पुण्याचा मानबिंदू - पर्वती :
भाग २
पोस्तसांभार : http://smarangatha.blogspot.com/2016/11/blog-post_27.html#more
सन १७५१ साली जिवाजी खासगीवाल्यांना
श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी पर्वती पायथ्याला 'रमणा' बांधण्याची आज्ञा केली. यासाठी पायथ्याला
असलेले मैदान रमण्याच्या बांधकामासाठी निवडण्यात आले. या मैदानात साधारण ४००००
ब्राह्मण मावतील इतका तो सुसज्ज असावा, असा आराखडा तयार केला
गेला. त्या मैदानात मग ५०० फूट × ५०० फूट अशी भव्य तटबंदी
उभी केली गेली. त्याला नानासाहेबांनी ५ दरवाजे करण्याची सूचना दिली. त्या सोबतच
तटबंदीतच ओवऱ्या बांधल्या गेल्या. मध्ये अंगण, कोठी, हौद, मुदपाकखाना, पुजा वगैरे
नित्य कर्मांसाठी स्वतंत्र खोल्या बांधल्या गेल्या. असा सर्व सोईंनी युक्त 'रमणा' १७५४ साली पूर्ण झाला आणि त्याच वर्षी पासून
श्रावणातील देकर रमण्यात देण्यात येऊ लागले.
१७५१ साली रमणा बांधण्याची सूचना
खासगीवाल्यांना देऊन नानासाहेब निजामाविरुद्धच्या लढाईसाठी निघून गेले. आपण
पुण्यात नसताना निजामाने उलट हल्ला करून पर्वतीची व देवतांची विटंबना, चोरी करू नये, म्हणुन सर्व
मूर्ती व मौल्यवान साहित्य त्यांनी सिंहगडावर सुरक्षित स्थळी हलविले. तेव्हापासून
सर्वच पेशव्यांनी हे धोरण अवलंबिले. १७५४ साली नानासाहेबांनी पर्वतीवर एक वाडा
बांधायला घेतला. याला 'सरकारवाडा' म्हणत.
त्याच वर्षी त्यांनी पर्वतीवरील देवतांच्या पूजेसाठी वर्षासने लावुन दिली आणि
इतरही सर्व व्यवस्था केली. त्यानंतर त्यांनी विष्णूची शालिग्रामची मूर्ती तयार
करवुन घेतली आणि १७५८ साली ती तयार होऊन तिची प्रतिष्ठा विष्णूच्या मंदिरात
करण्यात आली. यासाठी नानासाहेबांनी नेपाळहुन तेथील राजा जागोरथी यांच्याकडून ती
शिळा मागवली.
१७५५ साली रघुनाथराव दादांनी सरकार
वाड्याच्या नैऋत्येला कार्तिकेय स्वामींचे मंदिर बांधले आणि त्या मंदिरात
कार्तिकेयाची मूर्ती स्थापन केली. या मंदिरात स्त्रियांना प्रवेश त्या काळीही
निषिद्धच होता. १७५८ सालापासून दर एकादशीस स्वतः नानासाहेब विष्णूच्या पूजेसाठी
येऊ लागले व पुढे त्यांचे येणे वाढले. नानासाहेबांची पर्वती ही आवडती जागा बनली.
१७६१ सालापर्यंत नानासाहेबांनी विविध बांधणी करून पर्वतीची शोभा वाढवली. त्यांचा
पर्वतीवरच मृत्यू झाला. त्यांच्या नंतर थोरले माधवराव पेशवे झाले
आणि त्यांनी लगेच त्याच वर्षी देवदेवेश्वराच्या मंदिरातील शिवपंचायतन काढुन, देवदेवेश्वराच्या प्रदक्षिणा मार्गावर त्यांची
वेगवेगळी मंदिरे बांधून त्यात त्यांची मनोभावे स्थापना केली. विष्णू मंदिरावरही
त्यांनी सोन्याचा कळस केला.
या नंतर एकाच वर्षानी एक दुर्दैवी घटना
घडली. १७६३ मध्ये माधवराव मोहिमेवर पुण्याबाहेर असताना निजामाने पुणे लुटले आणि
त्यात त्याने देवी आणि गणपती या दोन्ही मूर्ती चोरून नेल्या. पुढे खूप शोध घेऊनही
त्या सापडल्या नाहीत. कार्तिकस्वामींच्या मूर्तीचीही त्यांनी विटंबना केली.
त्यामुळे माधवरावांनी नवीन मयुराधिष्ठित कार्तिकेयाची मूर्ती बनवून घेण्याची आज्ञा
त्यांनी कारभाऱ्यांना केली. देवदेवेश्वराचीही शाळुंका नाना फडणवीसांनी
माधवरावांच्या आज्ञेने बनवून तिची विधिपूर्वक स्थापना केली. १७६५ साली कर्नाटक
मोहिमेवर असताना चंदावरकर भोसल्यांनी माधवरावांना ५ लाख रुपये किमतीची सोन्याची
गजाननाची मूर्ती भेट दिली. मात्र मोहिमेत ती न देता सवडीने शनिवारवाड्यात
पाठवण्याचे ठरले. ती त्यांनी १७६६ साली पाठवली व माधवरावांनी त्याचा स्वीकार करून
ती गजाननाची मूर्ती पर्वतीवर स्थापन केली. त्याच वर्षी कार्तिकेयाचीही मूर्ती तयार
होऊन तिचीही स्थापना केली गेली. १७६७ साली सर्वच्या सर्व मंदिरांचे कळस
नानासाहेबांनी सोन्याचे करविले. यामुळे पर्वतीची शोभा वाढली आणि तिचा नावलौकीक
सर्वत्र झाला.
थोरल्या माधवरावांच्या मृत्यू नंतर सवाई
माधवरावांनी ही कार्तिक स्वामींच्या मूर्तीला भेग पडल्याचे पाहून १७८७ साली नवीन
मूर्तीची स्थापना केली. पुढे १७९१ पर्यंत काही बदल पर्वतीवर सवाई माधवरावांनी केले
नाहीत. मात्र त्या वर्षी मंदिरावर वीज पडली आणि मंदिराचे खूप नुकसान झाले. पण
मूर्तीला काहीही धक्का पोहोचला नव्हता. तरीही सवाई माधवरावांनी नवीन मूर्ती
घडविण्याचे आदेश दिले आणि मंदिर दुरुस्त झाल्यावर त्यात कार्तिकस्वामींच्या नवीन
मूर्तीची स्थापना केली गेली. १७९५ साली सवाई माधवरावांचा मृत्यू झाल्यावर पुन्हा
१७९६ साली मंदिरावर वीज पडली पण त्यात काही नुकसान झाले नाही.
पुढे शेवटचे बाजीराव यांनी पेशवे झाल्यावर
पर्वतीवरील सर्व ७ देवस्थानांच्या नित्यपूजेसाठी स्वतंत्र पुजारी नेमले. त्यांच्यासोबतच
एकूण १५० लोक व्यवस्थेसाठी लाऊन दिले. पर्वती वरच्या सर्व देवतांचे आणि मौल्यवान
वस्तूंचे रक्षण करण्यासाठी २५ जणांची सशस्त्र तुकडी २४ तास त्यांनी तैनात केली.
पुढे वरती चढुन जायला त्रास होऊ नये म्हणुन त्यांनी पायथ्यापासून वरपर्यंत एकूण
१०८ पायऱ्या बांधल्या.
१८१७ साली इंग्रज मराठा युद्धावेळी
पांडुरंग बापट या पुजाऱ्यांकरवी सर्व मौल्यवान वस्तू आणि दागिने वगैरे साहित्य
सिंहगडावर हलविले. पण इंग्रजांनी सिंहगड जिंकून घेतले आणि सगळं काही लुटून नेले.
पर्वती वरील मूर्तीही त्यांनी लुटून नेल्या. आता फक्त सोन्याची गणपती व पार्वतीची
मूर्ती शिल्लक राहिली. मात्र त्याही १९३२ साली चोरीला गेल्या आणि पर्वती पोरकी
झाली. पुढे १९३६ साली सगळ्या पंचधातूच्या मूर्ती करून त्या बसविल्या गेल्या आणि
पर्वतीचे वैभव पुन्हा तिला प्राप्त झाले.
पेशवाईतील अनेक महत्वाच्या घटना पर्वतीवर
घडल्या. एका साध्या टेकडीपासून सुरु झालेला पर्वतीचा 'विकास' खरंच उल्लेखनीय आहे. आजही
ही सह्याद्रीच्या रंगांच्या मध्ये असलेली पर्वती, 'सुहासिनी
सद्भाग्यशालिनी, लावण्याची नवखाणी' होऊन
'दख्खनची राणी' शोभावी, या प्रमाणे उभी आहे आणि 'पुण्याची मानबिंदू' म्हणून पुणेकरांना, पर्यटकांना आकर्षित करते आहे!
- © श्रेयस पाटील
- © श्रेयस पाटील
No comments:
Post a Comment