Followers

Wednesday, 31 March 2021

उदगीर किल्ला

 www.durgbharari.com
UDGIR FORT मराठवाडयातील किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला सोलापुर,औसा,परांडा,उदगीर, कंधार यासारखे एकापेक्षा एक बलदंड व भक्कम भुईकोट पहायला मिळतात. हे सर्व किल्ले आजही सुस्थितीत असुन या किल्ल्यांची रचना महाराष्ट्रात इतरत्र आढळणाऱ्या भुईकोट किल्यांपेक्षा खुपच वेगळी आहे. मराठवाडयातील हा प्रांत सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेपासुन दुर असून बहुतांशी सपाट मैदानी प्रदेशाचा व लहानमोठया टेकड्यांचा आहे. सह्यादीच्या भागांपेक्षा हा भाग पुर्णपणे वेगळा असल्याने त्या अनुषंगानेच येथे किल्ल्याची रचना केली गेली. येथे सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांचे नैसर्गिक सुरक्षा कवच नसल्याने किल्ला लढवय्या बनविण्यासाठी त्याला जाडजुड दुहेरी अथवा तिहेरी तटबंदी बांधुन संपुर्ण किल्ल्याभोवती खंदक खोदण्यात आले. इतकेच नव्हे तर किल्ल्याला एकामागे एक अशी दरवाजाची साखळी रचुन आत जाण्याचा मार्ग दुष्कर केला गेला. हे सर्व पहायचे असेल तर लातुर जिल्ह्यातील उदगीर शहरात असलेल्या


उदगीर किल्ल्याला भेट द्यायलाच हवी. उदगीर किल्ला लातुर शहरापासुन ६८ कि.मी.अंतरावर असून उदगीर हे रेल्वेस्थानक असल्याने ट्रेनने देखील तेथे जाता येते. उदगीर रेल्वे स्थानकापासुन किल्ला फक्त १.५ कि.मी. अंतरावर असून तेथे जाण्यासाठी रिक्षाची सोय आहे. उदगीर शहर देखील कधीकाळी तटबंदीच्या आत वसल्याच्या खुणा गावातुन जाताना पहायला मिळतात. किल्ल्याकडे जाताना या नगरदुर्गाचे दोन दरवाजे व चौबारा म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या चौकातील जुन्या काळातील पाणपोई पहात आपण गावाबाहेर असलेल्या किल्ल्यासमोर पोहोचतो. किल्ल्याची बांधणी परकोट, खंदक व दुहेरी तटबंदीने बंदीस्त किल्ला अशी तीन भागात केलेली असुन किल्ल्याच्या दरवाजासमोरील भागात परकोट उभारलेला आहे. परकोटाचा पुर्वाभिमुख दरवाजा आतील चार वास्तु व एक लहान तलाव वगळता परकोटाची तटबंदी व इतर सर्व वास्तु पुर्णपणे नष्ट झाल्या आहेत. परकोटाच्या दरवाजावर कमान व आतील देवडी वगळता कोणतेही कोरीवकाम दिसुन येत नाही. परकोटातील एका वास्तुत खापरी नळ व पाण्याचे लहान टाके पहायला मिळते. हि वास्तु बहुदा हमामखाना अथवा पाणी पुरवठा करण्यासाठी असावी. दुसरी वास्तु खंदकाच्या काठावर बांधलेली असुन त्यातुन खंदकात जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे. किल्ल्याचा दरवाजासमोरील हा भाग जमिनीपासून वेगळा करण्यासाठी २० फुट रुंद व २५ फुट खोल खंदक खोदण्यात आलेला आहे. हा खंदक दोन्ही बाजुंनी दगडांनी बांधून काढलेला आहे. पुर्वी या खंदकावर काढता-घालता येणारा लाकडी पुल असे आता मात्र यावर कायम www.durgbharari.com

नागपुरचा किल्ला

 

NAGPUR FORT नागपूर शहराच्या महाल भागात गोंड राजाचा किल्ला म्हणुन ओळखला जाणारा

नागपुरचा किल्ला आहे. हा किल्ला आहे म्हणण्यापेक्षा होता असे म्हणणेच जास्त योग्य ठरेल कारण एक दरवाजा वगळता किल्ला म्हणावा असे या किल्ल्याचे कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. जुन्या नागपुरात महालामधील कल्याणेश्वर मंदीर व दरवाजा प्रसिद्ध आहे. कल्याणेश्वर दरवाजा पार करून पुढे गेल्यावर उजव्या बाजुस एक लहान गल्ली आहे. या गल्लीतच किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. कधीकाळी या किल्ल्याभोवती पाण्याने भरलेले खंदक व तटबंदीत अनेक बुरुज असल्याचे वाचनात येते पण वाढत्या शहरीकरणामुळे विदर्भाच्या इतिहासातील एका मोठया कालखंडाचा साक्षीदार या गल्लीत लुप्त झाला आहे. यातील एक बुरुज अगदी अलीकडील काळापर्यंत शिल्लक होता पण आज तोदेखील दिसत नाही. किल्ल्यास उत्तरेच्या असलेल्या मुख्य दरवाजाची कमान आजही शिल्लक असुन या दरवाजावर पर्शियन भाषेत कोरलेला शिलालेख आहे. दरवाजातुन साधारण २०० फुटांवर राजवाड्याचा लाकडी दरवाजा आहे. दरवाजाच्या आतील बाजुस भग्नावस्थेतील राजवाडा आहे. राजवाड्याचे आवारात संगमरवरी बांधकामातील कारंजे असून एक विहीर पहायला मिळते. गोंड राजाच्या किल्ल्याचे आता आपल्याला इतकेच अवशेष पहायला मिळतात. महाल भागाची भटकंती करताना आपल्याला भोसले यांचा राजवाडा व इतर काही जुने वाडे व मंदिरे पहायला मिळतात. यशिवाय वेशीच्या तटबंदीत जुम्मा दरवाजा, कल्याण दरवाजा व इतर दोन दरवाजे पाहायला मिळतात. मध्य प्रदेशातील राणी दुर्गावतीच्या काळात गढा−मंडला येथील गोंडचे राज्य चांगलेच विस्तारले होते. इ.स.१५६४ सालच्या अकबराच्या स्वारीनंतर या राज्याचे चंद्रपूर आणि देवगड या राज्यांत विभाजन झाले. देवगडचे गोंड घराणे मूळचे हरया किंवा हरयागड येथील होते. या घराण्यातील जातबा या कर्तृत्वान पुरुषाने देवगड ही राज्याची जागा निवडली. गढ्याच्या राजाने मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारल्यानंतर जातबाही मांडलिक बनला. अकबराच्या काळात तो २०००स्वार, १०००० पायदळ व १०० हत्तींचा सेनापती असल्याचे वर्णन आइने-ए-अकबरीत येते. त्याचे स्वतःचे नाणे त्या काळात चालत असे. राज्याच्या सीमा नागपुरपर्यंत वाढल्यावर त्याने नागपुरात किल्ला उभारून ठाणे बांधले. जातबानंतर त्याचा मुलगा केसरीशहा उर्फ कोकशाह गादीवर आला. कोकशाहने खंडणी न दिल्याने सन १६३७ मध्ये शाहजहानचा सरदार खानदौरान याने नागपुरपर्यंतचा प्रदेश ताब्यात घेतला. यावेळी नागपूरच्या किल्ल्यावर हल्ला करून किल्ल्याचे तीन-चार बुरूज सुरुंग लावून उडवून दिले. www.durgbharari.com

Wednesday, 24 March 2021

२० मार्च १६६९ नखलचा किल्ला...

 


२० मार्च १६६९ नखलचा किल्ला...
हा किल्ला मस्कत ह्या राजधानीपासून १२० किलोमीटर अंतरावर आहे.. हा किल्ला “सल्तनत ऑफ ओमान” ह्या देशात असून “अल बतिनाह” भागातील सर्वात महत्वाचा किल्ला आहे...
किल्ल्यात सुंदर संग्रहालय असून ते 'मिनिस्ट्री ऑफ हेरिटेज अँड कल्चर' कडून चालविले जाते ह्या किल्ल्याला आजून एक नाव आहे 'ह्यूसन अल हिम' ह्या किल्ल्याचा इतिहास पूर्व-इस्लामिक कालखंडातील आहे हा किल्ला अत्यंत प्राचीन असून इतिहासकारांच्या मते हा साधारण १५०० वर्षांपूर्वीचा आहे...
ह्या किल्ल्याचे 'नखल' हे नाव तिथे असणाऱ्या नखल ह्या प्राचीन गावावरून पडले आहे शतकानुशतके ओमान मधील बऱ्याच शासकांनी किल्याचा विस्तार आणी नुतनीकरण केले किल्यात सुधारणा केल्याची सर्वात जुनी नोंद हि ९ व्या शतकातील आहे ती सुधारणा इमाम सलत बिन मलिक अल खसुरी ह्यांनी केली किल्ल्याचा आजून विस्तार हा तेथील यामादि, नभानी, आणी यरुबी ह्या जमातींनी (tribe) केला १७ व्या शतकात ह्या किल्याचे बरेच पुनर्वसन झाले...
निझवा ह्या प्रादेशिक राजधानी पासून जवळच्या व्यापार मार्गांसाठी संरक्षणात्मक उपाय म्हणून ह्या किल्याचा वापर केला गेला वादी बनी खारुस चे इमाम (धर्म गुरु ह्यांचं मोठं वर्चस्व असायचं) आणी यराबा वंशाचे इमाम ह्या किल्ल्यात राहत होते नखल किल्ल्यातील सर्वात अद्वितीय वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे तो एकसमान आकाराचा नाही किल्ल्याचे बांधकाम हे उंच अश्या खडकांवर असल्याने किल्ल्यात बरेच चढ उतार आहेत ह्या उंच खडकांमुळे किल्ल्याची भव्यता छान दिसते किल्यात बरीच बांधकाम असून त्यात प्रामुख्याने एक मशीद, एक विहीर किल्लेदाराची कोठी, महिलांच्या राहायच्या खोल्या लहान मुलांच्या खोल्या, सैनिकांसाठीच्या खोल्या, किल्ल्यातील दरबाराची कोठी, आन धान्य साठवायचा खोल्या आणी कैद्यांचे तुरुंग असे अनेक प्रकार आहेत...
“छत्रपती शिवाजी महाराज” आणि ओमानचे संबंध :
ह्याच नखल किल्ल्याचे इमाम ‘सुलतान बिन सैफ’ ह्यांनी पोर्तुगिजांचा बिमोड करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची मदत घेऊन आपल्याकडे मस्कतवरून अरबी आरमार पाठविले होते...
मुंबईकर इंग्रज सुरतेला २० मार्च १६६९ ला पत्र लिहितात कि.., “मस्कतहून ताजी बातमी अशी आली आहे कि १९ मोठी आणि ५-६ छोटी मिळून ४००० लोक असलेले एक अरबी आरमार हिंदुस्तानच्या किनाऱ्याकडे निघून गेले काहींच्या मते हे आरमार शिवाजीराजास मदत करण्याकरीता म्हणून जात असावे...”
मुंबईकर इंग्रज सुरतेला परत ९ फेब्रुवारी १६७४ ला पत्र पाठवितात कि: “अशी दाट बातमी आहे कि ओमानच्या आरमाराने पोर्तुगिजांचा थेट वसईच्या कोटा पर्यंत मुलुख उध्वस्त केला...”
शिवाजीराजे ही जमिनीवरून पोर्तुगीजांवर हल्ला चढविण्याच्या तयारीत आहे त्यामुळे पोर्तुगीज फारच पेचांत सापडल्याने संकटात पडले आहेत तसे पहिले तर अरबांनी तहाच्या अटी पाठविल्या पण त्यांचा इन्कार केल्याने पोर्तुगीजांची हि आपत्ती ओढवली आहे ४०० आरबी सैनिक किनाऱ्यावर उतरून वसईच्या कोटा पर्यंत त्यांनी बरीच नासधूस केली आहे बरेच चर्च, गावे आणी शहराची जाळपोळ केली पोर्तुगीज त्यांना तोंड देण्यास धजावले नाहीत.. मस्कती सैन्य ५ दिवस राहून लूट करून मस्कतला निघून गेले त्यामुळे प्रोतुगीजांची फार नाचक्की झाली आहे...

Saturday, 20 March 2021

दुर्लक्षित खांबटाके.

 




दुर्लक्षित खांबटाके.
जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी व लेण्याद्री या दोन गावाला जोडणारी एक पुर्व पश्चिम डोंगरांग आहे. याच डोंगररांगेत पश्चिमेला बल्लाळवाडी लेणी (सुलेमान लेणी) समुह पहावयास मिळतो एक खिंड असून एक कच्ची वाट लेण्याद्रीकडुन जवळचा रस्ता म्हणून जाते. जेव्हा आपण या डोंगराच्या खिंडीत पोहोचतो तेथेच हे पाय-या असलेले पुर्व पश्चिम एक तीन खांब असलेले खांबटाके निदर्शनास पडते. आतील एक खांब तुटलेला असून हे टाके व पाय-या गाडलेल्या असल्याने त्याची खोली व विस्तार किती असेल हे निश्चित सांगणे कठीण आहे. या टाक्यातील माती काढून स्वच्छ केले तर उन्हाळ्यात वन्यजिवांच्या पाण्याचा प्रश्न पावसाळ्यात पाणी साचून नक्कीच सुटेल असे वाटते? आपणही एकदा या टाक्यास भेट द्या व जमलेच तर नक्कीच त्यास साफ करून संवर्धन करण्यासाठी योगदान द्या. यापासून ऐतिहासिक वारसा जतन होईल व वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय पण होईल.🙏🙏
लेख/छायाचित्र रमेश खरमाळे, माजी सैनिक
८३९०००८३७०

बॅरन लँड म्हणून संबोधला गेलेले कातळपड आणि पोटखराबा क्षेत्र

 

*प्रागैतिहासिक – ऐतिहासिक – नैसर्गिक बाबींनी परिपूर्ण
महाराष्ट्रातील सर्वात मोठे पर्यटन क्षेत्र बनण्याची क्षमता असलेला प्रदेश*.
वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक भुदृश्य लाभलेला सडा
गोवळ - बारसु - पन्हाळे - सोलगाव - देवाचे गोठणे
( राजापूर लॅटेराइट सरफेस )
क्षमता संधी आणि पर्यावरण पूरक शास्वत विकास
कोकणात सडा म्हंटले तर डोळ्यासमोर उभे रहाते ते वैराण, रखरखीत भूप्रदेशाचे दृश्य. सरकारी दप्तरी अकारण















बॅरन लँड म्हणून संबोधला गेलेले कातळपड आणि पोटखराबा क्षेत्र. असा हा कोकणातील सडा आजूबाजूच्या प्रदेशाचे अर्थकारण बदलू शकेल ? आपला विश्वास बसणार नाही. पण त्याचे उत्तर आहे होय. याचे कारण आपण ह्या सडयांकडे आणि आजूबाजूच्या परिसराकडे खऱ्या अर्थाने आपण कधी पाहिलेच नाही .
जांभा खडकांचे कातळ सडे हे दक्षिण कोकणाचे खास वैशिष्ट्य. या सड्यांपैकी स्वतःचे वेगळेपण जपणारा सडा म्हणजे राजापूर तालुक्यातील बारसु, गोवळ, देवाचे गोठणे , सोलगाव परिसरातील सडा. या भागाला भौगोलिक भाषेत राजापूर लॅटेराइट सरफेस असे ओळखले जाते.
कोकणातील जांभा दगडाचा (Laterite) विशेषतः इथला द्वितीयक (secondary) जांभ्याने बनलेला पठाराचा ( Lateritic Plateau ) भाग अनेक दृष्टीने वेगळा आहे. कोकणच्या भूशास्त्रीय आणि सागर पातळीतील बदलांच्या इतिहासाच्या संदर्भात राजापूरच्या या सड्याला वेगळेच महत्व आहे. ह्या सड्याचे भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे द्वितीयक जांभा दगडाचा सर्वाधिक जाड थर या सड्याला लाभला आहे. जांभा दगडाचा एवढा जड थर भारतात अन्यत्र कोठेही आढळून येत नाही. हा सडा आपल्या पोटात मुबलक भूजल साठे बाळगून आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बारसु, सोलगाव या गावातून वाहणारे बारमाही ओढे, पाट. नैसर्गिक जलव्यवस्थापना उत्तम नुमना या सड्याच्या कुशीत पहायला मिळतो, हा सडा म्हणजे निसर्गाचा एक विलक्षण आविष्कारच आहे.
दक्षिणेकडे राजापूर , पन्हाळे , गोवळ तर नैऋत्य - वायव्येस देवाचे गोठणे, उत्तर दिशेस सोलगाव ही गावे या सड्याच्या कुशीत वसली आहेत. या सड्यावरील मध्य भागात असलेल्या खोलगट भागात बारसु हे गाव वसले आहे. त्या त्या गावाच्या नजीकच्या सड्याला त्या गावच्या नावाने ओळखले जाते. वैशिष्ट्यपूर्ण अशा या भूप्रदेशातील देवाचे गोठणेच्या गावच्या सड्यावर आपणास ‘चुंबकीय विस्थापन’ हे निसर्ग नवल अनुभवयास मिळते. सुमारे 500 चौरस मीटर परिसरात होकायंत्रातील चुंबकसुई अयोग्य दिशा दर्शन करते. ज्ञात माहिती नुसार द्वितीयक जांभा दगडात मोठ्या प्रमाणांत चुंबकीय विस्थापन दर्शविणारी ही जगातील एकमेव जागा आहे. त्याच बरोबर या सड्यावर पृथ्वीच्या जडघडणीचे साक्षीदार असलेले लाखो वर्षांपूर्वीचे जिवाष्म देखील आढळून आले आहे .
या संपूर्ण सड्यावर अष्मयुगीन मानव निर्मित कातळ खोद चित्ररूपी नवलाचा खजिना मोठ्या प्रमाणात आढळून येतो. सुमारे 60 चौरस किमी क्षेत्रफळाच्या या सड्यावर विविध ठिकाणी सुमारे 160 पेक्षा अधिक कातळ खोद चित्र आढळून येतात. या खोद चित्रांमध्ये मोठे वैविध्य आढळून येते. देवाचे गोठणे या गावाच्या सड्यावर विविध ठिकाणी मिळून 10 पेक्षा अधिक खोद रचना आहेत. त्यात काही मनुष्याकृती कोरल्याचे दिसून येते. बारसु - पन्हाळे भागात 60 पेक्षा अधिक चित्र रचना आहेत. या भागातील तारवाच्या सड्यावर आशिया खंडात आढळून येणाऱ्या सर्वात मोठ्या खोद चित्र रचनांपैकी एक चित्ररचना आढळून येते. तब्बल 57 फूट लांब व 14 फूट रुंदीच्या या रचने सोबत विविध खोद चित्र रचनांचा समूह येथे आढळून येतो. याच भागात थोड्या दूर असलेल्या भौमितिक रचना आपल्या तर्कशक्तीला आव्हान देतात. या बारसू च्या सड्यावरून राजापूर तालुक्याच्या सह्याद्री आणि समुद्र या दोन्ही नैसर्गिक सीमांचे दर्शन होते.
गोवळ परिसरातील सड्यावर सुमारे 45 पेक्षा अधिक चित्र रचनांचा समूह आहे. प्राणी पक्षी, भौमितिक रचना यांनी हा परिसर व्यापलेला आहे.
सोगमवाडी , सोलगाव या गावांच्या सड्यावरील चित्र रचनांमध्ये मोठ्या आकाराच्या प्राण्यांचे दर्शन होते .येथील रचना वास्तवातील त्या प्राण्यांच्या आकाराशी साधर्म्य साधणाऱ्या आहेत. या चित्र रचनांमधील गवा रेडा, हत्ती, एक शिंगी गेंडा यांच्या रचना तत्कालीन कालखंडातील भौगोलिक परिस्थिती आणि हवामानावर यांच्या भाष्य करण्यास पुरेश्या बोलक्या आहेत. या दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे 30 पेक्षा अधिक खोद चित्र रचना आढळून येतात. हजारो वर्षांचा मानवाचा इतिहास उलगडून सांगणाऱ्या या कातळ खोद रचना आणि आपल्या अंगावर या रचना बाळगणारा सडा महत्वपूर्ण आहे म्हणणे अधिक योग्य.
वेगवेगळ्या ऋतूमध्ये आपले वेगवेगळे रूप दाखविणारा हा सडा पावसाळ्यात विलोभनीय रूप धारण करतो. सड्यावर पाण्याची लहान मोठी तळी निर्माण होतात. सगळा परिसर हिरवा शालू आपल्या अंगावर धारण करतो. जवळपास 30 पेक्षा अधिक गवताच्या प्रजाती आणि 150 पेक्षा अधिक प्रजातींच्या रंगीबेरंगी कातळ फुलांनी हा परिसर खुलून जातो. हे सौन्दर्य अनुभवताना आपण भारावून जातो. पावसाळ्यात सड्यावर एक आगळी वेगळी परिसंस्था अनुभवायास मिळते. ही परिसंस्था आजूबाजूच्या फळांच्या बागा, शेती आणि मानवी जीवन यांसाठी पूरक आणि अत्यंत महत्वपूर्ण आहेत.
या सड्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे अनेक ठिकाणी शेती योग्य भागांची निर्मिती झाली आहे. गेल्या काही वर्षांपर्यंत मोठ्या प्रमाणत शेती केली जात होती. आजही काही प्रमाणात सड्यावर शेती केली जाते. पशुपालन करणाऱ्या माणसांसाठी हा सडा तर अत्यंत महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे या सड्याचा कुशीतून वाहणारऱ्या खाडी किनारी असणारा प्रदेश वैशिष्ट्यपूर्ण पिकांसाठी ओळखला जातो. गोवळ गावात तयार होणारी वांगी खूप प्रसिद्ध आहेत. या गावातून येणाऱ्या दिवसाच्या पहिल्या बसगाडीला ‘वांगी एक्सप्रेस’ नावाने ओळखले जाते. भाजीच्या नावावरून बस सेवेला पडलेले नाव तसे दुर्मिळच म्हणावे लागेल.
उन्हाळ्याच्या दिवसात रखरखीत भासणाऱ्या दक्षिण कोकणातील सड्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. पावसाचे पडणारे अधिक तर पाणी हे सडे आपल्या पोटात सामावून घेतात. आणि हे पाणी पुढे जवळपास वर्षभर सड्याचा कुशीतील गावांची पाण्याची तहान भागवतात. सड्यांवर मातीचे प्रमाण कमी असले तरी सड्यांच्या उताराच्या बाजूंवर मात्र मिश्र जंगले आढळून येतात. या जंगलांची जागा आता आंबा काजूच्या बागांनी घेतली आहे. राजापूरच्या या भागात देखील मिश्र जंगले आणि खूप मोठ्या प्रमाणात आंबा काजूच्या बागा आहेत. या बागांचे उत्पप्न संपूर्णपणे परिसरातील सड्यांवरील परिसंस्थेवर अवलंबून आहे हे दुर्लक्षून चालणार नाही.
सह्याद्री मध्ये उगम पावून पश्चिमेकडे वाहणारी अर्जुना नदी , राजापूर शहरापासून पुढे राजापूरची खाडी हे नाव धारण करते. ही खाडी बारसु- पन्हाळे सड्याचा दक्षिण कुशीतून वाहत देवाचे गोठणे भागात झोकदार वळण घेत उत्तर दिशेकडे वळते. ( कोकणातील खाड्यांचे हे अजून एक वैशिष्ट्य ) पुढे जैतापूर जवळ परत एकदा पश्चिमेकडे वळत आंबोळगड जवळ समुद्राला मिळते. राजापूर लॅटेराईट सरफेस नावाने भौगोलिक भाषेत ओळखल्या जाणाऱ्या या सड्याचा कुशीत वसलेले राजापूर हे इतिहास काळात एक महत्वाचे व्यापारी बंदर होते. याच कारणाने या सड्याचा कुशीत अनेक ऐतिहासिक बाबी पहावयास मिळतात. राजापूरची गढी, राजापूर बंदर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देतात. धबधब्याच्या शेजारी असलेले 400 वर्षांचा इतिहास लाभलेले धुतपापेश्वर मंदिर आणि परिसर आपल्याला एक वेगळी अनुभूती देऊन जातो. देवाचे गोठणे गावात कोकणाचा आद्य निर्माता भगवान परशुराम म्हणजेच भार्गवराम मंदिर आहे. चारशे वर्षांचा इतिहास लाभलेले हे मुघल आणि मराठा मिश्र शैलीतील हे मध्ययुगीन मंदिर. मंदिराच्या कडेला बारमाही वाहणारा ओढा, सड्यावर घेऊन जाणारी प्राचीन पाखाडी. सर्वच परिसर आंनद देणारा.
सड्यावरील विस्तीर्ण रानमाळ , सड्याच्या उतारावरील मिश्र जंगल, कुशीत वाहणारी अर्जुना नदी / राजापूरची खाडी , या सड्याचा मधोमध दोन भाग करणारा बारसु जवळील खोलगट भाग , तिथून वाहणारा बारमाही वहाळ या परिस्थितीमुळे संमिश्र परिसंस्था या परिसरात पहावयास मिळते. सुमारे 150 पेक्षा अधिक विविध जाती प्रजातींचे पक्षी, सुमारे 40 पेक्षा अधिक प्राणी तेवढ्याच संख्येने आढळून येणारे सरीसृप या परिसराची जैवविविधता परिपूर्ण करतात.
जगाच्या पाठीवर वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मिळ अशी सुमारे 160 पेक्षा अधिक अष्मयुगीन कातळ खोद चित्र, धोपेश्वर मंदिर, भार्गवराम मंदिर, पाखड्या यांसारख्या ऐतिहासिक वास्तू, खाडीतील जावे बेट , अमाप निसर्ग सौन्दर्य, सुमारे 10 किमी लांबीची खाडी याबाबी पर्यटन क्षेत्राचे अनेक पैलू उलगडतात.
वारसा पर्यटन, निसर्ग पर्यटन, जल पर्यटन, साहसी पर्यटन, अशी अनेक पर्यटनाची दालने या परिसरात सामावलेली आहेत. पर्यटन विषयावर आधारित खुले आकाश दर्शन , प्री हिस्टोरीक पार्क, फळ प्रक्रिया केंद्र असे अनेक प्रकल्प या भागात उभे राहू शकतात. शेती आणि बागायती यांना कृषी पर्यटनाची जोड देणे शक्य आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार आणि आर्थिक उलाढाल निर्माण होऊ शकते.
यासाठी काय करावयास हवे , सड्यावरील जागतिक वारसा स्थळात समाविष्ट होण्याची क्षमता बाळगणारी कातळ खोद चित्र ठिकाणे एकमेकाला सुयोग्य मार्गाने जोडणे. ( युनेस्को जागतिक वारसा स्थळ दर्जा मिळण्यासाठी आवश्यक कारवाई सुरवात झाली आहे. त्यात या स्थळांचा देखील समावेश आहे.) ही चित्र ठिकाणे एकमेकाला जोडणे म्हणजे गोवळ, देवाचे गोठणे, सोलगाव, सोगमवाडी आणि राजापूर ही गावे एकमेकाला कमी अंतराने जोडणेच आहे. त्याचा फायदा फक्त खोद चित्र रचनांना नाही तर परिसरातील सर्व गावांना होऊ शकेल. सड्यावरील शेती, बागायती यांना खूप मोठा उपयोग होऊ शकेल. पर्यटकांना सर्व ठिकाणी जाणे सहज शक्य होईल. याचाच वापर सायकलिंग ट्रॅक म्हणून सुद्धा होऊ शकेल ही बाब पर्यटकांना आकर्षित करणारी आहे. या मार्गाच्या बाजूने विशिष्ठ प्रकारची झाडे लावल्यास , हा मार्ग पहाण्यासाठी देखील पर्यटक येउ शकतील. चित्रपट माध्यमांना देखील पुरेसा लँडस्केप या परिसरात आहे.
कृषी पर्यटन, होम स्टे , तंबू निवास यांसारख्या बाबीना प्राधान्य देउन आलेल्या अभ्यागतांची निवास व्यवस्था निर्माण करता येउ शकेल. त्याचा फायदा निश्चितच स्थानिकांना होईल. स्थानिक कला, खाद्य संस्कृती यांना चालना मिळेल. यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने रोजगार निर्माण होईल. प्रत्येक हातात काम करण्याची आणि स्वरोजगार निर्मितीची संधी यामध्ये सामावलेली आहे. अर्थात त्याचा सकारात्मक परिणाम परिसरातील अर्थव्यवस्थेवर होईल यात शंका नाही.
हा परिणाम घडविण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे स्थानिकांची मनोभूमिका आणि सहकार्य. जे आहे तसे जपण्याची तयारी. डेव्हलमेंट सारख्या जडजड शब्दाच्या मागे न धावता पूरक गोष्टींची निर्मिती. नियमांच्या गुंतवळ्यात न अडकता प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्ती आणि स्थानिकांना सोबत घेत काम करण्याची शासनाची आणि प्रशासनाची भूमिका. या गोष्टी घडल्या तर हा परिसर महाराष्ट्रातील एक सर्वात मोठे पर्यटन स्थळ बनेल यात शंका नाही. यातून पर्यावरण व परिसंस्थेचे रक्षण होईलच आणि शास्वत विकासाची कासही धरता येईल. यातून या परिसराचे अर्थकारण पालटून जाईल.
तसे पहाता पूर्णगड ते राजापूर ह्या भागाकडे सांस्कृतिक वारसा जतन करणारा एक विलक्षण भूशास्त्रीय प्रदेश म्हणूनच बघणे इष्ट आहे. भारतातील एक मोठे पर्यटन क्षेत्र बनण्याची क्षमता या परिसरात आहे. या बाबींचा आदर राखत पर्यावरण पूरक विकासाच्या संकल्पना राबविणे गरजेचे आहे. निसर्गयात्री संस्था सदस्यांच्या शोध कार्यातून आणि चालू असलेल्या कामातून आज हजारो पर्यटकांनी या परिसराला भेट दिली आहे देत आहेत. यात परदेशी पर्यटकांचा, अभ्यासकांचा देखील आहेत ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. संस्था सदस्यांच्या कामातून या परिसराची ओळख जगाला झाली आहे. आणि यासाठी संस्था सदस्य स्वखर्चाने अविश्रांत मेहनत घेत आहेत. यांच्या प्रयत्नांना साथ देउन पर्यावरण पूरक शास्वत पर्यटन विकास साधायचा का ?
वारसा आणि निसर्ग स्थळांचा आदर राखून त्याला पर्यटन क्षेत्राची जोड देत आर्थिक विकास साधणारी अनेक उदाहरणे आज आपल्या डोळ्यासमोर आहेत. अर्थात तिथल्या बाबींचे अंधानुकरण करणे देखील योग्य नाही. आपल्या परिसराचा परिपूर्ण अभ्यास करून त्याला पूरक गोष्टी राबविणे गरजेचे आहे.
वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक भुदृश्य असलेला सडा इथल्या मानवी जीवनाचा गाभा आहे. भारत देशाचा आणि एकूणच मानवी उत्क्रांतीचा खूप मोठा सांस्कृतिक ठेवा आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या दृष्टीने बहुमोल आहे.
म्हणूनच हा सडा येथील परिसरातील अर्थकारण बदलण्याची क्षमता बाळगून आहे. गरज आहे ती दृष्टीकोनाची. आणि एकमेकांना पूरक साथीची.
सुधीर ( भाई ) रिसबुड, रत्नागिरी
( श्री सुधीर रिसबुड, श्री धनंजय मराठे आणि डॉ सुरेंद्र ठाकुरदेसाई यांनी या सड्यावरील जवळपास सर्व कातळ खोद चित्र शोधून जगासमोर आणली आहेत तसेच देवाचे गोठणे येथील चुंबकीय विस्थापनाचा देखील शोध लावला आहे, त्याच बरोबर त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 72 गावातून 1500 पेक्षा अधिक कातळ खोद चित्र रचनांचा शोध घेतला आहे. आणि या भागाचा सविस्तर अभ्यास चालू आहे ) संस्थेच्या माध्यमातून या खोद चित्रांच्या संरक्षण संवर्धनासाठी देखील सातत्याने प्रयत्न चालू आहेत. दोन तीन ठिकाणी पर्यटन प्रकल्प उभारण्याचे कामही हाती घेतले आहे.

Sunday, 14 March 2021

#किल्ले_ब्रह्मगिरी #दुर्ग_भांडार

 









































#किल्ले_ब्रह्मगिरी
#दुर्ग_भांडार
०७/०३/२०२१
नाशिक म्हटले कि सर्वप्रथम आपल्यासमोर उभे राहते ते तिर्थक्षेत्र गोदावरी नदीकाठचा सिंहस्थ कुंभमेळा, शिर्डीचे साईबाबा, त्र्यंबकेश्वरमधील ज्योतिर्लिंग मंदिर, कुशावर्त तिर्थ,संत निवृत्तीनाथांची समाधी, पंचवटीतील काळाराम मंदिर, सप्तश्रृंगी गड असे अनेक क्षेत्रं आहेत.तसेच महाराष्ट्रातील सर्वात उंचीवर असलेले गडकिल्ल्याचा मान नाशिक जिल्हालाच मिळतो.आमच्या #Dream_Adventureclub च्या माध्यमातून किल्ले ब्रह्मगिरी दुर्ग भ्रमंतीची मोहिम आयोजित करण्यात आली होती.नेहमी प्रमाणे वीस जण होते.शनिवारी रात्री अकराच्या दरम्यान ठाण्यावरून नाशिक कडे प्रस्थान केले.ते पहाटे साडेचार वाजता मजल दर मजल करत त्र्यंबकेश्वर गावात पोहोचलो.पोहोचल्या पोहोचल्या फ्रेश होऊन त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ हे नैसर्गिक पाण्याचे झरे असलेले कुंड सन १७५० मध्ये बांधण्यात आले आहे गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वतावरून लुप्त झाल्यानंतर ह्या ठिकाणी प्रकट होते अशी लोकांची श्रद्धा आहे.अगोदर येतील दर्शन घेऊन मग बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेले त्र्यंबकेश्वरांचे मनोभावे दर्शन होऊन दिवसाची सुरूवात अगदी प्रसन्न झाली.त्यानंतर गड पायथाला असलेले दत्तादादांचे हाॅटेल भवानी मध्ये नाश्ता करून सर्वांची ओळख परेड घेऊन गड चढाईस सुरूवात केली.
पायथापासूनच गडाच्या माचीपर्यत पायर्यांची वाट गडावर जाते.वाटेवर ठिक ठिकाणी छोटी हाॅटेल आहेत.सर्वप्रथम वाटेत छोटेखानी श्री दुर्गामाता मंदिर आहे.दहा- पंधरा मिनिटे चालल्यावर उजवीकडे एक पायवाट गंगाव्दार कडे जाते.कातळातील गुफामध्ये श्री कोलंबिका मंदिर,१०८ महादेव मंदिर आणि श्री गहिनीनाथ महाराज यांची गुफा आहे.हे पाहून पुन्हा मागे वळून पाहिल्या वाटेवर यायचे.पुन्हा आठ दहा मिनिटांच्या अंतरावर मुलतानी लालचंद जसोदानंदन भंभाणी (पंजाब) यांनी सन १९१३ मध्ये बांधलेली धर्मशाळा आहे.त्याच्याच पाठिमागे साधारण ७० पायर्यांची बारव (stepwell) आहे.हे बघून पुन्हा पायर्याच्या वाटेने चढून गेल्यावर मध्येच कातळात कोरलेल्या हमुमानाची मुर्ती लागते.त्यापुढे कातळात देवीची मूर्ती कोरलेली आहे.याच ठिकाणी खायला काहीतरी मिळेल या आशेवर माकडे अगदी अंगावर येऊन बसतात.हातातील बॅग, पिशवी खेचण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे येथून जाताना जर संभाळूनच जावे लागते.साधारण दिड तासाच्या पायपीटनंतर पायर्याची वाट चढून आल्यावर आपण प्रथम प्रवेशद्वारातुन गड माचीवर प्रवेश करतो.दरवाज्याच्या दोन्ही बाजूला व्दारपालांसाठी देवड्या आहेत.पायर्यांची वाट संपल्यावर वरती डाव्या बाजूला अज्ञात व्यक्तींच्या समाध्या आहेत.तसेच पाण्याची टाकी आहेत.येथून वीस मिनिटात आपण भारत सरकारच्या वतीने लावलेल्या फलकाजवळ म्हणजेच गडमाथ्यावर पोहोचतो.ब्रम्हगिरी ऊर्फ त्रिंबकगडाचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठार आहे. या ठिकाणाहून डावीकडून वाट गोदावरी नदीच्या उगमस्थानी जाते तर उजवीकडून जटामंदीराकडे जाते.आम्ही सर्वप्रथम डावीकडील वाटेने मुळगंगा(गोदावरी नदीच्या)उगमस्थानी पोहोचलो.अगोदर सतीशीळेचा दगड लागतो त्यानंतर ब्रह्मगिरीचे मुख्य मंदिर,गंगा गोदावरी मंदिर,श्री चक्रधर स्वामी मंदिर या सर्व मंदिरांमध्ये दर्शन घेऊन जटामंदिराकडे निघालो.१० मिनिटांतच आपण दुसर्या मंदिराजवळ पोहोचतो. याच ठिकाणी शंकराने आपल्या जटा आपटून गोदावरी नदी भूतलावर आणली.या मंदिराच्या पाठीमागून वाट दुर्ग भांडार या गडाकडे जाते.या वाटेने जाताना दोन पाण्याची टाकी लागतात.त्यापुढे उभ्या कातळातील चिरा चिरून पायर्याची वाट बनवली आहे.अगदी गडाच्या पोटात जात असल्याचा भास होतो.सुरूवातीलाच श्री हनुमानाची दगडात कोरलेली मुर्ती आहे.तसेच पायर्या उतरून खाली गेल्यावर आपण एका दरवाजातून बाहेर पडतो.मध्ये दोन बाजूला खोल दरी असलेला नैसर्गिक पुल(दुवा) आहे.हे पार केल्यावर पुन्हा कातळात खोदलेल्या पायऱ्यांनी दुर्ग भांडार गडावर जाता येते.हे दोन्ही दगडी जिने बघून आपण अचंबित होऊन जातो.या गडावर दक्षिण टोकाला एक बुरुज आहे.तसेच दोन पाण्याची टाकी आणि काही घरांचे अवशेष दिसतात.हे सर्व बघून आल्यावाटेने पुन्हा जटामंदिराकडे जाऊन गड उतार व्हावे. चारच्या सुमारास त्र्यंबकेश्वर गावात पोहोचलो.जेवण करून संत निवृत्तीनाथांच्या दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु झाला.
ब्रह्मगिरी जाणून घ्यावयाचा असेल तर आपल्याला पुरातन काळात जावे लागते.ऐवढा मोठा इतिहास या ब्रह्मगिरी पर्वताचा आहे.सर्वप्रथम ब्रम्हगिरी हे नाव कसे पडले, यामागे सुद्धा एक आख्यायिका आहे. एकदा विष्णू ब्रम्हदेवाला म्हणाले की, पुष्कळ तप केले परंतु अजूनही शिवाचे ज्ञान मला झाले नाही तेव्हा त्या दोघांनी ठरविले की, ब्रम्हाने शिवाच्या मस्तकाचा शोध लावायचा आणि विष्णूने त्याच्या चरणांचा शोध लावायचा. पण पुष्कळ शोध घेऊनही त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत. त्यांनी केतकी आणि पुष्प यांची खोटी साक्ष उभी केली आणि ब्रम्हाने सांगितले की मी महादेवाचा शोध लावला आणि केतकीच्या फुलाने व दुधाने त्याचा अभिषेक केला. शिवाने कृद्ध होऊन गायीलाही शाप दिला. त्यावर ब्रम्हदेवाने शिवाला प्रतिशाप दिला की, भूतलावर पर्वत होऊन राहशील. रागाचा हा आवेग ओसरल्यावर त्याने शाप मागे घेतला आणि त्याने भूतलावर पर्वताचे रूप घेतले आणि त्याचे नाव ब्रम्हगिरी ठेवले.या किल्ल्यावरून उगम पावणारी गौतमी गंगा ऊर्फ गोदावरी या ठिकाणाहून दक्षिणवाहिनी होते, त्यामुळे तिला दक्षिणगंगा असेही म्हणतात. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील किल्ल्यांचे उल्लेख पुराणातही आढळतात. गोहत्येचे पातक दूर करण्यासाठी गौतम ऋषींनी ब्रम्हगिरीवर तपश्चर्या केली व महादेवाला प्रसन्न करून घेतले. त्यानंतर शंकराच्या जटेतल्या गंगेची मागणी गौतम ऋषींनी केली, पण गंगा मात्र राजी नव्हती तेव्हा शंकराने आपल्या जटा ब्रम्हगिरीवर आपटल्या व गंगा भूमंडळी आणली. गौतमांचं गोहत्येचं पाप निवारण करून गाईलाही सजीव केलं म्हणून तिचं नाव पडलं गोदावरी. सिंहस्थ काळात जेव्हा गुरू सिंह राशीत असतो, तेव्हा सर्व देव देवता, नद्या, सरोवरे, तीर्थ गोदावरीत वास करतात, त्यामुळे सिंहस्थात गोदावरीला जास्त महत्त्व आहे.
इ.स. १२७१ - १३०८ त्र्यंबकेश्वर किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरावर देवगिरीचा राजा रामचंद्र याच्या भावाची राजवट होती. मोगल इतिहासकार किल्ल्याचा उल्लेख नासिक असा करतात. पुढे किल्ला बहमनी राजवटीकडे गेला. तिथून पुढे तो अहमदनगरच्या निजामशहाकडे गेला. इ.स. १६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड करून हा किल्ला व आजूबाजूचा परिसर जिंकला. मोगल राजा शाहजान याने ८ हजाराचे घोडदळ हा परिसर जिंकण्यासाठी पाठवले. इ.स. १६३३ मध्ये त्रिंबक किल्ल्याचा किल्लेदार मोगलांकडे गेला. इ.स. १६३६ मध्ये शहाजी राजांचा माहुली येथे पराभव झाल्यावर त्रिंबकगड मोगलांचा सेनापती खानजमान ह्याच्या हवाली केला. इ.स. १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने त्रिंबक किल्ला जिंकून घेतला.इ.स. १६८७ मध्ये मोगलांच्या अनेक ठिकाणी आक्रमक हालचाली चालू होत्या. याच सुमारास मोगलांचा अधिकारी मातबर खान याची नासिक येथे नेमणूक झाली. १६८२ च्या सुमारास सुमारास मराठ्यांची फौज गडाच्या भागात गेल्याने खानजहान बहाद्दरचा मुलगा मुझ्झफरखान याला मोगली फौजेत नेमण्यात आले. याने गडाच्या पायथ्याच्या तीन वाड्या जाळून टाकल्या. १६८३ च्या फेब्रुवारी महिन्यात राधो खोपडा हा मराठा अनामतखानाकडे जाऊन मराठयांना फितुर झाला. त्याच्यावर बादशाही कृपा झाली, तर तो मोगलांना त्रिंबकगड मिळवून देणार होता. या राधो खोपड्याने त्रिंबक किल्ल्याच्या किल्लेदाराला फितुर करण्याचा प्रयत्न केला, पण किल्लेदार त्याला वश झाला नाही. तो संभाजी महाराजांशी एकनिष्ठ राहिला. राधो खोपड्याचे कारस्थान अयशस्वी झाल्यामुळे त्याला मोघलांनी कैद केले. पुढे १६८४ मध्ये नोव्हेंबर महिन्यात अकरमतखान आणि महमतखान यांनी त्रिंबकगडाच्या पायथ्याच्या काही वाडया पुन्हा जाळल्या व तेथील जनावरे हस्तगत केली. १६८२ आणि १६८४ मध्ये मोगलांनी किल्ला घेण्याचा हरप्रकारे प्रयत्न केला, पण तो फसला. इ.स. १६८८ मध्ये मोगल सरदार मातबरखानाने ऑगस्ट महिन्यात किल्ल्याला वेढा घातला. त्याने औरंगजेबाला पत्र पाठविले आणि त्यात तो म्हणतो, ’‘त्र्यंबकच्या किल्ल्याला मी सहा महिन्यांपासून वेढा घातला होता किल्ल्याभोवती मी चौक्या वसविल्या आहेत. सहा महिन्यांपासून किल्ल्यामध्ये लोकांचे येणे जाणे बंद आहे. किल्ल्यामध्ये रसदेचा एकही दाणा पोहोचणार नाही याची व्यवस्था मी केली आहे. त्यामुळे किल्ल्यातील लोक हवालदील होतील आणि शरण येतील’’.यावर बादशहा म्हणतो, ‘‘त्र्यंबकचा किल्ला घेण्याचा हरप्रकारे प्रयत्न करावा, त्याचे चीज होईल हे जाणावे.’’ यानंतर मातबार खान किल्ला कसा घेतला, हे औरंगजेबाला पत्रातून कळवितो, ‘ गुलशनाबाद नाशिकच्या ठाण्यात आमचे सैन्य फार थोडे होते. या भागात मराठ्यांच्या हालचाली सुरू झाल्याच्या बातम्या पसरल्या ही परिस्थिती पाहून मी त्र्यंबकच्या किल्लेदाराला बादशाही कृपेची आश्वासने दिली. ८ जानेवारी १६८९ त्र्यंबक किल्ल्याचे अधिकारी तेलंगराव व श्यामराज हे किल्ल्यावरून खाली उतरले. आपल्या कृपेने त्र्यंबकचा किल्ला आमच्या ताब्यात आला. तेलंगराव व श्यामराज यांना कोणत्या मनसबी द्यावयाच्या याचा तपशील सोबतच्या यादीवरून दिसून येईल. त्याची अर्जी आणि किल्ल्याच्या किल्ल्या या काका मनसबदार भावाबरोबर पाठविल्या आहेत, त्या पहाण्यात येतील’.याशिवाय मातबरखान म्हणतो, ‘‘त्र्यंबक किल्ल्याच्या मोहिमेत औंढा किल्ल्याचा श्यामसिंग, याचा मुलगा हरिसिंग याने जमेतीनशे कामगिरी केली आहे. त्याच्या बरोबर तीनशे स्वार व हजार पायदळ देऊन मी त्याला त्र्यंबकचा किल्ला सांभाळण्याच्या कामावर नेमले आहे. नवीन किल्लेदार नेमून येईपर्यंत तो हे काम सांभाळील.’‘ मातबरखान या पत्रात अशी मागणी करतो,’‘साल्हेरचा किल्ला नेकनामखान याने असोजी कडून ताब्यात घेतांना त्याला जशी बक्षिसी आणि मनसब देण्यात आली, तशीच बक्षिसी आणि मनसब त्र्यंबकचा किल्लेदार तेलंगराव व श्यामराज यांना दयावी.’’ किल्ला ताब्यात आल्यावर औरंगजेब फर्मान पाठवितो, ‘‘मातबरखानाने जाणावे की तुमची अर्जी पोहोचली. आपण त्र्यंबकचा किल्ला जिंकून घेतला असून त्र्यंगलवाडीच्या किल्ल्याला वेढा घातला असल्याचे कळविले आहे. त्र्यंबकच्या किल्ल्या आपण पाठविल्या त्या मिळाल्या तुमची कामगिरी पसंत करण्यात येत आहे. तुमच्या स्वत:च्या मनसबीत पाचशेची वाढ करण्यात येत आहे. तुम्हाला खिलतीचा पोशाख, झेंडयाचा मान आणि तीस हजार रूपये रोख देण्यात येत आहे.’’
पुढे १६९१ च्या सुमारास या भागात मराठयांचे हल्ले वाढले. पुढे या भागातील अधिकारी मुकबरखान बादशहास कळवितो, ‘‘त्र्यंबकच्या किल्लेदाराचा मृत्यु झाला आहे. त्याचा मुलगा लहान आहे, तो कर्जबाजारी आहे. सावकाराचा तगादा चालू आहे. त्रिंबकगड सांभाळणे शक्य नाही. कोणीतरी उमदा आणि अनुभवी मनुष्य किल्लेदार म्हणून पाठवावा, नाहीतर किल्ल्यावर भयंकर संकट कोसळेल.’’ इ.स १७१६ मध्ये शाहूने किल्ल्याची मागणी मोगलांकडे केली, पण ती फेटाळली गेली. इ.स. १७३० मध्ये कोळयांनी बंड करून तो घेतला. पुढे १८१८ पर्यंत तो पेशव्यांच्या ताब्यात होता.
प्राचीन काळात महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणारा एक मार्ग याच रांगेतून जात असे, म्हणून त्याच्या संरक्षणासाठी ब्रम्हगिरी किल्ला उभारला गेला होता.ब्रह्मगिरी आणि दुर्ग भांडार हे दोन्ही किल्ल्यांची संपूर्ण गडफेरी करून पायथ्याला यायला किमान पाच तास लागतात.गडावरून अंजनेरी आणि हरिहर किल्ले दिसतात.त्र्यंबकेश्वर गावाला आता मंदिराचे शहरच म्हणावे लागेल कारण येथे लहान मोठी मंदिरासमोर विविध संस्थाचे मठ आहेत.हे सर्व बघायला एक दिवसही कमी पडेल. त्र्यंबकेश्वरांगावात दत्ता मढे 9689015835 यांच्या कडे चहा-नाश्ता जेवणाची सोय होते तसेच जर कुटुंब सहित गेलात तर हरिभाऊ गुंड ७३५०८६०५७० यांच्या कडे फ्रेश होण्यासाठी रूम मिळतात.
ऐतिहासिक माहिती आभार :- शिवमुद्रा अप्लिकेशन
✍️ शैलेश ज्ञानदेव तुपे