Followers

Wednesday, 14 August 2019

किल्ले लळिंग, जि.धुळे(महाराष्ट्र)

किल्ले लळिंग, जि.धुळे(महाराष्ट्र)

होळकरशाहीतील दुर्ग : किल्ले लळिंग

इ.स.१७५२ मध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) व मराठी सैन्याने भालकीच्या युद्धात निजामाचा पराभव केल्यानंतर हा किल्ला होळकर साम्राज्याच्या अंतर्गत आला . त्यामुळे मराठी साम्राज्यात श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांच्या(प्रथम) अधिपत्याखाली लळिंगचा कारभार चालत असे.हा किल्ला होळकर साम्राज्याच्या अंतर्गत मराठी सत्तेचा अंतहोई पर्यंत म्हणजेच इ.स. १८१८ पर्यंत होता त्यानंतर लळिंग इंग्रजांच्या ताब्यात गेला व संपत्तीच्या प्राप्तीसाठी त्यांनी नासधूस केली. हा किल्ला १३ व्या शतकात फारुकी राजांनी बांधला आहे.
लळिंग हे गाव धुळ्यातून जाणा-या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर वसलेले आहे. त्याचे धुळ्यापासून अंतर नऊ कि.मी., जळगावपासून 100 कि.मी., मालेगावपासून 40 कि.मी. व नाशिकपासून 146 कि.मी. आहे. लळिंग गावामध्ये काळ्या पाषाणात बांधलेले महादेवाचे एक छोटे मंदिर आहे व त्यामागे एक पाण्याची टाकी आहे. या टाकीच्या खालूनच किल्ल्याकडे जाण्याची वाट चालू होते. स्थानिकांची व विशेषत: मेंढपाळांची येथे नियमित ये-जा असल्याने गडावर जाणारी वाट ही मळलेली आहे. थोडे अंतर चालून गेल्यावर किल्ल्याच्या पाय-यांचे भग्न अवशेष दिसून येतात. पावसाच्या पाण्याच्या रेट्याने ते अस्ताव्यस्त पडले असावेत, असे लक्षात येते. साधारणत: अर्ध्या तासाच्या चढाईनंतर दगडात बनवलेल्या काही पाय-या लागतात. त्या चढून गेले की, समोरच एक थडगे व शेवाळलेले टाके दिसते. येथून डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूंना जाण्यासाठी रस्ते आहेत. डाव्या बाजूचा रस्ता हा फसवा आहे. तो पडझडीमुळे चुकीचा मार्ग दर्शवतो. हा रस्ता तटबंदीच्या बाहेरच्या बाजूने जातो. उजव्या बाजूचा रस्ता खालच्या तटबंदीकडून थेट मुख्य दरवाजाकडे जातो. याच वाटेमध्ये चार-पाच कातळात कोरलेली दालने दिसून येतात. पाणी साठवण्यासाठी वा राहण्यासाठी या गुहांचा वापर होत असावा. सध्या ती पूर्णपणे कोरडी पडली आहेत. मात्र पावसाळी मोसमात त्यात ब-यापैकी पाणी भरले जात असावे.
ही टाकीसदृश गुंफा मागे पडल्यावर आपण चालत या किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचतो. सध्या तो पूर्णपणे भग्न अवस्थेत आहे. दरवाजाच्या उजव्या बाजूला एक व्याघ्रशिल्प कोरलेले दिसते. येथून वर गेल्यावर उजव्या बाजूला गडाची तटबंदी दिसून येते .आपण गडाच्या माथ्यावर पोहोचलेलो असतो. गड पायथ्यापासून चढताना सतत एक सज्जाची कमानीयुक्त भिंत दिसत राहते. ही भिंत याच ठिकाणी दृष्टीस पडते. विटांचा व चुन्याचा वापर करून ती उभी केलेली आहे. समोरच नव्याने ध्वजस्तंभ उभारलेला आहे. त्याच्या पलीकडून मुंबई-आग्रा महामार्ग व धुळे शहराचे दर्शन होते. वातावरण स्वच्छ असताना सोनगीरचा किल्लाही येथून दिसतो.
तटबंदी पाहून पुन्हा प्रवेशद्वारापाशी आल्यावर डाव्या बाजूच्या वाटेने किल्ल्याच्या दुस-या भागाकडे जाता येते. रस्त्यात कातळात तयार केलेली एक पाण्याची टाकी आहे. त्यात उन्हाळ्याच्या ब-याच काळापर्यंत पाणी साठलेले असते. परंतु हे पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. पुढच्या भागात व किल्ल्याच्या मुख्य पठारावर आणखी काही पाण्याची टाकी कातळात तयार केल्याची दिसतात. पठारावर मध्येच काहीसा उंचवटा आहे. काही ठिकाणी राहत्या घरांचे पडीक अवशेष नजरेस पडतात. या पठाराच्या चहुबाजूंनी तटबंदी बांधलेली आहे. मध्य टेकाडाच्या पोटात काही गुहा खोदलेल्या आहेत. अशा गुहांची संख्या मात्र या किल्ल्यावर बरीच दिसून येते. समोरच एक दारू कोठाराची इमारत दृष्टीस पडते. त्याच्या मागच्या बाजूला पाण्याचा मोठा खंदक व तीन-चार टाकी आहेत. समोरच दुर्गा मातेचे एक छोटेखानी मंदिर आहे. लळिंगच्या किल्ल्यावर कधी राहण्याची वेळ आली तर या मंदिराचा वापर करता येतो. परंतु, येथे केवळ दोनच जण राहू शकतात. समोरील पाण्याच्या टाक्यांना लागून एक कुंड आहे. त्यातही पाणी साठलेले असते. किल्ल्यावर येणारे मेंढपाळ जनावरांना पाणी पाजण्यासाठी या कुंडाचा वापर करतात.
मंदिराच्या मागील बाजूस पुन्हा काही कोरलेल्या गुहा दिसून येतात. या गुहांनी बरीच मोठी जागा व्यापलेली आहे. एका गुहेपाशी एक भुयार आहे. हे भुयार थेट गडाच्या गुप्त दरवाजापाशी येऊन मिळते. या दरवाजापासून खाली कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. खाली उतरल्यावर उजव्या बाजूला एक वाट जाते. वाटेत देवीचे एक पडके मंदिर दिसते. येथूनच लळिंगच्या मुख्य माचीकडे वाट जाते. किल्ल्याच्या मुख्य बुरुजावरूनही ही माची स्पष्ट दिसून येते. माचीवर एक पाण्याचा भव्य तलाव आहे. समोरच एका घुमटीच्या खाली पाण्याची दोन टाकी आहेत. माचीचा परिसर पाहून झाल्यावर दुस-या बाजूची वाट पुन्हा किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जाते. येथून पुन्हा खाली मार्गस्थ होता येते. लळिंगचा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 1500 मी. उंच असल्यामुळे तो सर करताना वा उतरताना थकवा कधी जाणवत नाही.

No comments:

Post a Comment