सिन्नर शहरातील गोंदेश्वर मंदिर हे भूमिज शैलीतले महाराष्ट्रातले तुलनेने उशिरा निर्माण झालेले मंदिर. १३ व्या शतकातले. हे मंदिर बांधले गेले तेव्हा देवगिरी ही राजधानी होती. मात्र त्याही आधीचे म्हणजे यादव हे मांडलिक असतानाचे आणि देवगिरी हे यादवांची राजधानी नसतानाहीच्या कालखंडात एक मंदिर सिन्नरात बांधले गेले होते. ते दुर्लक्षित मंदिर म्हणजे सरस्वती नदीच्या किनारी असलेलं ऐश्वर्येश्वराचे. ह्यालाच आयेश्वर मंदिर असेही म्हणतात. यादव आईरमदेव ह्याने हे बांधले असावे असे मानले जाते.
हे आयेश्वराचं मंदिर दिसायला अगदी लहानसं आहे. किंचित वेगळ्या शैलीच. द्रविड आणि वेस्सर अशा मिश्र शैलीचं. मूळचं शिखर आज गायब आहे त्यामुळे शैली नीटशी ओळखता येत नाही. ऩक्षीदार स्तंभांवर तोललेला सभामंडप, पुढे अंतराळ आणि मग गर्भगृह अशी त्याची रचना आहे. गाभाऱ्यात पिंड आणि त्यासमोरील मंडपात नंदी विराजमान दिसतो. मंदिराच्या सभामंडपाचे स्तंभ उत्कृष्ठ नक्षीकामाचा नमुना आहेत. हे स्तंभ सरळ आहेत, इतर मंदिरांप्रमाणे वर चौकटीजवळ निमुळते झालेले नाहीत. गर्भगृहाच्या बाह्य अंगावर काही भग्न शिल्प आपल्याला दिसतात पण दगडांच्या झालेल्या झिजेमुळे ती नीटशी ओळखता येत नाहीत. या मंदिराच्या गर्भगृहाच्या द्वारावर दगडात कोरलेले अप्रतिम मकर तोरण हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.
No comments:
Post a Comment