Followers

Wednesday, 14 August 2019

किल्ले गाळणा, ता.मालेगाव जि.नाशिक(महाराष्ट्र)

किल्ले गाळणा, ता.मालेगाव जि.नाशिक(महाराष्ट्र)

होळकरशाहीतील दुर्ग : किल्ले गाळणा
शब्दांकन : सह्याद्री प्रतिष्ठान

इ.स.१७५२ मध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) व मराठी सैन्याने भालकीच्या युद्धात निजामाचा पराभव केल्यानंतर हा किल्ला होळकर साम्राज्याच्या अंतर्गत आला . त्यामुळे मराठी साम्राज्यात श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांच्या(प्रथम) अधिपत्याखाली किल्ले गाळणाचा कारभार चालत असे.हा किल्ला होळकर साम्राज्याच्या अंतर्गत मराठी सत्तेचा अंतहोई पर्यंत म्हणजेच इ.स. १८१८ पर्यंत होता त्यानंतर किल्ले गाळणा इंग्रजांच्या ताब्यात गेला. हा किल्ला होळकर साम्राज्याच्या अंतर्गत तब्बल ६६ वर्ष राहिला.

इतिहासकाळात बागलाणचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा गाळणा किल्ला अनेक भव्य दरवाजे, बुलंद बुरुज, दिमाखदार तटबंदी, देखण्या चर्या, अनेक दुर्गद्वार शिल्पे, सुंदर महिरपी कमान, कलाकुसर केलेली भव्य मशीद, अनेक कातळकोरीव गुंफा, शिलालेख, अंबरखाना, देखणे जलसंकुल अशा नानाविध दुर्गअवशेषांनी ऐश्वर्यसंपन्न बनला आहे.त्यामुळे हा गड खानदेशातील सर्वोत्तम डोंगरीदुर्ग म्हणून इतिहास अभ्यासकांत ओळखला जातो. महाराष्ट्रातील एकमेवाद्वितीय समजल्या जाणाऱ्या देवगिरी किल्ल्याप्रमाणेच या किल्ल्यास एकच मार्ग असून परकोट दरवाजा, लोखंडी दरवाजा, कोतवाल पीर दरवाजा व लाखा दरवाजा अशी अजस्त्र दरवाज्यांची मालिकाच या मार्गावर उभारण्यात आली आहे. या प्रवेशद्वारांच्या एका पाठोपाठ एक मालिकेमुळे एका दरवाज्यातून दुसऱ्या दरवाज्यापर्यंत येणारा मार्ग पूर्णपणे तोफेच्या माऱ्याच्या टप्प्यात येतो.त्यामुळे हा गड इतिहासकाळात अभेद्य मानला जात असे.
येथून सरळ मळलेल्या पायवाटेने गडाच्या पहिल्या परकोट दरवाज्यात येऊन पोहोचतो. या दरवाज्याच्या दोन्ही बाजूस दगडात कमळे कोरलेली असून याच्या दोन्ही बाजूस पहारेक ऱ्यांच्या देवडय़ाही आहेत. यानंतर गाळणा किल्ल्याचा दुसऱ्या लोखंडी दरवाज्यासमोर येऊन पोहोचतो. याच्या माथ्यावरील मधल्या चर्येत एक पर्शियन लिपीतील शिलालेख आपणास पाहावयास मिळतो. इथे डाव्या हाताच्या एका पायवाटेवर एक भग्न शिलालेखही दिसतो. यानंतर पुढे गडाचा तिसरा दरवाजा लागतो. या दरवाज्याच्या उजव्या हाताला गडाचा लांबचलांब पसरलेला तट पाहताना आपणास गाळणा किल्ल्याची भव्यता अनुभवता येते. आपण हा तट पाहून पायऱ्यांच्या वाटेने गडाच्या चौथ्या लाखा दरवाज्यात पोहोचायचे. या दरवाज्याच्या उजव्या हाताला असणाऱ्या तटातील महिरपी कमान आपल्याला राजस्थानातील गडकिल्ल्यांची आठवण करून देते.
गाळणा किल्ल्याच्या चौथ्या दरवाज्याच्या कमानीच्या माथ्यावर दोन सुंदर दगडी कमळे कोरलेली असून या प्रवेशद्वाराच्या पहारेक ऱ्यांच्या देवडय़ा मात्र ढासळलेल्या आहेत. हा दरवाजा ओलांडून उजवीकडे वळल्यावर आपणास तटबंदीत बांधलेले दोन सज्जे पाहायला मिळतात. यापैकी पहिला सज्जा नक्षीदार स्तंभावर उभा असून येथून गड पायथ्याचे गाळणा गाव फार सुंदर दिसते. आपण हा सज्जा पाहून शेजारीच असलेल्या कोठीत पोहोचायचे. या कोठीला पुढेच दुसरा सज्जा असून त्याच्या माथ्यावर नक्षीदार घुमटी आहे. आपण हे कलापूर्ण दोन सज्जे पाहून गडाचा तट उजव्या हातास ठेवत पुढे गेल्यावर डावीकडील कातळात एकामागोमाग एक खोदलेल्या पाच गुहा आपणास दिसतात. यापैकी तिसऱ्या गुहेत मारुतीची मूर्ती असून यातील काही खोलगट गुहा पाण्याने भरलेल्या तर काही कोरडय़ाच आहेत. आपण येथून उजव्या बाजूच्या तटावरील सुंदर चर्या पाहात पुढे गेल्यावर गाळणा किल्ल्याचा चोरदरवाजा लागतो. हा चोरदरवाजा आपणास परत गडाच्या पहिल्या दरवाज्यात नेतो. इथपर्यंत गडाची ही उजवी बाजू पाहून आपण परत आल्यावाटेने चौथ्या दरवाज्यात यायचे. येथून पायऱ्यांच्या वाटेने वर गेल्यावर आपणास उजव्या हाताला एक सुंदर महिरपी कमान पाहायला मिळते. येथून एका मशिदीसमोर येऊन पोहोचतो. या मशिदीच्या जागी १५ व्या शतकात गाळणेश्वर महादेवाचे मंदिर होते. या नावावरूनच हा गड गाळणा नावाने ओळखला जातो. पण इ.स. १५२६ मध्ये अहमदनगरचा बादशाहा बुरहान निजामशहाने या किल्ल्यावर आक्रमण करून हे मंदिर जमीनदोस्त केले व या ठिकाणी सध्याची भव्य मशीद उभी केली. हा महत्त्वपूर्ण उल्लेख ‘बुरहाने मासीन’ या ग्रंथात आपणास वाचावयास मिळतो.
गाळणा किल्ल्याच्या पायथ्यापासून आपणास खुणाविणाऱ्या या मशिदीची वास्तू भव्य असून तिच्या दर्शनी भागात असणाऱ्या तीन भव्य कमानींनी या वास्तूची शोभा आणखीच वाढली आहे. या मशिदीच्या खांबावर कुराणातील आयते कोरलेले असून मशिदीच्या माथ्यावर सुंदर मिनार आहेत. मशिदीच्या डाव्या हाताला आपणास २० फूट खोलीचा एक बांधीव हौद पाहायला मिळतो. येथून गडाच्या डाव्या बाजूला एक वाट जाते तर मशिदीच्या मागून एक वाट उजव्या बाजूला जाते. यातील डाव्या बाजूच्या वाटेने पुढे गेल्यावर आपण अंबरखान्याच्या भग्न वास्तूजवळ येऊन पोहोचतो. या वास्तूपलीकडेच गडाची सदर आपणास दिसते. इतिहास काळात नानाप्रकारची खलबते अनुभवलेली ही सदरेची वास्तू सध्या मात्र कशीबशी उभी असून तिच्या भग्न भिंतीतील देवळ्या मात्र आजही शाबूत आहेत. आपण येथून गडाच्या डाव्या टोकावरील बुरुजावर जायचे. या बुरुजाच्या भिंतीत एक पर्शियन शिलालेख व त्याच्या डाव्या-उजव्या बाजूस दोन व्यालांची शिल्पे आहेत. या बुरुजाच्या माथ्यावरून खाली पाहिल्यावर गडाचा पूर्व बाजूचा तिहेरी कोट व त्याच्यामध्ये एकाखाली एक या पद्धतीने खोदलेली पाण्याची टाकी आपणास पाहायला मिळतात. गाळणा किल्ल्याच्या दर्शनीपूर्व बाजूसच भक्कम बांधकाम करण्याचे मुख्य कारण म्हणजे या गडाच्या पूर्व उतारावर असणारे डोंगराचे कंगोरे. या कंगोऱ्यांच्या मदतीने शत्रू सहजपणे वर येऊ शकत असल्यामुळे या बाजूला लांबच लांब तटबंदी व बुरुज बांधण्यात आले आहेत. या बाजूच्या तटाची खालून वर पर्यंतची उंची तब्बल ३५ ते ४० फूट आहे. यावरूनच या बांधकामाच्या भव्यतेची दुर्गप्रेमींना कल्पना करता येईल. आपण ही गडाची डावी बाजू व्यवस्थितरीत्या पाहून अंबरखान्याच्या मागच्या बाजूने वर चढणाऱ्या वाटेने गडाच्या मध्यभागील गवताळ टेकडावर पोहोचायचे. गाळणा किल्ल्याच्या माथ्यावरील या सर्वोच्च पठारावर चार थडगी वगळता कोणतेही अवशेष नसून फक्त जिकडे पाहावे तिकडे गवत व झाडे-झुडपे पसरलेली आहेत. पण येथील थडग्यांवरील बारीक नक्षीकामाची कलाकुसर पाहता ही थडगी राजपरिवारातील सदस्यांची असणार याची आपणास खात्री पटते.
खरे तर गाळणा किल्ल्याची ही सर्वोच्च गवताळ टेकडी म्हणजे या गडाचा बालेकिल्ला. पण याच्या खालील सपाटीवर अनेक इमारती बांधण्यासाठी मुबलक जागा असल्यामुळे या गडाच्या दुर्गनिर्मात्याने हा सर्वोच्च टप्पा जाणीवपूर्वक तटबंदीविरहित मोकळा ठेवलेला आहे. आपण ही टेकडी पाहून आल्यावाटेने परत मशिदीजवळ यायचे व उजव्या हाताने पुढे जाणाऱ्या पायवाटेने गाळणा किल्ल्यावरील सुंदर बांधणीच्या जलसंकुलाजवळ पोहोचायचे. या ठिकाणी तीन कमानींनी तोललेली दगडी वास्तू असून तिच्या आतमध्ये बाराही महिने थंडगार पाणी वाहणारा झरा आहे. या झऱ्याचे पाणी साठविण्यासाठी आतमध्ये दगडी कुंडही असून मुद्यामहून या झऱ्याचे पाणी जिवंत राहण्यासाठी या वास्तूच्या माथ्यावर गडनिर्मात्याने छप्पर बांधलेले नाही.

येण्याचे मार्ग :-
गाळणा किल्ल्यावर जाण्यासाठी मालेगाव आणि धुळे या दोंन्ही बाजूंनी रस्ते आहेत. आपल्याला मालेगाव - डोंगराळे मार्गे गाळणा गावात पोहचता येते. मालेगावाहून डोंगराळे पर्यंत येण्यास एसटी बसेस आहेत. मालेगाव - डोंगराळे अंतर साधारणत: ३० किमी आहे. धुळ्याहूनही डोंगराळ्याला बसेस आहेत. हे अंतर साधारणपणे ३५ कि.मी आहे. डोंगराळेहून ४ किमी अंतरावर असलेल्या गाळणा गावात पोहचता येते. गाळणा हेच किल्ल्याच्या पायथ्याच्या गाव. गाळणा गावात गोरक्षनाथाचा एक मठ आहे. या मठाच्याच बाजूने किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. या वाटेने आपण अवघ्या १० मिनीटांतच किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्यात पोहोचतो.किल्ल्यावर एक दर्गा आहे. यात २० ते २५ लोकांची राहण्याची सोय होऊ शकते.जेवणाची सोय गाळणा गावात होऊ शकते. किल्ल्यावर राहायचे असल्यास स्वत:चा शिधा असणे उत्तम. दर्ग्याच्या मागील बाजूस पिण्याच्या पाण्याचे तळे आहे.किल्ल्यावर पोहोचण्यासाठी गाळणा गावातून १० मिनिटे लागतात.

No comments:

Post a Comment