सोलापुरातील " भुईकोट किल्ला "
सोलापूर शहरात भुईकोट प्रकारचा किल्ला आहे. हा किल्ला 'सोलापूरचा भुईकोट किल्ला' म्हणून ओळखला जातो. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक ४ डिसेंबर, इ.स. १९३० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
मध्यकालीन इतिहासामध्ये सोलापूरच्या किल्ल्याला महत्वाचे स्थान प्राप्त झाले होते. बहमनींच्या राज्याची शकले उडाल्यावर त्यातून पाच शाह्या निर्माण झाल्या. या पाच शाह्यांनी आपली वेगळी चूल मांडली. या पाचही राजवटीच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूरचे भौगोलिक स्थान होते. त्यामुळे सोलापूरचे महत्त्व वाढले.
1) इतिहास :- बाराव्या शतकात बांधलेले हा भुईकोट किल्ला सिध्देश्वर तलावाच्या काठावर वसलेला आहे. इतिहासप्रेमींनी , अभ्यासकांनी व होसी पर्यटकांनी आवर्जुन भेट द्यावी असा हा किल्ला आहे. दुसरे बाजीराव पेशवे, सातारचे छत्रपती प्रतापसिंह भोसले १८१८ मध्ये १ महिने येथे राहिले होते. माहिती नुसार सोलापूरचा किल्ला हा श्रीकांत यांनी १७१९ साली आपल्या प्रज्ञा साठी बांधला. काहींच्या मते हिंदू राजांच्या काळात बांधलेल्या या किल्ल्याभोवती महमूद गावान याने दुसरी तटबंदी बाहेरून बांधून किल्ला अभेद्य केला. महमूद गावान हा बहमनी सुलतान महंमदशाह याचा दिवाण होता.
इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार असलेला सोलापूरचा किल्ल्या अनेक राजवटीचे आश्रय स्थान होता. या ऐतिहासिक घटनांमध्ये एक गमतीशीर मजाही आहे. ती म्हणजे 'सोलापूरचा किल्ल्ला' हा लग्नामध्ये हुंडा म्हणून दिल्याची नोंद आहे. ही नोंद एकदा नाही तर दोन वेळा आहे.
अहमदनगर येथे बुऱ्हाण निजामशहा गादीवर होता. तर, विजापूर येथे इस्माईल आदिलशहा सत्तेवर होता. त्यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले होते. हे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने एक विवाह संबंध घडवून आणण्यात आला. आदिलशहाच्या कन्येला बुऱ्हाण निजामशहाला देऊन हा लग्नसमारंभ धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. हा विवाह सोलापूरच्या किल्ल्यामध्ये झाला. त्यावेळी म्हणजे, इ.स. १५२३ मध्ये हा किल्ला विजापूरच्या ताब्यात होता. जावयाला हुंडा म्हणून 'सोलापूरचा किल्ला' देण्याचे आदिलशहाने जाहीर केले होते. पण विवाहानंतर आदिलशहाने हा किल्ला देण्याचे नाकारले. त्यातून पुढे निजामशहा आणि आदिलशहा यांच्यात युद्धही झाले. या युद्धात जावई निजामशहाचा पराभव झाला. दुसऱ्यावेळी इ.स. १५५२ मध्ये अहमदनगरची राजकन्या चांदबिबी अली आदिलशहाला देण्यात आली. तर अली आदिलशहाची बहीण हदिया सुलताना हिचा विवाह मुतर्जा निजामशहाशी करण्यात आला. तेव्हा मात्र कबूल केल्याप्रमाणे निजामशहाने हा किल्ला विजापूरच्या सुलतानाला हुंडा म्हणून दिला.
सोलापूरचा किल्ला बहमनी, आदिलशाही, निजामशाही नंतर मोगल सत्तेत आला. औरंगजेबाच्या कारकिर्दीत त्याचा बराच काळ या किल्ल्याच्या परिसरात गेला. पुढे हैदराबादच्या निजामाच्या आणि नंतर मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला गेला.
सोलापूरचा भुईकोट म्हणजे तर दुर्गबांधणीतले एक बुलंद असे रूप आहे. विजापूर, बेळगाव, मिरज, बिदर, नळदुर्ग, औसा, परंडा या दुर्गशंृखलेतील हा एक जणू भक्कम बुरूजच आहे.
शहरात शिरल्याबरोबर मधोमध वसलेला हा गड आपले लक्ष वेधून घेतो. दुहेरी तटबंदी, त्याभोवती खंदक आणि खंदकानंतर पुन्हा तट, अशी चिलखती रचना असलेला हा एक भक्कम कोट! अशा या गडात शिरण्यासाठी उत्तरेकडून मूळ मार्ग होता. मात्र आज तो बंद केल्याने पश्चिमेकडील नव्या मार्गानेच गडात दाखल व्हावे लागते. पहिला तट, मग खंदक आणि त्यानंतर ती दुहेरी तटबंदी ओलांडतच आत शिरायचे. आत शिरताना भुईकोटाच्या या अजस्र रूपाचेच मनावर दडपण येत असते. ते मुस्लीम दुर्गस्थापत्यातील भरभक्कम बुरूज, त्याच्यावरचे ते आक्रमक सज्जे, मारगिरीच्या जागा हे सारे इतिहासकाळाचे दडपण वाढवते. आत गेल्या गेल्याच समोरच ब्रिटिशांच्या दोन प्रचंड आकारांच्या तोफा आपले स्वागत करतात. या तोफा पाहातच ही बुलंद वास्तू पाहण्यास सुरुवात करायची.
कोकणातून महाड मार्गे दक्षिणेत विजापूर, बिदरच्या दिशेने येणाऱ्या राजमार्गावर सोलापूर हा इतिहासकाळापासून एक महत्त्वाचा थांबा आहे. त्याच्या या महत्त्वामुळेच साधारणपणे चौदाव्या शतकात बहमनी राजवटीत सोलापुरात ही बुलंद वास्तू आकारास आली. पुढे त्यात आदिलशाही, निजामशाहीपासून ते थेट मराठय़ांपर्यंत अनेक राजवटींनी आपापल्या गरजा-सोयीनुसार बदल केले. आदिलशाही आणि निजामशाहीच्या तर अगदी सरहद्दीवर हा भुईकोट! यामुळेच या शाही फौजांमध्ये या गडावरूनच अनेकदा लढाया झाल्या. शेवटी लढाईचे मैदान ठरणारा हा किल्लाच पुढे या दोन शाही राजवटींच्या मनोमिलनाचे स्थळही ठरला! साठ वर्षांचा संघर्ष थांबवत इसवी सन १५२३मध्ये याच किल्ल्यात निजामशाह आणि आदिलशाहमध्ये मैत्रीचा तह झाला. या तहात आदिलशाहने आपली मुलगी मरिअमचा विवाह बुऱ्हाण निजामशाहशी लावला. पुढे १५५२मध्ये पुन्हा निजामशाहची कन्या चांदबिवी हिचा विवाह अली आदिलशाहबरोबर, तर आदिलशाहची कन्या हादिया सुलताना हिचा विवाह मूर्तझा निजामशाहबरोबर याच किल्ल्यात झाला. या शाही विवाहांनी तेव्हा हा किल्ला गाजला होता. पुढे दक्षिण मोहिमेवर आलेल्या औरंगजेबानेही हा किल्ला घेत काही काळ इथे मुक्काम ठोकला होता. यानंतर यथावकाश मराठय़ांचेही या किल्ल्यावर वर्चस्व प्रस्थापित झाले आणि शेवटी याच किल्ल्याने १४ जून १८१८ रोजी मराठेशाहीचा शेवटही पाहिला! गतकाळातील हा सारा घटना-घडामोडींचा इतिहास लक्षात घेतला, की हे तटबुरूजही आपल्याला सहाशे वर्षे मागे घेऊन जातात आणि मग या चिऱ्यांनाही एक अर्थ प्राप्त होतो.
या गडदर्शनासाठी आतील बाजूने चालत अगदी प्रथम उत्तरेकडील दरवाजात हजर व्हावे. आज हा मार्ग जरी बंद झालेला असला तरी दुर्गदर्शनासाठी इथूनच सुरुवात करावी. या दरवाजाच्या पुढय़ात असलेल्या खंदकावर आता काही वर्षांपर्यंत एक लाकडी काढघालीचा पूल होता. या पुलावरून या पहिल्या दरवाजात पूर्वी यावे लागे. या दरवाजातूनच आत शिरताना एक मोठा साखळदंड आणि दोन मीटर व्यासाची मोठी गोल कडी दिसते. या पहिल्या दरवाजाच्या अंगावर जागोजागी पोलादी खिळे ठोकलेले असल्याने या दरवाजाला ‘खिळा दरवाजा’ असे म्हणतात. काही वर्षांपर्यंत याच दरवाजातून गडात प्रवेश व्हायचा, पण आता हा दरवाजा बंद केलेला आहे. गोमुखी रचना, भोवताली आक्रमक बुरूज आणि आत शिरण्यासाठी मोठय़ा दरवाजाला दिंडी ठेवलेली! असा हा दरवाजा इसवी सन १८१० मध्ये दुरुस्त केल्याचा उल्लेख असलेला एक पितळी लेख या दरवाजावर होता अशी नोंद आहे. पण सध्या तो दिसत नाही. या दरवाजाच्या बाहेरील बाजूस नागबावडी नावाची एक भलीमोठी बारव आहे.
या दरवाजातून आत आलो, की एकापाठी एक दोन दरवाजे लागतात. त्यांची बांधणी- शैली बऱ्यापैकी सारखी आहे. पैकी मधल्याचे नाव ‘शहर’ किंवा ‘मधला दरवाजा’ तर त्यानंतरच्या महाकाली देवालयाजवळचा महाकाली दरवाजा! या दोन्ही दरवाजांवर मनोऱ्यांचे तोरण आहे. तटबंदीवरच्या पाकळय़ांच्या कमानी, बुरुजांवर बाहेर आलेले सज्जे आणि दरवाजावरचे हे मनोरे हे सारे मुस्लीम स्थापत्याचे खास वैशिष्टय़! या दोन्ही दरवाजांवर शरभांची शिल्पे बसवलेली आहेत. वाघ आणि घोडा किंवा बैल यांचे मिश्रण असलेला हा काल्पनिक पशू! या शरभाच्या जोडीच्या मधोमध दोन्ही दरवाजांवर फारसी लिपीतील शिलालेखही आहेत. या शिलालेखांनुसार हे दरवाजे अली आदिलशाह दुसरा याने बांधले आहेत. तिसऱ्या दरवाजातून आत जाताच देवडीवर आणखी एक फारसी शिलालेख दिसतो. गडावर असे एकूण दहा शिलालेख असून त्यापैकी सहा फारसी, तीन देवनागरी, तर एक मोडी लिपीत आहे. तीन दरवाजांच्या या मालिकेदरम्यान चौकीच्या देवडय़ा, दारूगोळय़ांची कोठारे आहेत. शिबंदीची घरे, विहिरी-आडही जागोजागी दिसतात. दुसऱ्या दरवाजाशेजारील बुरुजावरच ढालकाठीची रचना आहे.
तिसऱ्या दरवाजानंतर आपण पुन्हा गडात येतो. आतमध्ये भलेमोठे पटांगण आहे. या जागेवर कधीकाळी तीनशेहून अधिक इमारती असल्याची नोंद आहे. पण सध्या यापैकी मल्लिकार्जुन मंदिर, बत्तीस खांबांची एक प्राचीन इमारत आणि काही धान्य व दारूगोळय़ाची कोठारे एवढय़ाच वास्तू दिसतात. यापैकी आपले लक्ष स्थिरावते ते डाव्या हाताच्या मल्लिकार्जुन मंदिरावर! नक्षत्राकृती भूमीज पद्धतीचे हे मंदिर आज उद्ध्वस्त रूपातच समोर येते. पण त्याच्या उपलब्ध अवशेषांवरून मंदिराची एकेकाळची भव्यता आणि कोरीव श्रीमंती स्पष्ट होते. आज शिल्लक असलेल्या तळाच्या अवशेषांवर व्याल व अन्य प्राण्यांचे थर, विविध भौमितिक रचना आणि काही मैथुन शिल्पे दिसतात. हेमाडपंती शैलीतील हे मंदिर बाराव्या शतकात येथील योगी सिद्धरामेश्वरांनी बांधल्याचे सांगितले जाते.
या मंदिराशेजारीच बत्तीस खांबांची एक ऐतिहासिक इमारत आहे. या स्तंभांवरील कोरीव काम, त्यावरील विषय, शैली पाहता हे खांब मूळ मल्लिकार्जुन मंदिराचेच असल्याचे वाटते. या इमारतीचा तत्कालीन उपयोग लक्षात येत नाही. पण पुढे धान्याचे कोठार आणि ब्रिटिशांच्या काळात दारूचे कोठार म्हणून उपयोग झाल्याची नोंद आहे.
गडातील या दोन महत्त्वाच्या वास्तू पाहात पूर्व तटावर आलो, की गडाला या बाजूने वेढा घातलेला सिद्धेश्वर तलाव त्याचे अथांग रूप घेऊन आपल्यापुढे प्रगटतो. एवढा वेळ एखादा बुलंद भुईकोट वाटणारा हा किल्ला या दर्शनानंतर एकदम जलदुर्गच वाटू लागतो. तलावाच्या या पाण्यातच उभी राहिलेली या बाजूची तटबंदी, भोवतीचे पाणी, त्यातली छोटी बेटे, सिद्धरामेश्वराचे मंदिर, नारळाची झाडे हा सारा देखावा मनाला भावतो. सोलापुरात असतानाही कुठेतरी कोकणात असल्यासारखे वाटते. हा देखावा पाहातच तटावरून गडप्रदक्षिणा सुरू होते. वाटेत बाळंतिणीची विहीर लागते. पुढे एक सज्जा असलेली खोली आणि त्याच्या पुढय़ातील तलाव दिसतो. वाटेत दुहेरी तटबंदीतील मोठमोठे बुरूज धडकी भरवत असतात. यापैकी काहींची हनुमान, निशाण, महाकाली, दर्गोपाटील अशी नावेही समजतात. या तटावर जागोजागी हिंदू शिल्पेही दिसतात. ही शिल्पेदेखील मूळची मल्लिकार्जुन मंदिराची वाटतात. दोन-तीन तासांत हा कोट पाहून होतो आणि आपण पुन्हा त्या तोफांच्या सलामीसाठी हजर होतो.
गडाचे हे भलेमोठे आवार आता काही वर्षांपर्यंत एक खिंडार होते. पण येथील महापालिकेने यात लक्ष घातले आणि हा सारा परिसर साफसूफ होऊन तेथे आता एक उत्तम उद्यान फुलवलेले आहे. सुपारीची उंच गेलेली झाडे, अन्य वृक्ष-वेली, फुलझाडे आणि गवताचे पट्टे, नाचणारी कारंजी, फिरण्यासाठी बांधीव पायवाटा, बसण्यासाठी ओटे, दिवाबत्तीची सोय असे हे सारेच दृश्य धक्के देत असते.
( वरील माहिती ही विकिपीडिया आणि लोकसत्ता यांच्या ब्लॉग वरून घेतली आहे