पोवाडा (काव्यात्मक वर्णन प्रशस्ती किंवा स्तुतीस्तोत्र) -
पोवाडा हा वीर रसांतील लेखनाचा आणि गायनाचा महाराष्ट्रातील लोकप्रिय प्रकार आहे. पोवाड्याचा शब्दश: अर्थ उच्चरवातला संवाद ( संस्कृत प्र + वद ==> पवद ==> पवड ==> पवाडा ==> पोवाडा) असा होतो. वीरांच्या पराक्रमांचे, विद्वानांच्या बुद्धिमत्तेचे तसेच एखाद्याच्या सामर्थ्य, गुण, कौशल्ये इ. गुणांचे काव्यात्मक वर्णन प्रशस्ती किंवा स्तुतीस्तोत्र म्हणजे पोवाडा, असा पोवाडा शब्दाचा अर्थ महाराष्ट्र शब्दकोशात दिला आहे .
पोवाड्याचा उल्लेख ज्ञानेश्वरी मध्ये "पवद" असा केलेला आढळतो. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांवर केलेले पोवाडे विशेष प्रसिद्ध आहेत.
मराठी भाषिकांचा हा एक स्फूर्ति देणारा गीत प्रकार आहे. भारतात याचा उदय साधारण १७ व्या शतकात झाला. पोवाड्यात ऐतिहासिक घटना समोर ठेवून गीत रचना केली जाते आणि खास वेगळ्या अशा धाटणीने मनोरंजक पद्धतीने गायली जाते. पोवाड्याची गीते रचणाऱ्या आणि गाणाऱ्या लोक कलावंतांना शाहीर म्हणतात.
स्तवनात्मक कवने इसवी सनाच्या दहाव्या शतकापासून हिंदीत किंवा तत्सम भाषेत रचली जात होती. त्यांना रासो असे म्हणत. पृथ्वीराज चौहान याचा भाट चंद बरदाई याचे पृथ्वीराज रासो हे काव्य म्हणजे पृथ्वीराजाचा पोवाडाच आहे. राजस्थानातून काही राजपूत कुळे महाराष्ट्रात आली, तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे भाटही आले. त्यांपैकी काही पुढे महाराष्ट्रातच स्थायिक झाले. त्यांनी आपला भाटगिरीचा म्हणजे पोवाडा रचून गाण्याचा पेशा कायम ठेवला. उत्तर पेशवाईत प्रसिद्धीस आलेला सिद्धनाथ ऊर्फ सिदू रावळ शाहीर हा भाटच होता. भूषण नावाचा एक कवी शिवाजीमहाराजांच्याबरोबर काही काळ होता. त्याने शिवाजी महाराजांच्या चरित्रातील काही रोमहर्षक प्रसंग काव्यात वर्णिले आहेत. तेही पोवाडा या सदरात जमा होतील.
परंतु प्राचीन उपलब्ध पोवाड्यांत पुढील तीन प्रकारची कवने आढळतात : (१) दैवतांच्या अद्भुत लीला आणि तीर्थक्षेत्रांचे माहात्म्य, (२) राजे, सरदार वा धनिक यांचे पराक्रम, वैभव, कर्तृत्व इत्यादींचा गौरव आणि (३) लढाई, दंगा, दरोडा, दुष्काळ, पूर इ. उग्र वा कुतूहलजनक घटनांचे निवेदन.
पूर्वीच्या काळी पोवाडे रचणे आणि ते सदरेवर म्हणून दाखवणे हे काम गोंधळी लोकांचे असे. उत्तर पेशवाईत तमाशेवाल्यांचे स्वतंत्र फड निर्माण झाले. फडांतील कवी शाहीर पोवाडे व लावण्या रचत. गोंधळी लोक संबळ तुणतुणे यांच्या साथीवर पोवाडे म्हणत. तर शाहीर डफाच्या साथीवर ते गात.
पोवाड्यांची भाषा व रचना ओबडधोबड असते. त्यांत मुख्यत्वे वीररसाचा आविष्कार असतो. वीर आणि मुत्सदी पुरुषांच्या लढाया, त्यांचे पराक्रम, त्यांची कारस्थाने इत्यादींचे जोरकस शब्दचित्र पोवाड्यात असते. पोवाड्यांमध्ये सामान्यत: राजकीय इतिहासच वर्णिलेला असतो. काही पोवाडे एखादी महत्त्वाची राजकीय घटना घडल्यानंतर लगेच रचले गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना ऐतिहासिक माहितीच्या दृष्टीनेही महत्त्व प्राप्त होते.
# पुण्यातली शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी ही पोवाड्यांचे वर्ग घेते. पिंपरी चिंचवडमध्येही पोवाडा शिक्षणाचे वर्ग सातत्याने चालतात.
#"शाहीरमहर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंच " ही संस्था महाराष्ट्रात विविध ठिकाणी शाहिरीच्या संगोपन,संवर्धन,आणि प्रशिक्षणाच्या अनुषंगाने काम करुन तरुण व होतकरूंना शाहिरी व लोकतालवाद्यांचे शास्त्रोक्त शिक्षण देण्याचे कार्य करीत आहे.
प्रतापगडाच्या पायथ्याशी खान …(३)
आला बेगुमान नाही त्याला जाण
शिवाजी राजाच्या करामतिची
त्याशी नाही जाणीव शक्तिची
करील काय कल्पना युक्तिची हा जी जी जी …(३)
महाराजानी निरोप घेतला …(२)
न दंडवत घातला भवानीला
तसाच आई जिजाऊला
वकुत ह्यो वंगळ त्यों कसला
पानी आल आईच्या डोळ्याला
न सरदार लागला रडायला
अहो हे हे हे सरदार तर रडतीलच
पण हत्ती घोड़ शिव ना चार्याला
अन गाई बघा लागल्या हम्बराया
असला बेहुद वकुत आला
दुश्मनाच्या गोटामधी चालला मराठ्याचा राजा
अहो राजा हो जी र दाजी र जी जी …(३)
खानाच्या भेटीसाठी …(२)
महाराजानी एक शानदार शामियाना उभारला होता
भेटीसाठी छान उभारीला
नक्षीदार शामियान्याला
अन अशा ह्या शामियान्यात
खान डौलत डुलत आला …(२)
सय्यद बंडा त्याच्या संगतीला
शिवबाच्या संगती महाला
म्हणतात ना होता जीवा म्हणुन वाचला शिवा
राजाला पाहून खान म्हणतो
आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ
खान हाक मारीतो हसरी …(२)
रोखून नजर गगनी
जी र जी जी …
पण आपला राजा …(२)
काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता
राजा गोर पहात त्याची न्यारी
चाल चित्याची सावध भारी
जी र जी जी …
खानान राजाला आलिंगन दिल
अन दगा केला
खान दाबी मानी मान्याला …(२)
कट्यारीचा वार त्यान केला …(२)
गर खरा आवाज झाला
चिलाखत व्हत अंगाला
खानाचा वार फुका गेला
खान यडबडला
इतक्यात महाराजानी
पोटामधी पिसवा ढकलला
वाघनखांचा मारा केला
हे टरटरा फाडल पोटाला
हे तडा गेला खानाचा कोथळा
बाहिर आला जी र जी जी …(३)
प्रतापगडाचे युद्ध जाहले …(३)
रक्त सांडले पाप सारे गेले
पावन केला क्रुष्णेचा घाट …(२)
लावली गुलामिची हो वाट …(२)
मराठे शाहिचा मांडला थाट हो जी जी …(३)
No comments:
Post a Comment