वीरगाव : होळकरकालीन बारव
वीरगाव : ता.अकोले जि.अहमदनगर (महाराष्ट्र)
संकलन - राहुल वावरे, ८९९९१४३०७४.
वीरगाव येथील होळकरकालीन बारव. |
वीरगावच्या पश्चिमेला काळ्या-तपकिरी डोंगर रागांच्या सानिध्यात राणी
अहिल्यादेवी होळकर यांनी या बारवेचे बांधकाम केले. राणी अहिल्यादेवी होळकर
पुण्याहून इंदोरकडे जाताना हा प्रमुख मार्ग होता. या रस्त्यावर अनेक ठिकाणी
बारव बांधण्यात आल्या. परंतु कालौघात त्या नष्ट झाल्या. काही इतिहासात
चिरनिद्रा घेण्याच्या मार्गावर आहेत. वीरगावच्या या बारवेचा चिरा अन् चिरा
मात्र आजही शाबित आहे.
अकोले-सिन्नर रस्त्यापासून साधारण २०० फूट आतमध्ये शेतात या बारवेचे खोदकाम
झाले. बारवेची खोली ५८ फूट असून तळापर्यत जाण्यासाठी ४७ पायर्या आहेत.
कलथा आकाराची ही बारव पुढे रुंद आणि पाठीमागे जिन्याच्या स्वरुपात आहे.
बारवेसाठी वापरलेल्या दगडांचा अनेकांनी जवळपासच्या सर्व डोंगरामध्ये शोध
घेतला. मात्र कोणत्याही डोंगराचा दगड बांधकामाशी जुळता मिळता नसल्याचे
भागवत गंगाराम आस्वले यांनी सांगितले. यावरून त्याकाळी अनेक योजने दूर वरून
हा दगड आणला असावा. जागेवर चुन्याचा घाणा करून या बारवेची निर्मिती
झाल्याच्या खाणाखुणा मात्र आढळून येतात. बांधकामासाठी वापरण्यात आलेला
दगडही तीन प्रकारचा असून तळचा, मधला आणि वरचा दगड वेगळ्या प्रकारचा आहे.
बारवेत दोन आकर्षक कमानी असून राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या हस्तेच
विराजमान झालेली गणपतीची मूर्ती दगडी भिंतीच्या कोनाड्यात स्थानापन्न आहे.
श्रीगणेशाच्या मूर्तीची घडणही संशोधनात्मक आहे व हि मूर्ती त्या कोनाड्यात
इतकी घट बसवलेली आहे कि तुम्ही कितीही शक्ती वापरली तरी ती थोडीपण हालत
नाही. प्रत्येक वाटसरूसाठी निवांत विसाव्याचे हे ठिकाण आहेच. शिवाय
त्र्यंबकवारीला आळंदीहून निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी जाणार्या वारकरी
दिंड्यांच्या वास्तव्याचे हे कायमस्वरुपी तीर्थस्थान आहे.
ऐन उन्हाळ्यात बारवेचे पाणी तळ गाठते. इतर ऋतूत मात्र निळेशार थंडगार पाणी
येणार्या प्रत्येकाची तहान भागविते. दूरवरच्या अनेक संशोधकांनी या स्थळाला
भेटी दिल्या असून सखोल परीक्षणाअंती इतिहासाचा लख्ख भूतकाळ समोर
आल्याशिवाय राहणार नाही. त्याच बरोबर वीरगाव मधील दिनेश वाकचौरे व रावसाहेब
वाकचौरे यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ या बारवेची डागडुजी करून तिच्या
पाण्याचा वापर गावासाठी योग्य प्रकारे करत आहेत, त्यांच्या या कृतीचे
अनुकरण इतिहासाची हेळसांड करणाऱ्यांनी करणे गरजेचे आहे.
आजपर्यंत(फेब. २०१७) मिळालेल्या माहितीनुसार राणी अहिल्यादेवी होळकर यांनी
अकोले तालुक्यात वाशेरे, औरंगपूर, तांभोळ, ब्राह्मणवाडा येथे बारवेचा
निर्माण, लिंगदेव येथे लिंगेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार व बारवेचा निर्माण,
कुंभेफळ येथे शेषनारायण मंदिरचा व भव्य बारवेचा निर्माण केला आहे.
शेषनारायण मंदिर भारतात फक्त दोनच ठिकाणी आहेत एक म्हणजे वाराणसी(काशी) आणि
दुसरे म्हणजे कुंभेफळ. हा अकोले तालुक्याचा इतिहास लवकरच आपल्यासमोर फोटो व
माहीती सहित मांडू.
फोटो आभार : श्री.रामदास अस्वले(वीरगाव).
माहिती आभार : श्री.ज्ञानेश्वर खुळे.
No comments:
Post a Comment