Followers

Monday, 29 April 2019

अजिंठा’





अजिंठा’ हे नाव आहे उंच पाषाण कड्यात कोरलेल्या प्राचीन बौध्द लेणी समुहाचे. अजिंठा नामक गावाच्या अगदी समीप असल्याने या लेण्यांचे नाव पडले अजिंठ्याची लेणी. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजांच्या पलटणीतल्या काही सैनिकांना अजिंठा गावा जवळ या लेण्यांचा अचानक शोध लागला आणि मागील अनेक शतकं अज्ञातात गेलेला हा प्राचीन लेणी समूह, आधुनिक जगाला ज्ञात झाला. अजिंठ्याच्या लेणी समुहात एकूण तीस लेणी आहेत, त्यात काही चैत्यलेणी आहेत, तर इतर विहार लेणी. इथले विहार, चैत्यगृहं म्हणजे अखंड पाषाणातील प्रमाणबद्ध स्थापत्यकलेचा आणि प्राचीन चित्रकलेचा उत्तम नमून आहेत, हे पहाता क्षणीच ध्यानात येतं. जगभर ‘अजिंठ्याचीलेणी’ या नावाने हा प्रसिध्द असलेला लेणी समूह आज ‘यूनेस्को’च्या (United Nations Educational Scientific and Cultural Organization) जगातील महत्वाच्या वारसा यादीत जागतिक वारसा म्हणून घोषित झालेला आहे.
वाघुर नदीच्या प्रवाहाने नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या प्रचंड खोल घळीच्या अर्धगोलाकार उभ्या पाषाणकड्याच्या कोंदणात, चंद्र्कोरीत गुंफल्या प्रमाणे या लेण्या कोरलेल्या दिसतात. सभोवतालच्या डोंगरदरीतून फुललेल्या निसर्गाच्या भाळी बांधलेल्या तोरणा सारखा शोभून दिसावा असा हा अजिंठ्याचा लेणी समूह. या लेणींचे केवळ दुरून होणारे दर्शन, नयन रम्य तर आहेच, शिवाय मंत्र मुग्ध करणारे देखील आहे. सातवाहन आणि त्यानंतर उदयाला आलेल्या वाकाटक राजवटीच्या काळात कोरल्या गेलेल्या या लेण्या बौध्दांच्या प्रमुख पंथांना समर्पित आहेत. अशा या प्राचीन लेण्यांचा आपल्या अर्वाचीन जगाला शोध लागला त्या दिवसाला आज दोनशे वर्ष होत आहेत.
एकोणिसाव्या शतकाचा पूर्वार्धात इंग्रज लष्कराची एक पलटण ‘मद्रास आर्मी’ चा तळ सध्याच्या औरंगाबाद जिल्यातील ‘अजिंठा’ गावात पडलेला. एक दिवस पलटणीतले काही गोरे शिपाई शिकारी साठी निघाले; आणि अजिंठ्याच्या नजीकच, घनदाट जंगलांनी व्यापलेल्या अर्ध वर्तुळाकार आकाराच्या प्रचंड खोल घळीत उतरले. शिकारीच्या शोधात त्यांना कड्यात कोरलेल्या काही गुहा दिसल्या. त्यातले काही शिपाई धाडस करून एका लेणीत गेले. आत जाताच त्यांना सलग पाषाणात कोरलेले काही स्तंभ दिसत होते. त्या अष्टकोनी स्तंभांवर चित्रे देखील चितारलेली दिसत होती. त्यातल्या जॉन स्मिथ नावाच्या एका हुशार गोऱ्या सैनिकाने, समोर असलेल्या स्तंभावरच्या चित्रावर, इंग्रजी अक्षरात स्वतःचे नाव, पलटण व तारीख लिहिली ‘जॉन स्मिथ’ २८ कॅव्हलरी २८ एप्रिल १८१९.
जॉन स्मिथने लिहिलेली ती तारीख अजिंठा लेण्यांच्या इतिहासात महत्वाची ठरली आहे. का तर सातव्या, आठव्या शतकात विस्मृतीत गेलेला एक मोठा आणि महत्वाचा बौध्द लेणी समुह, या दिवसा पासून आधुनिक जगाला नव्याने ज्ञात झाला म्हणून. बहुदा सातव्या शतकात भारतात आलेल्या प्रसिद्ध चीनी यात्रेकरू हुएन-त्सांगनी नोंद करून ठेवलेला महाराष्ट्रातील हा प्राचीन बौद्धलेणींचा समुह पुन्हा प्रकाशात आला होता, थेट एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात; तब्बल बाराशे वर्षांनी.
अजिंठ्याच्या लेण्यांचा शोध तसा अचानकच लागला, असे जरी म्हणता येत असले, तरी स्थानिक लोकांस या गुहांची माहिती नक्कीच होती. अजिंठा गावच्या एका गुराख्याने त्या सैनिकांस अजिंठागावा पासून जवळच असलेली शिकारीची संभावित जागा दाखवली होती. स्थानिक समजुती नुसार हि जागा म्हणजे अजिंठा गावाच्या मागच्या बाजूस असलेले सध्याचे ‘अजिंठा व्हयूपॉईंट’ नावाचे ठिकाण होय. या ठीकाणाहुन खाली खोल वर्तुळाकार घळीच्या कड्यात दडलेल्या त्या सर्व लेण्यांचे दर्शन होते. इथूनच डावीकडे, काळ्या कातळावरून वहाणारी अवखळ वाघुरनदी त्या प्रचंड खोल घळीच्या ओंजळीत कोसळते आणि हिरव्या निळ्या डोहातून उसळी घेत, अवखळ नागमोडी होत खळखळणाऱ्या प्रवाहात मुक्त होते.
आर्य शुराच्या जातक मालेतील ‘क्षान्ति जातक’ कथेतील एक श्लोक अजिंठ्याच्या लेणी क्र. २ मध्ये लिहिला आहे. ‘निवसन्ति हि यत्रैव सन्तः सद्गुणभूषणा:I तन्मड़ल्यं मनोज्ञं च तत्तीर्थ तत्तपोवनम् II४II’ सद्गुणांनी भूषित थोर संत, महंत निवासासाठी जे ठिकाण निवडतात, ती जागा मंगल, मनोहर होते. तेच तीर्थ तपोवन असते. अजिंठा गावाजवळ पशुपक्ष्यांनी समृद्ध असलेल्या त्या वनातील मुनीन्द्रनाथाला समर्पित असलेला, तिथल्या दिव्य लेणींचा निवास, त्या वनाचे तीर्थभूषण होता; त्या लेणींनी त्या वनाचे तपोवन केले होते.
खरे तर अजिंठा हि एक न संपणारी दृश्य कथा आहे. ही कथा आहे; भगवानबुद्धाच्या चरणांवर सर्वस्व वाहणाऱ्याची; ज्ञानयोगियांची, थेरांची, भिख्खूची, राजांची, त्यांच्या मंत्रीसेनापतींची, अमात्यांची, दानशुरांची, आणि सर्वसामान्यांच्या श्रद्धेची आणि त्या ‘अनामिक’ प्रतिभासंपन्न कलाकारांची. ज्यांनी सुगताच्याच म्हणजेच तथागत गौतम बुद्धांच्या प्रेरणेने आपल्या जवळील छिन्नी आणि कुंचल्याच्या सहाय्याने आपली प्रतिभा सजीव साकार करून, त्यांच्याच चरणी समर्पित करून, आजचे ‘अजिंठा’ नावाचे आश्चर्य निर्माण केले त्याची.
अजिंठा नावाचे ‘सुरेंद्रमौलिप्रभोपचित्’ सुरेन्द्राच्या तेजस्वी मुकुटा प्रमाणे असे विशाल सुगतालय साकार करून तथागतांच्या चरणी समर्पित करणाऱ्या त्या प्रतिभावंत कलाकारांची नावे-गावे कोठे लिहून ठेवलेली, कोरलेली आहेत का? तर याचे उत्तर नकारार्थीच मिळेल. इथेहि त्यांचे अनामिक रहाणेच दिसेल. किंवा अजिंठ्याच्या विहारांच्या भित्ती, चित्रांनी जेंव्हा सजत होत्या, तेंव्हा, म्हणजे पाचव्या, सहाव्या शतकातील बौध्द किंवा इतर साहित्यात कोठे या प्रश्नांची उत्तरे मिळतील का? तर तसेही दिसत नाही. परंतु त्यांना जाणून घेण्याच्या उत्सुकते पोटी मनात हा विचार आला की ‘ठीक आहे, त्या कलावंतांची नावे न कळू देत, पण असे विस्मयकारक काम करणाऱ्या त्या प्रतिभावंतांची समृद्ध कला परंपरा नक्कीच असली पाहिजे. कदाचित त्या परंपरेचा मागोवा घेतला तर तिथेच ते भेटतील. किंवा त्या परंपरेच्या धाग्यात एखादे आणखी एक आश्चर्य दडलेले आसवे ज्यातून अजिंठा नावाचे दुसरे आश्चर्य साकार झाले असावे. अर्थातच अजिंठ्या पासून प्रेरणा घेत मी निघालो, आणि पोहोचलो होतो ‘बुद्धो देवस्य सानिध्यौ यत्र धात्रा प्रपुजितःI चैत्यमत्युन्नतं यत्र नाना चित्रसुचित्रितंI’ आणि समोर .........................
२८ एप्रिल १८१९ पासून,,,,,, ‘अजिंठ्याच्या शोधाच्या शोधाला’ ...........
IIश्रीII

No comments:

Post a Comment