Followers

Wednesday 24 June 2020

धामणगावची प्राचीन गढी अचलपूर

धामणगावची प्राचीन गढी अचलपूर या ऐतिहासिक दृष्टीने महत्वाच्या ठिकाणाहून सातपुड्याकडे म्हणजेच मेळघाटात जाणारे रस्ते जातात. यातील चिखलदऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारणता १० किमी अंतरावर धामणगाव गढी हे गाव लागते. या ठिकाणाहून सर्वप्रथम विदर्भातील सर्वात महत्वाचा किल्ला अर्थात गाविलगड किल्ल्याचे दर्शन होते. मेळघाटाच्या घाट रस्त्याच्या पायथ्याशी धामणगाव गढी हे गाव वसलेले असून या ठिकाणी एक प्राचीन अशी पांढऱ्या मातीतील गढी आहे. गावाच्या पश्चिम दिशेला असलेली ही गढी सुमारे दोन एकरात पसरलेली असून या गढीला चार प्रमुख असे भव्य बुरुज आणि प्रवेशव्दारा लगत तीन लहान बुरुज असे एकूण सात बुरुज आहेत. ही गढी म्हणजे एक छोटेखानी किल्लाच आहे. या गढीवरून गाविलगड किल्ल्यातील २१ घुमटांची मोठी मस्जिद स्पष्टपणे दिसते. या मस्जिद समोर असलेल्या कालभैरव तोफेचा मारा या गढीवर असल्याचे सांगितल्या जाते. किल्ल्यावरून बघितले असता, हे गाव बरोबर या तोफेच्या दिशेने वसलेले आहे. या गढीच्या भिंती किंवा परकोट पांच ते १० फुट रुंद असून त्याची उंची सुमारे ३० फुटापर्यंत आहे. या भिंतीवरून अख्खी बैलगाडी चालायची असे येथील लोक सांगतात. ही गढी किमान ३०० वर्षे तरी जुनी असावी आणि ती ब्रिटीश काळापर्यंत वापरात होती. १९२० च्या प्लेगच्या साथीत ही गढी रिकामी झाली तेव्हापासून ती ढासळन्यास सुरुवात झाली असावी. सध्या गढीचे बुरुज शिल्लक असून दक्षिण व पूर्व दिशेकडील परकोट सुद्धा उभे आहेत, इतर बाजूकडील भिंती मात्र मध्ये मध्ये ढासळल्या आहेत. गढीच्या सुरक्षेच्या दृष्टीने भोवताल खंदक होते, गावातील लोक त्यास धाय म्हणतात. बुरुज आणि परकोटात माऱ्याच्या जागा दिसून येतात. गढीच्या आतमध्ये मधोमध एक विहिर आणि एका बाजूला हत्ती पाग व घोड पाग होत्या असे स्थानिक लोक सांगतात. या गढी बाबतचा फारसा इतिहास उपलब्ध नाही मात्र या बाबतचा ताम्रपट येथील वारसांकडे असल्याचे समजते. आज ही गढी मोडकळीस आली असून तिकडे फारसे कुणी फिरकत सुद्धा नाही. चिखलदरा किंवा गाविलगड बघण्यास जातांना ही गढी आपण सहज बघू शकता. धन्यवाद

No comments:

Post a Comment