Followers

Monday, 12 August 2019

'सिन्नर' मध्ये आयेश्वराचे' वेसर शैलीतील सुरेख मंदिर

पुणे नासिक महामार्गारून प्रवास करताना आपल्याला नेहमी 'सिन्नर' हे गाव लागते हे गाव मुळातच प्राचीन काळापासून फार महत्वाचे आहे प्राचीन शिलालेखांमध्ये या सिन्नरचे नाव आपल्याला 'श्रीनगर किंवा सिंदिनेर' असे देखील आढळते. व्यापारामुळे भरभराटीला आलेले एक महत्वाचे शहर हे 'सिन्नर' होते. महाराष्ट्रातील एका महत्वाचे घराणे यादव घराणे या यादव घराण्याची राजधानी हि 'सिन्नर' होती नंतर ती देवगिरी येथे हलविली. याच प्राचीन 'सिन्नर' गावामध्ये विविध मंदिरे आहेत परंतु 'सिन्नर' गाव मुळात प्रसिद्ध आहे ते 'गोंदेश्वर' या मंदिरामुळे भूमिज शैलीतील 'गोंदेश्वर मंदिर' सर्वांनाच त्याच्या कलाकृती मुळे आकर्षित करते परंतु याच 'सिन्नर' मध्ये गावाच्या वेशीवर एका छोट्या ओढ्याच्या तीरावर थोडेसे उपेक्षित असलेले '
आयेश्वराचे' वेसर शैलीतील सुरेख मंदिर उभे आहे.
कल्याणीचे चालुक्य आणि द्वारसमुद्राचे होयसळ यांच्या राजआश्रयाखाली विकसित झालेल्या आणि नंतरच्या काळातील कर्नाट शैलीतील मंदिरे हि वेसर मंदिरे म्हणून ओळखली जातात. नागर आणि द्राविड शैलीतील काही वास्तूघटक यांच्या संयोगातून 'वेसर शैली' उदयाला आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आज काही ठराविक 'वेसर शैलीमधली' मंदिरे शिल्लक आहेत. यादव राजांच्या प्रदेशात देखील या शैलीचा प्रभाव पडून वेसर मंदिरे उभारली गेली. त्यापैकीच एक 'आयेश्वर मंदिर'
'आयेश्वर मंदिर' हे पूर्वाभिमुख असून मंदिराभोवती पूर्वी सीमाभिंत देखील असावी. मंडपावरील छप्पर पूर्णपणे नष्ट झालेले असून गर्भगृहावरील छप्पर काही प्रमाणात शिल्लक असल्याचे पाहायला मिळते. या मंदिराची तीन मुख्य वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात ती म्हणजे मंदिराचे पीठ हे 'गोंदेश्वर' मंदिराच्या पीठापेक्षा वेगळे असून कर्नाट मंदिराच्या पिठाशी मिळते जुळते आहे. गर्भगृहाच्या बाह्य अंगावर असलेले अर्धस्तंभ आणि दोन अर्धस्तंभाच्या मध्ये असलेले मंजरीचे अलंकरण आणि गर्भगृहाच्यावर विमानभागावर आपल्याला शालाशिखर दिसून येते.
तसेच मंदिराच्या कमानीवर नृत्य करणाऱ्या शिवाचे शिल्प असून त्याच कमानीवर आपल्याला लक्ष्मीचे देखील शिल्प पाहायला मिळते तसेच गर्भगृहाच्या ललाटावर सप्तमातृका पाहायला मिळतात. अंतराळाच्या छतावर अष्टदिक्पाल पाहायला मिळतात. तसेच उत्तर चालुक्यकाळातील मंदिराप्रमाणे दिसणाऱ्या स्तंभासारखेच मंडपाचे स्तंभ असून गर्भगृहाच्या बाह्यांगावर नंतरच्या काळातील कर्नाट शैलीचे स्तंभ पाहायला मिळतात.
अयेश्वराच्या या मंदिरावर कीचकहस्त असून हे वैशिष्ट्य गुजरात मधील सोळंकी स्थापत्यशैली मधून आलेले आहे. हे मंदिर साधारणपणे ११ व्या शतकाच्या चतुर्थकात सेउणचंद्र यादव याचा मुलगा परमदेव याच्या कारकिर्दीत बांधले असावे. 'गोंदेश्वर' मंदिर जसे प्रसिद्ध आहे त्यामानाने 'आयेश्वराचे' हे मंदिर उपेक्षितच फारशी वर्दळ नसल्याने येथे निवांत शांतता अनुभवता येते.
- अनुराग वैद्य.

No comments:

Post a Comment