हम्पी
– इतिहासाला पडलेलं एक सुंदर स्वप्नं. एकदा तुम्ही हम्पीला गेलात की हे
सुंदर स्वप्नं सुरु होतं....आणि तुम्हाला दिसू लागतो १६व्या शतकातला
वैभवशाली विजयनगर साम्राज्याचा सुवर्णकाळ....जसजसं तुम्ही हम्पीच्या
मळलेल्या वाटांवर चालायला सुरुवात करता तसतसं हे स्वप्नं धूसर व्हायला
लागतं आणि दिसू लागतात भग्न हम्पीच्या इतस्ततः विखुरलेल्या हजारो खाणाखुणा
आणि शिळाचे डोंगर. जर नीट कान देऊन ऐकलं तर इथली प्रत्येक शिळा काही न काही
मनोगत सांगते.
तुंगभद्रेच्या
तीरी अशाच एका कोपऱ्यात पडलेली ही शिळा. या शिळेवर कुणा एक कलाकाराने
देखणी सूर्यप्रतिमा कोरली. कोण असेल तो अनामिक कलाकार, तुंगभद्रेच्या
पात्रात का कोरली असेल त्याने इतकी देखणी मूर्ती...... सराव म्हणून
.......का नदीच्या तीरावर निवांत पडल्या पडल्या सहज वाटलं असेल त्याला
...... का सूर्याचं ध्यान करताना त्या कलाकाराच्या हातून आपोआप निर्माण
झाली असेल ही मूर्त....
एका
सुंदर प्रभावळीमध्ये अतिशय साध्या परंतु रेखीव रथावर द्विभुज सूर्यदेव उभे
आहेत. त्यांच्या हातात अर्धवट उमललेली कमळे आहेत. त्यांचा सात घोड्यांचा
रथ अरुण सारथी ओढत आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य हे की सारथी आणि घोडे समोर
नसून उजवीकडे आहेत. एकाच बाजूस असलेले सातही घोडे त्रिमितीत दाखवण्याचे
कौशल्य कलाकाराने खुबीने साधले आहे. हे कमी म्हणून की काय, एवढ्याश्या
जागेत वाऱ्याने उडणारा सूर्याचा शेलादेखील त्याने दाखवला आहे.
अशा बोलक्या शिळा तुम्हाला हम्पीमध्ये जागोजागी सापडतील….. हां .....त्यासाठी पुष्कळ तंगडतोड करायची मात्र तयारी हवी......
No comments:
Post a Comment