---------------------------------------------------------
जुन्नर - शिरोली रस्त्यावर हापुसबाग परिसरात उंचवट्यावर अंदाजे ६० फूट लांब ६० फूट रूंदीची घडीव दगडी बांधणीतील चौरसाकृती वास्तू पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेत असते. चौरसाकृती ५० फूट उंचीच्या भितीनी त्यांच्यावर ३० फूट उंचीचे , तर २५ फूट त्रिज्येचे आकर्षक घुमट तोलून धरलेले आहेत. इमारतीच्या दर्शनी बाजूच्या भितीवर दोन टप्प्यात कमानीची रचना असून दगडात घडविलेले नक्षीदार प्रवेशद्वार आणि जाळीदार खिडक्या आकर्षक आहेत. आतील बाजूवर फारशी भाषेतील मजकूर कोरलेला आहे. त्याचा अद्याप अर्थबोध झालेला नाही. आतमध्ये हबशी प्रमुखाच्या व त्याच्या कुटुंबीयाच्या ९ कबरी आहेत. इमारतीचे देखणेपण व वैभवावरून खास व्यक्तीच्या कबरीवर बांधलेले हे स्मारक कोण्या मोठ्या असामीचे किबहुना मलीक अंबरच्या कुटुंबापैकी कोणाचे स्मारक असण्याची शक्यता याबाबत वर्तवली जाते. सन १४९० च्या कालखंडात बहामनी सुलतानांचा सरदार मलीक अंबर याने जुन्नर परिसरात निजामशाही ची स्थापना केली होती. त्यानंतर वाढत्या साम्राज्याला सोयिस्कर अशा राजधानी साठी पुढे निजामशाहीची राजधानी नगरला नेण्यात आली. निजामशहाचा वजीर मलीक अंबर याचा संबंध सौदागर घुमट या वास्तूशी असल्याचे सागितले जाते.
भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने १६ लाख रूपये खर्चाचे या इमारतीच्या मजबुती करणासाठी काम केल्याचे येथील लोकानकडुन अंदाज केला जात असल्याचे समजते. ह्या वास्तूच्या संरक्षण जतनीकरणाचे काम भारतीय पुरातत्त्व विभागाने काही दिवसांपूर्वी सुरू केले होते. जवळपास ४०० वर्षे ऊन, वारा, पावसाच्या नैसर्गिक कालचक्राशी सामना करीत आजही तेवढ्याच दिमाखात उभी असलेली ही ऐतिहासीक वास्तू मजबुतीकरणाच्या कामानंतर अधिकच उजळून निघालेली आहे.
-- बापुजी ताम्हाणे, गोळेगांव - लेण्याद्री
ता. जुन्नर, जि. पुणे
मो. नं. 9730862068
No comments:
Post a Comment