"अहील्याराम"
अहिल्याबाई होळकरांनी त्यांच्या कारकिर्दीत देशात अनेक मंदिरे उभारली, नद्यांवर घाट बांधले. नाशिकमध्ये पण त्यांनी बरीच कामे केली.
त्यातील एक आहे अहिल्याराम मंदिर.१७८६ साली ह्या मंदिराचे बांधकाम पुर्ण झाले. हे मंदिर एका वाड्यात असल्याने त्याचा कळस बाहेरुन दिसत नाही.
सध्या लॉकडाऊन असल्याने मंदिर आपल्याला बंदच आहे. पण मागच्या महिन्यात मी या मंदिरात गेलो होतो.रामकुंडाजवळ असलेले हे मंदिर जरा उंचावर आहे. पंधरा वीस दगडी पायर्या चढुन गेल्यावर दिसला सुंदर लाकडी दरवाजा.अगदी नुकताच पॉलिश केलेला.आत गेल्यावर समोरच दिसते श्रीरामाची संगमरवरी सुंदर, गोजिरवाणी मुर्ती. चेहर्यावर मोहक हास्य.
हा आहे धनुर्धारी राम. इतर मंदिरात आपण पहातो की रामाच्या खांद्यावर धनुष्य असते.पण या मुर्तीत एक वेगळेपण आहे. श्रीरामाचे दोन्ही हात सरळ खाली आहेत. एका हातात धनुष्य आहे.. तर दुसर्या हातात बाण आहे.राम,लक्ष्मण, सितेच्या या मुर्ती एका सुबक,नक्षीदार शिसवी देव्हाऱ्यात स्थित आहेत. काही वर्षांपूर्वी काळाराम मंदिरात चांदीचे मखर,देव्हारा करण्याचे ठरवले.त्यावेळी तेथील ट्रस्टींनी येथे आवर्जून भेट दिली.चांदिचे मखर,देव्हारा बनवतात त्यांनी अहिल्याराम मंदिरातील डिझाइन डोळ्यासमोर ठेवले होते.
श्रीरामाच्या पायाजवळ खाली एका छोट्या कोनाड्यात अहिल्याबाई होळकरांची एक सुरेख मुर्ती आहे, तर समोर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ हनुमानाची मुर्ती आहे.
मंदिर थोडे उंचीवर असल्याने रस्त्यावरील रहदारीचा आवाज जाणवतही नाही.मी मंदिरात गेलो तेव्हा दुपारची वेळ होती. आत गेल्यावरच एक प्रकारची शितलता जाणवली. दगडी बांधणीचे मंदिर.. पुढच्या सभामंडपात असलेले लाकडी खांब..ओवर्या.. पडवीत झुलत असलेला झोपाळा..बाजुला असलेल्या खिडकीतून दिसणारा पंचवटीचा परीसर..
वातावरणात एक प्रकारचे पावित्र्य भरलेले होते.
मंदिराची मालकी क्षेमकल्याणी कुटुंबाकडे आहे. त्यांनी मंदिराची देखभाल, व्यवस्था अगदीच अप्रतिम ठेवली आहे.आज रामनवमी. श्रीरामाचा जन्मोत्सव थाटात साजरा होईल. पण आपल्याला तो अनुभवता येणार नाही.
पण घरातच थांबुन हे संकट दुर करण्यासाठी रामालाच विनवु या.कारण तोच तर या. संकटातुन आपल्याला बाहेर काढणारा आहे.
।।आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम्।।
।।लोकाभिरामं श्रीरामं
भूयो भूयो नमाम्यहम्।।
अर्थात..
सर्व आपत्तींचा नाश करणारा, सर्व संपत्ती देणारा, व लोकांना आनंद देणारा, असा जो श्रीराम.. त्याला मी पुनः पुनः नमस्कार करतो.
No comments:
Post a Comment