कोकणातील सावित्री नदीकाठी वसलेल्या महाड शहरातून परदेशांशी व्यापार चालत असे. महाडात उतरलेला माल अनेक घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठांत जात असे. ह्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी घाटमार्गाच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीवर व घाटमाथ्यावर अनेक किल्ले बांधण्यात आले .त्यापैकी मंगळगड उर्फ कांगोरी गड जावळीच्या खोर्यातील ६६४ मी उंच डोंगरावर जावळीच्या मोऱ्या कडून बांधण्यात आला. कांगोरी उर्फ मंगळगड हा किल्ला जावळीच्या खोर्यातील भोप घाट, कामाथा घाट ,वरंध घाट व अस्वल खिंड यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी व व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आला. उंच डोंगर, घनदाट जंगल व खोल दर्यांनी नटलेला आहे. महाबळेश्वर,वासोटा, मकरंदगड, मंगळगड, चंद्रगड, प्रतापगड, कावळा किल्ला व पारघाट यांच्या दाटीत जावळीच खोर वसलेल आहे.
पूर्वपश्चिम लांबी १४८५ फूट व दक्षिण-उत्तर रुंदी २६४ फूट असलेल्या मंगळगडाचे प्रवेशद्वार सुस्थितीत नाही. प्रवेशद्वाराबाजूचे भग्न बुरुज आणि तटबंदी मात्र अजुन शाबूत आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूची वाट बालेकिल्ल्याकडे जाते व डाव्या बाजूची वाट पूर्वपश्चिम पसरलेल्या माचीवर जाते. माचीवर कांगोरी देवीचे मंदीर आहे. मंदीराकडे जाताना उजव्या हाताला दगडात खोदून काढलेल पाण्याच टाके लागते. या टाक्यात उतरण्यासाठी दगडात खोदून काढलेल्या पायर्या आहेत.
डाव्या हाताला दगडात कोरलेल पण आता बुजलेले टाक दिसत. या टाक्याजवळ किल्ल्यावर सापडलेल्या अनेक मुर्ती ठेवलेल्या आहेत. कांगोरी देवीचे मंदिर दगडी जोत्यावर बांधलेले आहे. १० पायर्या चढून मंदिरात गेल्यावर प्रवेशद्वाराची विटांनी बनवलेली अर्धवर्तुळाकार कमान दिसते. देवळावरील मुळ छत काळाच्या ओघात नष्ट झालेल आहे. गाभार्यात भैरवाची व कांगोरी देवीची अशा दोन दगडी मूर्त्या आहेत. मंदीराच्या गाभार्याबाहेर भिंतीला टेकून दगडी भग्न मूर्त्या ठेवलेल्या आहेत.
मंदिराच्या मागील बाजूस गेल्यावर आपण अरुंद होत जाणार्या माचीच्या टोकावर पोहचतो. या माचीला दोनही बाजूंनी तटबंदी बांधून काढलेली आहे. माचीच्या टोकावर विस्तिर्ण अर्धगोलाकार बुरुज व ध्वजस्तंभ आहे. माचीच्या या टोकावरुन विस्तिर्ण प्रदेश दृष्टीक्षेपात येतो.
माचीवरुन बालेकिल्ल्याकडे जाताना कड्याच्या टोकाला एक अरुंद पाण्याचे टाक दिसत. बालेकिल्ल्यावर पाण्याच विस्तिर्ण टाक आहे. तेथून वर चढून गेल्यावर दोन वाड्यांचे अवशेष दिसतात. त्यातील एका वाड्याच दगडी जोते फक्त शिल्लक आहे, दुसर्या वाड्याच्या पडक्या भिंतीही शाबूत आहेत. वाड्याच्या मागील वाट आपल्याला पश्चिम टोकावरील बुरुजावर घेऊन जाते. किल्ला चढताना किल्ल्याचे नाक सतत दिसत असते. त्या नाकावर आपण पोहचलेलो असतो. बालेकिल्ल्याला फेरी मारतांना अजून दोन पाण्याची टाक दिसतात. यात बारमाही रुचकर पाणी असते. बालेकिल्ला उतरुन माचीवरील प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. कांगोरी गडावरून दक्षिणेकडे कामथे खोरे , महादेव मुऱ्हा चा डोंगर दिसतात . तर पश्चिमेला रायरेश्वर व कोळेश्वर डोंगर दिसतात . गडावरून मकरंदगड, प्रतापगड, रायगड, लिंगाणा, असे किल्ले दिसतात. तसेच रायरेश्वर, कोळेश्वर आणि महाबळेश्वरची पठारेही दिसू शकतात
१५ जानेवारी १६५६ रोजी शिवाजी महाराजांनी जय्यत तयारीनीशी जावळीवर हल्ला केला व जावळी ताब्यात घेतली. त्याबरोबर ८ जानेवारी १६५८ रोजी कांगोरी गड, ढवळगड ( चंद्रगड ), रायरी इत्यादी किल्लेही महाराजांच्या ताब्यात आले. मुरारबाजीसारखा कसलेला योध्दा मिळाला. कांगोरीगडाची डागडूजी करुन त्याचे नाव बदलून ‘‘मंगळगड’’ ठेवले. स्वराज्यांची राजधानी रायगडच्या जवळ असल्यामुळे याचा उपयोग राजकीय गुन्हेगारांना तुरुंगवासात ठेवण्यासाठी केला गेला. संभाजी महाराजांचा वध केल्यावर औरंगजेबाने इतिकदखान उर्फ जुल्फीकारखानास रायगड घेण्यास सांगितले. रायगडाच्या वेढ्यातून राजाराम महाराज निसटून वासोट्यामार्गे पन्हाळगडावर गेले. त्यांचा एकनिष्ठ सेवक गिरजोजी यादव रायगडाहून सोने व मौल्यवान वस्तु वेढ्यातून सहीसलामत बाहेर काढून मंगळगडाच्या आश्रयाला आले व तेथून चीजवस्तु काढून पन्हाळ्याला नेल्या. रायगडची नाकेबंदी करण्यासाठी मार्च १६८९ मध्ये खानाने आजूबाजूचे किल्ले व प्रदेश ताब्यात घेतला.त्यावेळी मंगळगड मोघलांच्या ताब्यात गेला. इ.स १६९० मध्ये छ. राजाराम महाराजांचे अमात्य रामचंद्रपंत यांनी ‘मंगळगड’ जिंकून घेतला. इ.स. १७७४ च्या एप्रिलमध्ये रायगडाच्या शिंबदीने कांगोरीवर स्वारी केली, याचे कारण बिरवाडी येथील निम्मा अंमल 'रायगडचा' व निम्मा कांगोरीचा असा होता.तर्फ बिरवाडीचा अंमल पेशव्यांनी जप्त केल्याने कांगोरकर रागावले आणि त्यांनी दंगे करुन रायगड परिसरात उपद्रव देण्यास सुरवात केली. कांगोरीकरांशी दोन तीन चकमकी झाल्यानंतर हा दंगा मिटला.
इ.स. १७७५ -७६ मध्ये येथे चोरट्यांचा उपद्रव झाल्यानंतर त्याचा बंदोबस्त रायगडाच्या शिंबदीने केला. इ.स. १७७९ मध्ये श्यामलने म्हणजे जंजिर्याच्या सिद्दीने रायगड परिसरात दंगे आरंभले तेव्हा त्याचा बंदोबस्त करण्याचे काम रघुनाथ सदाशिव याने केले.त्यावेळी मंग़ळगड उर्फ कांगोरी गडावरील शिंबदी मदतीला आली.
इ.स. १७७८-७९ मध्ये रायगड सुभ्यातील २४४ गावे होती. ती पेशव्यांनी जप्त करुन तात्पुरते परत घेतले.त्यापैकी तर्फ बिरवाडीची ६ गावे पंतप्रतिनिधींच्या ताब्यात असून ती कांगोरी संरजामास लावून दिली.
इ.स. १७८१-८२ मध्ये मंगळगडकर यांच्याशी बिरवाडीकडील वसुलीवरुन पुन्हा वाद आणि चकमक झाली.
इ.स. १० फेब्रुवारी १८११ मध्ये सातारा छत्रपती प्रतापसिंह यांचा भाउ चतुरसिंह यांनी पेशव्यांविरुध्द उठाव केल्याने पेशव्यांचा ( दुसर्या बाजीराव ) सेनापती त्रंबक डेंगळे यांनी त्याला मालेगाव येथे अटक केली.चतुरसिंह १८१२ मध्ये कांगोरी किल्ल्यावर कैद होता.कैदेत असताना १५ एप्रिल १८१८ रोजी त्याचा मृत्यु झाला.
इ.स.१८१७ मध्ये सरदार बापू गोखल्यांनी मद्रास रेजीमेंट मधील कर्नल हंटर व मॉरीसन हे इंग्रज अधिकारी हैदराबादहून पुण्यास येत असताना वाटेत उरूळी येथे अटक करुन मंगळगडावर कैदेत ठेवले होते. पुढे बापु गोखले यांच्या हुकुमावरुन त्यांना वासोटा किल्ल्यावर नेउन ठेवण्यात आले.पुढे वासोटा इंग्रजांनी घेतला तेव्हा त्यांची सुटका झाली.
मे १८१८ मध्ये इंग्रजांनी रायगडला वेढा दिला असता मंगळगडावरून एक तुकडी रायगडाच्या संरक्षणासाठी आली असता बिरवाडीजवळ तिची इंग्रज सैन्याबरोबर लढाई झाल्याचा उल्लेख आढळतो. इ.स. १८१८ मध्ये रायगडच्या पराभवानंतर कर्नल प्रोर्थर या इंग्रज अधिकाऱ्याने हा किल्ला ताब्यात घेतला.
No comments:
Post a Comment