Followers

Wednesday, 14 August 2019

किल्ले वाफगाव : महाराज यशवंतराजे होळकर यांचे जन्मस्थळ

किल्ले वाफगाव : महाराज यशवंतराजे होळकर यांचे जन्मस्थळ

किल्ले वाफगाव, वाफगाव ता.खेड जि.पुणे(महाराष्ट्र)

इतिहास :-
होळकरांच्या वैभवशाली इतिहासाचे उदाहरण म्हणजे वाफगावचा भुईकोट किल्ला होय. हा किल्ला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांनी आपल्या राज्यकाळात बांधला. हा किल्ला श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर(प्रथम) यांचे जन्मस्थान आहे. या भुईकोट किल्ल्यातच सुभेदार मल्हारराव होळकर यांची जेष्ठ कन्या उदाबाई होळकर यांचा विवाह होळकरांचे सरदार बाबुराव वाघमारे-पाटील यांच्याशी झाला होता व त्यानंतर सरदार बाबुराव वाघमारे व उदाबाई यांना येथून ३० कि. मी. अंतरावर असलेल्या खडकी-पिपळगाव(ता.आंबेगाव जि.पुणे) येथील वाडा व जमिनीची जहागीरदारी आंदण स्वरूपात देण्यात आली होती. तेथे आजही उदाबाई यांची समाधी, हत्ती दरवाजा, नदीघाट व आदी असंख्य होळकर कालीन वास्तू उपेक्षित अवस्थेत आहेत. या भुईकोट किल्ल्यात श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर, राणी अहिल्यादेवी होळकर, श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर(प्रथम), श्रीमंत महाराजाधिराज यशवंतराव होळकर(प्रथम) यांनी अनेक वेळा दक्षिण मोहिमांच्या दरम्यान मुक्काम केला आहे तसेच या किल्ल्यात पूर्वी होळकरांची टाकसाळ हि होती. सध्या हा भुईकोट किल्ला रयत शिक्षण संस्थेला बक्षीस रुपात दिला आहे. या किल्ल्यावर रयत शिक्षण संस्था वाफगाव याचे नियंत्रण असते.



किल्ल्यात पाहण्याची ठिकाणे :-
किल्ल्याच्या आत राजदरबार, राजमहाल, अंधारी विहीर(बुरुजातील विहीर), होळकर कालीन तोफा, काही मंदिरे (विष्णू-लक्ष्मि, विष्णूपंच्याती, मांगीर बुवा), बावडी, राजमहालाची तटबंदी, होळकर कालीन भव्य गुफा तसेच किल्ल्याच्या बाहेरील असलेले राजराजेश्वराचे मंदिर पाहण्यासारखे आहे. पूर्वी गावाला तटबंदी होती मात्र आज तटबंदी काळाच्या ओघात नष्ट झाली आहे मात्र मुख्य वेस आजही शाबूत आहे व त्याचे नामकरण "अहिल्याबाई होळकर वैभव स्मृती" असे केले आहे. गावाच्या पूर्वेस नदी आहे व नदीच्या पात्रात राणी अहिल्यादेवी निर्मित एक दगडी बारव आहे तसेच नदीच्या पलीकडे चिंचेचा मळा आहे त्या भागात एक सुंदर कमानीयुक्त विहीर आहे.(पक-पक-पकाक या मराठी चित्रपटामधील)

किल्ल्याची माहिती :-
हा किल्ला एकूण ८ एकर जागेत विस्तीर्ण असून या किल्ल्याच्या बांधकामात घडीव दगड व विटांचा उपयोग केला आहे. या किल्ल्याला एकूण ७ बुरुज असून प्रत्येक बुरुजावर खिडक्या व छरी आहेत. तोफ किवा बंदुका यांचा शत्रूवर मारा करायला यावा या उद्देशाने या खिडक्या व छरी बुरुजावर आहेत. किल्ल्याचे प्रमुख प्रवेशद्वार हे मजबुत दगडात असून दारांवर लोखंडी अणुकुचीदार सुळे आहेत. हे लोखंडी अणुकुचीदार सुळे पट्ट्यानवर मजबूत बसवलेले आहेत.

किल्ल्याचे प्रवेशद्वार

प्रमुख प्रवेशद्वारतून अपुन आत गेल्यावर राजमहाल लागतो. हा राजमहाल बंदिस्त तटबंदीत असून दुमजली बांधण्यात आलेला आहे. राजमहालाच्या आत होळकर कालीन सुबक लाकडी काम पाहवयास मिळते. तसेच या महालाच्या दुसऱ्या मजल्यावर जात असताना विष्णूपंच्याती हे मंदिर लागते. या मंदिरातील सर्व मुर्त्या या राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या विद्यमानाने स्थापन झालेल्या आहेत. या सारख्या मुर्त्या आपल्यालाला महेश्वरच्या किल्ल्यावर बघायला मिळतात. हा महाल "राणीचा महाल" म्हणून ओळखला जात असतं. या राजमहालाच्या समोर एक होळकर कालीन भव्य बारव स्थित असून या बारवेची निर्मिती राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केली. या बारवेच्या तळापर्यंत पायरया आहेत. या बारवेच्या बाजूलाच विष्णू-लक्ष्मि यांचे मंदिर स्थित आहे. हे मंदिर होळकराच्या धर्मनिरषेपचे उत्तम उदाहरण आहे कारण हे मंदिर मजिद सारखे दिसायला आहे. या मंदिरासमोरच आंधरी विहीर(बुरुजातील विहीर) असून हि विहीर किल्ल्याच्या एका बुरुजात स्थित आहे. या विहिरीच्या तळाला अंधार असून खूप गार वाटते तसेच या विहिरीत प्रकाश येण्यासाठी वरील बाजूने व्यवस्था केली आहे. या विहिरीच्या पाण्याचा आजही पिण्यासाठी उपयोग होतो. या किल्ल्याचे सर्वात आकर्षण हा राजदरबार आहे. राजदरबारचे बांधकाम हे दुहेरी असून या मध्ये दगड व विटांचा उपयोग केलेला आहे. राजदरबाराला आतील बाजूने असंख्य खिडक्या असून या राजदरबारावरच होळकरांचे बांड निशाण फडकवण्याची जागा आहे. राजदरबारावर पाकळ्याची आकर्षक तटबंदी आहे. राजदरबाराचे आतील द्वार हे सिमेंटने कायमचे बंद केलेले आहे. हे पाहून इतिहास प्रेमीना जरूर दुख होते. राजदरबाराचा आतून काही भाग पडला आहे. या किल्ल्यात होळकर कालीन तोफ हि बघायला मिळतात. या किल्ल्याच्या बाहेर राजराजेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी स्वरूपाचे असून या मंदिराचा निर्माण राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला आहे. या मंदिरासमोर दगडी मेघडबरीमध्ये नंदीचे भव्य वास्तू स्थित असून नंदीच्या गळ्यातील घंटा व रेखीव काम सुरेख आहे. हे मंदिर हि बंदिस्त स्वरुपात आहे. हे मंदिर पाहिल्यावर आपणास होळकर कालीन रेखीव व सुरेख दगडी कामाचा बोध होतो. या मंदिरच्या नक्षीदार बांधकामात महेश्वर किल्ल्याची समरूपता पाहवयास मिळते. मंदिराच्या बाजूच्या चौथऱ्यावर पूर्वी धर्मशाळा होती. मंदिराच्या गाभाऱ्यात आजही होळकर कालीन पूजेच्या पुरातन वास्तू पाहावयास मिळतात. एका कलशावर "तुकोजी होळ" अशी अक्षरे दिसतात. एक नक्षीदार घंटी आणि शिसवी पेटी आहे. या मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजाचे वेगळेच वैशिष्ट्य म्हणजे सध्याच्या लॅच पद्धतीची कुलूप कशी असतात तशी कुलुपी पद्धत आहे. दरवाजा लोटून घेताच आतून कडी लागते आणि एका लांब चपट्या किल्लीनेच ते उघडता येते. पूर्वीच्या काळी सर्व वाफगावालाच दगडी कोट होता आज आपल्यालाला काही दगडी कोट हे गावामध्ये प्रवेश करताना नजरेस पडतात. होळकर प्रेमीनी या किल्ल्याला एकदा आवश्य भेट द्यावी.

किल्ल्याच्या आतील राजदरबार
  
होळकर कालीन तोफा 

  होळकर कालीन पोलादी नक्षीकाम 
                                                       महाराजाधिराज यशवंतराजे होळकर  
                                                      अधिक फोटो पहा : किल्ले वाफगाव 
कसे यावे :-
राजगुरुनगर पासून १२ कि. मी. अंतरावर वाफगाव आहे. तेथे जाण्यासाठी एस. टी बसची सुविधा आहे. वाफगावच्या प्रमुख ठिकाणी उतरल्यावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैभव स्मृती असे लिहिलेली वेस नजरेस पडते. तेथून काहीच अंतरावर किल्ला आहे. किल्ल्याच्या प्रमुख प्रवेश द्वरावर शिक्षण संस्थेचे नाव लिहिलेले दिसते(महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय,वाफगाव).

इतर :-
"पक-पक-पकाक" या मराठी चित्रपटाचे ७०% शुटींग व "पिपाणी" या मराठी चित्रपटाचे १००% शुटींग या किल्ल्यामध्ये झाले आहे. सन २०११ पासून दरवर्षी या किल्ल्यामध्ये श्रीमंत महाराजाधिराज यशवंतराव होळकर यांची जयंती ३ डिसेंबर ला साजरी करण्यात येत आहे. त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासात अज्ञान राहिलेल्या या राजाला वंदन करण्यासाठी जीवनात एकदा तरी अवश्य या जयंतीला उपस्थित रहा. 

No comments:

Post a Comment