Followers

Monday 12 April 2021

वाटचाल औरंगाबाद शहराची


वाटचाल औरंगाबाद शहराची

 

आपण ज्या शहरामध्ये राहतो, जिथे आपला जन्म झालेला असतो ते शहर नेहमीच आपल्यासाठी खास असते, आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी त्या शहराची ओढ नेहमीच आपल्याला असते. तसच काहीस खास शहर म्हणजे आपल औरंगाबाद… आपण औरंगाबादकर सध्या औरंगाबाद ची ओळख मराठवाड्यातील एक मोठ औद्योगिक केंद्र, शैक्षणिक केंद्र  अशी असली तरी शहराच्या विविध भागात आज काही भग्न अवशेष त्याच्या अस्तित्वाची, संपन्नतेची, इतिहासाची, संस्कृतीची गोष्ट सांगू पाहत आहेत मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. इथे गरज आहे ती आपल्या शहराबद्दल जाणून घेऊन येथील अवशेषांची दखल घेण्याची, त्याचे योग्य रीतीने संवर्धन करण्याची.

खाम नदीवर वसलेले औरंगाबाद नैसर्गिक दृष्टीकोनातून कधी काळी उत्तम, नियोजनबद्ध असे शहर होते. याची बैठकच मनात भरण्यासारखी होती आणि म्हणूनच विविध काळात सरदार, राजे यांचे लक्ष वेधून या शहराने राजधानीचे शहर बनण्याचा मान पटकावला. औरंगाबाद ला ऐतिहासिक संपन्नतेचा वारसा लाभलाय. या भूमीवर अनेक राजवटी होउन गेल्यात, त्यामुळे अनेक धर्म, पंथ याठिकाणी गुण्या गोविंदाने नांदले, आणि एका संमिश्र संस्कृतीचा सुंदर मिलाप येथे झाला. महानुभाव, वारकरी, सुफी संतांनी दिलेले सहिष्णुतेचे पाठ हे या नगरीचे वैभवाच म्हणावे लागेल. संताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीला पुरातत्वीय आधारानुसार अश्मयुगापासून ऐतिहासिक् संदर्भ आहे, “Antiquerian remains in Hydrabad state 1953” च्या अहवालात  औरंगाबाद जिल्ह्यातील नवपाषण संस्कृतीची नोंद आहे. त्यानंतर सातवाहन, राष्ट्रकुट, यादवांच्या काळात औरंगाबादला विस्तृत प्रमाणात प्राचीन ऐतिहासिक बैठक लाभली. उत्तर आणि दक्षिणेच्या व्यापारी मार्गावरील हे एक मुख्य केंद्र होते.

१६१० नंतर मलिक अंबर याने मुघलांच्या आक्रमणापासून बचाव करते समयी राजधानी दौलताबाद पासून हलवून खडकी येथे स्थानांतरीत केली, आणि  या शहराचे रूप पालटले. खडकी गाव ते औरंगाबाद शहर असा प्रवास सुरु झाला. मलिक अंबरचा मुलगा फतेह खान याच्या नावावरून  या शहराला काही काळ ‘फतेह नगर’ असेही संबोधले गेले. या शहराला औरंगाबाद हे नाव १७ व्या शतकात औरंगजेब च्या नावावरून पडले; असे असले तरी औरंगाबाद चे मुळ नाव ‘राजतडाग’ असल्याचे शिलालेखावरून स्पष्ट होते. मुंबईच्या कान्हेरी येथील सातवाहन कालीन लेण्यांमध्ये असलेल्या शिलालेखात राजतडागचा स्पष्ट उल्लेख आढळतो. राजतडाग म्हणजे राजाने निर्माण केलेले सरोवर होय. प्रतिष्ठान ते श्रावस्ती या सार्थवाह पथावरील राजतडाग हा महत्वाचा थांबा होता. सार्थवाह पथ म्हणजेच व्यापारी मार्ग होय. प्रतिष्ठान (पैठण) वरून उज्जैन, श्रावस्ती येथे प्रवास करणारे अनेक प्रवासी तांडे याठिकाणी मुक्कामास थांबत असत, त्यांची मुक्कामाची सोय करण्याच्या दृष्टीने सातवाहन राजांनी राजतडाग ची निर्मिती केली होती. आजचा हर्सूल तलाव म्हणजेच सातवाहनांनी निर्माण केलेले राजतडाग होय असे म्हणले जाते, परंतु याबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. यानंतर वाकाटकांच्या अधिपत्याखाली हा भाग असावा हे औरंगाबाद येथे उत्खननात सापडलेल्या लेण्यांवरून वाटते.

या शहराला नावारूपास आणण्याचे श्रेय मलिक अंबर आणि औरंगजेब यांना जाते. मलिक अंबर याने या शहराचा विस्तार केला आणि स्वतःच्या बौद्धिक क्षमतेच्या आधारावर इथे भक्कम अशी  भूगर्भीय जलव्यवस्थापन पद्धती निर्माण केली जी अगदी आजपर्यंत कायम आहे. त्याच प्रमाणे अनेक महाल, प्रशासकीय इमारती व लोकोपयोगी वास्तू उभारल्या. खडकीचे शहरीकरण करण्यात मलिक अंबराचा मोठा वाटा आहे.

पुढे मुघल सम्राट औरंगजेबच्या काळात शहराचा विस्तार झाला. औरंगजेब १६३६ साली या प्रांताचा सुभेदार होता. यानंतर औरंगजेब १६८९ मध्ये मुघल साम्राज्याचा सम्राट म्हणून खडकी येथे परतला आणि १७०७ आपल्या मृत्यूपर्यंत येथे राहिला. औरंगजेबच्या निवासस्थाना दरम्यान हे शहर मुगल साम्राज्याची आभासी राजधानी झाले. औरंगजेबाने पुन्हा खडकीचे शहर वसवले आणि तिला दख्खन सुभ्याची राजधानी म्हणून विकसित केले आणि या शहराचे नाव औरंगाबाद असे ठेवले. जे आजतागायत रूढ आहे. १६९२ मध्ये त्यांनी येथे भव्य राजवाडा किला-ए-अर्क बांधला. त्याने शहराभोवती तटबंदी बांधली. हि तटबंदी घालण्यामागे दोन उद्देश होते एक म्हणजे खाम नदीला येणाऱ्या पुरापासून शहराचे रक्षण करणे आणि दुसरे म्हणजे मराठा आक्रमणापासून शहराचा बचाव करणे. शहराच्या तटबंदीला लागून १३ दरवाजे बांधले गेले, याव्यतिरिक्त देखील अनेक दरवाजे शहरामध्ये आहेत. औरंगजेबाच्या काळात हे शहर विद्वान पुरूषांचे, व कुलीन कारागीरांचे सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमासाठीचे केंद्रबिंदू बनले होते. आणि संवाद साधण्याकरीता औरंगाबाद येथे पोर्तुगीज, आर्मेनियन आणि फ्रेन्च दूतावासांची स्थापना करण्यात आली होती. देशाच्या विविध भागातून व्यापारी, कारागीर येथे येऊन स्थाईक झाले, अनेक मंदिर, मस्जीद, दर्गे, वाडे, देवड्या, बावड्या, विहीर, बझार, पुरे, हमाम यांची निर्मिती केली गेली. बेगमपुरा, जयसिंगपुरा, भावसिंगपुरा, पहाडसिंगपुरा, औरंगपुरा, नागेश्वरवाडी, भोईवाडा, हर्सूल, छावणी, फाजालपुरा, कर्णपुरा, नवाबपुरा, बायजीपुरा या उपविभागांची निर्मिती खाम नदीच्या काठी करण्यात आली.

औरंगजेबच्या मृत्यूनंतर  निजाम-उल-मुल्क असफजाह यांनी औरंगाबाद येथे स्वतःच्या स्वतंत्र्याची घोषणा केली. त्यांनी नवखंडा महालामध्ये आपले वास्तव्य केले. जे खाम नदीच्या तीरावरच स्थित आहे. असफजहाने शहराच्या सौंदर्यात आणखीन भर टाकली आणि अनेक राजवाडे, बाग, मस्जीदी आणि कालवे बांधले. महत्त्वाचे म्हणजे याचकाळात पानचक्की, गुलशन महाल, दमडी महाल, बारादरी, हवेली आरसे महाल ई. वास्तूंची निर्मिती केली गेली.

भारताच्या स्वातंत्र्य चळवळी मध्ये देखील औरंगाबादने मोलाची भर पाडली. निझामाने इंग्रजांच्या अधिपत्याखाली राहून मराठवाडा वरील ताबा मजबूत ठेवला होता आणी विलीनिकरणास नकार दिला होता तेव्हा औरंगाबाद येथील विद्यार्थी, स्त्रिया, पुरुष या सर्वांनी जीवाची परवा न करता  अतोनात कष्टाने मराठवाडा मुक्तीसंग्राम घडवून आणला.

अशा समृद्ध आणि वैभवशाली वारसा लाभलेल्या या शहरामध्ये प्रत्येक काळाच्या खुणा वास्तुरूपाने कोरल्या गेल्या आहेत ज्या आजतागायत आपल्या शहराच्या वैभवाची साक्ष देत आहेत काही वास्तू आज दुर्लक्षित आहेत आणि नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, यांचे संवर्धन होणे अत्यावश्यक आहे. आपल्या शहराचा संपन्न वारसा पुढील पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी आजपासून प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे..


No comments:

Post a Comment