Followers

Monday 12 April 2021

रामगड / माहूरगड / माहूरचा किल्ला

 

रामगड / माहूरगड / माहूरचा किल्ला
उंची: २६०० फुट
डोंगररांग: सातपुडा
चढाई श्रेणी: मध्यम
जिल्हा: नांदेड
माहूर / माहोर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे.माहूर, नांदेड जिल्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. श्रीरेणुकादेवी मंदिर, अनुसयामाता मंदिर, देवदेवेश्वर मंदिर इ. धार्मिकस्थळे माहूरला आहेत. इतिहास प्रेमींसाठी रामगड उर्फ माहूरचा किल्ला, माहूर संग्रहालय, सोनापीर दर्गा, पांडवलेणी आणि राजे उद्धवराव उर्फ उदाराम देशमुख यांचा वाडा अश्या अनेक ऐतिहासिक वास्तुसुद्धा माहूरमध्ये आहेत.शिवकाळात औरंगजेबाच्या आदेशावरून स्वराज्यावर चालून आलेली मुघलांची मनसबदार पंडिता रायबाघन (राजव्याघ्री) उर्फ सावित्रीबाई ही सुद्धा माहुरची. सावित्रीबाई माहूरचे राजे उदाराम देशमुख यांची पत्नी. राजे उदाराम यांच्या मृत्युनंतर वऱ्हाड प्रांतात हरचंदराय नावाच्या सरदाराने बंड केले. हे बंड सावित्रीबाईने मोडून काढले व वऱ्हाड प्रांतातील मोघली अंमल कायम राहिला. सावित्रीबाईच्या ह्या कामगिरीवर खुश होऊन औरंगजेबाने सावित्रीबाईला ‘पंडिता’ आणि ‘रायबाघन’ हे दोन किताब बहाल केले.माहूर येथे रेणुकादेवीचे मुख्य स्थान असल्यामुळे वर्षभर माहूर भक्तांनी गजबजलेले असते. येथे येणारे सर्व भाविक रेणुकादेवीचे, अनुसयामातेचे (दत्तात्रयांची आई) आणि दत्तशिखर येथे दत्तात्रयांचे दर्शन घेऊन निघून जातात. माहूर येथे येणाऱ्या भाविकांपैकी बोटावर मोजता येतील एवढे भाविक माहूरच्या किल्ल्याला किंवा रामगडला भेट देतात. पण माहुर येथे असलेली लेणी पर्यटकांची वाट बघत असतात. माहूर येथील लेण्यांना पांडवलेणी म्हणून ओळखले जाते. पांडवलेणी माहूर एसटी स्थानकापासून जास्तीत जास्त १५ मिनिटावर असूनसुद्धा येथे फारसे कोणीही येत नाही.माहूर येथील लेणी उत्तराभिमुखी असून एका टेकडीत कोरलेली आहेत. लेण्यांकडे जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. लेणी साधारणपणे ६व्या ते ७व्या शतकात म्हणजे राष्ट्रकुट काळात कोरलेली आहेत. ही हिंदू लेणी असून लेणी संकुलात चार लेणी आहेत. संकुलाच्या मध्यभागी दगडी खांबांनी युक्त असे मोठे लेणे आहे. या लेण्याच्या दर्शनी भागात दोन पूर्ण स्तंभ आणि दोन अर्ध स्तंभ आहेत. वरांड्यातून मुख्य दालनात प्रवेश करताना सहा पूर्ण स्तंभ आणि २ अर्ध स्तंभ आपले लक्ष वेधून घेतात. या खांबांवर शंकर, पार्वती, दुर्गा, महिषासुरमर्दिनी आदी शिल्पे कोरलेली आहेत. पण खांबाना पांढरा रंग मारलेला असल्यामुळे मूर्ती पटकन ओळखता येत नाहीत. या दालनाला जोडून गर्भगृह आहे. गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. गर्भगृहाच्या दरवाज्यावर दोन्ही बाजूला द्वारपालांची भव्य शिल्प कोरलेली आहेत. गर्भगृहाला पूर्ण प्रदक्षिणा मारता येते.मुख्य लेण्याच्या डाव्या बाजूला दोन अर्धवट कोरलेली असून एका लेण्यात गणपतीची मूर्ती कोरलेली आहे, दुसरे लेणे रिकामे आहे. मुख्य लेण्याच्या उजव्या बाजूला असलेल्या लेण्यांच्या दर्शनी भागात दोन पूर्ण आणि दोन अर्ध स्तंभ आहेत. स्तंभांच्या पलीकडे मोठा वरंडा असून वरांडाच्या दोन्ही बाजूना विहार कोरलेले आहेत. हे दोन्ही विहार दिसायला सारखे असून दोघांच्याही दर्शनी भागात दोन पूर्ण आणि दोन अर्ध स्तंभ कोरलेले आहेत. या लेण्याच्या अंतर्भागात आणखीन तीन लेणी कोरलेली असून यात देवतांच्या मूर्ती पण कोरलेल्या आहेत. पण लेण्यात असलेल्या अंधारामुळे या मूर्ती पटकन दिसून येत नाहीत. या तिन्ही लेण्यात दगडी बाकसुद्धा कोरलेले आहेत.पांडव वनवासात असताना भीमाचे आणि हिडिंब राक्षसाचे युद्ध, भीम आणि हिडिंबेचा विवाह आणि घटोत्कचाचा जन्म याच पांडवलेण्यांच्या परिसरात झाला, असा स्थानिक लोकांचा समज आहे.
माहूर येथील धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे : श्री रेणुकामाता मंदिरपरशुराम मंदिरअनुसयामाता मंदिरदत्तशिखरदेवदेवेश्वर मंदिरमाहूर संग्रहालयरामगड उर्फ माहूरचा किल्ला, किल्ल्यात असलेले महालक्ष्मी मंदिरराजे उदाराम देशमुख वाडासोनापीर दर्गा.
जाण्याचे मार्ग: माहूर येथे जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक किनवट. किनवट पासून माहूर साधारणपणे २० कि.मी.वर. पण किनवट येथे फार कमी गाड्या थांबत असल्यामुळे शेगाव किंवा अकोले सोयीचे.
जेवण आणि राहण्याची सोय : माहूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे राहण्यासाठी भरपूर धर्मशाळा / भक्त निवास आणि जेवणासाठी भरपूर उपहारगृहे उपलब्ध आहेत.
टीप : उन्हाळ्यामध्ये ह्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे माहूरला भेट देण्यासाठी हिवाळा हा योग्य मोसम आहे.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक मूळपीठ असलेले श्री रेणुकामातेचे मंदिर, सती अनुसयामाता, प्रभू दत्तात्रयाचे जन्मस्थान, माहानुभव पंथीयांचे देवदेवेश्वर, हिंदू मुस्लीम धर्मियांचे श्रद्धास्थान बाबा सोनापीर, बाब शेख फरिद वझरा, पांडवलेणी, मराठवाड्यातील सर्वात मोठी तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्ती या सह सर्व देवदेवतांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या माहूर येथील रामगड किल्ल्याला मोठे महत्व आहे. पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने गडकिल्ले संवर्धन या योजने अंतर्गत या किल्ल्याच्या बुरुजाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर बुरुज पूर्णतः नव्याने बांधण्यात आला आहे. या बांधकामात पूर्वीसारखेच गुळ, चुना, बेल, तुरटी पंधरा दिवस भिजत घालून मिक्सरमध्ये रेतीसहित तुरटीचे पाणी टाकून काम करण्यात आले. याकामावर देगलूर व विदर्भातून दगड आणून कर्नाटक तेलंगना, आंध्रप्रदेश व महाराष्ट्रातील कारागीरांनी काम केले आहे.

ऐतहासिक पार्श्वभूमी असलेल्या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून २ हजार ६५० फुट तर ५७० मीटर उंची आहे. हा किल्ला ७० हेक्टर क्षेत्रामध्ये विस्तीर्ण आहे. सदरील किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून प्रसिद्ध आहे. या किल्ल्याचा अखेरचा तट यादव राजा रामदेवाने बांधल्याने त्यास रामगड नावाने ओळखल्या जाते.

महानुभव पंथाच्या साहित्यामध्ये येथील तलावाचा इतिहास मिळतो. मध्ययुगीन कालखंडाचा माहूर हा साक्षीदार आहे. त्यानंतर महामणीच्या ताब्यातून चौदाव्या शतकात हा किल्ला गोंडानी घेऊन आपल्या राजकीय सत्तेचे केंद्र बनविले त्यानंतर इमादशाही व निजामशाही यांच्या त्या परिसरामध्ये मोठी लढाई होऊन हा किल्ला निजामांच्या ताब्यात गेला. नंतर १७ व्या शतकात हा किल्ला मोघलांच्या ताब्यात गेला. माहूर किल्ल्याचे किल्लेदार उदारामजी पत्नी सरस्वती रायबागन ही शिवकाळातील प्रसिद्ध स्त्री होती. ही अतिशय शूरवीर होती. औरंगजेबाने तिला स्त्रीशार्दुल हा किताब देऊन सन्मान केला होता. या घराण्यातील लोकांनी किल्ल्यातील बऱ्याच वास्तू बांधल्याचा उल्लेख मिळतो. अठराव्या शतकात या किल्ल्याचा ताबा गोंडराजा शंकर शहाकडे गेला. हटकर आणि निजामात १८८२ मध्ये लढाई झाली त्यात इंग्रजांनी या किल्ल्यावर हल्ला करून हा किल्ला निजामांच्या ताब्यात दिला. तो स्वातंत्र्यप्राप्ती पर्यत त्यांच्याच ताब्यात असल्याचे इतिहासात नमूद असल्याचे आढळते. सदरील किल्ल्यात धनबुरुज, महाकाली बुरुज, निशाण बुरुज, पहिल्या तटात १९ व विस्तारित तटबंदीत अठरा बुरुज, हत्ती दरवाजा, झरोका महल, कारंजे व हौद, चीनीमहल, बारूदखाना, राणी महल , दर्गाह, मजीद इत्यादी, वास्तू आढळतात. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या किल्ल्याची बऱ्याच वर्षापासून पडझड सुरु झाली होती. व दरवर्षी पावसाळ्यात किल्ला ढासळत चालला होता.

काळाच्या ओघात किल्ल्यातील वस्तू जीर्णावस्थेत आलेल्या होत्या मुख्यत्वे मागील काही वर्षात निशाण बुरुजाचे मोठे नुकसान होऊन जवळपास हे बुरुज पूर्णपणे कोसळले होते. बुरुजावर पूर्वी झेंडा फडकविला जायचा मात्र बुरूज कोसळल्याने झेंड्याचे ठिकाण बदलून महाकाली बुरुजावर करण्यात आले. निशाण बुरुज किल्ल्यातील एक मुख्य वास्तू असून या बुरुजावरून माहूर शहर व परिसरात नजर ठेवणे सहज शक्य होत असे. परंतु ते ढासळल्याने हे महत्व लक्षात घेता पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने गडकिल्ले संवर्धन या योजने अंतर्गत बुरुजाचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सदर बुरुज पूर्णतः नव्याने बांधण्यात आला आहे. या बांधकामात पूर्वीसारखेच गुळ, चुना, बेल, तुरटी पंधरा दिवस भिजत घालून मिक्सरमध्ये रेतीसहित तुरटीचे पाणी टाकून काम करण्यात आले. याकामावर देगलूर व विदर्भातून दगड आणून कर्नाटक तेलंगना, आंध्रप्रदेश व महाराष्ट्रातील कारागीरांनी काम केले आहे. माहूर शहरात प्रवेश करताच किल्ल्याचा बुरुज भाविक व पर्यटकांच्या नजरेत स्पष्ट पडत असल्याने माहूरच्या सौंदर्यात भर पडली आहे.

विशेष म्हणजे हे काम पूर्ण झाल्याने माहूर तीर्थक्षेत्रावर पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. शहराचा ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने ही बाब माहूर शहराच्या इतिहासात अविस्मरणीय बाब ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया निसर्गप्रेमी व पर्यटनप्रेमी नागरिक व्यक्त करीत आहेत

No comments:

Post a Comment