Followers

Wednesday 24 June 2020

धानोरा गढी

धानोरा गढी ................... जयंत वडतकर अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात महान पिंजर आणि काटेपुर्णा अभयारण्य भागात धानोरा हे गाव लहानसे गाव वसलेले आहे. या गावाच्या बाहेर दक्षिण दिशेला एका उंच भागावर येवलेची गढी या नावाने परिचित एक गढी किंवा छोटेखानी किल्ला आज भग्नअवस्थेत एकाकी उभी दिसतो. या गढीला मुख्य चार बुरुज व बाहेरील भागात आणखी काही बुरुज असावेत मात्र काळाचा भार आणि पाऊस, उन अन वाऱ्याचा मारा झेलून ते पार झिजले आहेत. चौकोनी आकारात बांधलेल्या या गढीत आतमध्ये आणखी चार चौकोनी आकाराचे वाडे असावेत, त्यातील अर्धा भाग शिल्लक असून त्यांच्या भिंती अजूनही कशाबशा तग धरून उभ्या आहेत. गढीच्या भिंती किंवा परकोट हे १५ ते २० फुट उंचीचे असून या भिंतीचा खालील अर्धा भाग दगड मातीने रचलेला असून वरील अर्ध्या भागात पांढरी माती वापरून भिंती बांधलेल्या दिसतात. गढीची मागील बाजू उंचावर असून मागील दोन बुरुज व मधील भिंत अजूनही अखंड उभी आहे. या ठिकाणाहून दूरवर पसरलेले जंगल, त्यामध्ये असलेले काटेपूर्णा अभयारण्य व त्यातून उगम पावणारी काटेपुर्णा नदी नजरेच्या टप्प्यात दिसते. ही नदी वाहत गेली कि पुढे महानचे धरण आहे. या गढीचा फारसा इतिहास मला उपलब्ध होऊ शकला नाही मात्र कारंजा लाड या गावावर ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेनी स्वारी केली होती, त्यावेळी हे सैन्य या गावातून गेले होते असे येथील लोक सांगतात. यावेळी या सैन्यातील आजारी पडलेल्या घोड्यांवर या गावातील वैद्याने झाडपाल्याच्या मदतीने उपचार केले होते, म्हणूनच या गावाची ओळख वैद्य धानोरा अशी झाली असल्याची मान्यता आहे. कारंजा लुटीच्या या घटनेचे वर्ष १६७० असून, यावरून ही गढी शिवकालीन किंवा त्याही पूर्वीची म्हणजे किमान ४०० वर्षे तरी जुनी असावी असा अंदाज आहे. गेल्या शतकभरापासून वापरात नसल्याने निर्मनुष्य झालेल्या या गढीच्या आतमध्ये आज झाडे, गवत वाढलेले असून उंदीर घुशिच्या बिळांसोबतच येथे सायाळ, रान मांजर आणि मसण्या उदांचा सुद्धा वावर आहे. काही ठिकाणी गुप्त धन किंवा अशाच काही विधी साठी खोदलेले खड्डे सुद्धा दिसून येतात. ही गढी पूर्वमुखी असावी, आणि उंचावर असलेला पश्चिमेकडील म्हणजेच मागील भाग हा निवास व्यवस्था किंवा महत्वाचा भाग असावा. गढीच्या प्रवेश द्वारातून आत गेल्यानंतर डाव्या हाताला म्हणजे आग्नेय दिशेकडील भागात एक विहीर असून सध्या ती कोरडी पडलेली आहे. गढीच्या समोरील पूर्वेकडील शेतात एका दगडी ओट्यावर मारुतीरायाची भग्न मूर्ती तसेच काळ्या पाषाणात कोरलेली आणखी काही शिल्पे पडलेली दिसतात. या गढीतील अशीच एक गणपतीची मूर्ती काही वर्षापूर्वी गावात आणून त्यावर एक छोटेसे मंदिर उभारण्यात आले आहे. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुका आणि अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या या ठिकाणी जाण्यासाठी अकोला वरून काटेपुर्णा व पुढे महान पिंजर येथून १० किमी अंतरावर हे गाव आहे. या ठिकाणी पातुर ते महान पिजर आणि तेथून धानोरा असे सुद्धा जाता येते. DHANORA

No comments:

Post a Comment