Followers

Wednesday, 27 May 2020

महाराष्ट्राचे दुर्गवैभव :संक्षिप्त इतिहास व महत्व भाग 3

महाराष्ट्राचे दुर्गवैभव :संक्षिप्त इतिहास व महत्व
भाग 3

महाराष्ट्रातील किल्ले : जिवंत ...
लेखनसिमा.
श्री शिवसेवेशी तत्पर तुषार भोर निरंतर. अध्यक्ष सखा सह्याद्री गिर्यारोहक पुणे.
2000 वर्षांच्या इतिहासाचा मागोवा घेतल्यास आपणास असे दिसेल की प्रत्येक शासनकर्त्यांनी आप आपल्या कारकिर्दीत किल्ले बांधले परंतु छत्रपती शिवरायांसारखे किल्ले बांधणीतले तंत्रज्ञान खरंच थक्क करणारे आहे. शिवरायांसारखा दुर्गवेडा इतिहासात शोधून सुद्धा सापडणार नाही. खरं म्हणजे महाराजांच्या व्यक्तिमत्वापासून किल्ले कधी वेगळे होऊच शकत नाही. खऱ्या अर्थाने शिवरायांच्या काळात दुर्गाना श्रीमंती लाभली आणि त्यांचे महत्व जाणले ते फक्त त्या कल्याणकारी राजानेच. दुर्गबांधणीतले महाराजांचे ज्ञान हे फक्त ज्ञान नसून महाराजांच्या अचाट बुद्धीचे विज्ञान होते,याचा प्रत्यय गडावर गेल्यावर येतोही.
आज समाज बदलत आहे .युद्धाची परिभाषा बदलली आहे. त्यामुळे विमानाचा शोध लागल्या बरोबर किल्ल्याचे महत्व युद्धाच्या दृष्टिकोनातून कमी झाले आहे. तरीही आपल्या पराक्रमी वैभवशाली इतिहासाची ग्वाही देणारे किल्ले आज पडक्या आणि विदीर्ण अवस्थेत आहेत.
असे म्हटले जाते की उत्तरेकडील दुर्ग दक्षिणेतील दुर्गांपेक्षा पाहण्यास उत्कृष्ट आहेत, त्यांनी फार सुंदर रीतीने जतन केलेत. परंतु असा शेलका उपदेश देणाऱ्या लोकांना मी विचारेन की परकीय आक्रमकांविरुद्ध माना तुकविणाऱ्या उत्तरेकडील सत्ताधिशांना महाराष्ट्रातील किल्ल्यांचा रोमहर्षक लढा तो काय कळणार?
आजही इथल्या किल्ल्यांच्या पडक्या वाटांवर
तोफगोळ्यांचा माराच्या खुणा सहजच लक्षात येतात. यावरूनच उत्तरेकडील किल्ल्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील दुर्गांचा लढा खऱ्या अर्थाने नोंद घेण्यासारखा आहे. हाच इतिहास पुढच्या पिढीला सांगायचा असेल तर गड संवर्धनाबरोबरच गड संशोधन सुद्धा झालेच पाहिजे.
खरे तर इतिहास हा विषयच मुळात खूप कमी लोकांना आवडणारा समजला जातो.त्याबद्दल समाजात प्रेम निर्माण होणे गरजेचे आहे. आज महाराजांना देवाच्या कोनाड्यात बसवून त्यांच्यावर स्तुतीसुमने वाहणारे असंख्य व्याख्याते महाराष्ट्रात आहेत परंतु खऱ्या अर्थाने महाराजांना माणूस म्हणून जाणणे आवश्यक आहे.आजच्या पिढीला महाराजांचे विचार फक्त ऐकून समजणार नाहीत. त्यासाठी दुर्ग नावाचा आविष्कार आणि त्यायोगे ह्या श्रीमानयोग्याने अवघ्या 35 वर्षांत उभं केलेलं साम्राज्य समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठीच
दुर्ग स्थापत्य, दुर्ग निर्मितीतील महाराजांचे विचार, महाराजांची दुर्गबांधणीतील वैशिष्ट्ये याकडे लक्ष दिले पाहिजे.
किल्ल्यावरील विविध वास्तू व बांधकामे, पाणीपुरवठा आणि साठवणूक करण्याच्या पद्धती.
तत्कालीन शौचालये आणि मलविसर्जनाची विल्हेवाट लावण्याच्या उपाययोजना . इत्यादी अनेक गोष्टींचा सुक्ष्म अभ्यास तरुणांनी केला पाहिजे. कारण आपल्या पूर्वजांनी अक्षरशः रक्ताचा सडा पाडून ही अस्मिता निर्मिली व रक्षिली .ती आता आपणच जपली पाहिजे. ती विसरता कामा नये. म्हणून तर गडकिल्ले हे फक्त गडकिल्ले नाहीत तर खऱ्या अर्थाने धारातीर्थे आहेत.

No comments:

Post a Comment