पुण्याचा मानबिंदू - 'पर्वती' :
भाग १
पोस्तसांभार : http://smarangatha.blogspot.com/2016/11/blog-post.html#more
स्मशानवासी, विघ्नविळासी, विभवविनाशी उमापती,
सपार्वती ज्या वसे पर्वती, तया पर्वती जन म्हणती,
धनी शिकंदर, विलास सुंदर, राज्यधुरंधर नानांनी,
पुण्यग्रामा रूपा आणुनि, केली आपुली नृपधानी!
शौर्यशालिना, समरखेलिना, महाराष्ट्रभू
हृदयमणी,
पुण्यपुरी ही भली वसविली, दख्खनची म्हणती राणी,
भयात संजीवनी मानिनी, मर्द मराठ्यांची जननी,
सुहासिनी सद्भाग्यशालिनी लावण्याची
नवखाणी!!
पुण्याच्या नैऋत्येस एका टेकडीवर पर्वताई
म्हणजेच पर्वती देवीचे पुरातन मंदिर होते. पर्वताईचा डोंगर किंवा पर्वतीचा डोंगर
या नावाने ती टेकडी ओळखली जाई. समुद्र सपाटीपासून साधारण २००० फूट उंच हि टेकडी
आहे. पर्वती देवी हि एक जागृत देवता आहे, अशी श्रीमंत पेशव्यांसकट सगळ्या गावकऱ्यांची श्रद्धा
होती.
चिमाजीआप्पांनी फार बिकट अशी वसईची मोहीम
फत्ते केल्यावर त्या शौर्याचे कौतुक म्हणून श्रीमंत बाजीराव साहेबांनी नवीन मंदिर
बांधुन तिथे पर्वताई देवीची चांदीची मूर्ती बसविण्याचे आदेश खासगीवाल्यांना दिले
आणि ते दिल्लीच्या मोहिमेस निघुन गेले. त्यातच वाटेत त्यांचा रावेरखेडी मुक्कामी
मृत्यू झाला आणि पुढे काही महिन्यांनीच चिमाजीआप्पांचा हि मृत्यू झाला. या
दुर्दैवी घटनांमुळे मंदिराचे काम राहुन गेले.
पुढे काही वर्षांनी १७४३ साली देवीवर
असलेल्या श्रद्धेपोटी देवीचे मंदिर बांधण्याचा संकल्प सोडला. त्या सोबतच एक
देवदेवेश्वराचे मंदिर, विष्णूचे एक छोटे मंदिर,
तटबंदी सह नगारखाना आणि मंदिर प्राकार बांधण्याची आज्ञा त्यांनी
जिवाजी खासगीवाल्यांना दिली. टेकडीवर मुबलक पाण्याचा साठा असावा यासाठी जयाजी
शिंदे यांना एक तळे बांधण्याची आज्ञा नानासाहेबांनी केली. त्यात देवदेवेश्वराच्या
देवालयाची रचना अशी केली गेली कि वर्षातल्या ज्या दिवशी दिवस आणि रात्र समान असतात,
अशा दिवशी सूर्यकिरणे थेट देवदेवेश्वरावर येतात. हे संपूर्ण बांधकाम
१७४५ साली पूर्ण झाले. या सर्व बांधकामाचा खर्च नानासाहेबांनी सेनापती यशवंतराव
दाभाडे यांच्यावरील जप्तीत मिळालेल्या पाच कोटी रुपयातून केला.
साधारण १७४६- ४७ साली मंदिरांमध्ये स्थापन
करण्यासाठी देवीची ३ फूट उंचीची आणि २ मण वजनाची सोन्याची हिरेजडीत मूर्ती तयार
करण्यात आली. या सोबतच देवदेवेश्वराची चांदीची २ मण वजनाची चांदीची आणि गणपतीची
दीड मण वजनाची चांदीची मूर्ती तयार करण्यात आली. देवांसाठी स्वतंत्र दागिने
बनविण्याची आज्ञा गोपाळराव बर्वे यांना नानासाहेबांनी दिली आणि त्यानुसार
बरव्यांनी ते दागिने कारागिरांकडून त्यांना शनिवारवाड्यातच एका बंद खोलीत बसवुन
बनवून घेतले.
दोन वर्षांनी १७४९ साली नानासाहेबांनी
सर्व मूर्तींची विधिपूर्वक स्थापना केली आणि मंदिराच्या कळसांना १००० तोळे सोने
चढविले. त्यात ९००० रुपये खर्च आला होता. त्यानंतर परत नानासाहेबांनी पर्वती
देवीची जुनी पाषाणातील मूर्ती मंदिरात स्थापन केली आणि देवदेवेश्वर मंदिराच्या
आवारात शिवपंचायतन स्थापन केले. १७५० साली आणखी एक मंदिर पेशव्यांनी बांधले आणि
त्यात छत्रपती शाहू महाराजांच्या पादुका निष्ठेने स्थापन केल्या. त्याच दरम्यान
श्रावण मासातील देकारांसाठी एक वेगळी वास्तू नानासाहेबांनी पर्वती पायथ्याला
बांधली. त्यात एका वेळी ४०००० ब्राह्मण राहू शकतील, इतकी ती वास्तू मोठी होती. ती वास्तू म्हणजेच 'रमणा'!
पुढे नानासाहेबांच्या नंतर थोरले
माधवरावांच्या काळातही पर्वती वर बरेच बदल झाले. ते पुढच्या भागात पाहूया.
- © श्रेयस पाटील
No comments:
Post a Comment