Followers

Wednesday 21 April 2021

गोवा उर्फ हर्णेचा किल्ला

 गोवा उर्फ हर्णेचा किल्ला

postsaambhar :';प्रशांत महादेव साळुंखे













दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळ 3 किल्ल्यांचा समूह आहे. कनकदुर्ग, फत्तेगड व गोवा किल्ला. हे किल्ले हर्णे समुद्रातील ‘सुवर्णदुर्ग’ किल्ल्याच्या रक्षणार्थ बांधले गेलेले आहेत हे मात्र खात्रीशीर सांगता येते. त्यातील गोवा किल्ला हा आकाराने सर्वात मोठा आहे. तसेच बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत आहे.
हर्णे बंदराला जाणाऱ्या रस्त्यालाच हा किनारी दुर्ग आहे. गडाला दोन दरवाजे आहेत, एक जमिनीवरचा व दुसरा समुद्राकडील बाजूस. सध्या मात्र वापर जमिनीवरच्या दरवाजाचा जरी होत असला तरी मुख्य दरवाजा हा समुद्राकडीलच आहे. दरवाजातून आत गेल्यावर उजव्या हाताला एक पाण्याचे टाके दिसते. त्याच्या शेजारीच मुख्य दरवाजाची आतील बाजू आपणास पहावयास मिळते. दरवाजा सध्या चिर्यांनी बंद केला आहे दरवाजास दोन्ही बाजूस दोन पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. दरवाजाच्या वर जाण्यास पायऱ्या आहेत. तटावरून गडफेरी करता येते, मात्र बऱ्याच ठिकाणी तट ढासळलेला आहे दरवाजा पासून पुढे जाताना उजव्या व डाव्या बाजूस चौथ-याचे अवशेष दिसतात. गडाच्या डावीकडील उंचवट्या च्या भागात ब्रिटिश काळातील इमारती आहेत समोरच मोठी विहीर आहे, पण विहिरीत उतरण्यास पायऱ्या जरी असल्या तरी झाडींच्या गचपणामुळे आत उतरता येत नाही.
पुढे दोन बुरुजांमधून बालेकिल्ल्याचा दरवाजा आहे बालेकिल्ल्याचा परिसर आटोपता आहे मात्र येथून सुवर्णदुर्ग, फत्तेदुर्ग व कनकदुर्ग चा विहंगम परिसर दिसतो.
गडाला जवळजवळ 14 बुरुज आहेत. येथे आपली गडफेरी पूर्ण होते मात्र गडाचे मुख्य आकर्षण पाहायला आपल्याला गडाबाहेर जावे लागते.
दरवाजातून बाहेर पडल्यावर डावीकडे समुद्राच्या बाजूने तटाकडेने गेल्यावर समोर येतो तो गोमुखी पद्धतीने दोन बुरुजात लपवलेला महादरवाजा. बुरुजांच्या पडलेल्या दगडांवरून गेल्यावर दरवाज्याजवळ उजवीकडे संकटमोचन हनुमान शिल्प भिंतीवर दिसते, आता तिथे घुमटीवजा छोटे मंदिर आहे. दरवाज्याच्या कमानीवर गंडभेरुंड आहे खाली शरभ शिल्पे दिसतात इथेच डावीकडे खाली असणाऱ्या शिल्पात मात्र दुर्मिळता जाणवते. शिल्पात तीन कुत्र्यांनी एकमेकांचे गळे आपल्या जबड्यात पकडले आहेत व पायात २ हत्ती पकडले आहेत तर हत्तींनी आपापल्या सोंडानी दुसऱ्या हत्तीच्या शेपट्या पकडल्या आहेत असा हा अद्भूत अभेद्य दरवाजा पाहायला जास्त कोणी फिरकत नाही हीच खरी खंत आहे.
या किल्ल्यावरून सुवर्णदुर्गाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.या किल्ल्यावरून सूर्योदय व सूर्यास्त पाहणे हा एक विलोभनीय अनुभव असू शकतो.
१८६२ च्या पाहणीत हा किल्ला व्यवस्थित होता व किल्ल्यावर जुन्या ६९ तोफा होत्या आणि त्या तोफांची संरक्षणव्यवस्था पाण्यासाठी 19 शिपाई होते, अशी नोंद मिळते. सध्या मात्र इथे एकही तोफ पाहायला मिळत नाही.

No comments:

Post a Comment