जल व्यवस्थापनाचा अजोड नमुना - राणीची विहीर
उत्तर गुजरातच्या पाटण येथील प्राचीन, नक्कशीदार आणि अनोखी अशी राणीची विहीर (स्टेपवेल) आहे. १ हजार वर्षांपूर्वी बांधलेल्या विहिरीचे वैशिट्ये म्हणजे या विहिरीत ७ मजली भव्य राजवाडा आहे. ही विहीर म्हणजे तंत्रज्ञानाचे एक उत्कृष्ट उदाहरण असल्याचे मानले जाते. भूमीगत जल वापर आणि जल व्यवस्थापनाचा हा अजोड नमुना असल्याचे मत युनेस्कोने व्यक्त केले आहे. त्यामुळेच यूनेस्कोने या राणीच्या विहिरीला २०१४ मध्ये वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये स्थान दिलंय. रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून नवीन १०० रूपयांची नोट जारी केली गेली. या नोटेच्या मागच्या बाजूला राणीच्या विहिरीचा फोटो देण्यात आला आहे. या फोटोचा वापर देशाची संस्कृती दर्शवण्यासाठी नोटेवर करण्यात आला आहे.
राणीच्या विहिरीची निर्मिती
रानी की वाव इ.स. १०६३ मध्ये राणी उदयमतीने आपला दिवंगत पती राजा भीमदेव याच्या स्मरणार्थ बांधली होती. सुमारे सात शतके ही मौल्यवान वास्तू सरस्वती नदीचे पाणी आणि गाळात रूतलेली होती. १९८० च्या दशकात भारतीय पुरातत्त्व खात्याने या विहिरीचे उत्खनन केले असता ही सातमजली खोल, पायऱ्यांची आणि कलाकुसरीचे नक्षीकाम केलेली विहीर अतिशय उत्तम स्थितीत सापडली होती.
विहीर नव्हे प्रेमाचे प्रतीक
राणीची ही विहिरीच्या रचनेने जगभराला आश्चर्यचकित केले आहे. १०-११ व्या शतकात याची निर्मिती सोळंकी राजवंशाच्या राणी उदयमती यांनी त्यांचे पती भीमदेव यांच्या स्मरणार्थ केली होती. त्यामुळे याला प्रेमाचे प्रतिकही म्हटले जाते. राजा भीमदेव हेच सोळंकी राजवंशाचे संस्थापक होते. त्यांनी वडनगर (गुजरात) वर १०२१ - १०६३ या काळात राज्य केले.
वास्तूरचना - कलाकृती
राणीच्या या विहिरीची वास्तुकला अत्यंत अनोख्या पद्धतीची आहे. पायऱ्या सरळ आहेत. पण, त्यावरील कोरीव काम वैशिष्ट्यपूर्ण आहे. सुमारे ६४ मीटर लांब आणि २० मीटर रुंद असणारी ही विहीर २७ मीटर खोल आहे. या विहिरीच्या निर्मितीसाठी नक्षीकाम केलेल्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. विहिरीतील खांब आणि त्यावर कोरलेल्या कलाकृतींमध्ये अजूनही सोळंकी वंश आणि विष्णूच्या विविध अवतारांची रुपे यांची चित्रे कोरण्यात आली आहेत. त्यातून तत्कालीन संस्कृतीचे दर्शन होते. विहिरीच्या भिंतीवर लावण्यात आलेल्या खुंटीही अत्यंत आकर्षक आहेत.
भुयार
सरस्वती नदीच्या तटावर असलेल्या या विहिरीत एक छोटे दारही आहे. त्याठिकाणापासून ३० किलोमीटर लांबीचे भुयार आहे. मात्र, हे भुयार काही ठिकाणी दगड, चिखलामुळे बंद झाले आहे. राणी उदयमतीनेच ते बंद केले होते, असे म्हटले जाते. पाटणच्या सिद्धपूर शहरात हे भुयार निघते. युद्धाच्या काळात पळण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली होती. त्याची माहिती केवळ राणी व तिच्या विश्वासू सहकाऱ्यांनाच होती. अशाप्रकरची देशातील ही एकच विहीर असल्याचे बोलले जाते.
पोस्ट - श्रीकांत माने यांच्या वॉलवरतून साभार
No comments:
Post a Comment