Followers

Wednesday, 27 May 2020

शिवरायांच्या अभिनव दुर्गशास्त्रातील प्रयोग भाग 2

शिवरायांच्या अभिनव दुर्गशास्त्रातील प्रयोग
भाग 2

Inside of Raigad fort | my journey
लेखनसिमा.
श्री शिवसेवेशी तत्पर तुषार भोर निरंतर. अध्यक्ष सखा सह्याद्री गिर्यारोहक पुणे.

छत्रपती शिवरायांनी वयाच्या 15 / 16 व्या वर्षी दुर्गबांधणीमध्ये लक्ष घातल्याचे दिसते. त्यापैकी राजगड, रायगड आणि प्रतापगड हे विशेष. यांत राजगडावरील बांधकाम थक्क करणारे आहे. सुवेळा आणि संजीवनी माचीचे बांधकाम पहिले कि एखादा दुर्गवेडा अवाक झाल्याशिवाय राहत नाही. कारण राजगड माच्यांवरील दुहेरी नाळेची तटबंदी आणि एकापेक्षा एक बुरुजांना चिलखती आवरणाचे कोंदण डोंगराच्या चिंचोळ्या धारेवर बांधून काढणे म्हणजे सिव्हिल इंजिनीअरिंगचा अदभूत चमत्कारच म्हणावा लागेल! इतकी बेलाग आणि भक्कम बांधणी की मुख्य दुर्ग सोडल्यास संजीवनी आणि सुवेळा माची हे स्वतंत्र दुर्ग ठरतील इतके वैशिष्ट्यपूर्ण. कधी विचार केलाय दुहेरी नाळेचा उपयोग कशासाठी असेल? मूळात तटबंदी असताना दुहेरी तटबंदी कशासाठी? यातच महाराजांचे वेगळेपण दिसून येते. समजा तटबंदी पाशी युद्ध सुरु आहे आणि तोफेच्या गोळ्यांनी पहिले आवरण भेदले गेल्यास दुसरे आवरण असल्यामुळे ती तटबंदी सुरक्षित राहते तसेच त्या पडलेल्या नाळेत सैनिकांनी शिरकाव केल्यास ती एक फसवी वाट असते ज्यामुळे वर असलेला मावळा शत्रूवर तापलेले तेल, विस्तू, दगड किंवा भाल्याच्या साहाय्याने त्यांस जखमी करू शकत असे.
#चिलखती बुरुज
शिवरायांच्या आगोदर ज्या काही किल्ल्यांचे बांधकाम झाले त्यांत अशा पद्धतीच्या बुरुजाचे बांधकाम दिसत नाही. चिलखती बुरुज म्हणजे बुरुजांभोवती दुहेरी आवरण त्यामुळे तोफ गोळ्यांच्या माऱ्या पासून (बुलेटप्रुफ जॅकेट सारखे ) बुरुजास दुहेरी संरक्षण मिळते.
# तटबंदीच्या विपरीत महाद्वाराकडे उजवीकडे नेणारी वाट
महाराजांनी बांधलेल्या प्रत्येक किल्ल्याची महादरवाज्याची वाट तटबंदीच्या उजवीकडे का असते ?
उदाहरण म्हणून प्रतापगड घेतल्यास गडावर जाताना जेव्हा आपण तटबंदीच्या खालून निघतो त्यावेळी आपणांस लक्षात येते की, तटबंदी आपल्या उजवीकडे राहते आणि आपण आपल्या डाव्या दिशेला असणाऱ्या महाद्वाराकडे जातो. अशा अवस्थेत शिवकाळात शत्रूने दरवाज्यावर आक्रमण केल्यावर 99 टक्के उजव्या हाताचा वापर करणारे सैनिक जेव्हा डाव्या हातात ढाल घेऊन पुढे जात असतील त्यावेळेस उजव्या बाजूने तटबंदीवरुन मावळ्यांकडून होणारा हल्ला बाण, ठासणीच्या गोळ्या, गोफणीचे दगड, भाले इत्यादी जर अडवायचे असेल तर उजव्या हातात आक्रमण करण्यासाठी धरलेली तलवार कुचकामी ठरते अशा वेळेस त्यांस डाव्या हातात बांधलेली ढाल सोडून उजव्या हातात बांधावी लागते आणि ह्या गोंधळात समोरून शत्रू आलाच तर मग उजव्या हाताने तलवार बाजी करणाऱ्या सैनिकाला डाव्या हाताने तलवार चालवता कशी येणार? आणि या गोंधळात तो सैनिक मारला जाऊ शकतो. अशाप्रकारचा दूर दृष्टिकोन महाराजांनी पहिला होता.
#गोमुखी द्वार
महाद्वार किंवा इतर दरवाजे महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यात गोमुखी रचनेचे असतात. याला कोणतेही धार्मिक कारण नसून अशा प्रकाराच्या रचनेमुळे द्वार भेदणे शत्रूस अवघड जावे हा यामागील रचनेचा हेतू असतो.
अशा प्रकारच्या रचना असलेले द्वार पाहिल्यास असे लक्षात येते कि द्वार फोडण्यासाठी पूर्वी युद्धात हत्तीचा वापर केला जायचा परंतु गोमुखी द्वाराची सुरुवातच 90 अंशात वळवलेली वाट असते.द्वार फोडण्यासाठी हत्तीला किंवा ओंडका घेऊन येणाऱ्या माणसाला सरळ रेषेत मार्गक्रमण करावे लागते आणि अशाप्रकारच्या रचनेत ते शक्य होत नाही त्यामुळे द्वार अभेद्य बनते.

शिवरायांच्या अभिनव दुर्गशास्त्रातील प्रयोग भाग १

शिवरायांच्या अभिनव दुर्गशास्त्रातील प्रयोग
भाग १
लेखनसिमा. श्री शिवसेवेशी तत्पर तुषार भोर निरंतर. अध्यक्ष सखा सह्याद्री गिर्यारोहक पुणे.

आज आपण शिवरायांच्या अभिनव दुर्गशास्त्राबद्दल   जाणून घेणार आहोत. "हजरतीस तीनशे साठ किल्ले आहेत" असे उद्गार महाराजांनी काढल्याचा उल्लेख इतिहासातून मिळतो. वरील वाक्य किती समर्पक होते याचा प्रत्यय नंतर काही वर्षांत आला सुद्धा! महाराजांना माहित होते दिल्लीपती आलमगीरसोबत मराठ्यांना एक ना एक दिवस अंतिम युद्ध निकराने लढावेच लागेल आणि त्यावेळेस एक एक किल्ला जर एक एक वर्ष लढवला तर तर तीनशे साठ किल्ले मिळविण्यास  औरंगजेबास 360 वर्षे लागतील.  म्हणजे सर्वार्थाने दख्खन मधील राज्य जिंकायचं तर गडकोट जिंकण्याशिवाय त्यांस पर्याय नाही. शिवरायांच्या पश्चात औरंगजेब जेव्हा स्वराज्य गिळंकृत करण्यास आला तेव्हा त्याच्या एका धडकेत आदिलशाही आणि कुतुबशाही जमीनदोस्त झाली पण काही वर्षांपूर्वी उभे  राहिलेले आणि गरीब मावळ्यांच्या रक्तावर पोसलेले स्वराज्य काही त्यांस मिटवता आले नाही. स्वराज्य बाटवायला आलेल्या धर्मांध औरंगजेबास  शेवटी याच मातीत चिररनिद्रा घ्यावी लागली.यातूनच गड कोटांचे महत्व अधोरेखित होते. महाराजांच्या इतका दुर्गप्रेमी नाहीच!  म्हणतात ना महाराज जन्मले गडावर, महाराज रांगले किल्ल्यावर, महाराजांनी स्वराज्य निर्माण केले गडांच्या मदतीने, महाराजांनी राजकारण केले ते सुद्धा गडावरून आणि शेवटी महाराजांनी शेवटचा श्वास घेतला तोही गडावरच. म्हणूनच महाराजांच्या व्यक्तिमत्वापासून गडकोट वेगळे होऊच शकत नाही. महाराजांनी आपल्या हयातीत 20 ते 25 किल्लेच बांधले पण प्रत्येक किल्ला महाराजांच्या अभिनव शास्त्राचा प्रयोगच म्हणावा लागेल म्हणून तर लेखाला नाव सुद्धा  "महाराजांचे दुर्गशास्त्रातील अभिनव प्रयोग" असे दिले आहे. यांत अगदी स्वराज्याच्या सुरुवातीला बांधलेला आणि प्रथम राजधानीचा मान असलेला राजगड असो अथवा द्वितीय राजधानी असलेला रायगड असो. दोन्हीही एकमेकांपेक्षा वेगळे आणि सरस. राजगड पहिला तर भुजंगाच्या चाली सारखा नागमोडी तर रायगड शेषाच्या फण्यासारखा दिमाखदार. म्हणूनच महाराजांनी बांधलेला प्रत्येक किल्ला एका दुर्गवेड्या चित्रकाराच्या कुंचल्याच्या  किमयेचे प्रतिकच वाटतो. खरं म्हणजे प्रत्येक दुर्गभ्रमराला सह्याद्रीमध्ये भटकताना काही प्रश्न जरूर पडतात. जसे - #  महाराजांनी बांधलेल्या द्वाराला गोमुखी द्वार असे का म्हणतात? # महाराजांनी बांधलेल्या बहुतेक किल्ल्याचे द्वार उजवीकडे व तटबंदी डावीकडे का? # काही तटबंदीवर दुहेरी नाळ कशासाठी बांधलेली आहे? # तटबंदी जवळ एखादे शस्त्र कोठार काढायचे सोडून पाण्याच्या टाक्या का? # काही तटबंदींना चुना, शिसे न वापरता फक्त दगडावर दगड रचलेत ते का बरे? असे किती तरी प्रश्न पडतात आणि ह्या प्रश्नांची उत्तरे जो तो आपल्या परीने महाराजांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये किंवा दृष्टिकोनातून शोधायचा प्रयत्न देखील करतो. परंतु याचे उत्तरमला सापडले दुर्गमहर्षी प्रा. श्री. घाणेकरांच्या एका व्याख्यानात आणि त्यांच्या " महाराजांचे दुर्गविज्ञान " या लिखित पुस्तकातून  मग त्या अनुषंगाने जेव्हा त्याचा शोध  घेतला तेव्हा महाराजांचा  विज्ञानवादी दृष्टिकोन समोर आला तोच तुम्हां वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही येथे करत आहोत.

महाराष्ट्राचे दुर्गवैभव :संक्षिप्त इतिहास व महत्व भाग 3

महाराष्ट्राचे दुर्गवैभव :संक्षिप्त इतिहास व महत्व
भाग 3

महाराष्ट्रातील किल्ले : जिवंत ...
लेखनसिमा.
श्री शिवसेवेशी तत्पर तुषार भोर निरंतर. अध्यक्ष सखा सह्याद्री गिर्यारोहक पुणे.
2000 वर्षांच्या इतिहासाचा मागोवा घेतल्यास आपणास असे दिसेल की प्रत्येक शासनकर्त्यांनी आप आपल्या कारकिर्दीत किल्ले बांधले परंतु छत्रपती शिवरायांसारखे किल्ले बांधणीतले तंत्रज्ञान खरंच थक्क करणारे आहे. शिवरायांसारखा दुर्गवेडा इतिहासात शोधून सुद्धा सापडणार नाही. खरं म्हणजे महाराजांच्या व्यक्तिमत्वापासून किल्ले कधी वेगळे होऊच शकत नाही. खऱ्या अर्थाने शिवरायांच्या काळात दुर्गाना श्रीमंती लाभली आणि त्यांचे महत्व जाणले ते फक्त त्या कल्याणकारी राजानेच. दुर्गबांधणीतले महाराजांचे ज्ञान हे फक्त ज्ञान नसून महाराजांच्या अचाट बुद्धीचे विज्ञान होते,याचा प्रत्यय गडावर गेल्यावर येतोही.
आज समाज बदलत आहे .युद्धाची परिभाषा बदलली आहे. त्यामुळे विमानाचा शोध लागल्या बरोबर किल्ल्याचे महत्व युद्धाच्या दृष्टिकोनातून कमी झाले आहे. तरीही आपल्या पराक्रमी वैभवशाली इतिहासाची ग्वाही देणारे किल्ले आज पडक्या आणि विदीर्ण अवस्थेत आहेत.
असे म्हटले जाते की उत्तरेकडील दुर्ग दक्षिणेतील दुर्गांपेक्षा पाहण्यास उत्कृष्ट आहेत, त्यांनी फार सुंदर रीतीने जतन केलेत. परंतु असा शेलका उपदेश देणाऱ्या लोकांना मी विचारेन की परकीय आक्रमकांविरुद्ध माना तुकविणाऱ्या उत्तरेकडील सत्ताधिशांना महाराष्ट्रातील किल्ल्यांचा रोमहर्षक लढा तो काय कळणार?
आजही इथल्या किल्ल्यांच्या पडक्या वाटांवर
तोफगोळ्यांचा माराच्या खुणा सहजच लक्षात येतात. यावरूनच उत्तरेकडील किल्ल्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील दुर्गांचा लढा खऱ्या अर्थाने नोंद घेण्यासारखा आहे. हाच इतिहास पुढच्या पिढीला सांगायचा असेल तर गड संवर्धनाबरोबरच गड संशोधन सुद्धा झालेच पाहिजे.
खरे तर इतिहास हा विषयच मुळात खूप कमी लोकांना आवडणारा समजला जातो.त्याबद्दल समाजात प्रेम निर्माण होणे गरजेचे आहे. आज महाराजांना देवाच्या कोनाड्यात बसवून त्यांच्यावर स्तुतीसुमने वाहणारे असंख्य व्याख्याते महाराष्ट्रात आहेत परंतु खऱ्या अर्थाने महाराजांना माणूस म्हणून जाणणे आवश्यक आहे.आजच्या पिढीला महाराजांचे विचार फक्त ऐकून समजणार नाहीत. त्यासाठी दुर्ग नावाचा आविष्कार आणि त्यायोगे ह्या श्रीमानयोग्याने अवघ्या 35 वर्षांत उभं केलेलं साम्राज्य समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठीच
दुर्ग स्थापत्य, दुर्ग निर्मितीतील महाराजांचे विचार, महाराजांची दुर्गबांधणीतील वैशिष्ट्ये याकडे लक्ष दिले पाहिजे.
किल्ल्यावरील विविध वास्तू व बांधकामे, पाणीपुरवठा आणि साठवणूक करण्याच्या पद्धती.
तत्कालीन शौचालये आणि मलविसर्जनाची विल्हेवाट लावण्याच्या उपाययोजना . इत्यादी अनेक गोष्टींचा सुक्ष्म अभ्यास तरुणांनी केला पाहिजे. कारण आपल्या पूर्वजांनी अक्षरशः रक्ताचा सडा पाडून ही अस्मिता निर्मिली व रक्षिली .ती आता आपणच जपली पाहिजे. ती विसरता कामा नये. म्हणून तर गडकिल्ले हे फक्त गडकिल्ले नाहीत तर खऱ्या अर्थाने धारातीर्थे आहेत.

महाराष्ट्राचे दुर्गवैभव :संक्षिप्त इतिहास व महत्व भाग 2

महाराष्ट्राचे दुर्गवैभव :संक्षिप्त इतिहास व महत्व
भाग 2

लेखनसिमा.
श्री शिवसेवेशी तत्पर तुषार भोर निरंतर. अध्यक्ष सखा सह्याद्री गिर्यारोहक पुणे.

महाराष्ट्राच्या पूर्व भागात डेक्कन ट्रॅप जिथे संपतो तिथेच गोंडवनाचा भाग सुरू होतो. गडचिरोली, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा ही पूर्वेकडील जिल्हे यांत येतात आणि आणि याच भागावर गोंड घराण्यातील दोन शासकांनी राज्य केले.हे राज्य साधारण 18 व्या शतकाच्या मध्यापर्यंत हे राज्य होते. त्यांपैकी छिंदवाडा जिल्ह्यातील देवगड चे गोंड आणि चंद्रपूर चे गोंड राजे.
त्यानंतर यादवांनी आपले महाराष्ट्रभर राज्य पसरवून संभाजीनगर येथील देवगिरी ह्या किल्ल्याला राजधानी चा मान दिला, यादवांच्या काळात सुद्धा महाराष्ट्रात धार्मिक आणि आर्थिक स्थैर्य नांदत होते. परंतु काळाचा आघात इतका जबरदस्त होता कि ह्या महाराष्ट्र भूमीवर प्रथम पाऊल परकीय राजवटीचे पडले ते म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीच्या रूपात आणि त्यानंतर महाराष्ट्रात बहमनी राजवटीचा उदय झाला.
यातूनच पाच नव्या शाह्या या देवभूमीत उभ्या राहिल्या:
1)नगरची निजामशाही
2)विजापूरची आदिलशाही
3)बीदरची बरीदशाही
4)वऱ्हाडची इमादशाही
आणि
5)खानदेशची फारुखशाही.
पण ह्या सर्वांना आणि समस्त पातशाह्यांना पुरून उरणारे आले ते मराठे!
छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या पिंडीसमोर शपथ घेऊन सह्याद्रीच्या मावळखोरीत राहणाऱ्या मावळ्यांना "हे राज्य व्हावे ये तो श्रींची इच्छा " हा मंत्र देऊन एका जहागिरीचे रूपांतर एकसंध स्वराज्यात केले.
तर अशा प्रकारे एत्तदेशीय स्वकीयांनी तर या महाराष्ट्र भूमीवर राज्य केलेच परंतु परकीयांनी सुद्धा राज्य केले. यथावकाश आपल्या गरजेनुसार किल्ले सुद्धा बांधले अगदी व्यापारासाठी भारतात आलेले इंग्रज, डच, पोर्तुगीज यांनी सुद्धा गरजेनुसार आपल्या सोयीने सुरुवातीला व्यापारासाठी नंतर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी किल्ले बांधले. यांत पोर्तुगीजांनी बांधलेले वसई, रेवदंडा, माहिमचा किल्ला, कोर्लई यांसारखे तर इंग्रजांनी सेंट जॉर्ज फोर्ट यासारखे लहान मोठे किल्ले बघायला मिळतात.
मुस्लिम पातशाहाच्या पदरी नोकरीसाठी आलेले आफ्रिकन, अबेसिनियन (त्यांस हबशी सुद्धा म्हणतात).
त्यांपैकी सिद्दी समाजाच्या लोकांनी सुद्धा जंजिरा, उंदेरी यांसारखे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर किल्ले बांधून महाराष्ट्राच्या इतिहासात भर घातली आहे. म्हणून तर महाराष्ट्रा इतकी नाविन्यता किंवा किल्ले बांधणीतली भिन्नता जगाच्या पाठीवर कुठेच मिळत नाही.

महाराष्ट्राचे दुर्गवैभव :संक्षिप्त इतिहास व महत्व भाग १

महाराष्ट्राचे दुर्गवैभव :संक्षिप्त इतिहास व महत्व

भाग १

लेखनसिमा.

श्री शिवसेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर.
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.

राकट देशा, पवित्र देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा!"

ह्या प्रसिद्ध अशा कवितेतील ओळीतून गोविंदाग्रजांनी अतिशय समर्पकपणे सह्याद्री आणि महाराष्ट्राचे वर्णन केले आहे.'राकट देशा दगडांच्या देशा' ही वरील उपमा सह्याद्रीला आणि सह्याद्रीत राहणाऱ्या मावळ्यांना लागू होते.
तसं पाहिलं तर त्या त्या भागातील भूगोलाचा आणि नैसर्गिक जैवविविधतेचा त्या त्या भागातील इतिहासाशी परस्पर संबंध असतो. ह्याच भौगोलिक परिस्थितीमुळे त्या भागातील स्वभाव वैशिष्ट्य ठरते. त्यामुळेच राकट दगडांचा असलेला हा महाराष्ट्र देश राकट, कणखर, चिवट स्वभावाच्या लोकांचा आहे.
ह्या महाराष्ट्राच्या खोलात दडलाय हा इतिहास. जवळजवळ दोन हजार वर्षांचा इतिहास आहे हा आणि ह्या इतिहासाचा मागोवा घ्यायचा असेल तर गडकिल्ले ह्यासारखे दुसरे विश्वासाचे साधन नाही.
ह्या पवित्र भूमीतील सर्वांत जुने शासक म्हणजेच सातवाहन किंवा त्यांस दक्षिणापथवती सातवाहन असे सुद्धा म्हटले जाते. सातवाहन घराण्याने जवळ जवळ 500 वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले. ह्या दरम्यान महाराष्ट्राला आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक स्थैर्य सातवाहन कालीन पराक्रमी राजांनी दिले.
तिसऱ्या शतकाच्या मध्यावर वाकाटकांचे राज्य विदर्भात आले. जवळ जवळ 250 वर्षे हे राज्य टिकले. इसवीसनाच्या सहाव्या शतकाच्या सुरुवातीला चालुक्य घराण्याचा उदय झाला.चालुक्यांचा पराभव करून राष्ट्रकूटांनी त्यांची 200 वर्षांची सत्ता संपुष्ठात आणली. राष्ट्रकूटांनी 8 व्या शतकापासून ते 9 व्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले.
साधारण 8 व्या शतकात महाराष्ट्रातील काही पश्चिम भागावर शिलाहार वंशीय घराण्याचे राज्य होते. हे शिलाहार राज्य तीन भागात विभागले होते. त्यापैकी पहिली शाखा मुंबई, रायगड आणि ठाणे हे जिल्हे तर दुसरी शाखा रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोवा यांची राजधानी वलीपट्टण म्हणजेच रत्नागिरी येथील खारेपाटण आणि तिसरी शाखा सातारा, कऱ्हाड, कोल्हापूर आणि बेळगाव त्यांची राजधानी वडिवळे म्हणजे राधानगरी ही होय. पन्हाळा हा किल्ला शिलाहार वंशीय राजांनी बांधला आहे.रायगढ़ - विकिपीडिया

दुर्गांची प्रमुख अंगे भाग 5

दुर्गांची प्रमुख अंगे

भाग 5एका रानवेड्याची शोधयात्रा: 2011-04-17

लेखनसिमा.....

श्री शिवसेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर.
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.

🚩किल्ल्याचे द्वार व प्रकार 🚩

आता जर एखादा किल्ला स्थलदुर्ग किंवा राजधानीचा असेल तर खालील गोष्टींचा सुद्धा बांधकाम करताना विचार केला जातो.

तट बांधून झाल्यावर पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर सम प्रमाणात रस्ते आखून एका चौकात मिळतील अशी योजना केली जाते. नगरातील सामान्य रस्ते 15 फुटी तर राजमार्ग, छावणीकडे जाण्याचा मार्ग, बाजार मार्ग 20 फुटी असतात. बाजार हा उंच ओट्यावर असावा म्हणजे एखादा शिलेदार घोड्यावर बसून खरीदारी करू शकेन. उदा.रायगडवरील बाजार. होम हवन आणि मंदिरासाठी शांत जंगलयुक्त जागा निवडावी. राजवाडा हा किल्ल्यातील मध्यभागी असावा, राजाच्या अष्टप्रधान मंत्र्यांचे वाडे राजवाड्याशेजारी असावेत.

कारभाऱ्यांनी घरे त्यांच्या हुद्दयानुसार असावीत.

तर अशा प्रकारे किल्ल्यातील महत्वाची बांधकामे कशी असावीत आणि शास्त्रात उल्लेख केलेले प्रकार येथे सांगितले.

याव्यतिरिक्त महाभारतीय ग्रंथात किल्ल्यात आवश्यक सामग्री कोणत्या प्रकारची असावी याचे संक्षिप्त वर्णन पुढील प्रमाणे

*किल्ल्यात उत्कृष्ट कारागिरांचे वास्तव्य असावे

*धनधान्याचा विपुल साठा असावा. उदा : शिवनेरी किल्ल्याला जॉन फ्रॉयर याने 1676 ला भेट दिली होती. त्यावेळी त्याने असे लिहून ठेवले कि 1000 लोकांना 7 वर्षे पुरेल इतके धान्य इथल्या अंबरखान्यात आहे.

* अठरा कारखाने 12 महाल आणि बाजारबुणगे असावेत.

* सर्वप्रकारच्या धातूंचा संचय असावा.

* सर्व प्रकारच्या औषधी वनस्पतीची साठवणूक असावी.

* सडलेल्या तुपाच्या विहिरींची सोय असावी .

* तलाव, पाण्याचा विपुल साठा असावा .

* प्रकांड पंडित आणि ज्ञानी लोकांचा भरणा

असावा.

* भिकारी, कुचकामी, व्यसनी लोकं नसावीत.

* सर्वांत महत्वाचे किल्ल्यासारखीच भक्कम, शूर-वीर आणि अभेद्य माणसे तयार करावीत कारण किल्ला लढवता येतो त्या किल्ल्यातील भक्कम मनाच्या माणसांमुळेच.

दुर्गांची प्रमुख अंगे भाग 4

दुर्गांची प्रमुख अंगे

भाग 4सह्याद्रीची धारातिर्थे ...

लेखनसिमा.....

श्री शिवसेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर.
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.

🚩किल्ल्याचे द्वार व प्रकार 🚩

दुर्गसुरक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे अंग म्हणजे द्वार. प्रामुख्याने द्वाराचे अनेक प्रकार पडतात. महादरवाजा, बिनीचा दरवाजा, चोर दरवाजा, हत्ती दरवाजा इत्यादी.यात हत्ती दरवाजा आणि महादरवाज्याची उंची भरपूर असते.जवळजवळ राजा हत्तीवरील अंबारीत बसून प्रवेश करू शकेल इतक्या उंचीचा महादरवाजा बनवलेला असतो.

किल्ल्यावर असलेल्या द्वाराच्या संख्येवर किल्ल्याची संरक्षण व्यवस्था अवलंबून असते. उदा. शिवनेरी किल्ल्यावरील सात वेगवेगळ्या दरवाजांमुळे हा किल्ला लढाईच्या दृष्टीने अभेद्य बनला आहे. द्वाराचे बांधकाम करताना जी शिला वापरली जाते प्रामुख्याने तिचे उपयोगितेच्या तसेच गुणधर्माच्या दृष्टीने तीन प्रकार पडतात. प्रथम पुंशीला, ही शीला अतिशय टणकअसते व यापासून बनवलेले द्वार हे सर्वात जास्त टिकणारे असते जवळ-जवळ ह्या शीलेपासून बनवलेले महाद्वार टिकाऊ असतें आणि सहजा सहजी पडत नाही . पाषाणावर पाषाण आपटल्यावर घंटे सारखा नाद जर त्या शिळेतून आल्यास त्यांस 'पुंशीला' म्हणतात. द्वितीय प्रकारास 'स्त्रीशिला' असे म्हणतात हिच्या पाषाणातून सामान्य पाषाणासारखा आवाज येतो. तिसऱ्या प्रकारच्या शिळा म्हणजे नपुंसक शिळा . ह्या शिळेच्या पाषाणातून कास्यासारखा आवाज येतो .त्यांस 'नपुंसक शिळा' असे म्हणतात. तर अशा प्रकारच्या शिळांचा वापर करून पूर्वीचे महाद्वार बांधले जायचे. महाद्वारावर वेगवेगळी चित्रे अथवा शिल्प कोरलेली असतात. यांत शत्रूला भय वाटावे म्हणून भद्रमुख कोरण्यात येई तर काही ठिकाणी द्वारांवर गजान्त लक्ष्मी काही ठिकाणी सिंह तर काही ठिकाणी व्याघ्रेश्वर कोरण्यात येई कारण द्वारावर कोरण्यात येणाऱ्या नक्षी वरून तो किल्ला कुठल्या राजाने अथवा कुठल्या काळात बांधला याचा अचूक अंदाज येतो.

किल्ल्याचे द्वार हे संध्याकाळी सूर्यास्ताला बंद करून सकाळी सूर्योदयाला उघडतात. तसें पहिले तर प्रत्येक द्वाराचे स्वतंत्र कार्य अथवा उपयोग असतो. उदा. चोर दरवाजा अथवा गुप्त द्वाराचा उपयोग संकटं काळी अथवा गुप्तहेर करतात. बिनीचा दरवाजा वर बिनीची म्हणजेच आघाडीची पथके ठेवलेली असतात तसेच किल्ल्यावरील महत्वाचा दरवाजा म्हणून त्यांस ओळखतात.