दौलताबाद येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यावर नव्या सात लेणी सापडल्या आहेत. यापैकी एक लेणे सुस्थितीत असून इतर पाच लेणी जमिनीखाली आहेत. एका लेण्याचे छत ढासळलेल्या अवस्थेत आहे. ही जैन लेणी असल्याचे इतिहासकारांचे मत आहे. पुरातत्त्व विभागाच्या साफसफाईत ही लेणी आढळली. शेकडो वर्षांपासून देवगिरी किल्ल्यात दडलेली सात लेणी सापडली आहे.
औरंगाबादपासून जवळच असलेल्या दाैलताबाद येथील देवगिरी किल्ला पर्यटकांसाठी सध्या बंद अाहे. या काळात पुरातत्त्व विभागाने किल्ल्याची साफसफाई सुरू केली. याच दरम्यान शेकडो वर्षांपासून झाडाझुडपात लपलेली सात लेणी समोर आली आहेत. त्यापैकी एक लेणे सुस्थितीत असून एका लेण्याचे छत ढासळले आहे.इतर पाच लेणी जमिनीच्या खाली आहेत. इतिहासकारांच्या मते या जैन लेणी आहेत. एक हजार वर्षांपूर्वी ११३७ मध्ये यादव राजवटीत या कोरल्या गेल्या असाव्यात. किल्ल्यावरचा हा भाग सात टाकी म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे.
किल्ल्यावरील मेंढा तोफेच्या समोर रंगमहाल आहे. त्याच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर जंगलासारखी झुडपे वाढलेली अाहेत. शिवाय खोल खंदकही आहे. त्यामुळे हा रस्ता अनेक वर्षांपासून बंद होता. अाता पर्यटकांची वर्दळ नसल्याने पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक मिलनकुमार चावले यांनी किल्ल्यावर साफसफाई मोहीम सुरू केली आहे. हे काम सुरू असताना या ठिकाणी लेणी असल्याचे समोर अाले. तिथे जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता करण्याचे काम पुरातत्त्व विभागाने सुरू केले आहे.
याशिवाय किल्ल्याच्या परिसरात असलेल्या शाही हमाम, पुरातन मशीद, कचेरी, चिनी महल या ठिकाणी जाण्यासाठीही रस्ते तयार करण्यात येत आहेत. किल्ल्यांच्या उंच भिंतीवर उगवलेली झुडपे काढण्याचे कामदेखील सुरू आहे. दौलताबाद किल्ल्याचे संरक्षण सहायक संजय रोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र घाटे, अशोक निंभोरे, सुखदेव नीळ, गौरख बनकर, मोहंमद इजाज, पंडित वाबळे, कुशीनाथ खोसरे, सिद्धार्थ कुमार व इतर कर्मचारी या नव्या कामासाठी परिश्रम घेत आहेत.
काही इतिहासकारांच्या मते किल्ल्यावर ७० जैन मंदिरे होती. काही राजवटीत याची तुटफूट झाली. या मंदिराचे काही स्तंभ सध्या भारतमाता मंदिरात पाहायला मिळतात. लेण्यांच्या जवळ मोठमोठे रांजणही आहेत. या ठिकाणी गंधक ठेवण्याची व्यवस्था असावी. या लेण्यांना लागून खंदकातून बाहेर पडण्यासाठी एक दरवाजादेखील आहे. महादेवाच्या पिंडीचे भग्न अवशेषदेखील या ठिकाणी आहे.
Source : "प्रभात"
No comments:
Post a Comment