अहिल्यादेवी होळकर आणि जेजुरी मधील कार्य
फोटो : जॉन्टी राऊत(जेजुरी) |
१. श्री खंडोबा देवस्थान, जेजुरी जि.पुणे(महाराष्ट्र) :-
जेजुरी …… श्री मल्हारी मार्तंड देवस्थान म्हणजेच श्री खंडोबा यांचे मंदिर.जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. जेजुरी गडाचा विकास अनेक राजघराण्यानी केला मात्र सिंहाचा वाटा तो फक्त इंदोर (मध्यप्रदेश) येथील श्रीमंत होळकर राजघरण्याचाच. जेजुरीचा खंडोबा हे होळकर राजघराण्याचे कुलदेवत होय. खंडोबा यांचे मंदिर सन १६०८ रोजी बांधण्यात आले.त्यानंतर श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांनी सन १७३५ मध्ये जेजुरी गडाच्या पुननिर्माणाचे कार्य चालू केले. सन १७३९ ला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर (प्रथम) व चिमाजी आप्पा यांनी पोर्तीगीजवर विजय मिळवल्यानंतर दोन पोर्तीगीज घंटा खंडोबाच्या चरणी अर्पण केल्या. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांनी सन १७४२ ला गडावरील दगडी कमानीचे आणि नंतर सन १७५८ ला गडावरील नगारखाण्याचे काम पूर्ण केले.सभोवारच्या सभामंडप, ओवऱ्या व इतर वास्तू श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांनी बांधल्या.पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांनी सन १७७० ला जेजुरी गडाच्या किल्लेसदृष्य तटबंदीचा निर्माण केला.पश्चिम, उत्तर व पूर्वेकडील तटबंदीवर होळकरांचे शिलालेख आढळतात.निसर्गाच्या सन्निध्यात नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या वास्तूकलेचे जेजुरीचा खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे. कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे.या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची थोडी कल्पना येते.जेजुरीचे शिखर व समोरच्या मोठ्या दगडी कमानी यांचे प्रमाण व तोल मराठी वास्तुकारांनी उत्तम साधला होता. देवळाच्या ओवऱ्या व समोरचा ओटा यांवर टोकदार दगडी कमानी आहेत.देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच देवाचा नगारखाना आहे. पूर्वाभिमुख देवळासमोर सात मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे कासव आहे.
जेजुरी गडाची अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील बांधलेली तटबंदी. |
जेजुरी गडाचे तेलचित्र. फोटो : Google वरून. |
२. होळकर वाडा, जेजुरी :-
श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर(प्रथम) यांनी सन १७६८ मध्ये पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नेतृत्वाखाली या वाड्याचे काम पूर्ण केले.सध्या या वाड्या मध्ये राणी अहिल्यादेवी यांचे स्मारक असून होळकर कालीन दुहेरी बांधकाम पहावयास मिळते.त्याच बरोबर होळकर कालीन असलेले दगडी व लाकडी कलाकसुरीचे हि दर्शन होते.वाड्यामध्ये सभागृह पहावयास मिळते.वाड्याच्या बाहेर व आत तुलसी वृंदावन असून वाड्यात दत्त मंदिर हि आहे.हे दत्त मंदिर पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांनी या वाड्याबरोबरच निर्माण केले. या वाड्याचा निम्मा भाग हा महाराजा यशवंतराव होळकर प्राथमिक शाळेस सन.१९९६ रोजी देण्यात आलेले आहे.वाड्याच्या प्रवेशद्वारा पासून ते शेवटच्या भिंती पर्यंत होळकर वस्तूकलेचे दर्शन होते.त्या काळी केले जाणारे बांधकाम पाहून जीव थक होतो.या वाड्यावर खासगी देवी अहिल्याबाई होळकर चारीतेज ट्रस्ट,इंदोर(मध्यप्रदेश) यांचे नियंत्रण असते.या वाड्याच्या समोर होळकर कालीन विठ्ठल मंदिर आहे.हे विठ्ठल मंदिर पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांनी या वाड्याबरोबरच निर्माण केले.
३. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) प्रतिसमाधी,जेजुरी :-
इ. स १७९० च्या सुमारास या समाधीची उभारणी पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवींच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली. हि समाधी मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिर म्हणून ओळखले जाते.पूर्वाभिमुख असलेल्या छत्री मंदिराचे बांधकाम अतिशय प्रमाणबद्ध व रेखीव असून मंदिराचे मंडप व गर्भगृह असे दोन प्राकार आहेत पैकी मंडपाचे छत घुमटाकार आहे व त्यावर आतील बाजूने चित्रे रंगविली आहेत. मंडपामध्ये वातानुविजनासाठी सुरेख कोरीव काम केलेल्या दगडी खिडक्या आहेत. गर्भगृहात लाकडी मेघडंबरीमध्ये खालील बाजूस संगमरवरी शिवलिंग असून मागील कट्ट्यावर मध्यभागी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांची(प्रथम) संगमरवरी बैठी मूर्ती आहे,तर त्यांच्या दोन्ही बाजूला त्यांच्या पत्नी गौतमाबाई व बनाबाई यांच्या मूर्ती आहेत.मंदिरासमोर चौथ-यावर कोरीव नंदीचे भव्य शिल्प आहे, नंदीच्या गळ्यातील घंटा, साखळी व झुलीवरील नक्षी सुबकरित्या कोरलेली असून मंदिराच्या बाजूला द्वारकाबाई व बनाबाई यांच्या दोन स्मारक घुमटी आहेत. या स्मारक घुमटी अनुक्रमे सन १७७२ व सन १७७३ ला निर्माण केली आहेत.
श्रीमंत मल्हारराव होळकर यांची जेजुरी येथील समाधी. फोटो : Pratham VN |
श्रीमंत मल्हारराव होळकर यांची जेजुरी येथील समाधीचे तेलचित्र. फोटो : Google वरून |
पाण्याने तुडुंब भरलेला तलाव, मावळतीला निघालेला सूर्य आणि पश्चिमेकडून येणा-या सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालेला जेजुरगड, पक्षांचा किलबिलाट असे मनाला प्रसन्नता देणारे विहंगम दृश्य मनाचा थकवा नाहीसा करते. भाविक आणि पर्यटकांच्या दृष्टीने जेजुरीतील सायंकाळ निवांत घालविण्यासाठी अतिशय रमणीय ठिकाण म्हणून ज्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तलावाचा.श्रीक्षेत्र जेजुरी नगररचनेचा, जल व्यवस्थापनेतील महत्वाचा दुवा म्हणजे १८ एकर क्षेत्रावर व्यापलेला होळकर तलाव, हा जलसाठा म्हणजे जेजुरी गावाच्या दृष्टीने अमृतकुंभच आहे. टेकडीच्या सोंडेवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या या तलावावर जेजुरी गावाचा पाणी पुरवठा वर्षानुवर्षे अवलंबून होता, आणि आजही या तलावातून झीरपणा-या पाण्यावर परिसरातील विहिरी व कूपनलिकांना पाण्याची कमतरता कधीच भासत नाही.जेजुरी गावाच्या नैऋत्य दिशेकडील डोंगरातून ओढ्याद्वारे वाहत येणा-या पाण्यावर इसवी सन १७७० मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी हा तलाव व जननी तीर्थ बांधले, त्या सोबतच तलावाच्या पूर्व-उत्तर बाजूस देवपूजेसाठी फुलबाग निर्माण केली तर दक्षिण बाजूस चिंचेच्या झाडांची बाग तयार केली ज्याचा उपयोग यात्रा काळातील भाविकांच्या निवा-यासाठी होतो. संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या तलावाला पाच ठिकाणांवरून खाली उतरण्यासाठी बांधीव पाय-या आहेत तर दोन ठिकाणी मोटेद्वारे पाणी उपसण्याची थारोळी आहेत.तलावाच्या पूर्वेकडील भिंतीमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठ्याचे नियंत्रण करणा-या दटट्याची व्यवस्था आहे, तलावाचे पाणी भूमिगत नळाद्वारे गावातील तीन हौदाना व गायमुखाला(जननी तीर्थ) पुरविले जात होते.
होळकर तलाव |
५. जननी जलकुंड (गायमुख किवा चिलावती कुंड) :-
पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर तलावाच्या बाजूला हे जलकुंड स्थित होते.या जलकुंडाचा
पुननिर्माण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी होळकर तलाव्या बरोबरच सन
१७७० रोजी केला.होळकर तालाव्यातील पाणी भूमिगत नळाद्वारे या जलकुंडामध्ये
जात असत. या जलकुंडामध्ये संगमरवरी चार गोमुखातून पाणी पडत असत म्हणून या
कुंडाला गायमुख म्हणत असत.बहुकोनी असलेल्या या जलकुंडास दोनी बाजूने
प्रवेशद्वारे होती. त्याच बरोबर या जलकुंडात उतरण्यासाठी चारी बाजूने
पायऱ्या होत्या.या जलकुंडाच्या चारी बाजूने संगमरवरी गोमुखे होती,या
गोमुखातून जलकुंडात पाणी पडत असत . होळकर तालाव्यातील दट्ययाद्वारे या
पाण्याचे भूमिगत नळांद्वारे नियंत्रण केले जात असत.हा एक अभियात्रीकेचा भाग
होता. हे जलकुंडा नष्ट करून या जागी जेजुरी नगरपालिकेने सध्या भाविक निवास
बांधलेले आहे.
No comments:
Post a Comment