!!..परळीचे प्राचीन शिव मंदिर..!!
सातारा शहराच्या नैऋत्येस ९ किमी. सज्जनगड च्या पायथ्याशी ' परळी ' हे प्राचीन गाव आहे.
या गावामध्ये दोन प्राचीन शिवमंदिरे आहेत अभ्यासकांच्या मते त्याची बांधणी यादव काळात १३ व्या शतकात झाली असावी
शेजाशेजारी असणाऱ्या या दोन शिवमंदिरांपैकी दक्षिणेस असणाऱ्या मंदिराची पूर्णपणे पडझड झालेली आहे. त्यातील फक्त गर्भगृहाचा भाग शिल्लक आहे .
त्याच्या शेजारी असणारे मुख्य मंदिर मात्र बऱ्यापैकी स्थितीत आहे. त्याची रचना सभामंडप , अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे . सभामंडपात अत्यंत सुंदर आणि रेखीव नंदी आहे.
मंदिराच्या खांबांवर सुंदर अशी शिल्पे कोरलेली आहेत. त्यामधील काही आभासी शिल्पे आहे..
मंदिराच्या दर्शनी भागावर डाव्या आणि उजव्या बाजूस ' मिथुनशिल्पे ' ( कामशिल्पे ) कोरलेली आहेत.
मंदिरासमोर एक कोरीव मानस्तंभ आहे. त्याचा तुटलेला अर्धा भाग समोरच ठेवलेला आहे. त्याच्या शेजारी एक पंचमुखी शिवलिंग आहे. हे सदाशिवाचे अव्यक्त रूप आहे , सदाशिव म्हणजे सद्योजत , वामदेव , अघोर, तात्पुरुष आणि ईशान या शिवाच्या पाच अवस्था दाखवणारी ही प्रतिमा आहे . या पंचावस्थिती म्हणजे पृथ्वी, आग, तेज, वायू, व आकाश.
शिवाच्या सदाशिव रूपातील अनेक मूर्ती उपलब्ध आहेत, त्या व्यक्त स्वरूपातील आहेत . येथे ही अव्यक्त रूपातील आहे.
मंदिराच्या समोरील परिसरात एक मान तुटलेला नंदी आहे.
शेजारी पुष्कळ वीरगळ शिल्पे आहेत त्यातील अनेक वीरगळ वर नक्षीदार काम केलेले आहे.
याच परिसरात अनेक समाध्या आहेत माझ्या मते त्या लिगायत समाजातील असाव्यात. शेजारी एक सुंदरशी ' पुष्करणी' आहे पण देखभाली अभावी सध्या ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
हे प्राचीन मंदिर सध्या दुर्लक्षित अवस्थेत आहे . या मंदिराकडे सहसा कोणी येत नाही.
एके काळी समृद्धीच्या परमोच्च शिखरावर असणारे हे मंदिर सध्या ' एकांतवास ' भोगत आहे.
- संतोष अशोक तुपे.
No comments:
Post a Comment