Followers

Sunday, 27 December 2020

सोलापुरातील " भुईकोट किल्ला "
















 सोलापुरातील " भुईकोट किल्ला " 

सोलापूर शहरात भुईकोट प्रकारचा किल्ला आहे. हा किल्ला 'सोलापूरचा भुईकोट किल्ला' म्हणून ओळखला जातो. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक ४ डिसेंबर, इ.स. १९३० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
मध्यकालीन इतिहासामध्ये सोलापूरच्या किल्ल्याला महत्वाचे स्थान प्राप्त झाले होते. बहमनींच्या राज्याची शकले उडाल्यावर त्यातून पाच शाह्या निर्माण झाल्या. या पाच शाह्यांनी आपली वेगळी चूल मांडली. या पाचही राजवटीच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूरचे भौगोलिक स्थान होते. त्यामुळे सोलापूरचे महत्त्व वाढले.
1) इतिहास :- बाराव्या शतकात बांधलेले हा भुईकोट किल्ला सिध्देश्वर तलावाच्या काठावर वसलेला आहे. इतिहासप्रेमींनी , अभ्यासकांनी व होसी पर्यटकांनी आवर्जुन भेट द्यावी असा हा किल्ला आहे. दुसरे बाजीराव पेशवे, सातारचे छत्रपती प्रतापसिंह भोसले १८१८ मध्ये १ महिने येथे राहिले होते. माहिती नुसार सोलापूरचा किल्ला हा श्रीकांत यांनी १७१९ साली आपल्या प्रज्ञा साठी बांधला. काहींच्या मते हिंदू राजांच्या काळात बांधलेल्या या किल्ल्याभोवती महमूद गावान याने दुसरी तटबंदी बाहेरून बांधून किल्ला अभेद्य केला. महमूद गावान हा बहमनी सुलतान महंमदशाह याचा दिवाण होता.
इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार असलेला सोलापूरचा किल्ल्या अनेक राजवटीचे आश्रय स्थान होता. या ऐतिहासिक घटनांमध्ये एक गमतीशीर मजाही आहे. ती म्हणजे 'सोलापूरचा किल्ल्ला' हा लग्नामध्ये हुंडा म्हणून दिल्याची नोंद आहे. ही नोंद एकदा नाही तर दोन वेळा आहे.
अहमदनगर येथे बुऱ्हाण निजामशहा गादीवर होता. तर, विजापूर येथे इस्माईल आदिलशहा सत्तेवर होता. त्यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले होते. हे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने एक विवाह संबंध घडवून आणण्यात आला. आदिलशहाच्या कन्येला बुऱ्हाण निजामशहाला देऊन हा लग्नसमारंभ धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. हा विवाह सोलापूरच्या किल्ल्यामध्ये झाला. त्यावेळी म्हणजे, इ.स. १५२३ मध्ये हा किल्ला विजापूरच्या ताब्यात होता. जावयाला हुंडा म्हणून 'सोलापूरचा किल्ला' देण्याचे आदिलशहाने जाहीर केले होते. पण विवाहानंतर आदिलशहाने हा किल्ला देण्याचे नाकारले. त्यातून पुढे निजामशहा आणि आदिलशहा यांच्यात युद्धही झाले. या युद्धात जावई निजामशहाचा पराभव झाला. दुसऱ्यावेळी इ.स. १५५२ मध्ये अहमदनगरची राजकन्या चांदबिबी अली आदिलशहाला देण्यात आली. तर अली आदिलशहाची बहीण हदिया सुलताना हिचा विवाह मुतर्जा निजामशहाशी करण्यात आला. तेव्हा मात्र कबूल केल्याप्रमाणे निजामशहाने हा किल्ला विजापूरच्या सुलतानाला हुंडा म्हणून दिला.
सोलापूरचा किल्ला बहमनी, आदिलशाही, निजामशाही नंतर मोगल सत्तेत आला. औरंगजेबाच्या कारकिर्दीत त्याचा बराच काळ या किल्ल्याच्या परिसरात गेला. पुढे हैदराबादच्या निजामाच्या आणि नंतर मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला गेला.
सोलापूरचा भुईकोट म्हणजे तर दुर्गबांधणीतले एक बुलंद असे रूप आहे. विजापूर, बेळगाव, मिरज, बिदर, नळदुर्ग, औसा, परंडा या दुर्गशंृखलेतील हा एक जणू भक्कम बुरूजच आहे.
शहरात शिरल्याबरोबर मधोमध वसलेला हा गड आपले लक्ष वेधून घेतो. दुहेरी तटबंदी, त्याभोवती खंदक आणि खंदकानंतर पुन्हा तट, अशी चिलखती रचना असलेला हा एक भक्कम कोट! अशा या गडात शिरण्यासाठी उत्तरेकडून मूळ मार्ग होता. मात्र आज तो बंद केल्याने पश्चिमेकडील नव्या मार्गानेच गडात दाखल व्हावे लागते. पहिला तट, मग खंदक आणि त्यानंतर ती दुहेरी तटबंदी ओलांडतच आत शिरायचे. आत शिरताना भुईकोटाच्या या अजस्र रूपाचेच मनावर दडपण येत असते. ते मुस्लीम दुर्गस्थापत्यातील भरभक्कम बुरूज, त्याच्यावरचे ते आक्रमक सज्जे, मारगिरीच्या जागा हे सारे इतिहासकाळाचे दडपण वाढवते. आत गेल्या गेल्याच समोरच ब्रिटिशांच्या दोन प्रचंड आकारांच्या तोफा आपले स्वागत करतात. या तोफा पाहातच ही बुलंद वास्तू पाहण्यास सुरुवात करायची.
कोकणातून महाड मार्गे दक्षिणेत विजापूर, बिदरच्या दिशेने येणाऱ्या राजमार्गावर सोलापूर हा इतिहासकाळापासून एक महत्त्वाचा थांबा आहे. त्याच्या या महत्त्वामुळेच साधारणपणे चौदाव्या शतकात बहमनी राजवटीत सोलापुरात ही बुलंद वास्तू आकारास आली. पुढे त्यात आदिलशाही, निजामशाहीपासून ते थेट मराठय़ांपर्यंत अनेक राजवटींनी आपापल्या गरजा-सोयीनुसार बदल केले. आदिलशाही आणि निजामशाहीच्या तर अगदी सरहद्दीवर हा भुईकोट! यामुळेच या शाही फौजांमध्ये या गडावरूनच अनेकदा लढाया झाल्या. शेवटी लढाईचे मैदान ठरणारा हा किल्लाच पुढे या दोन शाही राजवटींच्या मनोमिलनाचे स्थळही ठरला! साठ वर्षांचा संघर्ष थांबवत इसवी सन १५२३मध्ये याच किल्ल्यात निजामशाह आणि आदिलशाहमध्ये मैत्रीचा तह झाला. या तहात आदिलशाहने आपली मुलगी मरिअमचा विवाह बुऱ्हाण निजामशाहशी लावला. पुढे १५५२मध्ये पुन्हा निजामशाहची कन्या चांदबिवी हिचा विवाह अली आदिलशाहबरोबर, तर आदिलशाहची कन्या हादिया सुलताना हिचा विवाह मूर्तझा निजामशाहबरोबर याच किल्ल्यात झाला. या शाही विवाहांनी तेव्हा हा किल्ला गाजला होता. पुढे दक्षिण मोहिमेवर आलेल्या औरंगजेबानेही हा किल्ला घेत काही काळ इथे मुक्काम ठोकला होता. यानंतर यथावकाश मराठय़ांचेही या किल्ल्यावर वर्चस्व प्रस्थापित झाले आणि शेवटी याच किल्ल्याने १४ जून १८१८ रोजी मराठेशाहीचा शेवटही पाहिला! गतकाळातील हा सारा घटना-घडामोडींचा इतिहास लक्षात घेतला, की हे तटबुरूजही आपल्याला सहाशे वर्षे मागे घेऊन जातात आणि मग या चिऱ्यांनाही एक अर्थ प्राप्त होतो.
या गडदर्शनासाठी आतील बाजूने चालत अगदी प्रथम उत्तरेकडील दरवाजात हजर व्हावे. आज हा मार्ग जरी बंद झालेला असला तरी दुर्गदर्शनासाठी इथूनच सुरुवात करावी. या दरवाजाच्या पुढय़ात असलेल्या खंदकावर आता काही वर्षांपर्यंत एक लाकडी काढघालीचा पूल होता. या पुलावरून या पहिल्या दरवाजात पूर्वी यावे लागे. या दरवाजातूनच आत शिरताना एक मोठा साखळदंड आणि दोन मीटर व्यासाची मोठी गोल कडी दिसते. या पहिल्या दरवाजाच्या अंगावर जागोजागी पोलादी खिळे ठोकलेले असल्याने या दरवाजाला ‘खिळा दरवाजा’ असे म्हणतात. काही वर्षांपर्यंत याच दरवाजातून गडात प्रवेश व्हायचा, पण आता हा दरवाजा बंद केलेला आहे. गोमुखी रचना, भोवताली आक्रमक बुरूज आणि आत शिरण्यासाठी मोठय़ा दरवाजाला दिंडी ठेवलेली! असा हा दरवाजा इसवी सन १८१० मध्ये दुरुस्त केल्याचा उल्लेख असलेला एक पितळी लेख या दरवाजावर होता अशी नोंद आहे. पण सध्या तो दिसत नाही. या दरवाजाच्या बाहेरील बाजूस नागबावडी नावाची एक भलीमोठी बारव आहे.
या दरवाजातून आत आलो, की एकापाठी एक दोन दरवाजे लागतात. त्यांची बांधणी- शैली बऱ्यापैकी सारखी आहे. पैकी मधल्याचे नाव ‘शहर’ किंवा ‘मधला दरवाजा’ तर त्यानंतरच्या महाकाली देवालयाजवळचा महाकाली दरवाजा! या दोन्ही दरवाजांवर मनोऱ्यांचे तोरण आहे. तटबंदीवरच्या पाकळय़ांच्या कमानी, बुरुजांवर बाहेर आलेले सज्जे आणि दरवाजावरचे हे मनोरे हे सारे मुस्लीम स्थापत्याचे खास वैशिष्टय़! या दोन्ही दरवाजांवर शरभांची शिल्पे बसवलेली आहेत. वाघ आणि घोडा किंवा बैल यांचे मिश्रण असलेला हा काल्पनिक पशू! या शरभाच्या जोडीच्या मधोमध दोन्ही दरवाजांवर फारसी लिपीतील शिलालेखही आहेत. या शिलालेखांनुसार हे दरवाजे अली आदिलशाह दुसरा याने बांधले आहेत. तिसऱ्या दरवाजातून आत जाताच देवडीवर आणखी एक फारसी शिलालेख दिसतो. गडावर असे एकूण दहा शिलालेख असून त्यापैकी सहा फारसी, तीन देवनागरी, तर एक मोडी लिपीत आहे. तीन दरवाजांच्या या मालिकेदरम्यान चौकीच्या देवडय़ा, दारूगोळय़ांची कोठारे आहेत. शिबंदीची घरे, विहिरी-आडही जागोजागी दिसतात. दुसऱ्या दरवाजाशेजारील बुरुजावरच ढालकाठीची रचना आहे.
तिसऱ्या दरवाजानंतर आपण पुन्हा गडात येतो. आतमध्ये भलेमोठे पटांगण आहे. या जागेवर कधीकाळी तीनशेहून अधिक इमारती असल्याची नोंद आहे. पण सध्या यापैकी मल्लिकार्जुन मंदिर, बत्तीस खांबांची एक प्राचीन इमारत आणि काही धान्य व दारूगोळय़ाची कोठारे एवढय़ाच वास्तू दिसतात. यापैकी आपले लक्ष स्थिरावते ते डाव्या हाताच्या मल्लिकार्जुन मंदिरावर! नक्षत्राकृती भूमीज पद्धतीचे हे मंदिर आज उद्ध्वस्त रूपातच समोर येते. पण त्याच्या उपलब्ध अवशेषांवरून मंदिराची एकेकाळची भव्यता आणि कोरीव श्रीमंती स्पष्ट होते. आज शिल्लक असलेल्या तळाच्या अवशेषांवर व्याल व अन्य प्राण्यांचे थर, विविध भौमितिक रचना आणि काही मैथुन शिल्पे दिसतात. हेमाडपंती शैलीतील हे मंदिर बाराव्या शतकात येथील योगी सिद्धरामेश्वरांनी बांधल्याचे सांगितले जाते.
या मंदिराशेजारीच बत्तीस खांबांची एक ऐतिहासिक इमारत आहे. या स्तंभांवरील कोरीव काम, त्यावरील विषय, शैली पाहता हे खांब मूळ मल्लिकार्जुन मंदिराचेच असल्याचे वाटते. या इमारतीचा तत्कालीन उपयोग लक्षात येत नाही. पण पुढे धान्याचे कोठार आणि ब्रिटिशांच्या काळात दारूचे कोठार म्हणून उपयोग झाल्याची नोंद आहे.
गडातील या दोन महत्त्वाच्या वास्तू पाहात पूर्व तटावर आलो, की गडाला या बाजूने वेढा घातलेला सिद्धेश्वर तलाव त्याचे अथांग रूप घेऊन आपल्यापुढे प्रगटतो. एवढा वेळ एखादा बुलंद भुईकोट वाटणारा हा किल्ला या दर्शनानंतर एकदम जलदुर्गच वाटू लागतो. तलावाच्या या पाण्यातच उभी राहिलेली या बाजूची तटबंदी, भोवतीचे पाणी, त्यातली छोटी बेटे, सिद्धरामेश्वराचे मंदिर, नारळाची झाडे हा सारा देखावा मनाला भावतो. सोलापुरात असतानाही कुठेतरी कोकणात असल्यासारखे वाटते. हा देखावा पाहातच तटावरून गडप्रदक्षिणा सुरू होते. वाटेत बाळंतिणीची विहीर लागते. पुढे एक सज्जा असलेली खोली आणि त्याच्या पुढय़ातील तलाव दिसतो. वाटेत दुहेरी तटबंदीतील मोठमोठे बुरूज धडकी भरवत असतात. यापैकी काहींची हनुमान, निशाण, महाकाली, दर्गोपाटील अशी नावेही समजतात. या तटावर जागोजागी हिंदू शिल्पेही दिसतात. ही शिल्पेदेखील मूळची मल्लिकार्जुन मंदिराची वाटतात. दोन-तीन तासांत हा कोट पाहून होतो आणि आपण पुन्हा त्या तोफांच्या सलामीसाठी हजर होतो.
गडाचे हे भलेमोठे आवार आता काही वर्षांपर्यंत एक खिंडार होते. पण येथील महापालिकेने यात लक्ष घातले आणि हा सारा परिसर साफसूफ होऊन तेथे आता एक उत्तम उद्यान फुलवलेले आहे. सुपारीची उंच गेलेली झाडे, अन्य वृक्ष-वेली, फुलझाडे आणि गवताचे पट्टे, नाचणारी कारंजी, फिरण्यासाठी बांधीव पायवाटा, बसण्यासाठी ओटे, दिवाबत्तीची सोय असे हे सारेच दृश्य धक्के देत असते.
( वरील माहिती ही विकिपीडिया आणि लोकसत्ता यांच्या ब्लॉग वरून घेतली आहे 

भामगिरी अथवा भामेरगड

 
















भामगिरी अथवा भामेरगड


धुळे जिल्ह्यात असणाऱ्या पाच डोंगरी किल्ल्यांमध्ये सर्वात सुंदर डोंगरी किल्ला म्हणजे भामगिरी अथवा भामेरगड. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात धुळे - सुरत महामार्गावर धुळ्यापासून ५० किमी अंतरावर असलेल्या ह्या गडाची उंची समुद्रसपाटीपासून २५०० फुट आहे. एकेकाळी अहीर राजांनी राजधानी असलेला हा किल्ला भामेर गावाभोवती नालेच्या आकारात पसरलेला असुन या किल्ल्याने व शेजारच्या डोंगराने गावाला ३ बाजूंनी कवेत घेतल्यामुळे गावाला नैसर्गिक संरक्षण लाभलेल आहे. उरलेल्या चौथ्या बाजूला दुहेरी तटबंदी व प्रवेशद्वार बांधून त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी गावाला व किल्ल्याला संरक्षित केले होते. असा हा सुंदर किल्ला आणि गाव दुर्गप्रेमीने एकदा तरी पहायलाच हवा. प्राचीन काळी सुरत-बुऱ्हाणणपूर मार्गावरील वैभवशाली व संपन्न शहर म्हणून भामेर ओळखले जाई. नाशिकला जाणारा व्यापारी मार्गही या शहरावरुन जात असे. अहिर घराण्याच्या ताब्यात हा किल्ला असताना किल्ल्यावरील पन्नासपेक्षा अधिक गुंफा याच काळात खोदल्या गेल्या. आजही स्थानिक लोक या गुफांना अहिर राजाची घरे म्हणून ओळखतात. धुळे -सुरत रस्त्यावरुन भामेरकडे येताना आपल्याला भामेर किल्ल्याच्या ३ डोंगरापैकी मधील डोंगरावर एका ठराविक उंचीवर कोरलेली लेणी दिसायला लागतात. लांबून दिसणारा कातळमाथा व अर्धवर्तुळाकार पसरलेली डोंगररांग ह्यामुळे दुरुनच हा किल्ला चटकन लक्षात येतो. या डोंगरांना वळसा घालून आपण भामेर गावात प्रवेश करतो. भामेर या गावालाही कधीकाळी उत्तम तटबंदी होती पण आजमितीला तटबंदी ढासळलेली आहे. भामेर गांवात शिरताना २० फूट उंच प्रवेशद्वार व गतवैभव दाखवणारी प्रवेशद्वाराची कमान लक्ष वेधून घेते. प्रवेशद्वाराच्या खांबावर नक्षी कोरलेली आहे तसेच या कमानीच्या बाजूला प्राचीन बारव असुन बाजूलाच आजही वापरात असलेल्या भल्या मोठया दगडी डोणी आहेत. या विहीरीचे पाणी पंपाने काढून चरांमधून हौदात खेळवलेले आहे. त्याकाळी या हौदातील पाण्याचा उपयोग वाटसरुंची तहान भागवण्याकरीता होत असावा. आजही ही व्यवस्था सुरू असुन हे हे पाणी गावातील गुरे पिण्यासाठी वापरतात. डाव्या बाजूला भली-मोठी प्राचीन विहीर साऱ्या गावाला पाणी पुरवते. उन्हाळ्याचे चार पाच महिने भामेर गावात पाण्याचे हाल असतात त्यात सरतेशेवटी या एकाच विहीरीत पाणी शिल्लक असते. प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या हाताला ४ फूट उंच दगडी जोत्यावर अखंड दगडात घडवलेले ८-९ फूट उंच नक्षी कोरलेले १२ देखणे गोल खांब उभे असलेले दिसतात. पेशवेकाळात या ठिकाणी त्यांचे कार्यालय होते. कमानी समोर एका चौथऱ्यावर दोन विरगळ नजरेस पडतात. जवळच एका जुन्या मशिदीचेही पडके अवशेष दिसतात. गावातून फिरताना गावातली घरेही पुरातन धाटणीची वाटतात. ठिकठिकाणी, घरांच्या पायात , भिंतीत पुरातन कलाकुसर केलेल्या दगडी खांबांचे अवशेष, यक्ष व गंधर्वमुर्ती दृष्टीस पडतात. गावातील एका गल्लीत २.५ फुट उंचीची नंदीची तुकतुकीत दगडाची मुर्ती रस्त्यावर पडलेली आहे. त्यांच्या जवळ दोन ६ फूटी कोरीव काम केलेले खांब व काही मुर्त्या पडल्या आहेत. या खांबांचा जाता येता त्रास होतो म्हणून गावकऱ्यानी हे खांब मातीची भर घालून पुरले आहेत. नंदीला सुध्दा हटवण्याचा त्यांचा विचार होता पण मुर्ती जड असल्याने ते शक्य झालेले नाही. पूर्वी इथे मंदिर असावं. गाव पार केल्यावर आपण शंकराच्या मंदिरापाशी येतो. येथून समोरच एकूण तीन डोंगरांवर वसलेला भामेरगड उर्फ भामगिरी किल्ला नजरेस पडतो. यातील उजव्या हाताच्या डोंगरावर एक छोटा दर्गा असुन समोरील डोंगरावर कोरीव लेणी आहेत तर डाव्या हाताच्या डोंगरावर भामेरगडचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याच्या खाली डोंगरात एक मोठी खाच मारून बालेकिल्ला व मधला डोंगर एकमेकापासुन वेगळे केलेले आहेत. बालेकिल्ल्याचा डोंगर ते दर्ग्याचा डोंगर यांना समांतर अशी तटबंदी पायथ्याशी बांधलेली असुन आजही ही तटबंदी व त्यातील पाच बुरुज बऱ्यापैकी शिल्लक आहेत. यातील एका बुरुजाच्या बाहेरील बाजुस मोठा बांधीव हौद आहे तर एका बुरुजावर भग्न झालेली विष्णुमुर्ती आहे. ह्या तटाचा बराचसा भाग झाडांनी लपलेला आहे पण बुरुज मोठे असल्याने लांबूनही चटकन दिसतात. ह्या तटाची व बुरुजाची मांडणी गडमाथ्यावरुन उठून दिसते. गावामागून उजव्या हाताला असलेल्या एका मळलेल्या पायवाटेने सुरूवातीच्या वाटेवर नाक दाबून १० मिनीटात आपण भग्न प्रवेशद्वारापाशी येतो. दरवाजाकडे येताना डाव्या बाजुला कातळात कोरलेल्या गुफा आपले लक्ष वेधतात तर काही ठिकाणी घसारा लागतो. येथे काटकोनात दोन प्रवेशद्वारे असून या बाजूचा बुरुज कसाबसा तग धरुन उभा आहे. येथील प्रवेशद्वार ढासळलेलं असलं तरी दुतर्फा उभे असलेले उंच दगडी खांब व बुरुज गतवैभवाची साक्ष देतात. प्रवेशद्वारातून आत आल्यावर उजव्या हाताला दर्ग्याचा डोंगर, समोर गुंफांचा डोंगर व डाव्या हाताला बालेकिल्ल्याचा डोंगर दिसतो. किल्ल्याचे प्रवेशद्वार अशा ठिकाणी बांधले आहे की, प्रवेशद्वाराकडे येणारा शत्रू मधल्या डोंगरावरून व उजव्या बाजूच्या डोंगरावरुन सहज टप्प्यात येइल. उजव्या हाताच्या डोंगरावरचा छोटासा दगडी टप्पा व कातळातल्या पायऱ्या चढून आपण दर्ग्यापाशी पोहचतो. या पीराला पांढऱ्या कापडाचे बैल वाहिलेले दिसतात. तिथून खाली उतरुन परत प्रवेशद्वारापाशी येऊन छोटेसा माळ पार करुन आपण लेण्यांच्या डोंगरापाशी येतो. या डोंगराला सर्व बाजूंनी एकाला एक लागुन जवळपास चाळीस लेणी खोदलेली असुन यातील २४ लेणी आपल्याला पाहता येतात. १० x १० फूट ते २५ x १० फूट अशी लांबी रुंदी असलेली ही लेणी पाण्याच्या टाक्या आहेत. काही कोरडी टाकी तर काही स्वच्छ पाण्याने भरलेली आहेत. प्रत्येक टाके हे पहिल्या टाक्याच्या खालच्या पातळीत कोरलेले असुन टाक्याच्या तळाशी असलेल्या छीद्रातुन एका टाक्यातील पाणी दुसऱ्या टाक्यात जाण्याची सोय आहे. या किल्ल्यातील हे पाण्याचे नियोजन अभ्यासण्यासारखे आहे. २४ लेण्यांपुढे जाण्याचा मार्ग धोकादायक असुन दोरीशिवाय पुढील लेणी पाहता येत नाही. लेण्या पाहून झाल्यावर परत मागे येऊन खडकात खोदलेल्या पायऱ्यानी डाव्या हाताच्या बालेकिल्ल्याकडे निघायचे. एकूण ६० पायऱ्या चढून गेल्यानंतर किल्ल्याचा खरा आवाका लक्षात येतो. जाताना वाटेत भग्न झालेल्या दगडी कमानीत कोरलेला एक पर्शियन शिलालेख दिसतो. या चढाई दरम्यान किल्ल्याचे प्रवेशद्वार सतत आपल्या नजरेच्या टप्प्यात असते. पायऱ्या संपल्यावर पहिल्या टप्प्यावर परत सहा गुंफा आहेत. तिथून थोडे वर आल्यावर ३ कोरीव गुंफा लागतात. या गुंफांच्या दाराच्या पट्टीवर नक्षी काढलेली असुन मधोमध गणपतीची मुर्ती कोरलेली आहे. गुफांच्या दारावर भालदार चोपदार स्त्री पुरुषांच्या मुर्ती व पक्षांच्या जोडी कोरलेल्या आहेत. प्रत्येक गुफां साधारण ३० x ३० फुट असून बारा दगडी खांबांवर त्याचे छत तोललेले आहे. गुंफांना दगडात कोरलेल्या खिडक्या आहेत. शेवटच्या गुंफेच्या पलिकडे २० × २० फुट व साधारण ३० फूट खोल गुंफा आहे. याचे तोंड कोरीव गुंफांच्या वरच्या बाजूला आहे. या कोरीव गुंफांचा वापर कचेरीसाठी केला जात असावा. गुंफांपासून वर चढत गेल्यावर आपल्याला समोर बालेकिल्ल्याचा बुरुज व त्यामागे किल्ल्याचे सर्वोच्च टोक दिसते तर उजव्या हाताला दगडात खोदलेली खाच दिसते. या खाचेने बालेकिल्ला व शेजारील टेकडी एकमेकापासुन वेगळी करण्यात आली आहे. ही खाच बनविण्याचे काम अर्धवट राहिलेले दिसते. १५ फूट × ३० फूट खाचेच्या दोन्हीं बाजूंना उंचावर बुरुज आहेत तर समोरच्या बाजूला व मागील बाजुस खोल दरी आहे. ह्या खाचेतुन दगडाचा थोडासा टप्पा चढून गेल्यावर आपण खाचेच्या बाजूवरील डोंगरात पोहचतो इथून आजूबाजूच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य दिसते. खाचेतून उतरुन बालेकिल्ल्याकडे चढत गेल्यावर १५ पायऱ्यांनंतर दुसरे प्रवेशद्वार लागते. येथे आपल्याला बुरुज व तटबंदीचे अवशेष दिसतात. तिथून पुढे गेल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाक लागते. भामेर किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर जाण्यासाठी पुन्हा एक दगडी टप्पा चढावा लागतो. वर ३० फूट रुंद व लांबवर पसरलेले पठार आहे. या पठारावर सती मातेचं छोटे मंदिर गावातील लोकांनी नव्याने बांधून काढले आहे. व त्याच्या बाजूला २० × २० फूटी पिण्याच्या पाण्याचे टाक व इतर उध्वस्त अवशेष नजरेस पडतात. थोडे पुढे गेल्यावर बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या टोकाचा बुरुज नजरेस पडतो. येथुन खाली उतरल्यावर डोंगर उतारावर असणारी पाण्याची तीन टाकी व समोर देऊरचा डोंगर व त्यावरील लेणी दिसतात. इथून खाली गांवाकडे पाहिल्यावर किल्ला व गावांच्या मध्ये असलेली खंदकरेषा स्पष्ट दिसते. तेथुन ढासळलेला तट चढुन परत बालेकिल्ल्यावर यावे लागते. या ठिकाणी आल्यावर आपला संपूर्ण किल्ला पाहून होतो. भामेर गडावरुन दक्षिणेकडे गाळणा किल्ला तर पूर्वेकडे राव्या-जाव्या नावाची दोन जोड शिखरे दिसतात. गड चढण्यासाठी एक तास तर फिरण्यासाठी तीन तास लागतात. गावातील महत्त्वाची ठिकाणे पहाण्यासाठी १ पुरेसा होतो. भामेर गावाचा इतिहास अतिप्राचीन आहे. प्राचिन काळी येथे भद्रावती नगर होते. त्या काळांत इथे युवनाश्व राजा राज्य करीत होता. पांडवांनी सोडलेला यज्ञाचा घोडा या राजाने अडवला. पांडवांनी युद्ध करून तो घोडा परत नेला. महाभारत युद्धावेळी हा राजा पांडवांच्या बाजूने लढला. त्याची मुलगी भद्रावती हिच्या नावाचा अपभ्रंश म्हणजे ‘‘भामेर’’ होय अशी दंतकथा आहे. दंतकथेप्रमाणे तोरणमाळचा महाभारत कालीन राजा युवनाश्न हा त्याची उपराजधानी भामेर येथे पावसाळ्यात वास्तव्य करून राहत होता. भामेर (भंभगिरी) 1000 ते 1500 वर्षांपासून आपला ऐतिहासिक समृद्ध वारसा आजही टिकवून आहे. गडावरील लेणीवरून हा किल्ला सातवाहन काळात अस्तित्वात असावा. मध्ययुगात हा किल्ला व्यापारी दळणवळणाच्या मार्गावरील प्रमुख केंद्रस्थानी होता. खानदेश-बऱ्हाणपूर-सुरत मार्गाच्या प्रदेशावर वर्चस्वासाठी भामेरसारखा मजबूत किल्ला ताब्यात असणं त्यावेळच्या राज्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं समजलं जाई. नाशिक-धुळे-सुरत या तीनही शहरांकडे जाणारे मार्ग याच भामेरच्या परिसरातून जातात. प्राचीन काळात लेण्या या व्यापारी मार्गावरच कोरल्या गेल्यात. येथील जैन लेण्या आजही प्राचीन कलेचा वारसा टिकवून आहेत. १२व्या शतकांत अहिर कुळांतील लक्ष्मीदेव हा राजा भामेरला राज्य करीत होता. तसा शिलालेख आजही येथे आहे. देवगिरीच्या यादव कुळातील जैतुगीचा मुलगा दुसरा सिंधण (१२१०-४६) गादीवर आला. याने खानदेशमधील पिंपळगाव तालुक्यातील भंभागिरीच्या (भामेर) लक्ष्मीदेवाला जिंकले अशी नोंद आढळते. सिंधण यादवाच्या सेनापतीने लक्ष्मीदेवाचा पराभव केला. खानदेशात यादव राजांना गवळी राजेही म्हटले जाते. भामेर बहामनीं काळापासून १८ व्या शतकापर्यंत इस्लामी सत्तेच्या वर्चस्वाखाली होते. १८ व्या शतकाच्या सुरूवातीला दाभाडे घराण्याकडे भामेर प्रांताची व्यवस्था आली पण भामेर किल्ला मराठ्यांच्या ताब्यात सन १७५२ मध्ये आला. त्यानंतर भामेर मुलुखाचा सरंजाम विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांच्या नातवाकडे देण्यात आला होता. इंग्रजांनी सन १८१८ मध्ये सगळे किल्ले ताब्यात घेतल्यानंतरही सन १८२० मध्ये कालेखान या पेंढाऱ्याच्या सरदाराने बंड करून भामेर ताब्यात घेतला पण कॅ.ब्रिग्जने हे बंड मोडून काढतांना इथल्या इमारती व तट नष्ट केले.
सुरेश सुर्यवंशी धुळे दुर्ग सेवक किल्ला
9922482351

वैराटगड ( ता.वाई, जि.सातारा, महाराष्ट्र )





















 वैराटगड ( ता.वाई, जि.सातारा, महाराष्ट्र )


पुणे सातारा हमरस्त्याने भुईंज - पाचवड या गावापासून जाताना उजव्या बाजूला असलेला वैराटगड नेहमीच प्रवाशांचे लक्ष वेधून घेत असतो. हमरस्त्याने त्याची दिसणारी भव्य उंची पाहून काहीशी मनात शंका येते की, आपल्याला गडमाथा गाठणे शक्य होईल का ? दि.२६ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ७:३० भोर मधून आमचे नेहमीचेच भटकंती करणारे मित्र आनंद गोसावी, कैलासराव जाधव, सुरेशराव कंक व मी हे चारचाकीने निघालो.
भोर - शिरवळ - खंडाळा या मार्गाने पाचवड येथे पोहोचलो. तेथे चहा घेऊन पाचवड - वाई मार्गाने प्रवास करीत व्याजवाडी या गावी पोहोचलो. याच गावापासून जवळच असलेल्या घेरेवाडी येथे साधारणतः सकाळचे ८:३० वाजता पोहोचलो. तेथूनच वैराटगडची चढण सुरू होते. घेरेवाडीतील शेवटच्या घराच्या समोर एक चारचाकी उभी होती. तिच्या पाठीमागील काचेवर राणादा हे नाव लिहलेले होते. तेथे त्या नावाबाबत विचारणा केल्यावर एका भगिनीने आपल्या तीन वर्षे वयाच्या मुलाला बोलावले व सांगितले, 'हाच राणादा, ह्याचे पाळण्यातील नाव राजवीर असून आम्ही सर्वजण राणादा या नावाने संबोधत असतो. चिमुकला राणादा नवीन लोकांना पाहून आईकडे गेला. अशा एका चिमुकल्या गोड हस-या मुलाचा निरोप घेऊन गडवाटेला लागलो. वाईच्या नैऋत्येस फक्त १० कि.मी.अंतरावरील ३३४० फूट उंचीच्या किल्ल्याच्या गडमाथ्यावर पोहोचण्यासाठी मानसिक व शारीरिक क्षमतेची कसोटी नक्कीच लागते. खडी चढण, तीही अतिशय निसरडी अशी आहे. सुमारे दोन तासांचा अवधी लागातो. वाटेत कैलासरावांचा गडमाथ्यावर पोहचण्याचा संघर्ष पाहून आपलीही चढण चढण्याची क्षमता आपोआपच वाढते. ही वाट किल्ल्याच्या उत्तरेची असून सुमारे मध्यावर गेल्यावर पूर्वेकडे जाते. दमछाक करीत आपण काळ्या कातळाची नैसर्गिक तटबंदींतील पश्चिमाभिमुख दरवाजाच्या पायऱ्यात पोहोचतो.समोर दोन्ही बाजूस असलेल्या बुरूजांचे अवशेष दिसतात, तर डाव्या हातास थोड्या उतारावरील लक्ष्मीमाता मंदिराचे लोखंडी छत लक्ष वेधून घेतात. नकळत आपण तिचे दर्शनासाठी पोहोचतो तर जाताना उजव्या बुरूजाच्या बरोबर खाली खडकात असलेली पुरातन लहान गुहा दिसून येते. मग मुख्य व एकमेव असलेल्या दरवाजाच्या खडकात खोदलेल्या वळणावळणाच्या पायऱ्या चढून वर येतो. दरवाजाची कमान व दोन्हीही दगडी स्तंभ काळाच्या ओघात नष्ट झाल्याचे पाहून मन दुखावते, मात्र दरवाजाचा दगडी उंबरठा पाहून थोडे हायसे वाटते. उंबरठ्याच्या डाव्याबाजूस अडगळ खोचण्याची दगडातील खाच पाहून तत्कालीन व्यवस्थेची जाणीव होते. शेजारीच दोन्हीबाजूस असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या देवड्या अर्धवट अवस्थेत आहेत. गडमाथ्यावर सर्वात प्रथम दर्शन होते ते मारुतीरायाच्या लहान मंदिराचे. मंदिर लहान असून त्यात दगडी प्रभावळीत मारुतीची प्रसन्न मूर्ती आहे, तर शेजारीच अलीकडील काळातील छत्रपति शिवाजी महाराजांचा बैठा पुतळा आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस देखील उघड्या जागेवर मारुती शिल्प असल्याचे पाहून मनात गोंधळ होतो. शक्तिदेवता मारूती दर्शनाने काहीशी उर्जा अंगात संचारते. किल्ला साधारणतः पूर्व - पश्चिम असा असून कमी क्षेत्रफळ असलेला आहे. मग पश्चिमेस असलेल्या बुरूजाकडे / माचीकडे आपण जातो. तटबंदीची पडझड झाली असली तरी तरी शत्रूच्या सैन्यावर मारा करता यावा यासाठी जागोजागी असलेल्या तटबंदीतील जंग्या पाहत आपण पश्चिम बुरूजाजवळ पोहोचतो. बुरूजावरून समोरील डोंगर व परिसर पाहण्यात एक वेगळाच आनंद येतो. हा किल्ला प्रतापगडपासून आलेल्या शंभूमहादेव डोंगररांगेवर असल्याने ह्या डोंगररांगेतील उर्ववरित हिरवाईने सजलेल्या लांबच लांब डोंगर मनाला आनंद देतात. त्यानंतर पलिकडील बाजूची तटबंदी पाहत असताना बुरूजाजवळच्या तटबंदीत असलेला चोरवाट पाहाताना मनात धडकीच भरते. सह्याद्रीच्या विशालरूपातीला ही तटबंदीतील चोरवाट म्हणजे एक दिव्यच आहे. सुमारे दोनशे फूट तीव्र उतार व अरुंद बोळ असणारी चोरवाटेचा वापर करणारे मावळे म्हणजे चमत्कार आहे. वाई येथील निवासी व पुणे येथे दंतमहाविद्यालयात शिक्षण घेणारे डाॕ.सचिन सांवत हे एकटेच वाईहून वैराटगड पाहणेसाठी आले होते. घेरेवाडीतून येणाऱ्या मळलेल्या पाऊलवाटेने अर्धा किल्ला चढून आल्यावर डावीकडे जाणाऱ्या वाटेने येण्या ऐवजी उजव्या वाटेने आले. परिणामी ते पश्चिमेकडील माचीच्या जवळ असलेल्या चोरवाट ठिकाणी पोहोचले. त्यांनी त्या अवघड अशा वाटेने किल्ल्यावर येण्यास सुरूवात करून बरेच वरपर्यंत येण्यात यशस्वी झाले पण शेवटच्या टप्प्यात शक्य होत नव्हते. त्याचवेळी आम्ही तेथे असल्याने आनंद गोसावी, कैलासराव जाधव व सुरेशराव कंक यांनी सामुहिक युक्ती व शक्तीने त्यांना गडमाथ्यावर येण्यास मदत केली. अशक्य असणाऱ्या टप्प्यावर आमच्या सहका-यांनी धाडसी मेहनत करून वर घेतल्यावर डाॕ.सावंत यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. चोरवाटेचा तो थरार आमच्या व सावंतांच्या कायमच स्मरणात राहिल. चोहोबाजूने काळ्या कातळाची नैसर्गिक तटबंदी या किल्ल्यास लाभल्याने वरील भागात थोडे बांधकाम करून किल्ला सुरक्षित केल्याचे प्रामुख्याने आढळून येते. तेथून पूर्वेकडे येताना वेताळ स्थापित केल्याचे आढळून येते, तर त्याच्या शेजारीच पुरातन बांधकामाचे त्यातल्या त्यात बरे अवशेष दिसून येतात. येथे मोठा वाडा असावा असे वाटते. पुढे पूर्वेस तटबंदी पाहत येताना तटबंदीतील दोन शौचकुप असल्याचे आढळून येते. सातारा जिल्हा हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडणारा जिल्हा असल्याने तटबंदीच्या लादणीतील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी केलेली सोय अप्रतिम अशी आहे. गडमाथ्यावर अनेक इमारती असल्याचे तुरळक अवशेष आहेत. चारपाच मोठी पाण्याची तळी असून त्यातील दोनतीन मधे पाणी असते, मात्र ते पिण्यास अयोग्य आहे. पूर्वेकडील माचीवर पूर्वाभिमुखी वैराटेश्वर शंभूमहादेवाचे मंदिर असून नंतरच्या काळात मंदिरासमोर भव्य लोखंडी पत्र्याचा आधुनिक सभामंडप उभारलेला आहे. मंदिरात वैराटेश्वराची पिंडी असून शाळुंकेवर पितळी नागदेवता विराजमान आहे. मंदिरात प्रवेश करताना दगडी चौकटीवर असलेल्या गणपति शिल्पाला वंदन केले जाते. समोरील बाजूस नंदी शिल्प तर बाजूला तुळशी वृंदावन आहे. याच मंदिराच्या उजव्या बाजूस भिंतीला टेकवून ठेवलेली भव्य वीरगळ आहे. १९८३ साली ही वीरगळ, मारुतीच्या दोन मूर्त्या ह्या या किल्ल्यावर मिळाल्या आहेत. ह्या मंदिराजवळच भैरवनाथाचे लहान मंदिर असून तेथे एक सतीशिळा देखील आहे. किल्ल्यावर विद्युत पुरवठा केला आहे. दर महाशिवरात्रीस परिसरातील भाविक मोठ्या संख्येने हजर असतात. वैराटेश्वर मंदिराच्या प्रारंगणात आम्ही जेवणाचे डबे सोडून एकत्र भोजनाचा आनंद घेतला. पोटपुजा झाल्यावर काही वेळ निवांत घालविला. संपूर्ण किल्ला पाहण्यास एक तासाचा अवधी पुरेसा आहे. गडमाथ्यावरुन आजूबाजूचा विस्तीर्ण परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. पूर्वेला असलेला चंदन वंदन, नांदगिरी तर वायव्येला कमळगड, केंजळगड, पांडवगड हे किल्ले दिसतात. तसेच जरंडेश्वर डोंगर, मांढरदेव डोंगर, मेरुलिंग डोंगरासह कृष्णा नदीचे खोरे, कण्हेर खोरे, पसरणीचा घाट यांचे विहंगम दृश्य सुखावते.
कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील दुसरा राजा भोज यांनी ११७८ ते ११९३ दरम्यानच्या कालखंडात निर्माण केलेल्या पंधरा किल्ल्यापैकी हा एक आहे. मात्र परिसरात एक दंतकथा सांगितली जाते ती अशी की, महाभारतातील राजा विराट राजाची वैराटगड ही राजधानी होती. ऐतिहासिक कालखंडात या किल्ल्यावर फार मोठा सैनिकी संघर्ष झाल्याच्या नोंदी आढळून येत नाहीत. ११ नोव्हेंबर १६७३ रोजी सातारा जिंकल्यावर छत्रपति शिवाजी महाराजांनी वाईच्या परिसरातील पांडवगड, कमळगड, केंजळगड इत्यादी किल्ले जिंकून घेतले यात नक्कीच वैराटगड असावा कारण चिटणीस व चित्रगुप्त बखरी मधे विराटगड नावाचा उल्लेख येतो. छत्रपति संभाजी महाराजांच्या हयातीत हा किल्ला स्वराज्यात होता. त्यांच्या मृत्यूनंतर काही काळ मोगल वरचड झाल्याने हा किल्ला त्याने जिंकला होता, मात्र १६९० मधे रामचंद्रपंत अमात्य व सचिव शंकराजी नारायण गांडेकर यांनी वाई प्रांतातील किल्ले परत स्वराज्यात घेतले होते त्यात वैराटगडचा देखील समावेश असावा. सातारा किल्ल्यास औरंगजेब सैन्याने वेढा दिला होता तेव्हा स्वतः औरंगजेब करंजे ह्या गावी होता. मुघल दरबारातील ९ डिसेंबर १६९९ च्या नोंदीनुसार हमीदुद्दीन बहादूर यांच्या सैन्याने सलग दोन दिवस मराठ्याच्या ताब्यातील या किल्ल्यावर लढाई करून जिंकून घेतला व त्याच्या चाव्या औरंगजेबाकडे पाठवून दिल्या. त्याने वैराटगडचे सर्जागड असे नामकरण केले तर किल्ल्यावरील संपत्तीची मोजदाद करण्यास सांगून १३ डिसेंबर १६९९ रोजी किल्लेदार म्हणून मुहम्मद इब्राहिम यास नियुक्त केले. मुहम्मद इब्राहिम हा वाईचा ठाणेदार असलेल्या नाहरखानचा मुलगा होता. किल्लेदार म्हणून नेमणूक केल्यावर औरंगजेबाने त्याची मनसब वाढविली व त्याच्या सोबत १५० सैनिक, २ बाजदार, २ पानके व २ गोलंदाज दिले.
पुढे ९ जुलै १७०४ च्या नोंदीनुसार मराठ्यांनी वैराटगडच्या किल्लेदारास कैद करून किल्ला ताब्यात घेतला तेव्हा औरंगजेबाने कराडच्या ठाणेदारासोबत म्हसवडचा ठाणेदार नागोजी माने, बुधपाचगावचा ठाणेदार पदाजी घाटगे व खटावचा ठाणेदार कृष्णराव यांना किल्ला घेण्यास पाठविले मात्र तो त्यांनी जिंकला की नाही हे माहित होत नाही. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर वैराटगडचा सरनोबत दादजी फाटक हा नाईकजी फाटकचा दुसरा मुलगा होता. पेशवे माधवराव यांच्या काळात खंडोजी जाधवराव हा वैराटगडचा किल्लेदार होता. पेशवाईत कुडाळ प्रांताचा सर्व कारभार याच किल्ल्यावरून पाहिला जायचा. तत्कालीन पत्र व्यवहारात " अज दिवाण किले वैराटगड ...." अशी पत्राची सुरूवात केली जायची.खंडोजी जाधवराव हे सुमारे तीस वर्षापेक्षा जास्त काळ ह्या किल्ल्याचे किल्लेदार होते ही ऐतिहासिक काळातील एकमेव घटना असावी. १८१८ मधे हा किल्ला इतर किल्ल्याप्रमाणे इंग्रजांच्या ताब्यात गेला. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या वैराटगडला घेरेवाडी येथून पुन्हा एकदा वंदन करुन दुपारी अडीच वाजता भोरला सहका-यासोबत निघालो. वाटेतील प्रवासात वैराटगडचे गाडीतून दर्शन घेतले.
सुरेश नारायण शिंदे, भोर
९७६७५९६९५४