Followers
Wednesday, 24 June 2020
धानोरा गढी
धामणगावची प्राचीन गढी अचलपूर
Monday, 22 June 2020
किल्ले कर्नाळा
किल्ले कर्नाळा.
#लींगोबाचा_डोंगुर.
#किल्ले_कर्नाळा (Karnala)
• किल्ल्याची ऊंची : 2500ft
• किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग.
• डोंगररांग : माथेरान
• जिल्हा : रायगड
• श्रेणी : मध्यम
पनवेल विभागात येणारा आणि रायगड जिल्ह्यात मोडणारा हा किल्ला त्याच्या
अंगठ्या सारख्या आकारामुळे सर्वांचे लक्ष नेहमीच वेधून घेतो. कर्नाळ्या
खालचे पक्षी अभयारण्य हे संरक्षित प्रदेश म्हणून राखले गेले आहे.
• इतिहास :
किल्ल्यांमध्ये असणार्या टाक्यांवरून हा किल्ला सातवाहनकालीन असावा असे
वाटते. मात्र याचा उल्लेख यादवकाळात आढळतो. शिवरायांनी इ.स १६५७ मध्ये
किल्ला घेतला. पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना देण्यात येणार्या २३ किल्ल्या
मध्ये कर्नाळा किल्ल्याचा समावेश होता. यानंतर सन १६७० नंतर महाराजांच्या
सैन्याने छापा घालून कर्नाळा किल्ला सर केला आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी
सर्व कल्याण प्रांत काबीज केला. पुढे संभाजी महाराजांच्या काळात किल्ला
पुन्हा मोगलांनी घेतला. त्यानंतर तो पेशव्यांकडे गेला. सन १८१८ मध्ये जनरल
प्रॉथरने हा किल्ला घेतला.
• पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याचा माथा
फारच लहान आहे. किल्ल्याचे प्रवेशव्दार ढासळलेल्या अवस्थेत आहे.
प्रवेशव्दा्रातून आत शिरल्यावर भवानी मातेचे मंदिर आहे. समोर एक मोठा वाडा
आहे, वाडा संपूर्ण ढासळलेल्या अवस्थेत आहे. वाड्याच्या जवळ शंकराची पिंड
आहे. समोरच अंगावर येणारा सुळका आहे. सुळक्याच्या पायथ्याशी पाण्याची टाकी
आणि धान्य कोठारे आहेत.
सुळका चढण्यासाठी प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत
असणे आवश्यक आहे. सोबत प्रस्तरारोहणासाठी आवश्यक असणारे साहित्य सुद्धा
हवे. कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्य हे सर्व एका दिवसात पाहून
येण्यासारखे आहे. गड फिरण्यास साधारण ३० मिनिटे पुरतात.
• पोहोचण्याच्या वाटा :
१) मुंबई - गोवा मार्गाने :
मुंबई - गोवा मार्गाने पनवेल सोडल्यानंतर शिरढोण गाव लागते. या गावानंतर
लगेसच पुढे कर्नाळ्याचा परिसर लागतो. महामार्गाच्या डावीकडेच शासकीय
विश्रामधाम आणि काही हॉटेल्स आहेत. एसटी बस येथे थांबते, समोरच असणार्या
पक्षी संग्रहालया जवळून किल्ल्यावर जाण्यास वाट आहे. वाट चांगली प्रशस्त
आहे. साधारण किल्ल्यावर पोहचण्यास अडीच तास लागतात.
२) रसायनी - आपटा मार्गाने :
रसायनी - आपटा मार्गाने आकुळवाडी गाव गाठावे. या गावातून येणारी वाट मुख्य वाटेला येऊन मिळते. या वाटेने साधारण ३ तास लागतात.
• राहाण्याची सोय :
किल्ल्यावर रहाण्याची सोय नाही. मात्र किल्ल्याच्या पायथ्याच्या असणार्या शासकीय विश्रामधामात, हॉटेल्स मध्ये रहाण्याची सोय होते.
• जेवणाची सोय :
किल्ल्याखाली हॉटेल्स आहेत.
• पाण्याची सोय :
गडावर बारामही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
• जाण्यासाठी लागणारा वेळ :
कर्नाळा पायथ्यापासून २ १/२ तास लागतात.
• #सूचना :
कर्नाळा किल्ल्याच्या सुळक्यावर मधमाश्यांची पोळी आहेत. त्यामुळॆ येथे आरडाओरड करु नये तसेच आग पेटवू नये..
• #माझा_अनुभव :
#लिंगोबाचा_डोंगुर.
( #किल्ले_कर्नाळा ).
"शपथपूर्वक सांगतो, की कर्नाळ्यावरचा दीडशे फूट उंचीचा उभा टेंबा मी
पाहिला, आणि थक्कीत होऊन उभा राहिलो. अवघ्या सह्याद्रिमंडळात या जातीचा कडा
नाही. मग दिसली त्या कड्याभोवती चहूबाजूंनी लोंबलेली भली प्रचंड पोळी -
आग्यामाश्यांची. त्या पोळ्यांचा मध कुधी काढू शकेल, यावर माझा विश्वास
बसेना. पण मग बसला. ठाकरवाडीत ठाकरांशी गप्पा मारीत असता त्यांनी जे
सांगितले, ते ऐकून आपण तर बुवा तोंडात बोट घातले! अशा अवघड ठिकाणाचा मधही
ठाकरगडी काढतात! धन्य त्यांची माय त्यांना प्रसवली.
मस्तकात वारे
भिरभिरू लागले. गेला चारसहा वर्षात कर्नाळ्यावर चारपाचदा जाऊन आलो. अनेकदा
तिथे रात्रीचा मुक्काम केला, खाली तळात वाघरू डुरकत होते. आगटीजवळ मी अन्
नाग्या ठाकर शेकत होतो. शेकता शेकता नाग्याला गोष्ट सांगू लागलो. नाग्या
असा काही हरिखला! ती तर त्याच्या घरचीच गोष्ट होती!
नाग्या ठाकर हा
माझा गोष्टीचा पहिला श्रोता. बरेच दिवस गोष्ट डोकात घुमत होती. मित्रोत्तम
अनंतराव कुलकर्णी मजकडून लिहवून न घेते, तर कदाचित आणखी चारदोन वर्षे कथा
तशीच रेंगाळली असती."
- गड-किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र राज्य.
किल्ले देवगड.
किल्ले देवगड.
#किल्ले_देवगड.
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या
बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली.
७ एप्रिलला 'देवगड' विनासायास इंग्रजांच्या ताब्यात गेला
प्राचिन काळापासून देवगड हे एक सुरक्षित बंदर
म्हणूनही प्रसिध्द आहे.
याच कारणासाठी शिवाजी महाराजांच्या काळात व आजही मालवण,
वेंगुर्ला व आजूबाजूच्या बंदरातील
बोटी पावसाळ्यात देवगड बंदरात नांगरल्या जातात.
देवगडचा किल्ला समुद्रात शिरलेल्या टेकडीच्या निमुळत्या होत गेलेल्या
टोकावर वसलेला आहे त्यामुळे त्याला ३ बाजूंनी समुद्राचे नैसर्गिक
संरक्षण लाभलेले आहे.
देवगड किल्ला दोन भागात विभागलेला आहे.
टेकडीवरील बालेकिल्ला व समुद्राला लागून असलेला किल्ल्याचा भाग.
देवगड किल्ला कोणी व कधी बांधला याची माहिती उपलब्ध नाही.
इतिहासातही या किल्ल्याचा फारसा उल्लेख आढळत नाही.
इ.स.१७७२ मध्ये वॉल्टर ब्राऊन याने वाडीकर
सावंतांच्या मदतीने देवगड किल्ल्यावर हल्ला चढविला होता, पण त्या
हल्ल्यात त्यांचा पार धुव्वा उडाला होता.
इ.स.१८१८ मध्ये कर्नल इम्लाफ याने हा किल्ला
जिंकून घेतला.
- गड-किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र राज्य.
किल्ले तुंग
किल्ले तुंग.
#किल्ले_तुंग
#मावळ.
सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील इतिहासाचा वारसा म्हणजे गिरिदुर्ग. पवन
मावळातील गिरिदुर्गांची मोठी शृंखला असून त्यात बोरघाटचा व पवन मावळचा
टेहळणीचा किल्ला म्हणजे तुंग. पुण्याहून व लोणावळा पासून जवळ असलेला व पवना
धरणाच्या विहंगम जलसाठ्याला लागूनच असलेला हा दुर्ग लांबूनच पाहाताना मनात
धडकी भरते म्हणजे चारशे वर्षापूर्वी काय अवस्था होत असेल याची जाणीव
झाल्याशिवाय राहात नाही. या दुर्गाकडे पाहावयास केवळ मावळ्या शिवाय कुणाचे
धाडस होणार नाही. मावळी मनात व डोळ्यांत फक्त सह्याद्री आणि सह्याद्री.
सह्याद्रीच्या कुशीतील एक भव्य असा काळ्या कातळांचा उंचच्या उंच डोंगर.
लाल मातीच्या नागमोडी वळणाच्या रस्त्यातून गर्द हिरवाईतून जाणारी कच्ची
वाट. चारचाकी वाहनातून खिडक्या काचा बंद करून प्रवास केला तरी
सह्याद्रीच्या लाल मातीचा भला मोठा धर या मानव निर्मिती यंत्रावर साठलेला
असतो. लाल मातीची उधळण करीत जाणारी चारचाकी पवन मावळातील महिलांना नवल
नाही, कारण दुर्गाप्रेमींची वाढती वर्दळ त्यांच्या परिचयाची. किल्ल्याच्या
पायथ्याशी तुंगवाडी, पण सिमेंटच्या रस्त्याने सजलेली वाडी. गर्द वृक्षाच्या
सावलीत वसलेली तुंगवाडी पर्यटकांना सेवा देण्यासाठी सज्ज. पिण्याच्या
पाण्यापासून खवय्येचे हट्ट पुरवण्यासाठी सज्ज. घनदाट झाडांच्या सावली
सिमेंटच्या रस्त्याने किल्ल्याच्या पायथ्याशी सहज पोहोचतो.
शेवटच्या
टोकाव हिरवाईत असलेल्या मारुती दर्शन घेऊन किल्ला चढण्यास सुरूवात होते.
तुंग किल्ल्याचे दुसरे नाव कठिणगड आहे. या दुसऱ्या नावातच किल्ल्याचा परिचय
होतो. दगड गोट्यातून अवघड नागमोडी चढण चढण्यासाठी सह्याद्रीच्या कुशीतच
जन्म घेणे गरजेचे आहे अस नाही त्यासाठी मावळा होने गरजेचे आहे. एका वेळी
एकच व्यक्ती ह्या वाटेने वर जाऊ शकतो किंवा उतरू शकतो. किल्ला चढताना अवघड
वाटेवर डाव्या हाताला खडकात खोदलेली लहान जागा दिसून येते. वरच्या
किल्ल्याकडे पाहण्याचे धाडस होत नाही. सुमारे पाऊण तासांत आपण पहिल्या
प्रवेशद्वारा पर्यंत पोहोचतो. येथे आल्यावर किल्ले राजगडचा पाली दरवाजा
आठवतो. अगदी तसंच सर्व काही वाटते. याच दरवाजातून डाव्या हाताला असलेल्या
अरूंद वाटेने किल्ल्याच्या एका नाळेवर असलेल्या प्रतागडच्या बुरूजा सम
बुरूज आहे .या बुरूजाच्या उजव्या बाजूच्या तटबंदीत शौचकुप असल्याचे आपल्या
नजरेत येते. ही व्यवस्था या बुरूजांच्या सुरक्षेसाठी असलेल्या शिलेदारासाठी
असावी.
हा बुरूज पाहून पुन्हा पहिल्या प्रवेशाद्वारा पाशी पोहोचतो.
तिथूनच दुसरा दरवाजा चढण्याची धमक ठेवावी लागते. सुमारे वीस पावलांवर
असलेल्या दुसऱ्या गोमुखी दरवाजा पोहोचल्यावर आनंदला पारावर राहत नाही.
दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूस देवड्या आहेत.
दोन तीन पायऱ्या चढून
आल्यावर मोठे पटांगण असून पुरातन वास्तूंचे चौथरे दिसून येतात. अर्ध्या
भागात कातळातील बालेकिल्ला खुणावतो. तर एका बाजूचा भव्य बुरूजावर भगवा
डौलाने फडकतो. तेथून नाळेवरचा देखावा बुरूज आकर्षक दिसतो. तर दुसऱ्या
बाजूला असलेल्या गणेशाचे लहान मंदिर आहे. याच मंदिराच्या पाठीमागे चौकोनी
भव्य पाण्याचे टाके असून त्याच्या डाव्या बाजूने चढण चढून बाले किल्ल्यावर
पोहोचतो. समोरचा तिकोना किल्ला स्पष्ट दिसतो तर पवना धरणाच्या परिसरातील
संपूर्ण परिसर मोहक दिसतो. येथे गडदेवता तुंगी मातेचे साधे मंदिर आहे.
आपनास तेथे शिवकाळाच्या स्मृती जागवतात.
हा किल्ला देखील साधारणतः १६५७
दरम्यान निजामशाही कडून घेण्यात छत्रपतींच्या मातब्बर सैन्याला शक्य झाले
होते. पुरंदरच्या तहात मोगलांना दिलेल्या किल्ल्यात याचा समावेश होता. काही
वर्षात पुन्हा स्वराजात आलेल्या या किल्ल्याने अनेक राजसस्ता पाहिल्या,
मात्र याने शिवकाळचा सुवर्ण काळ पाहिला तो कायमचा मनात राहिला.
विशेष आभार : सुरेश नारायण शिंदे, भोर.
- गड-किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र.
किल्ले शिवनेरी.
किल्ले शिवनेरी.
#नाव_किल्ले_शिवनेरी.
उंची : ३५०० फूट.
प्रकार : गिरिदुर्ग.
चढाईची श्रेणी : मध्यम.
ठिकाण : पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत.
जवळचे गाव : जुन्नर.
डोंगररांग : नाणेघाट.
सध्याची अवस्था : सर्वात चांगली.
स्थापना : ११७०.
#१९_फेब्रुवारी_१६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता. हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे.
या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा
बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व राजमाता जिजाऊ व
बाल-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा आहेत.
या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे.
शिवनेरी अगदी जुन्नर शहरात आहे. जुन्नरमधे शिरतानाच किल्ले शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे...
#इतिहास :
‘जीर्णनगर’, ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे गाव इसवी सन पूर्व काळापासून
प्रसिद्ध आहे. ही शक राजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र
सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले
वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून
फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील
दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर
त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदवून घेतली.
सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक– उल–तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इ.स. १४७० मध्ये मलिक– उल–तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते.
यानंतर इ.स. १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. राजमाता जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर १६२९ मध्ये राजमाता जिजामाता गरोदर असताना छत्रपती शहाजी राजे त्यांना ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीवर नेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानीमाता शिवाई ना राजमाता जीजाऊ यांनी नवस केला जर आपल्याला पुत्र झाला तर तुझें नाव ठेवीन. त्याउप्पर, शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरे, फाल्गुन वद्य तृतीयेला, शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजीराजे यांचा जन्म जाला. तारीख होती १९ फेब्रुवारी, इसवी सन १६३०. इ.स. १६३२ मध्ये राजमाता जिजाबाईनी छत्रपती शिवाजी राजे सह गड सोडला आणि १६३७ मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरूद्ध येथील महादेव कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. पुढे इ.स.१६७३ मध्ये किल्ले शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न छत्रपती राजे शिवाजी यांनी केला. इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्न केला, मात्र अपयश पदरात पडले. पुढे ३८ वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहूमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला.
- गड-किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र.
#किल्ले_राजगड #संजीवनी_माची
#किल्ले_राजगड
#संजीवनी_माची
संजीवनी माचीची एकूण लांबी अडीच कि.मी. आहे. ही माची सुद्धा ३ टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत. पहिला टप्पा खाली उतरून उत्तरेकडे वळून तटालागत थोडे मागे चालत गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरूज लागतात. या तिन्ही बुरुजांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात प्रचंड मोठा तोफा असाव्यात. या माचीवर अनेक पाण्याची टाकी आहेत. या माचीला एकूण १९ बुरूज आहेत. माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे. या भुयारातून बाहेरील तटबंदीकडे येण्यासाठी दिंडांची व्यवस्था केलेली आहे. दोन्ही तटांमधील अंतर अर्धा-पाऊण मीटर असून खोली सुमारे ६ ते ७ मीटर आहे. या भागात बुरुजांच्या चिलखतात उतरण्यासाठी पायऱ्यांच्या दिंडा आहेत. तसेच नाळेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर तटबंदीमध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेच यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे.
तोरणा ते राजगड हे अंतर या मार्गे जवळचे आहे.
आभार : शिवराय ट्रेकिंग ग्रुप, कराड
- गड-किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र.
किल्ले राजगड.
किल्ले राजगड.
#किल्ले_राजगड
#पाली_दरवाजा
पाली दरवाज्याचा मार्ग पाली गावातून येतो. हा मार्ग फार प्रशस्त असून
चढण्यासाठी पायऱ्या खोदल्या आहेत. पाली दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार भरपूर
उंचीचे आणि रुंदीचे आहे, यातून हत्तीसुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. हे
प्रवेशद्वार ओलांडून २०० मी. पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे
प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरुजांनी
केलेले आहे. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर
परकोट बांधलेले आहेत. या परकोंटाना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आढळतात. अशा
झरोक्यांना 'फलिका' असे म्हणतात. या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत
असे. दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवडा आहेत. या
दरवाजाने गडावर आल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहचतो.
आभार : शिवराय ट्रेकिंग ग्रुप, कराड.
- गड-किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र.
किल्ले जंजिरा उर्फ दंडाराजपुरी.
#दंडाराजपुरी_दुर्ग.
दंडाराजपुरी येथील किल्ला ज्याला आपण जंजिरा नावाने आता ओळखतो तेथे गेले
असता त्याची अजिंक्यता तेथील लोक आपणास ऐकवतात. पाण्यातील पाश्चिमात्य
दैत्यांचा अभ्यास केल्यावर जंजिरा अजिंक्य का ठरला ह्याचे उत्तर आपणांस
मिळते. तसेच शिवकाळातील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या व छत्रपती संभाजी
महाराजांच्या जंजिऱ्यावरील मोहिमांचा अभ्यास केल्यावर त्यांना माघार का
घ्यावी लागली ह्या प्रश्नांची उत्तरे जंजिऱ्यावरील घटनावळींमध्ये आपल्याला
आढळतात.
दर्यामध्ये ताठ उभा असलेला जंजिरा दर्याकिनाऱ्यावरील
मराठ्यांपुढे कितीतरी वेळा झुकला आहे ते इतिहासाची पाने चाळल्याशिवाय समजणे
मुश्किल.
जंजिऱ्याचे आरमार,त्याची बांधणी,त्यावरील युद्धसामुग्री ई.
गोष्टी रणांगणात शौर्य गाजविणाऱ्या मराठ्यांमध्ये बरेच अंतर राखून होत्या.
शिवकाळात कोकणी माणसाची आपल्या वतनाची आसक्ती आणि उत्तर काळामध्ये
धर्मसहिष्णूता ह्यामुळे जंजिरा पाण्यामध्येच अजिंक्य राहिला. हे आपण लक्षात
घेतलं पाहिजे.
आभार : अतुल अनंत मोरे.
- गड-किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र.
विश्रामगड उर्फ पट्टाकिल्ला.
विश्रामगड उर्फ पट्टाकिल्ला.
#छत्रपती_शिवरायांच्या_झुंजाराची_रीत...
#विश्रामगड_ʼपट्टाकिल्लेʼ.
इ.स २२ नोव्हेंबर १६७९ रोजी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पट्टा
किल्ल्याची हिंदवी स्वराज्याच्या सुवर्ण इतिहासात नोंद झाली आणि हर हर
महादेव गर्जनेत “विश्रामगड गाथा” सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात रुजली...
या ऐतिहासिक पर्वाची साक्ष देणारा पट्टाकिल्ला...
इ स १६७९ मध्ये आपल्या दक्षिण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात महाराजांनी जालन्याची (तेव्हाचे जालनापूर) लूट केली सोनेनाणे, जडजवाहीर घेऊन महाराज रायगडाकडे निघाले दरम्यान महाराज सोनेनाणे घेऊन रायगडाकडे जात असल्याची खबर मुघल सरदार रणमस्तखानाला लागली दहा हजारांची मोठी फौज घेऊन तो महाराजांच्या मागावर निघाला संगमनेरजवळच्या रायतेवाडी येथे दोन्ही सैन्याची गाठ पडली दि. १८, १९ व २० नोव्हेंबर असे ३ दिवस दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले खानाच्या दिमतीला औरंगाबादेहून मोठी कुमक रवाना झाल्याची खबर आली युद्ध सुरू असतानाच महाराजांनी खजिना घेऊन पुढे जायचे व बाकीच्या सैन्याने लढाई सुरू ठेवायची अशी रणनीती निश्चित करण्यात आली निवडक ५०० घोडेस्वारांसह महाराज पट्टा किल्याकडे रवाना झाले संगमनेर जवळ रायतेवाडी येथे आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई लढून शिवाजीमहाराज २२ नोव्हेंबर इ स १६७९ या दिवशी नगर-नाशिक जिल्ह्यांच्या हद्दीवर असणार्या अकोले तालुक्यातील पट्टाकिल्ल्या वर आले त्यांचे वास्तव्य १७ दिवस या किल्ल्यावर होते ते विश्रांतीसाठी थांबले म्हणून या किल्ल्याचे नामांतर नंतर ‘विश्रामगड’ असे पडले...
आभार :
● छत्रपती फाउंडेशन, भिगवण.
● विश्रामगड (पट्टाकिल्ला)
● गड-किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र.
● पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन.
- गड-किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र राज्य.
किल्ले रायगड.
किल्ले रायगड.
#नाव : #रायगड.
किल्ला उंची : ८२० मीटर/२७०० फूट.
प्रकार : गिरिदुर्ग.
चढाई ची श्रेणी : सोपी.
ठिकाण : रायगड, महाराष्ट्र.
जवळचे गाव : महाड.
डोंगररांग : सह्याद्री.
सध्याची अवस्था : व्यवस्थित.
स्थापना : १०३०.
किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या
पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर
आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती
शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून [इ.स.चे १६ वे शतक|१६ व्या
शतकात] याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी
झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर
किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे.
इतिहासलेखन
प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास
‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य
तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप
नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन
नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’
असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई.
मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर
प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस
म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली.
तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे
निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व
त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी
बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक
अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी
राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्याचे पूर्वीचे नाव जम्बुदीप असे
होते.
सभासद बखर म्हणते -
“राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा.
चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत
उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु
तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले
आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.”
याच दुर्गदुर्गेश्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे. :-
१.रायगड
२.रायरी
३.इस्लामगड
४.नंदादीप
५.जंबुद्वीप
६.तणस
७.राशिवटा
८.बदेनूर
९.रायगिरी
१०.राजगिरी
११.भिवगड
१२.रेड्डी
१३.शिवलंका
१४.राहीर
आणि
१५.पूर्वेकडील जिब्राल्टर.
'देवगिरीच्याहुन दशगुणी, दीड गाव उंच, प्रशस्त जागा. पर्जन्यकाळी कड्यावर
गवत उगवत नाहि. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाहि' हे बघून महाराज
खुशीने म्हणाले… 'तख्तास जागा हाच गड करावा'. छत्रपती शिवाजी महाराजांच्या
या शब्दाचा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्यावरच
राजधानी बसवण्याचे महाराजांनी निश्चित केले. रायगडाचे जुने नाव रायरी,
गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्रसपाटीपासून किल्याची उंची २९०० फूट आहे.
गडाला सुमारे १४३५ पायऱ्या आहेत.
गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरूज,
उत्तरेकडच टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा
पुतळा हे मुख्य आकर्षण आहे.
शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी
होते. याची आठवण देणारी गडस्वमिनी श्री शिरकाई मंदिर गडावर आहे. लोकमान्य
टिळकांच्या काळात मावळंकर नावाच्या इंजिनिअरने हे मंदिर बांधले आहे. ते
श्री शिरकाईचे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर
राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा
अजूनही आहे. ब्रिटिश काळापासून तेथे श्री शिरकाईचा घरटा हा नामफलक होता.
- योगेश सोनवणे ( गड-किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र. )
किल्ले लोहगड.
किल्ले लोहगड.
नाव : लोहगड 🚩🚩🚩
उंची : ३४२० फूट
प्रकार : गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी : सोपी
ठिकाण : पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव : लोणावळा,मळवली
डोंगररांग : मावळ
सध्याची अवस्था : व्यवस्थित
लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. जवळच असणारी भाजे आणि
बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच
इ.स.पू. सातशे वर्षांपूर्वी किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे अनुमान
निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने
पाहिल्या.
इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि
अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक. इ.स. १५६४ मध्ये
अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुर्हाण
निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ.स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला.
१६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून
घेतला आणि लोहगड–विसापूर हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला.
इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन
केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला.
पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून
ठेवली होती. इ.स. १७१३मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी
आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंग्र्यांकडून
तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बांबळे याने
तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे
किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स. १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम
आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व
तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा-शके १७११ मध्ये बाळाजी
जनार्दन भानू – नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या
देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुरे कैलासवासी झाले व नंतर १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसर्या
बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड
जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर
इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.
योगेश सोनवणे - गड-किल्ले संवर्धन समिती, पुणे.
किल्ले देवगिरी / दौलताबाद चा किल्ला.
किल्ले देवगिरी / दौलताबाद चा किल्ला.
दौलतींचे शहर म्हणून विख्यात असलेल्या दौलताबादला भेट द्यावी, असा विचार
केला. इतिहास आमचा कच्चा असल्यामुळे, काही चुकीचे लिहिले असेल तर ते आपण
तपासून घ्यावे (शक्यतो नसेल). या शहराने आणि किल्ल्याने अनेक वंशाचे उत्थान
पाहिले. यादव, खीलजी, मोगलवंश हे त्यापैकी आहेत, असे म्हणतात.
दौलताबाद (जुने नाव देवगिरी) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या औरंगाबाद
जिल्ह्यातील एक गाव असून येथे यादवकालीन ऐतिहासिक किल्ला आहे.
• नाव : किल्ले देवगिरी (दौलताबादचा किल्ला).
• उंची : २९७५ फूट.
• प्रकार : गिरीदुर्ग.
• चढाईची श्रेणी : सोपी.
• ठिकाण : औरंगाबाद, महाराष्ट्र.
• जवळचे गाव : औरंगाबाद.
• डोंगररांग : औरंगाबाद.
• सध्याची अवस्था : व्यवस्थित.
महाराष्ट्रात जे काही भुईकोट किल्ले आहेत त्यापैकी हा एक. युद्धपद्धती आणि युद्धकलेतील गरजांच्या फेरबदलांना अनुसरुन या किल्ल्याची रचना आणि बांधणीही वेळोवेळी होत गेली असावी. याचसाठी दौलताबादचा किल्ला सैन्यवास्तुकलेतील प्रगतीचे प्रतीक म्हणून गणला जातो.
ह्या किल्ल्याचा नकाशा, भिंती आणि प्रवेशद्वाराची रचना अशी योजनाबद्ध रीतीने करण्यात आलेली आहे की, शत्रूच्या हल्ल्यापासून किल्ला सुरक्षित राखता येईल असे वळणा-वळणाचे अरुंद रस्ते शत्रुसैन्याच्या सहज प्रवेशाला थोपवून धरतात. तर उंच,उंच भिंती किल्लेबंदी करणा-या उरतात. संपूर्ण किल्ला चहूकडून जलमय कालव्यांनी वेढलेला आहे. किल्ल्याची उंची गाठण्यासाठी डोंगर पोखरुन तयार करण्यात आलेल्या दूर्गम, अतिसुरक्षित असे अंधारे बोगदे ओलांडावे लागतात. किल्ल्याच्या या रचनेमुळे लक्षात येते की, शत्रुची दिशाभुल करण्यासाठी आणि त्याला फसवण्यासाठी अशी रचना केलेली असावी.
• किल्ल्याच्या एका बाजूला दहा कि,मी. भिंत पसरलेली आहे. किल्ल्यात प्रवेश करतांना एक महादरवाजा आहे, या दरवाजावर हत्तींचा हल्ला थोपवण्यासाठी टोकदार खिळे ठोकण्यात आलेली आहेत. यातून प्रवेश केल्यावर प्रत्येक गल्लीत पहारेक-यांच्या कोठड्या बांधण्यात आलेल्या आहेत. या कोठड्यामधे काही जूनी वापरण्याजोगी अवजारे ठेवण्यात आली आहेत. इथेच हत्ती हौद आहे. तसेच जैन मंदिरही आहे. पुढे त्याची तोडफोड करुन येथे मशिद उभारलेली आहे, आणि नंतर त्याचीही तोडफोड करुन तेथे आता एका भारतमातेचे मंदिर उभारण्यात आलेले आहे. हे बद्ल स्वातंत्र्यानंतर झाले असावेत.
या मंदिरातून म्हणजे रस्त्याच्या डाव्या बाजूला हे मंदिर आहे तर उजव्या बाजूला चांद मिनार आहे. दोनशे दहा फूट उंचीचा एक गोलाकृती मीनार येथे आहे. आता तो प्रवेशासाठी बंद करण्यात आलेला आहे.चांदमीनाराच्या पुढे कालाकोट प्रवेशाद्वारानजिक हेमांडपंथी मंदिराचे भग्नावशेष सापडतात. पण आता या किल्यावरुन ते हटवण्याचे काम चालू आहे, पुरातत्वे विभागाला त्याच्याशी काही घेणे नाही. अशा अविर्भावात ते सर्व रस्त्याच्या कडेला पडून आहेत.
• भिंतीचा तिसरा भक्कम भाग कालाकोटचे प्रवेशद्वार, पुढे एका डोंगरावर आहे, यावर पोचण्यासाठी पाय-या बांधण्यात आलेल्या आहेत. इथे तीन दरवाजे समकोन स्थितीत आहेत. शत्रुसैनिकावर समोरुन आणि मागच्या बाजूस हल्ला करता यावा या उद्देशाने तशी रचना असावी असे वाटते. याच्या वरती उंचावर एका महालाचे अवशेष असून या महालाला चीनी महल म्हटल्या जती. यातील सजावटीसाठी चीनी टाइल्स वापरण्यात आल्या होत्या. औरंगजेबाने गोलकोंडाचा अंतिम राजा सुल्तान आबूल हुसैन तानाशाह आणि विजापुरचा अंतिम शासक सुल्तान सिकंदर यांना इथेच कैदेत ठेवलेले होते.
• रंग महाल येथुन डावीकडे एक लहानश्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर रंगमहालाचे भग्नावशेष सापडतात विभिन्न खोल्या आणि महालाच्या सुनियोजित बांधणीव्यतिरिक्त यातील खांब आणि खणामधील लाकडांवर केलेलं नक्षीकाम पर्यटकांना गतवैभावाची आठवण करुन देतात.(इथेही आता प्रवेश करु देत नाही. काही रुपयाची लाच देऊन इथे प्रवेश करता येतो. लोकांना याची उत्सुकता असत नाही. आणि लोक इथे प्रवेशाचा हट्टही करत नाही. कारण तिथे पाहण्यासारखे काय आहे, असे म्हणतात.)
• मेंढा तोफ या तोफेचे मुळ नाव शिकन तोफ होती असे म्हणतात. पण तिच्या आकारावरुन तिला मेंढा तोफ असे आता नाव प्रचलीत आहे. या तोफेवर दोन उल्लेख आहे, संपूर्ण खिताबासहीत एक औरंगजेबाचा आणि दुसरा तोफ निर्मात्याचे नाव मुहमद-हुसेन अमल-ए-अरब असे लिहिलेलं आहे. असे मार्गदर्शकाराने सांगितले. बुरुजाच्या मध्यभागी तोफेचे तोंड फिरवण्याची व्यवस्था आहे.जेणेकरुन दुर-दुर मारा करण्यात यावा.
दरी महालाच्या सभोवताली डोंगर पोखरुन केलेली दरी दिसते ते साधारणतः पन्नास ते शंभर फूट खोल असावी. इथे या किल्ल्यात वरच्या बाजुला प्रवेश करण्यासाठी एकमेव रस्ता आहे. आणि सर्व बाजूंनी दरी आहे. आता किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एक आधुनिक पुल लोखंडाचा पर्यटकांसाठी केलेला आहे. आणि जुना पुल काहिसा विटा आणि दगडाचा वापर करुन बांधलेला आहे. हाच पुल पुर्वी पर्यायी रस्ता म्हणून वापरण्यात येत होता. दरीतील पाण्याची पातळी उभयबाजूंवरील बंधा-यावरुन नियंत्रीत करण्यात येत असे. धोक्याचे प्रसंगी शत्रुसैन्याला थोपवून धरण्यासाठी कोणत्याही एका धरणातून पाणी दरीत सोडण्यात येत असे आणि दुसरे धरण बंद करण्यात येई. त्यामुळे पाण्याची पातळी वाढत असे. या प्रकारे धोक्याच्या वेळेस हा पूल पाण्याखाली जात असे. आणि जो आधुनिक पूल दिसतो त्याचा उपयोग क्वचित प्रसंगी करतही असतील असे वाटते. म्हणून या किल्ल्यावर हल्ला करणे केवळ अशक्य असे वाटते. अर्थात फितुरीमुळे या किल्ल्याची वाट लागली हे सांगण्याची काही गरज नाही.
• या डोंगरावर किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी, आणि शत्रुची दिशाभुल करण्यासाठी जागोजागी इथे वाटा आहेत. भुयारी मार्ग आहेत. इथे पुल ओलांडला की, काही अंधारे रस्ते ओलांडावे लागतात. इथे माणूस हरवल्यासारखा अनुभव येतो प्रत्येकाला हा किल्ला ओलांडून जाण्यासाठी या अंधा-या पाय-या ओलांडाव्याच लागतात. आणि यालाच समांतर असा एक पर्यायी रस्ता इथे आहे, ज्याच्यातुन इथे मार्गदर्शन करणारे, किल्ला अजिक्य कसा राहिला. शत्रुवर उकळते तेल टाकण्याच्या जागा कोणत्या, शत्रुने प्रवेश केल्यावर तो जर चुकीच्या मार्गाने गेला तर सरळ दरीतच कसा जाईल. गुप्त कोठड्या, धुर सोडून शत्रुला अडवण्याची पद्धत, भुयारातुन लहान-सहान चाके सरकवून त्याचा फासासारखा वापर हे सर्व अद्भुत आहे, ते मात्र मार्गदर्शकाकडूनच पाहिले आणि ऐकले पाहिजे. हेच या किल्ल्यात पाहण्यासारखे वाटते. अजूनही इथे धोकादायक रस्ते, या अंधा-या गुहेत आहेत. मार्गदर्शकाशिवाय या रस्त्याने प्रवेश करु नये. किंवा मार्गदर्शकाचा उपयोग घ्यायचा नसेल तर सोप्या मार्गाने जावे, तो पार करतांनाही अंधा-या रस्त्याचा वापर करावा लागतो. भिंतीचा आधार घेत-घेत हा रस्ता विना-मार्गदर्शकाशिवाय अनेक पर्यटक हा रस्ता सहज पार करतात.
डोंगराळ वाटेवरच पाय-याची रांग लागली की तिथे एक गणपतीचे मंदिर आहे, तेव्हा केव्हापासून आहे, हे कोणासही निश्चित सांगता येत नाही.
• बारादरी, दमलेले पर्यटक जेव्हा पाय-यावरुन वर पोहचतात तेव्हा इथला बारादरीतले भव्य महालाच्या दर्शनाने जराशी विश्रांती घेतल्यावर सुखावतो. बारा कमाणी असलेली ही इमारत आहे, इथे अष्ट्कोणी खोल्या आणि या खोल्यांची छत घुमटाकृती आहेत. त्यालगतच्या खोलीत लोखंडी खिडक्या आहेत. प्रत्येक दारावर एक खिडकी असून त्यातून मनोरम देखावे बघता येतात. बारादरीचे बांधकाम दगड-चुन्याने केलेले दिसते. चुन्याच्या थराचे डिझाईन मोहक आहे. इथून पुढे गेले की, पुढे शिखर बुरुज आहे. शिखराकडे कडे जातांना डोंगर पोखरुन एक गुहा इथे दिसते.
एकनाथांचे गुरु आणि या किल्ल्याचे किल्लेदार जनार्धनस्वामी इथे निवास करीत असे म्हणतात. राजकारण आणि युद्धानी त्रासलेल्या सामान्य जनतेस ते उपदेश, मार्गदर्शन करीत. किल्लेदार असुनही त्यांनी धार्मिक जीवनाची कास धरली संसारात अटकलेल्यांना आणि अध्यात्माची कास धरणा-यां सर्व धर्मियांना ही एक हक्काची जागा तेव्हा वाटत असावी.
◆ निवडक भाग :
• १२वे शतक.
बदामीचे चालुक्य, कल्याणचे चालुक्य, मौर्य, शुंग, सातवाहन, हल(हाला), शक
क्षत्रप, सतकर्णी, वाकाटक, नल, विंध्यसेना, प्रवरसेना, राष्ट्रकूट
यांच्यानंतर बाराव्या शतकाच्या शेवटच्या २५ वर्षात देवगिरीच्या यादवांचा
उदय खान्देश परिसरात झाला. पहिल्या सेऊनचंद्राच्या सेऊनदेशात (आताचा
खान्देशात) नाशिक ते देवगिरीचाही समावेश होता. कृष्णा नदीच्या उत्तरेकडे
वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या या यादव वंशातील भिल्लमा-२ या राजपुत्राने
देवगिरी गावाची स्थापना करून पुढे तेथून राज्य चालवले.
पुढे सिंघण्णा व त्यानंतर त्याचा नातू कृष्ण यांनी राज्य वाढवले. त्याने उत्तर कोकणचा प्रदेश आपल्या राज्यास जोडण्यात यश प्राप्त केले आणि गादी आपला मुलगा आमण्णाकडे सोपविली. पण कृष्णाचा मुलगा रामचंद्राने बंड करून गादी स्वतःकडे घेतली आणि विदर्भ आणि इतरत्रही विजय प्राप्त केले. मात्र, १२९६ मध्ये झालेल्या अल्लाउद्दीन खिलजीच्या आकस्मिक हल्ल्यास रामचंद्र तोंड देऊ शकला नाही.
• इ.स. १३२७ ते इ.स. १३९७.
इ.स. १३२७ मध्ये
अल्लाउद्दीन खिलजी या उत्तरेतील सुलतानाने दख्खन प्रांतात प्रवेश करून
यादवांचा पराभव केला आणि त्यांची संपत्ती लुटून त्यांना दरिद्री बनवले.
सेनापती मलीक कफूर याने अल्लाउद्दीनचे काम पुढे चालू ठेवले आणि इ.स. १३१० मध्ये यादवांची सत्ता लयाला गेली.
• इ.स.१३१० ते इ.स.१३४७.
अल्लाउद्दीनचे
अनुकरण मुहम्मद बिन तुघलक (इ.स. १३२४-१३५०) या दिल्लीच्या सुलतानाने करून
आपली सत्ता दक्षिणेतील मदुरेपर्यंत वाढवत केली. १३२६ मध्ये मुहम्मद बिन
तुघलक ऊर्फ वेडा मुहम्मद या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी देवगिरीवर
आणली व देवगिरीचे नाव दौलताबाद केले. दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादेस
आणण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला. ही राजधानी परत दिल्लीला न्यावी लागली.
देवगिरी किल्ल्यावर पंचधातूंनी बनवलेला एक तोफ आहे. तोफ किल्ल्यावर बनवली आहे . त्या तोफेमध्ये एक शहर उद्ध्वस्त करण्याची शक्ती आहे. या तोफेवरील कोरलेली माहिती ही पर्शियन भाषेत व लिपीत आहे .
• इ.स. १३४७ ते इ.स.१५००.
तुघलकांची सत्ता क्षीण झाल्यावर अल्लाउद्दीन
हसन बहामनी याच्या अधिपत्याखाली दक्षिणेत इ.स. १३४७ साली बहामनी घराण्याची
स्थापना झाली. ते राज्य सुमारे १५० वर्षे टिकले. देवगिरी अथवा दौलताबाद ही
बहामनींची काही काळ राजधानी होती. सोळाव्या शतकात बहामनी राज्याचे
गोवळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही, वऱ्हाडची इमादशाही,
विजापूरची आदिलशाही आणि बिदरची बरीदशाही अशा पाच स्वतंत्र राज्यांत विभाजन
झाले. आपली सत्ता टिकविण्याकरिता या दख्खनी सुलतानांना प्रशासनासाठी
स्थानिक मराठी लोकांचे मोठ्या प्रमाणावर साहाय्य घ्यावे लागले. सनदी सेवा,
लष्करी चाकरी आणि राजनैतिक व्यवहार यासाठी प्रामुख्याने त्यांना मराठी
माणसांचीच नेमणूक करावी लागली. सतराव्या शतकाच्या अंतापर्यंत या पाचही
शाह्या मोगल साम्राज्यांत विलीन झाल्या. १७ व्या शतकाचा अखेरीस औरंगजेबाने
येथे वास्तव्य केले होते.
- गड-किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र राज्य.
बहादूरवाडी गड.
बहादूरवाडी गड.
• किल्ल्याची ऊंची : ०.
• किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले.
• डोंगररांग : डोंगररांग नाही.
• जिल्हा : सांगली.
• श्रेणी : सोपी.
बहादूरवाडी गड हा भूईकोट सांगली जिल्ह्यात आहे पण तो कोल्हापूरपासून केवळ
३५ किलोमीटर अंतरावर आहे तर विलासगड आणि मच्छींद्रगडापासून २० किलोमीटर
अंतरावर आहे. त्यामुळे खाजगी वहानाने हे तीनही किल्ले एकाच दिवसात पाहून
होतात.
• पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर
चारही बाजूंनी खंदक खोदलेला होता. त्यात आत्ता झाडी माजलेली आहे. मुख्य
प्रवेशव्दार समोरील खंदक बुरुजवरुन किल्ल्यात जाण्यासाठी रस्ता केलेला आहे.
प्रवेशव्दाराच्या बाजूला दोन बुरुज आहेत त्यांची डागडूजी केलेली आहे.
त्यातील उजव्या बुरुजाच्या बाहेर गणपतीची मुर्ती आहे. त्यामुळे या जागेचे
सुशोभिकरण करुन फ़रशा बसवलेल्या आहेत. प्रवेशव्दारातून आत शीरल्यावर
पाहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. प्रवेशव्दारावर जाण्यासाठी जीना आहे.
किल्लाला दोन तटबंद्या आहेत. बाहेरील तटबंदीत १८ बुरुज आहेत तर आतील
तटबंदीत ८ बुरुज आहेत. बुरुज आणि तटबंदी जमिनीपासून १२ फूट पर्यंत दगडांनी
बांधलेले असून त्यावर वीटांचे बांधकाम आहे. तटबंदी आणि बुरुजामध्ये झरोके
आहेत. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर मोकळी जागा आहे. त्यासमोरील तटबंदीत
खोल्या आहेत त्यांना चार दरवाजे आहेत. या ठिकाणी घोड्यांच्या पागा होत्या
असे सांगतात. आतल्या तटबंदीतून बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर सगळीकडे
प्रचंड झाडी माजलेली दिसते, त्यात किल्ल्याचे सगळे अवशेष हरवून गेलेले
आहेत. प्रवेशव्दारापासून सरळ पुढे गेल्यावर एक दरवाजा लागतो. तो ओलांडून
गेल्यावर एक पायऱ्या असलेली खोल विहिर आहे. या विहिरीच्या बाजूला हौद आणि
तुळशी वृंदावन आहे. विहिरीच्या पुढे बाहेरच्या तटबंदीत चोर दरवाजा आहे. या
विहिरी भोवती तटबंदी बांधून आणि प्रवेशव्दार आणि चोर दरवाजा ठेवून विहिरीचा
भाग संरक्षित केलेला आहे. चोर दरवाज्यातून विहिरीच्या भागात येऊन पाणी
नेण्यासाठी ही सोय केली असावी. किल्ल्याच्या आत पडझड झालेल्या काही वास्तू
आहेत. हे सर्व पाहून प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. गड
फ़ेरीला अर्धा तास लागतो.
• पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई ते
बहादूरवाडीगड अंतर ३५५ किलोमीटर आहे. बहादूरवाडीगड सांगली जिल्ह्यात असला
तरी कोल्हापूरपासून केवळ ३५ किलोमीटरवर आहे. बहादूरवाडीगड जाण्यासाठी मुंबई
- कोल्हापूर महामार्गाने पेठ नाका त्या पुढील कामेरी गाव, तांदुळवाडी
ओलांडल्यावर बहादूरवाडीला जाणारा फ़ाटा आहे, या फ़ाट्यावरुन बहादूरवाडीगड २
किलोमीटरवर आहे. खाजगी वहानाने थेट किल्ल्या पर्यंत जाता येते.
• राहाण्याची सोय : गडावर रहाण्याची सोय नाही.
• जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
• पाण्याची सोय : गडावर पिण्याचे पाणी नाही.
• जाण्यासाठी उत्तम कालावधी : वर्षभर
• निवडक माहिती :
कोल्हापूर आणि सातारा ह्या मराठ्यांच्या दोन गाद्या होत्या. त्यांच्या
सीमेवर संरक्षणासाठी बहादूरवाडी येथे माधवराव पेशव्यांनी बहादूरवाडी किल्ला
बांधला आणि तो सांगलीच्या पटवर्धनांच्या ताब्यात दिला. त्यांनी मुधोळकर
घोरपडे यांच्या ताब्यात हा किल्ला दिला.
- गड-किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र राज्य.