Followers

Saturday 5 December 2020

#ऐतिहासिक_अचलपूर, जिल्हा अमरावती















 #ऐतिहासिक_अचलपूर, जिल्हा अमरावती

अचलपूरचा इतिहास म्हणजेच #वऱ्हाडचा_इतिहास’ असा अभिमानपूर्वक उल्लेख ज्या शहराबद्दल केला जातो, ते अचलपूर (आणि परतवाडा) आता पार बदलून गेले आहे. संपन्नतेची साक्ष पटवणाऱ्या खुणा तेवढय़ा शिल्लक आहेत, इतकी ती संपन्नता लयास गेली आहे. या शहरातील ऐतिहासिक वास्तूंमुळे गतकाळातील वैभवाची साक्ष पटते.
अचलपूर किंवा एलिचपूर- इतिहासाला सुमारे दिड सहस्रकापासुन ज्ञात असलेली एक प्राचीन नगरी. या शहरात मध्ययुगीन कालखंडातील अनेक प्राचीन स्थापत्य अवशेष आजही सुस्थितीत दिसतात. या शहराला हा वारसा जतन करण्याची व येथील इतिहास जाणून घेण्याची आज आवश्यकता आहे.
अचलपूर हे अमरावती जिल्ह्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेले एक महत्वाचे तालुक्याचे शहर. अचलपुर शिवाय वऱ्हाडचा इतिहास पुर्ण होऊच शकत नाही असे या शहराबाबत म्हटले जाते. जैनधर्मीय इल राजाने हे नगर वसवल्याने त्याला एलिचपूर असे नाव पडले व काळाच्या ओघात त्याचे अचलपुर झाले. काही काळ विदर्भाची राजधानी असलेले हे शहर बिच्छन नदीतीरावर एका भुइकोटाच्या आत वसलेले असुन मध्ययुगीन काळात वऱ्हाडातील एक महत्वाचे ठिकाण होते. मध्ययुगीन काळातील वैभवाची साक्ष देणाऱ्या वास्तु आजही या शहरात विखुरलेल्या अवस्थेत पहायला मिळतात. अचलपुर किल्ला अमरावती बुऱ्हाणपूर मार्गावर अमरावती पासुन ५० कि.मी.अंतरावर तर परतवाडा शहरापासुन ४ कि.मी.अंतरावर आहे. अचलपुर शहरात आपला प्रवेश या किल्ल्याच्या दरवाजातूनच होतो. भक्कम पोलादी तटबंदीत असलेल्या या शहरात आजही त्याच्या सौंदर्याने नटलेल्या वास्तु दुर्लक्षित झालेल्या आहेत. शहराभोवती असलेली भक्कम तटबंदी, त्यातील बुरुज व कोरीवकामाने सजलेले सहा बुलुंद दरवाजे आजही या शहराचे वैभव आहे. या वास्तु आपल्याला कळत नकळत मध्ययुगीन काळात घेऊन जातात. या सर्व दरवाजावर असलेले पर्शियन शिलालेख त्या दरवाजाची माहिती देतात पण या शिलालेखांचे एकत्रित वाचन कोठेही आढळून येत नाही. हे दरवाजे दुल्हा दरवाजा, खिडकी दरवाजा, जिवनपुरा दरवाजा, माळीपुरा दरवाजा, बुंदेलपुरा दरवाजा आणि हिरापुरा दरवाजा या नावांनी ओळखले जातात. ३०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला दुल्हा दरवाजा इस्माईल खान याने बांधल्याचा शिलालेख त्या दरवाजावर कोरलेला आहे. या दरवाजाची वाट दुल्हा रहेमान यांच्या दर्ग्याकडे जात असल्याने या दरवाजाचे नाव दुल्हा दरवाजा असे पडले. शहराबाहेरील तटबंदी सुलतानखानचा मुलगा नवाब इस्माईलखान याने बांधल्याचा शिलालेख एका दरवाजावर कोरण्यात आला आहे. किल्ला फिरताना तटबंदीखाली काही ठिकाणी सांडपाण्याचे मार्ग तर काही ठिकाणी किल्ल्यात येणारे पाणीमार्ग तसेच या पाण्यासाठी बांधलेले उच्छ्वास पहायला मिळतात. यातील एक उच्छवास आपल्याला दुल्हा दरवाजाच्या आत समोर पहायला मिळतो. बहामनी काळात बिच्छन नदीवर धरण बांधुन खापरी नळाने नगरात सात ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात आला होता. सातभुळकी नावाने ओळखली जाणारी हि व्यवस्था बंद झाली असली तरी त्याचे अवशेष व टाक्या अजूनही पहायला मिळतात. अचलपूर शहरात नबाबांच्या नावावर ३५ पेक्षा जास्त पुरे अस्तित्वात असुन त्यांना वसवणाऱ्या नबाबांच्या नावाने ते ओळखले जातात. समरसखानने (१७२४) साली वसवला तो समरसपुरा, सुल्तानखानने (१७२७) साली वसवला.
माहीती - दुर्ग भरारी

No comments:

Post a Comment