होळकरशाहीतील दुर्ग : किल्ले थाळनेर
किल्ले थाळनेर : थाळनेर, ता.शिरपूर जि.धुळे(महाराष्ट्र)
संकलन - राहुल वावरे, ८९९९१४३०७४.
होळकरशाहीची श्रीमंती असलेला केल्ले थाळनेर नष्ट होण्याच्या मार्गावर आहे |
किल्ले थाळनेर ता.शिरपूर जि.धुळे, होळकरशाहीची श्रीमंती असलेला किल्ले
थाळनेर नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या किल्ल्याचा निर्माण फारुकी
राजवटीमध्ये करण्यात आला. त्या काळात हा किल्ला फारुकी घराण्याची राजधानी
होता, त्यानंतर हा किल्ला मुघल राजवटीमध्ये गेला व नंतर हिंदवी स्वराज्यात
सन १७५० ला हा किल्ला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर सरकार यांच्या
ताब्यात आला. सुभेदार मल्हारराव होळकर व राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या
राज्यकाळात या किल्ल्याची नव्याने बांधणी करण्यात आली मात्र थाळनेरचा
कारभार खऱ्या अर्थाने भरभराटीला आला तो राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या
काळात. थाळनेर आजच्या घडीला एक छोटेसे गाव असले तरी तत्कालीन होळकरशाहीच्या
काळात एक श्रीमंत परगणा होता. वास्तविक आज थाळनेर हे तालुक्याचे ठिकाण हवे
होते मात्र तसे न होता ते एक शिरपूर तालुक्यातील खेडे गाव आहे, हा एक योगा
योगच म्हणावा लागेल. शिरपूर तालुक्यासहित खानदेशात राणी अहिल्यादेवी होळकर
यांचे आजही खूप मोठ्या प्रमाणात लोककल्याणकारी कार्य पाहायला मिळते व या
सर्व कामांचा लेखाजोखा हा किल्ले थाळनेर मध्ये ठेवला जात होता. तसेच किल्ले
थाळनेर हा सातपुडा डोंगररांग व महाराष्ट्र पठाराच्या मध्यभागी येत
असल्यामुळे तेथे राणी अहिल्यादेवी यांच्या काळामध्ये एक आरक्षित लष्करी फोज
तोफांसहित सज्ज असतं. १८ व्या शतकात राणी अहिल्यादेवी होळकर यांनी महेश्वर
ते पुणे अशी टपाल व्यवस्था सुरु केली होती याचे पुरावे मिळतात व या टपाल
व्यवस्थेच्या मार्गावर प्रमुख पाच ठाणी(Check Post) होती त्यामधील किल्ले
थाळनेर हे एक प्रमुख ठाण होते. किल्ले थाळनेर होळकर रियासतीच्या अंतर्गत
येण्या अदोगर त्याचे नाव "स्थलकनगर" असे होते मात्र १८ व्या शतकात राणी
अहिल्यादेवी होळकर यांनी तापी नदीच्या काठी असलेल्या थळेश्वर महादेव
मंदिराचा नव्याने निर्माण केल्यानंतर या मंदिरावरून "थाळनेर" हे नाव रूढ
झाले ते आजही. इ.स. १८१८ ला मराठा-इंग्रज युद्धामध्ये ब्रिटीश जनरल सर थॉमस
हिसॉप जेव्हा थाळनेरचा किल्ला घेण्यासाठी गेला, त्यावेळी खानदेशच्या
इतिहासातील सर्वात रक्तरंजित प्रतिकार त्याला इथे झाला. यात किल्ल्यावरील
२५० मराठी लोक तर इंग्रजांचे २५ जण ठार झाले. यामध्ये लढाऊ बाण्याचे तेथील
किल्लेदार तुळशीराम मामा यांनी प्राणपणाने किल्ल्याचे रक्षण करताना
ब्रिटिशांशी दोन हात केले. अखेर ब्रिटिश सैन्यापुढे त्यांचा पाडाव लागला
नाही. तुळशीराम मामांना फाशी देण्यात आली. त्या वेळी ब्रिटिश सैन्याला कडवी
झुंज देणारे तुळशीराम मामा व अन्य त्यांचे साथीदार खान्देशातील पहिले
हुतात्मे ठरले.
अशाप्रकारे फारुकी राजवटीपासून होळकरशाहीच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष
असणारा हा किल्ला व थाळनेर गाव आज अतिशय दुर्लक्षित आणि उपेक्षित अवस्थेत
आहे. जसा काळ लोटला तसा हा किल्ला नष्ट होत गेला त्याला जबाबदार कोण? आज
मोठ्या प्रमाणात किल्ला नष्ट झाला आहे मात्र जेवढ्या ऐतिहासिक वास्तू आहेत
त्याचं वेगळंच वैशिष्ट्य आहे व त्या जपल्या गेल्या पाहिजेत.
तापी नदी थाळनेर गावाजवळ इंग्रजी (U) आकाराचे वळण घेते. तेथे असलेल्या १००
मीटर उंच टेकडीवर थाळनेरचा किल्ला वसलेला आहे. थाळनेरचा किल्ला हा राज्य
संरक्षणाच्या दृष्टीने अभेद्य असा होता. इतिहासकार पर्सी ब्राऊन या
किल्ल्याचा उल्लेख ‘बादशाही किल्ला’ म्हणून करतो. थाळनेरचा किल्ला बांधताना
जी जागा निवडली आहे, ती कौशल्यपूर्वक निवडलेली दिसते. या गावातून
वाहणाऱ्या तापी नदीच्या काठी हा किल्ला बांधला आहे. या किल्ल्याची रचना अशी
काही चमत्कारिक आहे की तेथे एकाच्या आत दुसरा असे एकमेकांच्या पाठीमागे
नागमोडी वळणांनी बांधलेले असे पाच दरवाजे आहेत. पहिल्या दरवाजातून शत्रू आत
आला तर त्याच्यावर आतील दुसऱ्या दरवाजाच्या तटावरून मारा करण्याची सोय
करण्यात आली आहे. या किल्ल्याच्या भिंतीची उंची सुमारे ६० फूट असून या
किल्ल्यातील सगळ्या तोफांचा मारा बहुतेक पूर्वेच्याच बाजूला आहे कारण
पश्चिमेच्या बाजूला तापी नदीचे खोल पात्र, उत्तर आणि दक्षिण या दिशांनी
तुटलेले कडे या कारणांमुळे या तीन बाजूंचे संरक्षण प्रत्यक्ष सृिष्टदेवताच
आपल्या अजिंक्य तोफांनी करत आहे. या व्यतिरिक्त किल्ल्याची पाताळेश्वर
मंदीराच्या बाजूची ६० फूट उंच भाजलेल्या विटांमध्ये बांधलेली भिंत व २
बुरुज उभे आहेत. बाकी सर्व बाजूच्या भिंती व बुरुज नष्ट झालेले आहेत.
किल्ल्यावर दोन छोट्या देवळ्या आहेत. एकात सप्तशृंगी देवीची अलिकडची मुर्ती
आहे व दुसरे देऊळ रिकामे आहे. अनेक होळकर कालीन तोफा जमिनीत गाडल्या
गेल्या आहेत. असा हा वैभवशाली किल्ला आज जवळजवळ उद्ध्वस्त होण्याच्या
मार्गावर आहे. तापी नदीला सतत येणा-या पुराने त्याची भिंत पडली असून
गावातील लोक स्वत:ची घरे बांधण्यासाठी आतील माती वाहून नेत आहेत.
अशाप्रकारे राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा
किल्ला होळकरशाहीची श्रीमंती असून तुळशीराम मामा व अन्य हुतात्म यांचा हा
किल्ला शौर्यचे स्मारक आहे. तो जपला पाहिजे. स्थानिक प्रशासन, स्थानिक
जबाबदार व्यक्तीं व राज्य पुरातत्व खात्याने याकडे लवकर लक्ष देऊन या
किल्ल्याचा विकास केला पाहिजे नाही तर हा किल्ला होता असाच एक इतिहास होऊन
बसेल आणि तेथील पुरातत्व खाते हे नावाप्रमाणे पुरावे लागेल. हा किल्ला
पुरातत्व खाते यांच्या ताब्यात आहे. खानदेशात अजून एक होळकरशाहीचा लष्कर
भुईकोट आहे त्याची पण अशीच अवस्था आहे. तत्कालीन काळात तेथे सेनिकांची व
हत्ती, घोडे, उंट व तोफांची प्रशिक्षण कवायती होत असतं. त्या किल्ल्याचे
नाव आहे किल्ले सुलतानपूर ता.शहादा जि.नंदुरबार. आजच्या घडीला हे दोन्ही
किल्ले उपेक्षित अवस्थेत कसेबसे तग धरून उभे आहेत.
फोटो आभार : सचिन हाटले
माहिती आभार : १.स्थानिक नागरिक,थाळनेर, २.इंदोर स्टेट गॅझेट भाग-१,
३.दिव्य मराठी वृत्तपत्र, ४.ट्रेकसिटीज संकेत स्थळ, ५.phd-"अहिल्याबाई
होळकर यांचे नेतृत्व एक राजकीय अभ्यास"-प्रकरण २.
No comments:
Post a Comment