पूर्णगड, रत्नागिरी
मराठी आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी इ.सं. १७२४ मधे पूर्णगड किल्ला बांधला असावा अशी माहिती आंग्रे शकावलीत आहे. गडावर गेल्यावर मुख्य दरवाजा लगेच दिसतं नाही. जवळचं हनुमानाचं मंदिर ही इथली महत्वाची खूण आहे. उत्तम बांधणीचा पूर्णावस्थेतील भक्कम महादरवाजा जांभ्या दगडातील असून त्यावर मधोमध चंद्रसूर्य व गणेशाची प्रतिमा कोरली आहे. दरवाजातून आत गेल्यावर देवड्या दिसतात.
दक्षिणेकडे सुरुच्या दाट बनांनी झाकलेला गावखडीचा निर्मनुष्य समुद्रकिनारा या ठिकाणाहून खूप सुंदर दिसतो. गडावरील सर्व वास्तू तटबंदीवर उभं राहून नीट दिसू शकतात.
दरवाज्याशेजारून बांधीव पायऱ्यावरून तटबंदीवर जाता येते. तटबंदीवर पोहोचल्यावर नजरेसमोर येतो तो अथांग सागर व मुचकुंदी नदीची खाडी
बुरुजात व तटबंदीत बंदुकी व तोफांचा मारा करण्यासाठी ठिकठीकाणी जंग्या आहेत. याच तटबंदीमधून सागराकडे जाणारा १० फूट उंचीचा रेखीव कमानीचा दरवाजा आहे.
कान्होजी आंग्रे यांचा मृत्यू झाल्यावर इ.सं. १७३२ मधे पूर्णगड पेशव्यांकडे आला. त्याकाळांत त्यांनी गडावरील कारभारासाठी जे अधिकारी नेमले होते त्यांचे वंशज आजही किल्ल्यावर वास्तव्य करून आहेत. १८१८ मधे पेशव्यांची सत्ता संपल्यावर किल्ला इंग्रजांकडे आला असा किल्याचा इतिहास आहे. पूर्णगड जवळून पावस, गणेशगुळे, कशेळी सूर्यमंदिर, आडीवरे महालक्ष्मी मंदिर, साटवली किल्ल्या अश्या ठिकाणी भेट देता येते.
मुचकुंदी नदीच्या उत्तर काठावर सुमारे दोन एकरावर वसलेला पूर्णगड हा सागरीदुर्ग ५० मीटर उंचीवर आहे. उत्तर दक्षिण पसरलेला हा किल्ला समुद्रातील व्यापारी जलमार्गावर खाडीमुखाशी अगदी मोक्याच्या ठिकाणी वसला आहे. रत्नागिरी तालुक्यातील पावसपासून ७ किमी. अंतरावर हा किल्ला आहे. तिथपर्यंत स्थानिक किंवा खासगी वाहनाने पोहोचता येते. गडावर फक्त २० मिनिटात चढून जाता येते मात्र जाताना गावातून जाण्याऱ्या रस्त्याचा वापर करावा.
No comments:
Post a Comment