शिवरायांच्या अभिनव दुर्गशास्त्रातील प्रयोग
भाग 2
लेखनसिमा.
श्री शिवसेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर.
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.
छत्रपती शिवरायांनी वयाच्या 15 / 16 व्या वर्षी दुर्गबांधणीमध्ये लक्ष घातल्याचे दिसते. त्यापैकी राजगड, रायगड आणि प्रतापगड हे विशेष. यांत राजगडावरील बांधकाम थक्क करणारे आहे. सुवेळा आणि संजीवनी माचीचे बांधकाम पहिले कि एखादा दुर्गवेडा अवाक झाल्याशिवाय राहत नाही. कारण राजगड माच्यांवरील दुहेरी नाळेची तटबंदी आणि एकापेक्षा एक बुरुजांना चिलखती आवरणाचे कोंदण डोंगराच्या चिंचोळ्या धारेवर बांधून काढणे म्हणजे सिव्हिल इंजिनीअरिंगचा अदभूत चमत्कारच म्हणावा लागेल! इतकी बेलाग आणि भक्कम बांधणी की मुख्य दुर्ग सोडल्यास संजीवनी आणि सुवेळा माची हे स्वतंत्र दुर्ग ठरतील इतके वैशिष्ट्यपूर्ण. कधी विचार केलाय दुहेरी नाळेचा उपयोग कशासाठी असेल? मूळात तटबंदी असताना दुहेरी तटबंदी कशासाठी? यातच महाराजांचे वेगळेपण दिसून येते. समजा तटबंदी पाशी युद्ध सुरु आहे आणि तोफेच्या गोळ्यांनी पहिले आवरण भेदले गेल्यास दुसरे आवरण असल्यामुळे ती तटबंदी सुरक्षित राहते तसेच त्या पडलेल्या नाळेत सैनिकांनी शिरकाव केल्यास ती एक फसवी वाट असते ज्यामुळे वर असलेला मावळा शत्रूवर तापलेले तेल, विस्तू, दगड किंवा भाल्याच्या साहाय्याने त्यांस जखमी करू शकत असे.
#चिलखती बुरुज
शिवरायांच्या आगोदर ज्या काही किल्ल्यांचे बांधकाम झाले त्यांत अशा पद्धतीच्या बुरुजाचे बांधकाम दिसत नाही. चिलखती बुरुज म्हणजे बुरुजांभोवती दुहेरी आवरण त्यामुळे तोफ गोळ्यांच्या माऱ्या पासून (बुलेटप्रुफ जॅकेट सारखे ) बुरुजास दुहेरी संरक्षण मिळते.
# तटबंदीच्या विपरीत महाद्वाराकडे उजवीकडे नेणारी वाट
महाराजांनी बांधलेल्या प्रत्येक किल्ल्याची महादरवाज्याची वाट तटबंदीच्या उजवीकडे का असते ?
उदाहरण म्हणून प्रतापगड घेतल्यास गडावर जाताना जेव्हा आपण तटबंदीच्या खालून निघतो त्यावेळी आपणांस लक्षात येते की, तटबंदी आपल्या उजवीकडे राहते आणि आपण आपल्या डाव्या दिशेला असणाऱ्या महाद्वाराकडे जातो. अशा अवस्थेत शिवकाळात शत्रूने दरवाज्यावर आक्रमण केल्यावर 99 टक्के उजव्या हाताचा वापर करणारे सैनिक जेव्हा डाव्या हातात ढाल घेऊन पुढे जात असतील त्यावेळेस उजव्या बाजूने तटबंदीवरुन मावळ्यांकडून होणारा हल्ला बाण, ठासणीच्या गोळ्या, गोफणीचे दगड, भाले इत्यादी जर अडवायचे असेल तर उजव्या हातात आक्रमण करण्यासाठी धरलेली तलवार कुचकामी ठरते अशा वेळेस त्यांस डाव्या हातात बांधलेली ढाल सोडून उजव्या हातात बांधावी लागते आणि ह्या गोंधळात समोरून शत्रू आलाच तर मग उजव्या हाताने तलवार बाजी करणाऱ्या सैनिकाला डाव्या हाताने तलवार चालवता कशी येणार? आणि या गोंधळात तो सैनिक मारला जाऊ शकतो. अशाप्रकारचा दूर दृष्टिकोन महाराजांनी पहिला होता.
#गोमुखी द्वार
महाद्वार किंवा इतर दरवाजे महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यात गोमुखी रचनेचे असतात. याला कोणतेही धार्मिक कारण नसून अशा प्रकाराच्या रचनेमुळे द्वार भेदणे शत्रूस अवघड जावे हा यामागील रचनेचा हेतू असतो.
अशा प्रकारच्या रचना असलेले द्वार पाहिल्यास असे लक्षात येते कि द्वार फोडण्यासाठी पूर्वी युद्धात हत्तीचा वापर केला जायचा परंतु गोमुखी द्वाराची सुरुवातच 90 अंशात वळवलेली वाट असते.द्वार फोडण्यासाठी हत्तीला किंवा ओंडका घेऊन येणाऱ्या माणसाला सरळ रेषेत मार्गक्रमण करावे लागते आणि अशाप्रकारच्या रचनेत ते शक्य होत नाही त्यामुळे द्वार अभेद्य बनते.
No comments:
Post a Comment