Followers

Monday, 22 June 2020

किल्ले तुंग

दुर्ग क्रमांक : ८.









किल्ले तुंग.

#किल्ले_तुंग
#मावळ.
सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील इतिहासाचा वारसा म्हणजे गिरिदुर्ग. पवन मावळातील गिरिदुर्गांची मोठी शृंखला असून त्यात बोरघाटचा व पवन मावळचा टेहळणीचा किल्ला म्हणजे तुंग. पुण्याहून व लोणावळा पासून जवळ असलेला व पवना धरणाच्या विहंगम जलसाठ्याला लागूनच असलेला हा दुर्ग लांबूनच पाहाताना मनात धडकी भरते म्हणजे चारशे वर्षापूर्वी काय अवस्था होत असेल याची जाणीव झाल्याशिवाय राहात नाही. या दुर्गाकडे पाहावयास केवळ मावळ्या शिवाय कुणाचे धाडस होणार नाही. मावळी मनात व डोळ्यांत फक्त सह्याद्री आणि सह्याद्री.
सह्याद्रीच्या कुशीतील एक भव्य असा काळ्या कातळांचा उंचच्या उंच डोंगर. लाल मातीच्या नागमोडी वळणाच्या रस्त्यातून गर्द हिरवाईतून जाणारी कच्ची वाट. चारचाकी वाहनातून खिडक्या काचा बंद करून प्रवास केला तरी सह्याद्रीच्या लाल मातीचा भला मोठा धर या मानव निर्मिती यंत्रावर साठलेला असतो. लाल मातीची उधळण करीत जाणारी चारचाकी पवन मावळातील महिलांना नवल नाही, कारण दुर्गाप्रेमींची वाढती वर्दळ त्यांच्या परिचयाची. किल्ल्याच्या पायथ्याशी तुंगवाडी, पण सिमेंटच्या रस्त्याने सजलेली वाडी. गर्द वृक्षाच्या सावलीत वसलेली तुंगवाडी पर्यटकांना सेवा देण्यासाठी सज्ज. पिण्याच्या पाण्यापासून खवय्येचे हट्ट पुरवण्यासाठी सज्ज. घनदाट झाडांच्या सावली सिमेंटच्या रस्त्याने किल्ल्याच्या पायथ्याशी सहज पोहोचतो.
शेवटच्या टोकाव हिरवाईत असलेल्या मारुती दर्शन घेऊन किल्ला चढण्यास सुरूवात होते. तुंग किल्ल्याचे दुसरे नाव कठिणगड आहे. या दुसऱ्या नावातच किल्ल्याचा परिचय होतो. दगड गोट्यातून अवघड नागमोडी चढण चढण्यासाठी सह्याद्रीच्या कुशीतच जन्म घेणे गरजेचे आहे अस नाही त्यासाठी मावळा होने गरजेचे आहे. एका वेळी एकच व्यक्ती ह्या वाटेने वर जाऊ शकतो किंवा उतरू शकतो. किल्ला चढताना अवघड वाटेवर डाव्या हाताला खडकात खोदलेली लहान जागा दिसून येते. वरच्या किल्ल्याकडे पाहण्याचे धाडस होत नाही. सुमारे पाऊण तासांत आपण पहिल्या प्रवेशद्वारा पर्यंत पोहोचतो. येथे आल्यावर किल्ले राजगडचा पाली दरवाजा आठवतो. अगदी तसंच सर्व काही वाटते. याच दरवाजातून डाव्या हाताला असलेल्या अरूंद वाटेने किल्ल्याच्या एका नाळेवर असलेल्या प्रतागडच्या बुरूजा सम बुरूज आहे .या बुरूजाच्या उजव्या बाजूच्या तटबंदीत शौचकुप असल्याचे आपल्या नजरेत येते. ही व्यवस्था या बुरूजांच्या सुरक्षेसाठी असलेल्या शिलेदारासाठी असावी.
हा बुरूज पाहून पुन्हा पहिल्या प्रवेशाद्वारा पाशी पोहोचतो. तिथूनच दुसरा दरवाजा चढण्याची धमक ठेवावी लागते. सुमारे वीस पावलांवर असलेल्या दुसऱ्या गोमुखी दरवाजा पोहोचल्यावर आनंदला पारावर राहत नाही. दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूस देवड्या आहेत.
दोन तीन पायऱ्या चढून आल्यावर मोठे पटांगण असून पुरातन वास्तूंचे चौथरे दिसून येतात. अर्ध्या भागात कातळातील बालेकिल्ला खुणावतो. तर एका बाजूचा भव्य बुरूजावर भगवा डौलाने फडकतो. तेथून नाळेवरचा देखावा बुरूज आकर्षक दिसतो. तर दुसऱ्या बाजूला असलेल्या गणेशाचे लहान मंदिर आहे. याच मंदिराच्या पाठीमागे चौकोनी भव्य पाण्याचे टाके असून त्याच्या डाव्या बाजूने चढण चढून बाले किल्ल्यावर पोहोचतो. समोरचा तिकोना किल्ला स्पष्ट दिसतो तर पवना धरणाच्या परिसरातील संपूर्ण परिसर मोहक दिसतो. येथे गडदेवता तुंगी मातेचे साधे मंदिर आहे. आपनास तेथे शिवकाळाच्या स्मृती जागवतात.
हा किल्ला देखील साधारणतः १६५७ दरम्यान निजामशाही कडून घेण्यात छत्रपतींच्या मातब्बर सैन्याला शक्य झाले होते. पुरंदरच्या तहात मोगलांना दिलेल्या किल्ल्यात याचा समावेश होता. काही वर्षात पुन्हा स्वराजात आलेल्या या किल्ल्याने अनेक राजसस्ता पाहिल्या, मात्र याने शिवकाळचा सुवर्ण काळ पाहिला तो कायमचा मनात राहिला.

विशेष आभार : सुरेश नारायण शिंदे, भोर.

- गड-किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र.

No comments:

Post a Comment