Followers

Friday, 26 April 2019

केंजळगड!

रायरेश्वराच्या पठारापासून साधारण पूर्वेला एका डोंगरसोंडेवर एक बुलंद किल्ला आहे. त्याचे नाव किल्ले

केंजळगड!

स्वराज्याच्या सीमेवरला हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता. अल्याड भोर परगणा जो माहाराजांचा ताब्यात होता आणि पल्याड वाई परगणा जो आदिलशीत होता,असा भू-राजनैतिक आणि लष्करी महत्व असलेला हा किल्ला ऐन राज्याभिषेकाच्या मुहूर्तावर शत्रूच्या ताब्यात असणं धोकादायक होतं.

म्हणूनच शिवरायांनी एक बेत ठरवला. अचानक हल्ला करून केंजळगड स्वराज्याच्या सेवेत दाखल करायचा. मोहिमेची आखणी झाली. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी बिनीची फौज आणि त्यावरील शिलेदार निश्चित झाले.शत्रू गाफील असताना रात्रीच्या मुहूर्तावर सुलतानढवा करून गडावर मोर्चे लावायचं पक्क झालं.

आता फक्त प्रश्न होता की या मोहिमेचे नेतृत्व कोण करणार? महाराजांच्या खाश्या खाश्या सरदारांना वाटत होतं की या मोहिमेची सुपारी आपल्यालाच मिळावी आणि हा किल्ला सर करून महाराजांची सरफराजी पाववावी..

अनेक तर्क लढवले जात होते..शेवटी भवती न भवती होऊन मोहिमेचा नेता निश्चित झाला...अर्थात ही गोष्ट ठराविक लोकांनाच माहीत असणे जरूर होत कारण एकूणच सारा मामला गनिमी काव्याचा होता. तेव्हा गुप्तता पाळणं फार गरजेचे होत.

कोण होता या मोहीमेचा प्रमुख?

मंडळी,

आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल..

स्वतः शिवाजी महाराजच या हल्ल्याचे नेतृत्व करणार होते..राज्याभिषेक केवळ 40 दिवसांवर आलेला असताना महाराज मोठं धाडस करायला तयार झाले होते. मला सांगा, आजचा कोणता नेता स्वतःचे प्राण असे धोक्यात घालायला तयार होईल?

पण शेवटी महाराज हे निश्चयाचे महामेरू होते.

Leading by Example या शिवरायांच्या गुणविशेषामुळेच आजवर स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटांमध्ये महाराजांच्या शूर मावळ्यांनी त्याना कायम साथ दिली होती आणि प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदानही देण्यासही त्यानी मागे पुढे पाहिलेले नव्हते!

रामदास स्वामींनी महाराजांची प्रशस्ती करताना म्हणलं आहे की राज्यसाधनेची लगबग कैसी केली ? याप्रसंगी त्या समर्थवचनाचा प्रत्यय येत होता.

राज्याभिषेकाची एकीकडे रायगडावर गडबड सुरू असताना महाराज मात्र इकडे राज्यसाधनेच्या मागे लागले होते!

आपल्याकडे एक संस्कृत वचन आहे. साहसे श्री: प्रतिवसति! अर्थात जिथे साहस आहे तिथे यश हमखास आहे.

आणि तो मुहूर्ताचा दिवस ठरला...

चैत्र वद्य १४,शके १५९६, इंग्रजी दिनांक २४ एप्रिल १६७४(ज्युलियन दिनांक)!

केंजळगडवर शत्रूचा मोठा करोल पहारा होता. गंगाजी नाईक किरदत्त नावाचा एक मराठी किल्लेदार आदिलशहाच्या वतीने गडावर किल्लेदार म्हणून तैनात होता. महाराजांनी स्वतः मावळयांची निवड केली आणि त्या निवडक सेनेसह माहाराज बिनीचे सेनापती होऊन त्यानी किल्ल्यावर एकच एल्गार केला.

गंगाजी एक कसलेला योद्धा आणि रांगडा, मर्द शिपाईगडी होता. मराठी आणि आदिलशाही सेना एकमेकांना भिडल्या. स्वतः माहाराज त्या सैन्याचे नेतृत्व करत होते. त्यामुळे प्रत्येक मराठी छाव्याला आपसूकच दहा हत्तींचे बळ प्राप्त झाले होते.

मराठयानी पराक्रमाची शर्थ केली. गंगाजीनेही मोठा पराक्रम गाजवला. काहीं मावळ्यांना त्याने धारातीर्थी पाडले पण त्याने मराठे बिलकुल कचरले नाहीत. अखेर तो विजयाचा क्षण समीप आला. लढता लढता गंगाजी नाईक किरदत्त पडला .

केंजळगड स्वराज्यात सामील झाला. आदिलशाही निशाण उतरवून किल्ल्यावर मराठ्यांनी भगवे निशाण फडकवले.

दि २४ एप्रिल १६७४ (ज्युलियन दिवस)हा दिवस आणि मराठयांचा पराक्रम अश्या प्रकारे इतिहासात अजरामर झाले.

आज त्या दिवसाला बरोब्बर ३४५ वर्षे पूर्ण झाली. मराठयांच्या प्रेरणादायी इतिहासातील या सोनेरी पर्वाचा साक्षीदार असलेला केंजळगड शिवरायांच्या आणि त्यांच्या सवंगड्यांच्या पराक्रमाच्या आठवणी उराशी बाळगून ताठ मानेने आजही उभा आहे.

©पराग लिमये
दि २४ एप्रिल २०१९

No comments:

Post a Comment