Followers

Wednesday, 28 April 2021

#गोष्ट_अजिंठा_लेणींची




 #गोष्ट_अजिंठा_लेणींची

इ.स. पुर्व दुसरं शतक.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एकाच वेळी लेणी खोदण्याचे काम सुरु झालंय.
नांगरायला काळी माती आणि कोरायला दख्खनचा बेसाल्ट असला तर सोने पे सुहागा..
....तर एक बौध्द भंते जे उत्कृष्ट स्थपतीसुध्दा आहेत अजिंठ्यात उतरतात.नारळ जसा टिचक्या मारुन,कानाला लावून पारखला जातो तसाच हा इथला घोड्याच्या नालेच्या आकाराचा अगडबंब,उघडबंब काळा कातळ बघतात टिचकी मारुन..
भुरचना विशेषतः इथला पैनोरामीक व्ह्यु त्यांना भावतो.एक कटाक्ष कातळावर पडतो,डोळ्यात चमक अन् एक मंद स्मित रेषा...
.. सभोवतालच्या जंगलातले लाकुड आणून अनावश्यक असलेल्या मोठमोठ्या पत्थरांजवळ पेटवले जाते.गरम झालेल्या कातळावर पाणी सोडलं जातं.अन् मग दुभंगलेले पत्थर दरीत ढकलले जातात.
......राजे,व्यापारी, सामंत यांजकरवी द्रव्य मिळतं.कारागिरांची गामे वसवली जातात.पिढ्यानपिढ्या शतकानुशतके छिन्नी हातोड्याचे घाव बेसाल्ट हसतमुखाने सहन करतो.जणु काही बुध्द होण्यासाठीची बोधिसत्वाची सत्वपरिक्षाच...
लेणी शिल्पींकडून कोरली जातात नालंदादी विद्यापिठांतून चित्रकलेत प्राविण्य मिळवलेले कलाकार त्या शिल्पांवर रंग चढवतात.छतं,भिंती, कोपरा न् कोपरा मिळेल तिथे बुध्द, बोधिसत्व,राजे प्रजा,परदेशी प्रवासी,परिचारिका, राण्या,नोकरचाकर,फळे,फुले,वेली,प्राणी चितारले जातात. कोपरे रंगविले जातात.
शेकडो वर्षे अजिंठा लेणी कला,स्थापत्य,शिल्प आणि धम्म यांना कवेत घेऊन भंते व विद्यार्थ्यांनी ओसंडून वाहते.
....कालौघात अनेक घडामोडी घडतात. राजाश्रय तुटतो.द्रव्य आटते. कारागीर निघून जातात.मग धम्माचं निर्गमन होतं,भंते ही निघून जातात.निर्जन लेणी उज्वल इतिहास आठवत पावसासवे आसवं ढाळतात शतकानुशतके.
....... माती जमा होते ,वेली,पक्षी,श्वापदांची वस्ती वसते.अजिंठा लेणी लुप्त होतात जसा धम्म लुप्त झाला तशाच.शेकडो वर्षे...
मग इंग्रज येतात.जॉन स्मिथ व त्यांचं लष्कर, संशोधक, जिज्ञासू, इतिहास संशोधक, चित्रकार रॉबर्ट गील,त्याची पारो...
सर्वजण आपापल्या परिने जतन करतात,संवर्धन करतात.संशोधन करतात. इंग्रजांमुळे लेणी उजेडात येतात,उत्खनन केलं जातं,शिलालेख वाचले जातात,
आणि अनेक विद्वानांची नजर लेणी, स्तुप,स्तंभाभरोबरच बौद्ध धम्म आणि तत्वज्ञानावर पडते.
पुन्हा उत्खनन स्तुपांचं,
जतन लेणींचं आणि
बाबासाहेबांद्वारे पुनरागमन होतं धम्माचं....
बौध्द धम्माचं....!!
अजिंठा लेणींचा शोध लागुन दोनशे वर्षे झालीत आज.खुपच सुंदर लेणी आहेत...
सुंदर तत्वज्ञान, धम्म चित्रित करुन ठेवलाय पुर्वजांनी...
जतन करुयात...
एका उर्दु शायराच्या ओळी आहेत अजिंठ्यावर लिहिलेल्या..
जहां नगमें जनम लेते है
रंगिनी बरसती हे..
दख्खन की गोद में आबाहा
ये खाबों की वस्ती है..
ये तस्वीरें बजाहेर साकेत
व खामोश रहती है..
मगर अहले नजर पुछे तो
दिल की बात कहती है...
मंगेश जावळे,कल्याण
२८/०४/२०१९

Saturday, 24 April 2021

मंगळगड अर्थात कांगोरी किल्ला

 
















मंगळगड अर्थात कांगोरी किल्ला
( गड - किल्ले : २०२१ / ०९ )
कोकणातील सावित्री नदीकाठी वसलेल्या महाड शहरातून परदेशांशी व्यापार चालत असे. महाडात उतरलेला माल अनेक घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठांत जात असे. ह्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी घाटमार्गाच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीवर व घाटमाथ्यावर अनेक किल्ले बांधण्यात आले .त्यापैकी मंगळगड उर्फ कांगोरी गड जावळीच्या खोर्यातील ६६४ मी उंच डोंगरावर जावळीच्या मोऱ्या कडून बांधण्यात आला. कांगोरी उर्फ मंगळगड हा किल्ला जावळीच्या खोर्यातील भोप घाट, कामाथा घाट ,वरंध घाट व अस्वल खिंड यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी व व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आला. उंच डोंगर, घनदाट जंगल व खोल दर्यांनी नटलेला आहे. महाबळेश्वर,वासोटा, मकरंदगड, मंगळगड, चंद्रगड, प्रतापगड, कावळा किल्ला व पारघाट यांच्या दाटीत जावळीच खोर वसलेल आहे.
पूर्वपश्चिम लांबी १४८५ फूट व दक्षिण-उत्तर रुंदी २६४ फूट असलेल्या मंगळगडाचे प्रवेशद्वार सुस्थितीत नाही. प्रवेशद्वाराबाजूचे भग्न बुरुज आणि तटबंदी मात्र अजुन शाबूत आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूची वाट बालेकिल्ल्याकडे जाते व डाव्या बाजूची वाट पूर्वपश्चिम पसरलेल्या माचीवर जाते. माचीवर कांगोरी देवीचे मंदीर आहे. मंदीराकडे जाताना उजव्या हाताला दगडात खोदून काढलेल पाण्याच टाके लागते. या टाक्यात उतरण्यासाठी दगडात खोदून काढलेल्या पायर्या आहेत.
डाव्या हाताला दगडात कोरलेल पण आता बुजलेले टाक दिसत. या टाक्याजवळ किल्ल्यावर सापडलेल्या अनेक मुर्ती ठेवलेल्या आहेत. कांगोरी देवीचे मंदिर दगडी जोत्यावर बांधलेले आहे. १० पायर्या चढून मंदिरात गेल्यावर प्रवेशद्वाराची विटांनी बनवलेली अर्धवर्तुळाकार कमान दिसते. देवळावरील मुळ छत काळाच्या ओघात नष्ट झालेल आहे. गाभार्यात भैरवाची व कांगोरी देवीची अशा दोन दगडी मूर्त्या आहेत. मंदीराच्या गाभार्याबाहेर भिंतीला टेकून दगडी भग्न मूर्त्या ठेवलेल्या आहेत.
मंदिराच्या मागील बाजूस गेल्यावर आपण अरुंद होत जाणार्या माचीच्या टोकावर पोहचतो. या माचीला दोनही बाजूंनी तटबंदी बांधून काढलेली आहे. माचीच्या टोकावर विस्तिर्ण अर्धगोलाकार बुरुज व ध्वजस्तंभ आहे. माचीच्या या टोकावरुन विस्तिर्ण प्रदेश दृष्टीक्षेपात येतो.
माचीवरुन बालेकिल्ल्याकडे जाताना कड्याच्या टोकाला एक अरुंद पाण्याचे टाक दिसत. बालेकिल्ल्यावर पाण्याच विस्तिर्ण टाक आहे. तेथून वर चढून गेल्यावर दोन वाड्यांचे अवशेष दिसतात. त्यातील एका वाड्याच दगडी जोते फक्त शिल्लक आहे, दुसर्या वाड्याच्या पडक्या भिंतीही शाबूत आहेत. वाड्याच्या मागील वाट आपल्याला पश्चिम टोकावरील बुरुजावर घेऊन जाते. किल्ला चढताना किल्ल्याचे नाक सतत दिसत असते. त्या नाकावर आपण पोहचलेलो असतो. बालेकिल्ल्याला फेरी मारतांना अजून दोन पाण्याची टाक दिसतात. यात बारमाही रुचकर पाणी असते. बालेकिल्ला उतरुन माचीवरील प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. कांगोरी गडावरून दक्षिणेकडे कामथे खोरे , महादेव मुऱ्हा चा डोंगर दिसतात . तर पश्चिमेला रायरेश्वर व कोळेश्वर डोंगर दिसतात . गडावरून मकरंदगड, प्रतापगड, रायगड, लिंगाणा, असे किल्ले दिसतात. तसेच रायरेश्वर, कोळेश्वर आणि महाबळेश्वरची पठारेही दिसू शकतात
१५ जानेवारी १६५६ रोजी शिवाजी महाराजांनी जय्यत तयारीनीशी जावळीवर हल्ला केला व जावळी ताब्यात घेतली. त्याबरोबर ८ जानेवारी १६५८ रोजी कांगोरी गड, ढवळगड ( चंद्रगड ), रायरी इत्यादी किल्लेही महाराजांच्या ताब्यात आले. मुरारबाजीसारखा कसलेला योध्दा मिळाला. कांगोरीगडाची डागडूजी करुन त्याचे नाव बदलून ‘‘मंगळगड’’ ठेवले. स्वराज्यांची राजधानी रायगडच्या जवळ असल्यामुळे याचा उपयोग राजकीय गुन्हेगारांना तुरुंगवासात ठेवण्यासाठी केला गेला. संभाजी महाराजांचा वध केल्यावर औरंगजेबाने इतिकदखान उर्फ जुल्फीकारखानास रायगड घेण्यास सांगितले. रायगडाच्या वेढ्यातून राजाराम महाराज निसटून वासोट्यामार्गे पन्हाळगडावर गेले. त्यांचा एकनिष्ठ सेवक गिरजोजी यादव रायगडाहून सोने व मौल्यवान वस्तु वेढ्यातून सहीसलामत बाहेर काढून मंगळगडाच्या आश्रयाला आले व तेथून चीजवस्तु काढून पन्हाळ्याला नेल्या. रायगडची नाकेबंदी करण्यासाठी मार्च १६८९ मध्ये खानाने आजूबाजूचे किल्ले व प्रदेश ताब्यात घेतला.त्यावेळी मंगळगड मोघलांच्या ताब्यात गेला. इ.स १६९० मध्ये छ. राजाराम महाराजांचे अमात्य रामचंद्रपंत यांनी ‘मंगळगड’ जिंकून घेतला. इ.स. १७७४ च्या एप्रिलमध्ये रायगडाच्या शिंबदीने कांगोरीवर स्वारी केली, याचे कारण बिरवाडी येथील निम्मा अंमल 'रायगडचा' व निम्मा कांगोरीचा असा होता.तर्फ बिरवाडीचा अंमल पेशव्यांनी जप्त केल्याने कांगोरकर रागावले आणि त्यांनी दंगे करुन रायगड परिसरात उपद्रव देण्यास सुरवात केली. कांगोरीकरांशी दोन तीन चकमकी झाल्यानंतर हा दंगा मिटला.
इ.स. १७७५ -७६ मध्ये येथे चोरट्यांचा उपद्रव झाल्यानंतर त्याचा बंदोबस्त रायगडाच्या शिंबदीने केला. इ.स. १७७९ मध्ये श्यामलने म्हणजे जंजिर्याच्या सिद्दीने रायगड परिसरात दंगे आरंभले तेव्हा त्याचा बंदोबस्त करण्याचे काम रघुनाथ सदाशिव याने केले.त्यावेळी मंग़ळगड उर्फ कांगोरी गडावरील शिंबदी मदतीला आली.
इ.स. १७७८-७९ मध्ये रायगड सुभ्यातील २४४ गावे होती. ती पेशव्यांनी जप्त करुन तात्पुरते परत घेतले.त्यापैकी तर्फ बिरवाडीची ६ गावे पंतप्रतिनिधींच्या ताब्यात असून ती कांगोरी संरजामास लावून दिली.
इ.स. १७८१-८२ मध्ये मंगळगडकर यांच्याशी बिरवाडीकडील वसुलीवरुन पुन्हा वाद आणि चकमक झाली.
इ.स. १० फेब्रुवारी १८११ मध्ये सातारा छत्रपती प्रतापसिंह यांचा भाउ चतुरसिंह यांनी पेशव्यांविरुध्द उठाव केल्याने पेशव्यांचा ( दुसर्या बाजीराव ) सेनापती त्रंबक डेंगळे यांनी त्याला मालेगाव येथे अटक केली.चतुरसिंह १८१२ मध्ये कांगोरी किल्ल्यावर कैद होता.कैदेत असताना १५ एप्रिल १८१८ रोजी त्याचा मृत्यु झाला.
इ.स.१८१७ मध्ये सरदार बापू गोखल्यांनी मद्रास रेजीमेंट मधील कर्नल हंटर व मॉरीसन हे इंग्रज अधिकारी हैदराबादहून पुण्यास येत असताना वाटेत उरूळी येथे अटक करुन मंगळगडावर कैदेत ठेवले होते. पुढे बापु गोखले यांच्या हुकुमावरुन त्यांना वासोटा किल्ल्यावर नेउन ठेवण्यात आले.पुढे वासोटा इंग्रजांनी घेतला तेव्हा त्यांची सुटका झाली.
मे १८१८ मध्ये इंग्रजांनी रायगडला वेढा दिला असता मंगळगडावरून एक तुकडी रायगडाच्या संरक्षणासाठी आली असता बिरवाडीजवळ तिची इंग्रज सैन्याबरोबर लढाई झाल्याचा उल्लेख आढळतो. इ.स. १८१८ मध्ये रायगडच्या पराभवानंतर कर्नल प्रोर्थर या इंग्रज अधिकाऱ्याने हा किल्ला ताब्यात घेतला.

Thursday, 22 April 2021

ऐश्वरेश्वर मंदिर, सिन्नर















ऐश्वरेश्वर मंदिर, सिन्नर
सिन्नर शहरातील गोंदेश्वर मंदिर हे भूमिज शैलीतले महाराष्ट्रातले तुलनेने उशिरा निर्माण झालेले मंदिर. १३ व्या शतकातले. हे मंदिर बांधले गेले तेव्हा देवगिरी ही राजधानी होती. मात्र त्याही आधीचे म्हणजे यादव हे मांडलिक असतानाचे आणि देवगिरी हे यादवांची राजधानी नसतानाहीच्या कालखंडात एक मंदिर सिन्नरात बांधले गेले होते. ते दुर्लक्षित मंदिर म्हणजे सरस्वती नदीच्या किनारी असलेलं ऐश्वर्येश्वराचे. ह्यालाच आयेश्वर मंदिर असेही म्हणतात. यादव आईरमदेव ह्याने हे बांधले असावे असे मानले जाते.
हे आयेश्वराचं मंदिर दिसायला अगदी लहानसं आहे. किंचित वेगळ्या शैलीच. द्रविड आणि वेस्सर अशा मिश्र शैलीचं. मूळचं शिखर आज गायब आहे त्यामुळे शैली नीटशी ओळखता येत नाही. ऩक्षीदार स्तंभांवर तोललेला सभामंडप, पुढे अंतराळ आणि मग गर्भगृह अशी त्याची रचना आहे. गाभाऱ्यात पिंड आणि त्यासमोरील मंडपात नंदी विराजमान दिसतो. मंदिराच्या सभामंडपाचे स्तंभ उत्कृष्ठ नक्षीकामाचा नमुना आहेत. हे स्तंभ सरळ आहेत, इतर मंदिरांप्रमाणे वर चौकटीजवळ निमुळते झालेले नाहीत. गर्भगृहाच्या बाह्य अंगावर काही भग्न शिल्प आपल्याला दिसतात पण दगडांच्या झालेल्या झिजेमुळे ती नीटशी ओळखता येत नाहीत. या मंदिराच्या गर्भगृहाच्या द्वारावर दगडात कोरलेले अप्रतिम मकर तोरण हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.

 

Wednesday, 21 April 2021

#हत्तरसंग_कुडल

 
















#हत्तरसंग_कुडल
सोलापूर येथून विजयपूर महामार्गावरून टाकळी गावापर्यंत जा. तेथून डावीकडून 8 किमीवर हे स्थान आहे. सोलापूरपासून 22 किलोमीटर अंतरावर भीमा आणि सीनेच्या संगमावर हरिहरेश्वर आणि संगमेश्वर देवस्थान आहे. पुरातत्वीय बारकावे न्याहाळत संपूर्ण परिसरात फेरफटका मारणे समाधान देऊन जाते.
मंदिरासमोर गर्द झाडी आहेत. स्वच्छता सुखावणारी आहे. येथील मंदिर परिसरात भोजन करणे हाच एक वेगळा अनुभव आहे. पर्यटक भोजन झाल्यानंतर स्वच्छता राहील याची स्वतः काळजी घेतात. वातावरणाचा परिणाम होतो तो असा. जीवनातील ताण तणाव विसरून पर्यटक येथे फिरतात, झाडांखाली विश्रांती घेतात. धार्मिक पर्यटन पावित्र्य राखून कसे विकसित करता येते हे पाहण्यासाठी येथे एकदा येथे अवश्य भेट द्या.
एक दिवसाचे पर्यटन म्हणून
हे स्थान परफेक्ट आहे.
1. हे स्थान महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर आहे.
2. भीमा आणि सीना या नद्यांचा येथे काटकोनात संगम होतो.
3. मराठी भाषेतील सर्वात प्राचीन शिलालेख येथेच आहे.
4. सुमारे तीस वर्षांपूर्वी केलेल्या उत्खननात हरिहरेश्वराचे प्राचीन मंदिराचे अवशेष येथे मिळाले. सुमारे हजार वर्षांपूर्वी हे मंदिर ज्या स्थितीत होते तशी उभारणी पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न पुरातत्व खात्याने केला आहे.
5. पाषाणातील एका भव्य शिव लिंगात 359 शिव लिंग कोरलेले लिंग उत्खननात मिळाले.
6. पर्यटनाच्या दृष्टीने येथे अनेक विकास कामे झाली आहेत. आमदार विजय देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख हे मंत्री असताना यातील अनेक कामे झाली.
______
गूढ आणि अद्भुत

गोवा उर्फ हर्णेचा किल्ला

 गोवा उर्फ हर्णेचा किल्ला

postsaambhar :';प्रशांत महादेव साळुंखे













दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळ 3 किल्ल्यांचा समूह आहे. कनकदुर्ग, फत्तेगड व गोवा किल्ला. हे किल्ले हर्णे समुद्रातील ‘सुवर्णदुर्ग’ किल्ल्याच्या रक्षणार्थ बांधले गेलेले आहेत हे मात्र खात्रीशीर सांगता येते. त्यातील गोवा किल्ला हा आकाराने सर्वात मोठा आहे. तसेच बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत आहे.
हर्णे बंदराला जाणाऱ्या रस्त्यालाच हा किनारी दुर्ग आहे. गडाला दोन दरवाजे आहेत, एक जमिनीवरचा व दुसरा समुद्राकडील बाजूस. सध्या मात्र वापर जमिनीवरच्या दरवाजाचा जरी होत असला तरी मुख्य दरवाजा हा समुद्राकडीलच आहे. दरवाजातून आत गेल्यावर उजव्या हाताला एक पाण्याचे टाके दिसते. त्याच्या शेजारीच मुख्य दरवाजाची आतील बाजू आपणास पहावयास मिळते. दरवाजा सध्या चिर्यांनी बंद केला आहे दरवाजास दोन्ही बाजूस दोन पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. दरवाजाच्या वर जाण्यास पायऱ्या आहेत. तटावरून गडफेरी करता येते, मात्र बऱ्याच ठिकाणी तट ढासळलेला आहे दरवाजा पासून पुढे जाताना उजव्या व डाव्या बाजूस चौथ-याचे अवशेष दिसतात. गडाच्या डावीकडील उंचवट्या च्या भागात ब्रिटिश काळातील इमारती आहेत समोरच मोठी विहीर आहे, पण विहिरीत उतरण्यास पायऱ्या जरी असल्या तरी झाडींच्या गचपणामुळे आत उतरता येत नाही.
पुढे दोन बुरुजांमधून बालेकिल्ल्याचा दरवाजा आहे बालेकिल्ल्याचा परिसर आटोपता आहे मात्र येथून सुवर्णदुर्ग, फत्तेदुर्ग व कनकदुर्ग चा विहंगम परिसर दिसतो.
गडाला जवळजवळ 14 बुरुज आहेत. येथे आपली गडफेरी पूर्ण होते मात्र गडाचे मुख्य आकर्षण पाहायला आपल्याला गडाबाहेर जावे लागते.
दरवाजातून बाहेर पडल्यावर डावीकडे समुद्राच्या बाजूने तटाकडेने गेल्यावर समोर येतो तो गोमुखी पद्धतीने दोन बुरुजात लपवलेला महादरवाजा. बुरुजांच्या पडलेल्या दगडांवरून गेल्यावर दरवाज्याजवळ उजवीकडे संकटमोचन हनुमान शिल्प भिंतीवर दिसते, आता तिथे घुमटीवजा छोटे मंदिर आहे. दरवाज्याच्या कमानीवर गंडभेरुंड आहे खाली शरभ शिल्पे दिसतात इथेच डावीकडे खाली असणाऱ्या शिल्पात मात्र दुर्मिळता जाणवते. शिल्पात तीन कुत्र्यांनी एकमेकांचे गळे आपल्या जबड्यात पकडले आहेत व पायात २ हत्ती पकडले आहेत तर हत्तींनी आपापल्या सोंडानी दुसऱ्या हत्तीच्या शेपट्या पकडल्या आहेत असा हा अद्भूत अभेद्य दरवाजा पाहायला जास्त कोणी फिरकत नाही हीच खरी खंत आहे.
या किल्ल्यावरून सुवर्णदुर्गाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.या किल्ल्यावरून सूर्योदय व सूर्यास्त पाहणे हा एक विलोभनीय अनुभव असू शकतो.
१८६२ च्या पाहणीत हा किल्ला व्यवस्थित होता व किल्ल्यावर जुन्या ६९ तोफा होत्या आणि त्या तोफांची संरक्षणव्यवस्था पाण्यासाठी 19 शिपाई होते, अशी नोंद मिळते. सध्या मात्र इथे एकही तोफ पाहायला मिळत नाही.