Followers

Sunday, 27 December 2020

श्री धारेश्वर (स्वयंभू देवस्थान) धायरी, पुणे

 


















श्री धारेश्वर (स्वयंभू देवस्थान) धायरी, पुणे

पहाटेच्या प्रसन्न वेळी किंवा संध्याछाया पसरतांना दिसणारे धायरी गावातील धारेश्वराचं मंदिर हे अनुभवण्यासारखेच आहे. औदुंबर, पिंपळ आदी वृक्षांनी घेरलेल्या मार्गातूनच आपण मंदिराकडे जातो. पायर्या चढून जातांना दोन्ही बाजूंनी सावलीचा आधार असतो. गाभार्यातील स्वयंभू प्रसन्न शिवलिंग पहातांना हात नकळत जोडले जातात.
धारेश्वर मंदिर हे साडेचार एकर परिसरात आहे. सध्याचे मंदिराचे स्वरूप हे १९७८ मध्ये निर्माण झालेले आहे. देवळाच्या आजूबाजूचा परिसर हिरवागार आहे. पाठीमागच्या डोंगरावर असलेल्या खंडोबाच्या देवळात स्थानिक लोक अधूनमधून जात असतात. श्री धारेश्वराचं देवस्थान ३५० वर्षांपूर्वीचे आहे. धायरी गावात रायकर घराण्यातील बरीच मंडळी रहातात. या घराण्यातील जैतुजीबाबा रायकर या महापुरुषाच्या शिवभक्तीने हे मंदिर निर्माण झालेले आहे. सध्या श्री धारेश्वर महादेव संस्थान, धायरी यांच्या वतीने या मंदिराचा सर्व कारभार पाहिला जातो. या मंदिराची कथा पुढीलप्रमाणे आहे.
रायकर घराण्याचे मूळपुरुष जैतुजीबाबा हे शिवभक्त होते. सातारा जिह्यातील शिखर शिंगणापूरला ते प्रतिदिन दर्शनासाठी जायचे. सकाळी जाऊन संध्याकाळी परतायचे. एके दिवशी त्यांना शिखर शिंगणापूरहून येतांना अंधार झाला. ते मनातून घाबरले; परंतु त्या वेळी साक्षात भगवान शंकर स्वतः साधूच्या रुपात आले आणि म्हणाले, तू घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. केवळ तुझ्या घरी जाईपर्यंत मागे वळून पाहू नकोस. हे ऐकून जैतुजीबाबा निघाले. आता जेथे धारेश्वर मंदिर आहे, तेथे आल्यावर बाबांना वाटले आता आपण आपल्या गावात आलो आहे. आता पाठीमागे पहायला हरकत नाही. ते पाठीमागे वळून पहातात, तर काय, साधूच्या रुपात प्रत्यक्ष भगवंत तेथे उभे होते आणि त्याच ठिकाणी ते गुप्त झाले. त्या ठिकाणी स्वयंभू शिवलिंग सिद्ध झाले. शिखर शिंगणापूरला ज्या रूपात स्वयंभू शिवलिंग आहे, तसेच येथेही आहे.
जैतुजीबाबांनी मग त्या ठिकाणी छोटेसे देऊळ बांधले. आणखी काही दिवसांनी जैतुजीबाबा जास्तच थकले. त्यांना घरापासून या मंदिरापर्यंत जाणेही कठीण होऊ लागले. म्हणून ते त्यांच्या रहात्या घरात देवाचे नामस्मरण करत पाणी भूमीवर घालू लागले. त्या ठिकाणी त्यांच्या रहात्या घरातदेखील शिवलिंग सिद्ध झाले. आज त्यांच्या घराला देववाडा म्हणून संबोधले जाते.
पुढे त्यांच्या मनात जिवंत समाधी घ्यावी, असा विचार येऊ लागला आणि त्यांनी त्यांच्या मुलांना त्यासाठी खड्डा खोदण्यास सांगितले. मुले खड्डा खोदण्यास गेली. पहिला खड्डा खोदला, त्या ठिकाणी शिवलिंग प्रकट झाले. दुसरा खड्डा खोदला, तेथेही शिवलिंग प्रकट झाले. असे ७ खड्डे खोदले असता ७ शिवलिंगे प्रकट झाली. मुलांनी वडिलांनी ही हकिकत सांगितली. मग जैतुजीबाबांनी प्रार्थना केली, तेव्हा आठव्या ठिकाणी शिवलिंग निघाले नाही आणि त्या ठिकाणी जैतुजीबाबांनी जिवंत समाधी घेतली. आजही ती संजीवन समाधी आणि ७ शिवलिंगे पहायला मिळतात. थोडेसे चढून वर आले की, उजव्या बाजूला शनी मंदिर आहे. मूर्ती जुनीच; मात्र प्रतिष्ठापना चार-पाच वर्षांपूर्वी झाली आहे. मुख्य पायर्या चढून वर आले की, दोन भरभक्कम दीपमाळा आपले स्वागत करतात. त्या दोहोंमध्ये असलेला नंदी शिवमंदिराकडे मुख करून बसलेला आहे. समोरच्या भल्यामोठ्या प्रांगणात मंदिर आहे. सभामंडपही चांगला ऐसपैस, स्वच्छ आहे आणि तेथे शिवभक्त देवाचा जप करत असतांना दिसतात. गाभार्यातील हे प्रसन्न शिवलिंग पहातांना हात नकळत जोडले जातात. तांब्याच्या पात्रातून अभिषेकाची धार अखंड चालू असते. जैतुजीबाबांच्या शिवभक्तीने हे स्वयंभू स्थान निर्माण झालेले आहे. मंदिरात प्रतिदिन सकाळी ६ वाजता पूजा आणि अभिषेकाला प्रारंभ होतो. संध्याकाळी ७.३० वाजता पुन्हा आरती होते. दुपारी १२ ते ४ या वेळेत दर्शन बंद असते.
चैत्र वद्य चतुर्थीला श्री धारेश्वराची मोठी यात्रा भरते. त्याचे नियोजन गुढीपाडव्यादिवशी केले जाते. महादेवाची काठी किंवा कावड पाडव्याच्या आठव्या दिवशी शिखर शिंगणापूरला जाण्यास निघते. धायरी गावच्या काठीला शिंगणापूर येथे प्रथम मानाचे स्थान आहे. त्याचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ताम्रपटातून २० माहे इसवीसन १३२४ चैत्रमध्ये केला आहे. पुढे बारा दिवसांनी ती परत येते. या कावडीबरोबर जाणार्या सर्वांची व्यवस्था संस्थेच्या वतीने केली जाते. कावड परत आली की, मोठा उत्सव असतो. भजन, कीर्तन, प्रवचन यांनी परिसर भक्तिमय होऊन जातो. मुख्य धारेश्वर मंदिरामागे औदुंबराच्या छायेत दत्तमंदिर आहे. त्यापुढे अक्कलकोट स्वामींच्या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सगळा परिसर पहातांना प्रसन्न वातावरण आपल्याला सतत जाणवते.

No comments:

Post a Comment