यामुळे मंदिराचे जुणे पण नाहिशे झाले आहे.मंदिरात कुठेही नक्षीकाम केलेले दिसत नाही.सभामंडपात नंदी विराजमान आहे गाभाऱ्याच्या प्रवेशव्दारावर गणरायाची मूर्ती आहे गाभाऱ्यात शिवलिंग आहे.मंदिराच्या डाव्या बाजूला श्री वैजनाथाचे छोटं मंदिर आहे.मंदिराच्या बाहेर दिपमाळ आहे. एक दगडी चाकं आहे. सप्तेश्वर महादेवाचे मनोभावे दर्शन घेऊन तेथील प्रसिद्ध अशा बारव कडे जाणारी वाट आहे.इथे अतिशय सुंदर प्रकारे जल व्यवस्थापन केलेले बघायला मिळते.
सात प्रवाहांचा स्वामी म्हणजे सप्तेश्वर. नैसर्गिक सात पाण्याचे प्रवाह एकत्र होऊन अलकनंदा नदीचा उगम याठिकाणी झाला आहे.सात प्रवाहाला सात मंदिरे दगड व चुना वापरुन बनवली आहे.प्रत्येक कमाणी वर कमळपुष्प कोरलेली आहेत तसेच वरच्या बाजूला शरभशिल्प आहेत. आत मध्ये शिवलिंग आहे. पुढे गायमुखातून बनवलेल्या बारव मध्ये पाणी पडले. हा कुंड पुर्ण भरल्यावर पुढच्या कुंडात पाणी जाते.या कुंडातून नदीच्या पाण्याचा प्रवाह ओढ्यामार्गे खाली जाऊन कजबा येथे शास्त्री नदीला श्री संगमेश्वर मंदिराजवळ मिळतो.
स्वच्छ व शांत वातावरणात, निसर्ग सौंदर्याने नटलेल्या मंदिरात आवश्य भेट द्या.
✍️ शैलेश ज्ञानदेव तुपे

Monday, 1 January 2024

माचणूर किल्ला ( ता.मंगळवेढा जि.सोलापूर )

 







माचणूर किल्ला ( ता.मंगळवेढा जि.सोलापूर )
(इतिहासवाटा - ८४)
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढे तालुक्यात भीमानदी तीरावर माचणूर येथे मोगल बादशहा औरंगजेबाने १६९६ मधे भुईकोट किल्ला निर्माण केल्याचे बोलले जाते. सोलापूर शहरापासून सुमारे ४५ कि.मी.अंतरावर तर मंगळवेढे या तालुक्याच्या गावाहून सुमारे १२ -१३ कि.मी.अंतरावर हा इतिहासाचे अवशेष सांभाळून उभा आहे.तर शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धेश्वर देवालयाचा अप्रतिम शिल्पकलायुक्त परिसर भाविकांना भक्तिरसात तल्लीन करतो. भीमानदी तीरावर वसलेले माचणूर हे लहान खेडेगाव जरूर आहे पण याला नदीपात्राने घातलेला वळसा व वृक्षाच्या घनदाट अस्तित्वाने वातावरणात शितलता जाणवते. भीमा नदीच्या तीराकडे जाताना वेगवेगळ्या वृक्षाच्या पटांगणाच्या नदी बाजूला समांतर अशी घडीव तटबंदीतील भव्य मंदिर समुहाचे प्रवेशद्वार दिसून येते. प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर नदी प्रवाहाच्या दिशेने उतरत जाणारा दगडी फरसबंदी मार्ग लागतो. डाव्या बाजूला साधू पुरूषाचे समाधिस्थळ तर उजव्या बाजूला दगडी बांधकामातील मंदिर दृष्टीस पडते. दोन्हीहि बाजूला चुनाव वीटांमधे बांधलेले मिनार आहेत. या मिनारातून अंतर्गत भागातून टोकाकडे जाणारा जिना आहे. त्यानंतर दगडी फरसबंदी उतरत असताना श्री भवानीमाता मंदिर तुळजापूरच्या मंदिर परिसरात असल्याचा भास होतो कारण दोन्हीहि मंदिराच्या स्थापत्यशैलीत कमालीचे साम्य आहे.समोर दक्षिणोत्तर तटबंदीतील दुसरे प्रवेशद्वार असून उत्तरेस तटबंदीच्या समांतर असे नदीप्रवाहकडे जाणारे द्वार आहे. डाव्या बाजूच्या तटबंदीतील देवकोष्टकात विशाल शिवलिंग पाहून नकळतच भक्ती व श्रद्धेने दोन्ही कर जोडले जातात. दगडी कमानी प्रवेशद्वारातून प्रवेश करतानाच चौबाजूंच्या दगडी तटबंदीतील मोकळ्या फरसबंदीच्या मध्यवर्ती ठिकाणी उत्तरामुखी हेमाडपंति शैलीतील दृष्टीस पडते. शांत वातावरण, परिसरातील प्राचीन पिंपळवृक्षाचा गोलाकार पार, शिवभक्तांचा वावर एक वेगळी अनुभूती देण्यास पुरेसा आहे.चारहि बाजूच्या तटबंदीत भक्तांच्या विसाव्यासाठी निर्माण केलेल्या दगडी कमानी ओव-या. याच प्रवेशद्वाराच्या दक्षिणोत्तर तटबंदीत दुमजली भक्तनिवास वा साधूंच्या निवासाची देखणी व्यवस्था दिसून येते. श्री सिद्धेश्वर मंदिर उत्तराभिमुखी असून सभामंडप व गर्भगृह अशा रचनेत आहे.सभामंडपाच्या पूर्वेकडील तीन कमानीचा भाग आहे तर पश्चिमेकडील बंदिस्त भिंत असून याच भिंतीत शेंदूर लेपनातील प्रसन्न गणपतिची मूर्ती विराजमान आहे. मंदिरासमोरील आभुषणांनी युक्त नंदी असून शिंगांच्या अग्रावर सोनेरी शेंभ्या चित्त वेधून घेतल्याखेरीज राहत नाही. श्री सिद्धेश्वराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी दोन अडीच फुटाचा मार्ग असून उत्तरेस पन्हळी असलेले शिवलिंग दर्शनाने आत्मिक समाधान मिळते. डाव्या बाजूच्या कोपऱ्यात बंदिस्त काचेत श्री सिद्धेश्वराचा धातूचा मुखवटा ठेवलेला आहे. दर्शन घेऊन आल्यावर समोरच्या ओव-यातून नदीपात्राकडे जाणारा दरवाजा असून या दरवाजातून नदीपात्रातील जटाशंकराचे दगडी बांधकामातील मंदिराकडे जाणारा भव्य कठडायुक्त पायरीमार्ग आहे. चौहोबाजूंनी भीमानदीच्या पाण्याने वेढलेल्या जटाशंकर मंदिराचा नेत्रसुखकारक देखावा पाहून पूर्वजांच्या उच्चदर्जाच्या स्थापत्यकलेचा अचंबा वाटल्याशिवाय राहत नाही. श्री सिद्धेश्वर मंदिर समुहातील देवदर्शन झाल्यावर जवळच असलेला माचणूर किल्ला पाहाण्यासाठी आपली पावले वळतात.
मंदिर व किल्ला यांच्या दरम्यान गावातील वसाहत असून गावाची वसाहत संपल्यावर श्री सिद्धेश्वर मंदिराच्या समांतर भीमानदीच्या तीरावर हा भुईकोट निर्माण केलेला आहे. औरंगजेबाची दक्षिण मोहीम सुमारे अखंड पंचवीस वर्षाची होती. दक्षिणेतील मराठशाही संपविण्यासाठी लाखोंची फौज, खजिना घेऊन आलेला आलमगीर स्वतः येथील मातीत मिळाला पण दख्खन जिंकू शकला नाही. भीमा नदीच्या विशाल पात्रा लगतच सपाट माळरानावर साधारणतः अंडाकृती आकाराचा माचणूरचा भुईकोट किल्ला आपला ऐतिहासिक कालखंड व्यक्त करण्यास उत्सुक आहे. किल्ल्याला पूर्वाभिमुखी मुख्य प्रवेशद्वार असून प्रवेशद्वाराच्या बाहेरील चौबाजूस भिंतींनी बंदिस्त केलेले असल्याने ते लक्षात देखील येत नाही. साधारणतः पंधरा फूट उंचीचे दगडी प्रवेशद्वार तर आतील दोन्हीहि बाजूला सुरक्षारक्षकांच्या देवड्या आहेत. किल्ल्याची सुमारे तीन फूट रूंदीची व पंधरा फूट उंचीच्या तटबंदीची बरीचशी पडझड झालेली आहे. संपूर्ण तटबंदीला वापरलेला दगड हा लहान काचळीचा असून चौकोनी अथवा आयताकृती दगड अजिबात नाही. मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस किल्ल्यात असणारी एकमेव विहीर दगड मातीने भरून गेली असून तेथे झुडुपांचे साम्राज्य झाले आहे. तटबंदी अनेक बुरूज असून इतर भुईकोट अथवा डोंगरी किल्ल्याच्या तुलनेने अतिशय लहान आहेत. अस्तित्वात असलेल्या तटबंदीवर चढ उतार करण्यासाठी सहा ठिकाणी अरूंद पायरी मार्ग आहे.नदी तीराच्या बाजूची तटबंदी नदीपात्रात ढासळलेली आहे. पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वाराखेरीज दक्षिण व उत्तरेस लहान तटबंदीतील दरवाजे असल्याचे दिसून येते तर नदीपात्राच्या ढासळलेल्या तटबंदीतून नदीपात्रात उतरणा-या काही दगडी पायऱ्या अस्तित्वात असल्याने तेथे देखील किल्ल्याबाहेर पडण्याचा मार्ग असल्याची शक्यता वाटते. किल्ल्याच्या नैऋत्येस उत्तराभिमुख मुस्लिम प्रार्थनास्थळ असावे, तर त्याच्या शेजारीच पूर्वाभिमुख घडिव दगडी बांधकामातील वास्तू सुस्थितित असून प्रमुख राज्यकर्त्याच्या किंवा सेनापतिच्या वास्तव्यासाठी निर्माण केली असावी. तीनचार एकर भूभागावरील किल्ल्यात इतर कोणते बांधकाम असल्याचे आढळून येत नाही. मुळात मोगलांनी ह्या किल्ल्याची निर्मिती ही सैन्याच्या छावणीसाठी केली असावी. औरंगजेबाने मराठ्यांशी जो झगडा सुरू केला होता त्यासाठी लागणारा पैसा हा देणे त्याचीच जबाबदारी असल्याने संताजी घोरपडे, धनाजी जाधव व इतर मराठा सरदारांनी औरंगजेबाच्या सैन्यावर अचानक छापा घालून संपत्ती लूटण्याचे प्रकार होत होते म्हणूनच आपली संपत्ती व दारूगोळा सुरक्षित रहावा म्हणून माचणूर किल्ल्याची निर्मिती संभवनिय वाटते. अज्ञात ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या माचणूर किल्ला पाहाण्यासाठी एक तासाचा वेळ पुरेसा असून मराठ्यांच्या पराक्रमाचा अबोल पुरावा एकदा नक्कीच पाहिला पाहिजे.
©® सुरेश नारायण शिंदे, भोर
shindesn16@gmail.com

Wednesday, 13 December 2023

नृसिंह मंदिर - श्रीक्षेत्र धोम

 

नृसिंह मंदिर - श्रीक्षेत्र धोम
लेखन ::
©® सुरेश नारायण शिंदे, भोर
shindesn16@gmail.com



 
सातारा जिल्ह्यातील वाई तालुका म्हणजे ऐतिहासिक स्थळे आणि निसर्गसंपन्न ठिकाणांचा असलेला वारसा पदोपदी पाहावयास मिळतो. तालुक्यातील प्रत्येक गावात ऐतिहासिक घटनांचे अवशेष, डोंगररांगेत असलेले किल्ले व छ.थोरल्या शाहू महाराजांच्या कालखंडात निर्माण केलेल्या वैभवशाली, अप्रतिम स्थापत्यशैलीतील अनेक मंदिरे आहेत. कोल्हापूर नजीक असलेल्या पन्हाळा किल्ला ही शिलाहारांच्या राजधानीचे ठिकाण होते. शिलाहारांचा अखेरचा राजा दुसरा भोज हा होता. दुसरा भोजने जे पंधरा किल्ले निर्माण केले त्यातील चंदन - वंदन, पांडवगड व विराटगड हे दुर्ग वाई तालुक्यात येतात. शिवाय कमळगड, केंजळगड हे शिवकाळचे अनोखे स्मरण देणारे किल्ले याच तालुक्यात येतात. रायरेश्वरपासून सुरू होणाऱ्या शंभूमहादेव डोंगररांग व तेथूनच दुसरी सुरू होणाऱ्या डोंगरावर पाचगणी डोंगरांच्या दरम्यान असलेल्या वाळकी व कृष्णा खोरे निर्माण झालेले आहे. वाई नगरीच्या वायव्येस सुमारे ९ कि.मी. अंतरावर व कृष्णामाईच्या उत्तर तीरावर श्रीक्षेत्र धोम हे सह्याद्रीच्या नैसर्गिक सौंदर्य लाभलेले गाव आहे.धोम गावातून जलाशयाच्या भिंतीकडे जाण्यासाठी झाडीझुडूपातून जाणारी अरूंद रस्त्याने गेल्यावर अगदी जवळच असलेल्या श्री सिद्धेवर देवालयाचा कळस दिसून येतो. कृष्णामाईच्या अगदी तीरावर तटबंदीयुक्त मंदिराचे पूर्वाभिमुखी महाद्वार असून दक्षिण - उत्तरेस देखील प्रवेशद्वारे आहे. सुमारे ३०:५ मी × ३६:५० मीटर लंबगोलाकार क्षेत्राला ३:६६ मी.उंचीची भक्कम तटबंदी आहे. महाद्वार दगड वीट बांधकामात केलेले आहे आहे तर दोन्ही कोपऱ्यात विशाल बुरूज आहेत. दरवाजावर गणेशपट्टी असून त्यावर नगारखाना आहे, यास हवामहाल असे प्रचलित नाव आहे. आत प्रवेश केल्यावर समोर श्री सिद्धेश्वर महादेवाचे घडीव बांधकामातील मंदिर लक्ष वेधून घेते. मंदिरासमोरील नंदीमंडप कलात्मक व वैशिष्ट्यपूर्ण आहे. २७•४ मी.परिघाची व सोळा कमळ पुष्पांची दगडी पुष्करिणी आहे. त्यात मध्यभागी सुमारे २:११ मीटर लांबीचे दगडी कासवाकृती असून त्याचे पाठीवर अष्टकोनी दगडी स्तंभ आहे. या स्तंभावर अष्टकमानीयुक्त नक्षीदार नंदीमंडप आहे. या नंदीमंडपात सुबक नंदीमूर्ती आहे. श्री नृसिंह जयंतीच्या दिवशी या पुष्करिणी पाण्याने भरली जाते तेव्हा दिसणारे दृश्य मनमोहक असते. पुष्करिणीतील पाण्यात कासव तरंगत असल्याचा भास होतो. पुष्करिणी मध्ये पाणी सोडण्याची व्यवस्था आहे तर कासवाच्या समांतर पाणी भरल्यास, अतिरिक्त होणारे पाणी कृष्णामाईत प्रवाहित करण्याची रचना केलेली आहे. नंदीमंडप हा स्थापत्यशैलीचा दुर्मिळ, अनोखा व अप्रतिम नमुना आहे. श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर विधान चौरस असून त्याचे क्षेत्रफळ ४:४२ मी × ४:२ मी इतके आहे. मंदिराच्या तीन कमानीयुक्त सभामंडपात प्रवेश करण्यासाठी पायऱ्या चढून जावे लागते. पायऱ्यांच्या खाली एक लहान चौकोनी खिडकी आहे. श्री सिद्धेश्वरच्या गर्भगृहाखाली ४•५ मी. खोलीवर आयताकृती दालन आहे. यात ऋषीवर्य पांडव पुरोहित श्री धौम्यऋषींची स्वयंभू समाधी आहे. सभामंडपात दगडी फरशीवर कासव आहे तर वितानवर सुरेख नक्षी कोरलेली आहे. सभामंडपाच्या तुलनेत गर्भगृह खोलगट आहे. गर्भगृहाच्या दरवाजाच्या स्तंभावर नक्षीकाम केलेले आहे तर वितानवर एक फुल कोरलेले आहे. शिवलिंगाच्या पाठीमागील कोनाड्यात श्री गणेश मूर्ती आहे. श्री सिद्धेश्वर मंदिराचे नागर शैली शिखार चुनेगच्ची विटांचे आहे. हे मंदिर म्हणजे शिव पंचायतन स्वयंभू स्थान आहे. ह्याचे बांधकाम संभवतः पेशवाईच्या सुरूवातीला केले असावे. मंदिराच्या चारही बाजूस श्री सुर्यदेव, श्री गणेश, आदिमाता पार्वती व श्री विष्णू यांची लहान मंदिरे आहेत. यातील पार्वतीमातेच्या मंदिरातील मातेच्या बरोबर त्यांचे पुत्र कार्तिकेन व गणेश यांच्या एकत्रित मूर्ती आहे. तर श्री सुर्यदेव मंदिरातील मूर्ती अप्रतिम शैलीची व बोलकी आहे. सुर्यदेवाची मूर्ती ज्या रथावर आरूढ आहे, त्यास सात वारांचे प्रतीक म्हणून सात अश्व जोडलेले आहेत.
महाद्वाराच्या उजव्या बाजूस दगडी बांधकामातील अष्टकोनी मेघडंबरी आहे. त्यास नृसिंहपार या नावाने संबोधण्यात येते. या पारावरती भव्य दगडी स्तंभ असून याच स्तंभावर पूर्वाभिमुखी आक्राळ विक्राळ उग्र नृसिंह मूर्ती आहे. सव्वा मीटर उंचीची नृसिंह चतुर्भूज मूर्ती एका उंबरठ्यावर अखंड पाषाणात आहे. भगवान नृसिंहच्या मांडीवर दैत्य हिरण्यकश्यपूला आडवे घेतले आहे. उजव्या व डाव्या हाताच्या नखांनी हिरण्यकश्यपूचे पोट विदीर्ण केलेले आहे. बाकीच्या दोन हातात शंख व परशू धारण केलेले आहे. नृसिंह मूर्तीच्या दगडी महिरपात पंचमुखी शेषनागाने फणीवर धरलेला आहे. मूर्तीचे डोळे डोळे आरक्त व विस्फारित असून कर्ण ताठ, जीभ लळलळीत, मुकूटातून आयाळ खांद्यावर रूळणारे आहेत. अलंकारने सजलेल्या मूर्तीच्या पायाजवळ भक्त प्रल्हादाची मूर्ती आहे. याच उग्र मूर्तीच्या पाठीमागील कोनाड्यात श्री विष्णूचा चौथा अवतार असलेल्या नरहरीची शांत रूपतील प्रसन्न व विलक्षण मुद्रेतील दगडी सिंहासनावर आहे. दैत्य हिरण्यकश्यपूच्या वधानंतर प्रसन्न चेहऱ्याची, तृप्त भावना दिसणारी ही मूर्ती आहे. याच नृसिंह पारावर इ.स.१७७९ च्या डिसेंबर महिन्यात थोरल्या माधवरावांच्या शारीरिक प्रकृतीस आराम मिळावा म्हणून त्यांचे कनिष्ठ बंधू नारायणराव यांनी ब्राह्मणांस अनुष्ठानांस बसवले होते.
नृसिंह मंदिर व पुष्करिणी दरम्यान एका रोवलेल्या शिवपंचायतन आहे. याखांबावर शिवाची संगमरवरी तत्पुरूष, नामदेव, अघोर, सद्दोजात अशी चार मुखे चार दिशांना व ईशान हे एक मुख आकाशाकडे तोंड करून कोरलेले आहे. श्री सिद्धेश्वर व इतर मंदिरांचा जीर्णोद्धार इ.स.१७८० मध्ये पुण्याच्या महादेव शिवराम या सावकारांनी केलेला आहे. मात्र श्री सिद्धेश्वर मंदिर निर्मिती शिवपूर्व काळातील असल्याचा संभव आहे. मंदिर समुहाच्या तटबंदी बाहेरील उजव्या बाजूस कृष्णामाईच्या तीरावर दुसरा बाजीराव पेशवा यांनी लहान श्रीराम मंदिर बांधलेले आहे. तर थोड्या अंतरावर थोरल्या छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेले अजून एक महादेव मंदिर आहे. हा मंदिर समुह कृष्णामाईच्या काठावरती असल्याने हा सर्व भाग पानथळ आहे. मंदिराच्या पूर्वेस काही अंतरावर तीर्थ धृत पापेश्वर नामक अंधारी विहीर आहे.
संदर्भ - १) वाई ः कला आणि संस्कृती - डाॕ.सुरेश र.देशपांडे
२)भारतातील कोरीव मंदिरे - स्वाती देशपांडे
३)श्री क्षेत्र धौमा नृसिंह महात्म्य - श्री.गणेश पांब्रे
©® सुरेश नारायण शिंदे, भोर
shindesn16@gmail.com

Wednesday, 6 December 2023

खारेपाटणची सूर्यमूर्ती !!

 



खारेपाटणची सूर्यमूर्ती !!
आशुतोष बापट
खारेपाटण एक प्राचीन बंदर. काही ठिकाणी बळीपट्टण असाही याचा उल्लेख आलेला. खारेपाटण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उत्तरेचे प्रवेशद्वार. पूर्वीची ही अत्यंत गजबजलेली बाजारपेठ. याच खारेपाटण इथे आहे एक कपिलेश्वराचे मंदिर. लहानसे टुमदार देवालय. बाहेरच एक मोठा नंदी देवाकडे टक लावून बघत बसलेला. आतल्या गाभाऱ्यात शिवपिंड. पण खरे नवल इथे गाभाऱ्याच्या बाहेर आहे. छोट्याश्या गाभाऱ्याच्या बाहेरच्या भिंतीला दोन बाजूंना दोन मूर्ती टेकवून उभ्या केलेल्या आहेत. त्यातली एक आहे विष्णूची जी काहीशी अर्धवट घडवलेली कळते. तर दुसरी आहे नितांतसुंदर अतिशय देखणी अशी सूर्यदेवाची मूर्ती.
उंचीला साधारण ३ फूट. पाठीमागे प्रभावळ. प्रभावळीत मकरतोरण आणि त्यात केलेले पानाफुलांचे नक्षीकाम. समचरण उभ्या असलेल्या देवाच्या दोन्ही हातात कमळे धारण केलेली. डोक्यावर किरीट मुकुट, तो सुद्धा आभूषणांनी नटलेला. देवाचा गळा त्रिवलायांकित. गळ्यात एकावली, फलकहार असे सुंदर दागिने. कानात कुंडले, खांद्यावर वैकक्षक, छातीला उदरबंध. कमरेला वस्त्र नेसलेले त्यावर देखणी मेखला. पायात पादांगद अशी दागदागिन्यांनी मढवलेली ही रेखीव सूर्यमूर्ती. नजर शांत आणि चेहरा हसरा. बघत बसावी अशी ही मूर्ती इथे आडबाजूला वसलेली आहे. देवाच्या पायाशी देवाच्या पत्नी संज्ञा आणि राज्ञी. त्यांनी हातात कमळ धारण केलेले. त्यांच्या बाजूला सूर्याचे सेवक दंड आणि पिंगल. दंडाच्या हातात लांब दंड आणि पिंगलाच्या दोन हातात दौत आणि टाक. पायाशी सात घोडे कोरले असावेत मात्र आता ते अतिशय अस्पष्ट.
अशी ही साग्रसंगीत घडवलेली सूर्यमूर्ती शिलाहारकालीन आहे. कोकणच्या मूर्तीवैभवात भर घालणारी ही मूर्ती मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून जेमतेम ५०० मीटर आतमध्ये आहे. मुळात सूर्यमूर्ती कमी प्रमाणात आढळतात. त्यात कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ऐन उंबऱ्यावर वसलेल्या ह्या सर्वांगसुंदर सूर्यमूर्तीच्या दर्शनाने प्राचीन भारतीय शिल्पश्रीमंतीचा अवश्य अनुभव घ्यावा.

Sunday, 22 October 2023

विदर्भातील शक्तीपीठ ३७ - महाकाली, चंद्रपूर

 

#VidarbhaDarshan :




विदर्भातील शक्तीपीठ ३७ - महाकाली, चंद्रपूर
महाकाली मंदिर चंद्रपुरातील गोंडकालीन इतिहासाची साक्ष देते . या मंदिराला वाकाटक काळाचेही संदर्भ सांगितले जातात . हे गुफा मंदिर आहे . रंगीत चित्रकला हे या मंदिराचे सर्वांत मोठे आणि अनोखे वैशिष्ट्य . अजिंठा - वेरूळ लेण्यांतील रंगीत चित्रांच्या परंपरेतील अशी चित्रकारी विदर्भात दुसरीकडे नाही . विदर्भातील अष्ट शक्तिपीठांपैकी एक म्हणजे चंद्रपूरचे महाकाली मंदिर . या महाकाली देवीचे संदर्भ स्कंद पुराणातही आढळतात . मध्य भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थळ म्हणून या महाकाली मंदिराचा उल्लेख होतो . वर्षभर येथे भाविकांचा राबता असतो . चैत्रात मोठी यात्रा भरते . विदर्भ , मराठवाड्यासह आंध्र प्रदेशातील भाविकांची या यात्रेला अलोट गर्दी उसळते . महाकालीची ही यात्रा ' नांदेडची यात्रा ' म्हणूनही ओळखली जाते . चंद्रपूरची महाकाली आणि माहूरची रेणुका माता ही दोन तीर्थस्थळे विदर्भ आणि मराठवाड्याला परंपरेने जोडतात . महाकाली मंदिर चंद्रपुरातील गोंडकालीन इतिहासाची साक्ष देते . या मंदिराला वाकाटक काळाचेही संदर्भ सांगितले जातात . हे गुफा मंदिर आहे . रंगीत चित्रकला हे या मंदिराचे सर्वांत मोठे आणि अनोखे वैशिष्ट्य . अजिंठा - वेरूळ लेण्यांतील रंगीत चित्रांच्या परंपरेतील अशी चित्रकारी विदर्भात दुसरीकडे नाही .
येथील मूळ मंदिराची निर्मिती कशी झाली , याविषयी अनेक दंतकथा आहेत . एका कथेनुसार , गोंडराजा खांडक्या बल्लाळशाह ( १४७२ ते १४९७ ) हा शिकारीच्या निमित्ताने या परिसरातील जंगलात फिरत होता . फिरता फिरता तो देवीच्या या मूळ गुफेकडे आला . तेथील पाण्याने त्याने व्रण साफ केले . त्याचे व्रण नाहीसे झाले . पुढे त्याला स्वत : महाकालीने दृष्टांत दिला . स्वत : चे स्थान सांगितले . दुसऱ्याच दिवशी राजाने जंगलातील भुयारी मार्ग मोकळा केला . गुफा मोकळी केली . त्यात देवीची कोरीव मूर्ती सापडली . राजाने तेथे पहिले छोटेखानी मंदिर बांधले . आजच्या मंदिराची निर्मिती ही राणी हिराईने १७व्या शतकात केली . १७०७ ते १७०९ हा या मंदिराच्या उभारणीचा काळ . देवगडचा राजा दुर्गशाह व गोंडराजा वीरशाह ( बिरसिंग ) यांच्यात लढाई झाली . वीरशाहाचा पाडाव होऊ लागला होता . अचानक ' जय महाकाली ' चा जयघोष झाला . वीरशाहाच्या सैन्यात चैतन्य संचारले आणि राजा वीरशाहचा विजय झाला . महाकालीच्या कृपेनेच लढाईत विजय झाल्याचा राणी हिराईचा दृढ समज झाला . या कृतज्ञतेतून तिने मंदिराचा कायापालट केल्याचे सांगितले जाते . ही राणी हिराई ( सन १७०४ - १७१९ ) कर्तृत्ववान होती . मदनापूर होशंगाबाद येथील मोगल सरदार ढिल्लनसिंग मडावी यांची ती मुलगी . कुशाग्र बुद्धीची हिराई शस्त्रविद्येत पारंगत होती . गोंडराजा किसनशाह याने हिराईतील गुण ओळखले होते . त्यामुळेच त्याने तिला आपला मुलगा वीरशाह याच्यासाठी मागणी घातली . १७०४च्या सप्टेंबरमध्ये राजा वीरशाहची हत्या झाली . वयाच्या २२ - २३व्या वर्षी हिराईला वैधव्य झाले . जबाबदारी आली . गादीला वारस नव्हता . राणीने तीन वर्षांच्या रामशाहला दत्तक घेऊन नेटाने राज्यकारभार सुरू केला . आपल्यापुढे अनेक आव्हाने आहेत , याची तिला जाणीव होती . तिच्या काळात पाच मोठी युद्धे झाली . या युद्धांमध्ये राणीचे युद्धकौशल्य दिसले . मुत्सद्देगिरीही जाणवली . तिचा पराभव झाला . अर्धे राज्य गेले . पण ती खचली नाही . ती जितकी युद्धनिपूण , तितकीच धार्मिक वृत्तीचीही होती . महाकाली मंदिरासोबतच अंचलेश्वर , एकवीरा , खटीचा गणपती मंदिर , मुरसा येथील शिवमंदिर , गिलबिली येथील महादेव मंदिर , वैरागड येथील भवानी मंदिर तिनं बांधली . मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वर मंदिर दुरुस्त केले . वीर पतीची आठवण कायम राहावी , म्हणून राजा वीरशाह याची मोठी समाधी हिराईने बांधली . आज मात्र ही समाधी दुरवस्थेत आहे .
महाकाली मंदिराच्या संरक्षणाची जबाबदारी भारतीय पुरातत्त्व विभागाकडे आहे . रामायण , महाभारतातील प्रसंग हे या मंदिराच्या शिल्पकलेतील आणखी एक वैशिष्ट्य . हे सारे शिल्प म्हणजे गोंडकालीन हस्तकलेचा उत्तम नमुना आहेत . महाकाली मंदिराला चार दरवाजे आहेत . आतील भागात कमानी आहेत . बाहेरील शिल्पांमध्ये राणीचे स्नान , राजा - राणी , मल्लयुद्ध आदी प्रसंग आहेत . एका शिल्पात मदारी पुंगी वाजवित असून समोर नाग फणा काढून आहे . एका खिडकीच्या बाजूला कोरलेल्या प्रसंगात यशोदेसमोर गवळणी एकत्र आल्या आहेत आणि त्या श्रीकृष्णाच्या तक्रारी करीत असल्याचे दिसते . आतील बाजूस गाईवरून झेप घेऊन शिकार करणारा वाघ , दोन सैन्यांतील युद्धप्रसंग , नमस्कार करीत असलेले भक्तगण , घोडेस्वार , गजस्वार , उंटस्वार आहेत . या मंदिरासंदर्भात पुरातत्त्वाचे अभ्यासक डॉ . रघुनाथ बोरकर सांगतात , ' चवथ्या - पाचव्या शतकात हे गुफा मंदिर होते . ते वाकाटक काळातील असावे . चंद्रपूर जिल्ह्यात अशा अनेक गुफा आढळतात . या मंदिराची स्थापत्यरचना ही गोंड - भोसलाशैलीची आहे . राज्य सार्वभौम आणि संपन्न असले की स्थापत्यरचना तयार होतात . त्यात त्या - त्या शासकाचे प्रतिबिंब उमटते . चंद्रपूरमध्ये गोंडांचा शासनकाळ साधारणत : ५५० वर्षे होता . पण बहुतांश काळ ते मोगलांचे मांडलिक होते . आताच्या महाकाली मंदिरात राणी हिराईच्या कल्पकतेचा प्रभाव दिसतो .
या आदिशक्ती महाकालीच्या यात्रापरंपरेविषयीही आख्यायिका आहेत . एका प्रचलित आख्यायिकेनुसार , नांदेड जिल्ह्यातील तळेगाव उमरी येथील राजाबाई देवकरीण ही धार्मिक वृत्तीची स्त्री . ती आदिशक्तीची उपासक होती . १९०५ - ०६च्या दरम्यान चंद्रपूरची आदिशक्ती देवी महाकाली ही राजाबाई देवकरीणीच्या स्वप्नात आली . ' मी चंद्रपूर परगण्यात आहे . तेव्हा तू माझ्या भक्तीचा प्रसार कर ', अशी आज्ञा तिला दिली . देवीची आज्ञा स्वीकारून राजाबाई आपल्या भागातील लोकांचा एक जत्था घेऊन चंद्रपूरला महाकाली देवीच्या दर्शनास आली . दर्शन घेऊन गावी परतली . तेव्हापासूनच या देवीच्या यात्रेला नांदेडसह मराठवाड्यातील भाविक मोठ्या संख्येने येऊ लागल्याचे सांगितले जाते . चैत्र शुक्ल षष्ठी ते पौर्णिमेपर्यंत ही यात्रा चालते . यात्रेच्या नऊ दिवसांत देवी व्रतस्थ असते . वरण , भात , पोळी असा नेवैद्य देवीला दिला जातो . दहीदुधाचा अभिषेक केला जातो . पुरणाच्या आरतीनंतर घट हलविला जातो . त्यानंतर भक्त नारळ फोडतात . पोतराज हे या यात्रेत आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात . आली आली या महाकाली। तिचा कळेना अनुभऊ। साऱ्या जगाला घालते खाऊ। माय माझी काली।। अशी लोकगीते म्हणत भक्त महाकाली देवीचा महिमा गातात . देवीचे भक्त देवकर व देवकरीण आंबिल घेतल्याशिवाय जात नाहीत . या मंदिराचे पुजारीपण दिवंगत नामदेवराव गोविंदराव महाकाले यांच्याकडे आले . गेल्या १३ पिढ्यांपासून त्यांच्या वंशजांकडे ही परंपरा सुरू आहे . गोंडकालीन इतिहास आणि अध्यात्माची परंपरा असा दुहेरी संदर्भ असलेले हे महाकाली मंदिर विदर्भाचीच नव्हे तर मध्य प्रांताची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे.

Sunday, 15 October 2023

.अत्यंत विचित्र वाहनांवर आरूढ झालेल्या देवींचे दर्शन !

 









.अत्यंत विचित्र वाहनांवर आरूढ झालेल्या देवींचे दर्शन !
( गाढव, कोंबडा, घुबड, मांजर, उंट, मगर )
आपल्या देशात शेती संदर्भातील मुख्य कामे आटोपली की नंतरच्या काळामध्ये, विविध सण साजरे केले जातात. गणपती उत्सवानंतर नवरात्रोत्सव हे स्त्रीशक्तीला अधिक प्राधान्य देणारे पर्व आहे. मेहनत आणि हवामानामुळे खर्च झालेली शारीरिक ताकत पुन्हा प्राप्त करण्यासाठी, याकाळात शक्तीची आराधना केली जाते. सप्तशतीच्या पाठातील देवीच्या युद्धाची वर्णने ही साहित्यात एकत्रितपणे अभावानेच आढळणाऱ्या रौद्र, भीषण, वीर, अद्भुत आणि बीभत्स रसाचा आविष्कार करणारी आहेत. एका स्त्रीच्या नेतृत्वाने, पराक्रमाने इतक्या क्रूर आणि शक्तिवान मायावी शक्तींना हरविले हे महत्वाचे आहे. जगामध्ये स्त्रीशक्तीचे असे उदाहरण प्रत्यक्षात सोडा पण वाङ्मयातसुद्धा आढळणार नाही. आपल्याकडे स्त्रीला कमी लेखले जाते असे म्हणण्यावर हे पूर्ण वेगळे उदाहरण आहे. जगाला छळणाऱ्या अत्यंत ताकतवान, बलदंड, क्रूर, असुरी शक्ती जर कुणी संपविल्या असतील तर त्या स्त्री शक्तींनी, देवींनी ! असामान्य सिद्धी लाभलेल्या पुरुष-असुरांना संपविण्यासाठी पुरुष देव नाही तर स्त्री देवता उभ्या राहिल्या. त्यांनी या असुरांना घनघोर, मायावी युद्धात लीलया हरविले, ठार मारले. म्हणूनच नवरात्र हा एक प्रकारे स्त्री शक्ती जागविण्याचा उत्सव आहे. यातील प्रत्येक तिथीला, देवी विविध रूपामध्ये अवतरते. नवरात्रीत देवी नऊ विविध रूपांमध्ये पुजली जाते. तसाच सप्तमातृका, ६४ योगिनी, सात आसरा, देवीची महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे, देशभरातील आणि शेजारील देशातील देवी सतीची ५१ शक्तिपीठे यासह देवीच्या सर्व मंदिरांमधून नवरात्रोत्सव साजरा केला जातो.
सर्वसाधारणपणे आपण देवीच्या ज्या मूर्ती पाहतो त्यात तिचे वाहन म्हणून वाघ, सिंह, मोर, हंस इत्यादी प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात. पण आपल्या धर्मामध्ये अत्यंत विचित्र वाहनांवर आरूढ झालेल्या अनेक देवी आहेत. त्याची थोडी माहिती घेऊ या. देवी आणि वाहने या प्रतीकात्मक, सांकेतिक गोष्टी आहेत. विविध देवी म्हणजे विविध प्रकारच्या लहरी असल्या पाहिजेत. या लहरी वाहून नेणारी माध्यमे म्हणजे ही वाहने ! एकाच प्रकारचे प्रक्षेपणास्त्र बोट, रॉकेट लॉंचर, विमान अशा वेगवेगळ्या वाहनांवरून डागल्यास त्याचे परिणाम वेगवेगळे असू शकतात. तशीच या देवी लहरींची वाहनानुसार शक्ती बदलत असलेली पाहिजे. ( यावर माझ्या कुवतीनुसार माझा अभ्यास सुरु आहे. त्याचा तपशील पुन्हा केव्हातरी देईनच ! )
पण या सर्वपरिचित वाहनांपेक्षा अत्यंत विचित्र वाहनांवर आरूढ झालेल्या अनेक देवी आहेत. कांही वेळा एकच देवी वेगवेगळी वाहने वापरते असेही दिसते. तिच्या शक्तीचे आणि लढ्याचे स्वरूप, कारण, तिचा सहकारी, जागा, तिचा शत्रू इत्यादींनुसार वाहन बदललेले दिसते. नेहेमीच्या आयुष्यात आपण ज्यांना अत्यंत अपवित्र, अशुभ, त्याज्य प्राणी / पक्षी मानतो त्यांनासुद्धा देवीने आपले वाहन बनविले आहे. साप हे कामाख्या देवीचे वाहन मानले गेले आहे. तारिणी देवीचे बदक, सप्तमातृकांतील एक चामुंडा देवीचे कुत्रा, कारकरी योगीनीचे खेकडा, गौरी योगिनींची घोरपड,जलकामिनी योगिनीचा बेडूक, रतीचे कबुतर अशी आश्चर्यकारक वाहन मालिका आहे. संबंधित देवीच्या शक्तीनुसार पूरक वाहनांची निवड करण्यात आली आहे. आपली पुराणातील कथांमध्ये कल्पिलेली अशीच अन्य कांही वाहने, देवी आणि माहिती --
घुबड ----- हा पक्षी अशुभ, अपवित्र मानला जातो. तरीही देवी लक्ष्मीने त्याला आपले वाहन मानले आहे. लक्ष्मीला सर्वात भीती चोरीची असते आणि चोरीची शक्यता रात्री अधिक असते.घुबड हा अत्यंत बुद्धिवान पक्षी आहे. घुबड अत्यंत सूक्ष्म आवाज ऐकू शकते. केवळ आवाज ऐकून ते शिकार करते. त्याच्या पंखांचा आवाज येत नाही इतके ते उडताना सावध असते. असे वाहन हे रात्रीसुद्धा लक्ष्मीचे अधिक सक्षमतेने रक्षण करते असे मानले जाते. त्याच्या हुशारीचा एक गंमतीदार पुरावा म्हणजे घुबडांच्या समूहाला पार्लमेंट म्हटले जाते. लक्ष्मीच्या घुबड या वाहनामुळे तिला उलूकवाहिनी असे नाव पडले आहे.
कोंबडा -- किन्नर ( तृतीयपंथी ) पंथाची पूजनीय बहुचरा देवी ही कोंबड्यावर आरूढ झाली आहे. गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात तिचे मंदिर आहे.
मांजर --- मुलाच्या जन्मानंतर सठी / षष्ठीची पूजा केली जाते. ही षष्ठी देवी लहानमुलांची रक्षणकर्ती आहे. या षष्ठीदेवीचे वाहन चक्क मांजर आहे. मांजर हे वाहन असलेली " षष्ठी " ही एकमेव देवी आहे.
गाढव---- स्कन्द पुराणानुसार देवदेवतांनी भगवतीच्या आराधनेसाठी जेव्हा यज्ञ केला त्यातून शितलादेवी प्रकटली. ही देवी गोवर, कांजिण्या, देवी, ज्वरजन्य विकार यांचा नाश करते. या देवीचे वाहन चक्क गाढव हे आहे. नवरात्रीतील सातव्या दिवशीचे देवीचे रूप असलेली कालरात्री या देवीचे वाहनसुद्धा गाढव आहे.
उंट ------ गुजरात व राजस्थानमध्ये मोमाई माँ, उंटेश्वरी किंवा दशा माँ या नावांनी ओळखली जाणारी देवी ही उंटावर विराजमान झालेली आहे. आपले आरोग्य, पिकाचे आणि पशुधनाचे संरक्षण या साठी शेतकरी तिची भक्ती करतात. तिला माती पासून बनविलेला छोटा उंट अर्पण केला जातो. नल राजा आणि दमयंती यांनीही हिची भक्ती केल्याची कथा आहे.
मगर ---- महानदी गंगेचे देवी स्वरूपात पूजन केले जाते. क्षमाशीलता आणि पावित्र्य यांची ती अधिपती आहे. या रूपामध्ये गंगेचे वाहन मगर आहे.
कासव --- यमुना नदीलाही देवता स्वरूपात पुजतात. तिला यामिनी, कालिंदी असेही संबोधले जाते. ती मृत्यूच्या भयापासून रक्षण करते. गोड्या पाण्यातील कासव हे तिचे वाहन कल्पिलेले आहे.
एकंदरीत काय, तर माणसाने कितीही भेदभाव उभे केले असले तरी देव मात्र त्याने बनविलेल्या कुठल्याही प्राण्याला, माणसाला, पक्षाला अपवित्र, अशुभ, त्याज्य, निरुपयोगी मानत नाही. त्या प्रत्येकात त्याने कांही ना कांही असामान्य शक्ती घातलेली आहे. त्यातून देवी म्हणजे मातृशक्ती ! तिने अशा तऱ्हेने प्रत्येकाला दिलेले स्थान, केलेला सन्मान हा याच महत्वाच्या गोष्टीचा प्रत्यय आहे. विज्ञान सुद्धा सर्व प्राणी हे जैव साखळीच्या महत्वाच्या कड्या आहेत असे मानते.
सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
सौजन्य -- सर्व चित्रे आणि कांही माहिती -- विकिपीडिया,गुगल
©( हा लेख व चित्रे शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावीत )
***** मकरंद करंदीकर.
makarandsk@gmail.com